पाटील v/s पाटील - भाग १०

Submitted by अज्ञातवासी on 11 January, 2019 - 04:21

मागचा भाग लिहीत असताना खरंच मी ब्लँक झालो होतो आणि शिवाय मोबाईलवर लिहीत होतो, त्यामुळे भाग छोटा झाला.

भाग ९ - https://www.maayboli.com/node/68628

"सर असे का शून्यात बघत बसले आहात."
"सहज बसलोय व्यास."
"नाही तुम्ही असे बसलात ना, इशाबाळासारखे मंद वाटतात, म्हणून!"
मोहन ताड्कन उठला. "व्यास तुम्ही ती सिरीयल पाहून माझं डोकं खातात. तुमचा तो पायजामे ना उद्या एका फोनवर पाटील स्टील विकत घेईल. कामाचं बोलूयात?"
"सॉरी सर."
"काय सॉरी, सगळं प्लॅन फसलाय. अंबाला कळलंय, मी कुणाचा नातू आहे ते."
"काय?"
"हो व्यास."
"मग तिने घरातून हाकललं नाही तुम्हाला? ते जाऊ दे, आधी तिला कसं कळलं?"
"वॉलेट मध्ये फोटो बघितला, माझा आणि आजीचा."
"तिला कसं मिळालं वॉलेट?"
"परवा अंबावर विसरलो होतो."
"मग हकालपट्टी?"
"व्यास," मोहन हसला. "जगात सगळं बरोबर कळूनही चुकीचं परीक्षण करणारी माणसं असतात."
"म्हणजे?"
"तिला वाटलं, आजी खूप गरिबीत दिवस काढतेय. मला काम नाही, म्हणून तिच्याकडे आश्रयाला गेलो."
"काय?"
"हो, आणि ती मला कायम कामावर ठेवणार आहे, राधाबाईचा नातू चालक झालेला बघून, तिला असुरी आनंद झालाय".
"सर एक विचारू?"
"विचारा ना व्यास."
"ह्या दोन्ही बहिणी इतक्या वाईट कशा झाल्या."
"मोठी स्टोरी आहे व्यास, खूप मोठी."
"ऐकूयात ना सर, आज मी 'तुला पाहते रे' नाही बघणार, तुमचीच स्टोरी भक्तिभावाने श्रवण करेल."
"मग तर सांगावीच लागेल."
मोहन सांगू लागला.....
------------------------------------------
"वसंता, आताशा आलाय,आणि लगेच चाललाय होय."
"आई वर्कर होतो आधी, आता सुपरवायजर झालोय, जावंच लागेल."
"दोन वर्षात चांगलं नाव कमावलं. लग्नाचं बघ आता."
"आई बघतो ग. काय घाई आहे?"
"वसंता, हे गेले, तेव्हा माझ्याकडे काय होतं माहितीये? घर आणि चार एकर शेती. खंडेरायाची कृपा म्हणून तू योग्य मार्ग निवडला.कृष्णाला पुढच्या वर्षी कॉलेजात जायचंय. जगनही त्यानन्तर कॉलेजला येतोच आहे. होस्टेलला राहतात दोघे. नीट बघायचं असेल, तर तुला परत यावं लागेल. हे सगळं सोडून मी नाही येणार तिकडे. आणि...
...आनंदीची डॉक्टरेटही पूर्ण होतेय."
आनंदीच नाव ऐकताच वसंतराव लालेलाल झाले.
"वसंत लाजतोय काय? प्रेम करताना लाजला नाही. अंबाची पुतणी आहे, तशीच जहाल निघाली ना, लाजताही येणार नाही."
"आई, अंबा मावशी कधीची दिसली नाही."
"अरे काहीतरी शेतीच काम निघालंय, म्हणून अटकलीये वाटत."
तेवढ्यात दरवाजावर थाप पडली.
वसंताने धावत जाऊन दरवाजा उघडला.
"मावशी, शंभर वर्ष, आताच तुझी आठवण काढत होतो."
अंबा दिनकररावांबरोबर आत आली.
"अंबा, आज बरी वाट चुकली इकडे."
"शंभरी भरलीये वसंता मावशीची, राधी, शेवटचं भेटून जावं म्हणून आले."
"काय?" राधाबाई चपापल्या.
"राधी, सगळं गेलं ग. सगळं गेलं. ह्यांनी दुकान घ्यायचं, म्हणून घर विकायला लावलं. दुकानातच वरच्या मजल्यावर संसार थाटला. भांडवल कमी पडतंय म्हणून शेती गहाण ठेवायला लावली."
"अंबे नीट सांग, काय झालंय?"
"दुकान लिलावात निघालंय राधी, वाचवायच असेल, तर पाच लाख लागतील. यावर्षी ऊस होईल ग तेवढा, पण दुकान गेलं तर सगळं संपेल. शेतीही जाईल. म्हणून म्हटलं, तुला रामराम करून जावा."
"अंबे नीट बस, आपण मार्ग काढू."
"काही मार्ग नाही, राधी काही नाही."
"कसंय राधाबाई," दिनकररावांनी सुरुवात केली.
"पाच लाख काही छोटी रक्कम नाही हो. तशी पत आहे माझी बाजारात, पण लोक गहाण मागतात. आता गहाण ठेवायला जमीन नाही. यावर्षी ऊस नक्कीच पाच लाखापेक्षा जास्त होईल, पण कुणी विश्वास तर ठेवायला हवा?"
थोडावेळ शांततेत गेला. वसंतही शांत होता.
शांततेचा भन्ग करत राधाबाई म्हणाल्या.
"दिनकरराव, खरंच पाच लाखाचा उस होईल?"
"होईल, का होणार नाही?"
"चार एकर आणि घर गहाण ठेवल्यावर मिळतील, पाच लाख?"
"राधी, काहीही बोलू नको. तुझा संसार गहाण टाकून मला माझा संसार वाचवायचा नाहीये.बस तुला भेटायला आली होती." अंबा म्हणाली
"या घरात मी एकटी राहते आंबा, सगळी पोर इकडेतिकडे गेलीत. हे घर माझ्यानन्तर पोरांचं. ते येतील तोपर्यंत तुही सोडवशील. उद्याच जा कागदपत्र घेऊन." राधाबाई म्हणाल्या.
"राधाबाई, स्पष्ट बोलतो, पण गहाणात पाच लाख एवढी किंमत येणार नाही हो." दिनकरराव म्हणाले.
"मग आता आम्हला गहाण ठेवताय?" वसंत रागाने म्हणाला.
"वसंता. शांत राहा. थांबा दिनकरराव,"
राधाबाई आत गेल्या
परत येताना त्यांच्या हातात एक पितळी डबा होता.
"राधी, असं नको करू." आंबा ओरडली.
"दिनकरराव घ्या. हा डबा! पिढीजात आमच्या घरात चालत आलेला वारसा. आमच्या घराण्यात प्रत्येक आई आपल्या थोरल्या मुलीला, लग्नानंतर हा डबा देते. त्यात ती माहेरी भर घालते, व मुलीला आणि मुलगी नसेल तर सुनेला हा डबा देते...
गेल्या पाच पिढ्यांच्या सुहासिनीच सोनं यात आहे, आणि मी कमनशिबी म्हणून मंगळसूत्र सुद्धा!!!" राधाबाईंचं कंठ भरून आला.
"राधी...."म्हणून अंबाने राधाबाईंना मिठी मारली.
घरात अश्रूंचा बांध आता तुटला होता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह! इतक्या लवकर! छान लिहिलयं (नेहमीप्रमाणे)
Happy
Btw तुपारे चा हँगओव्हर वाटतं
Wink

मस्त
येऊ द्या उत्सुकता आहे

धन्यवाद किल्ली, मेघना, कोमल!
श्रद्धा, तुम्हाला आणि मेघाला कधी धन्यवाद म्हणणार नाही, हक्क आहे माझा तो. Wink
आणि तुपारेचा हँगओव्हर नव्हे, सात्विक राग!!! Wink

मेघाला कधी धन्यवाद म्हणणार नाही, हक्क आहे माझा तो>> वा म्हणजे मायबोलीवर जोड्या सुद्धा जमतात
लाडू मिळणार म्हणजे इकडे

वा म्हणजे मायबोलीवर जोड्या सुद्धा जमतात
लाडू मिळणार म्हणजे इकडे>>>>>> तसं काहीही नाहीये, मी तिला पर्सनली ओळखतही नाही, किंवा बघितलंही नाही, पण एक व्यक्ती म्हणून ती खूप चांगली आहे. तसंही मला स्पष्टीकरण द्यायचीच गरज नव्हतीच, पण गैरसमज नको इथे कुणाचाही, म्हणून दिलंय!
आणि तसंही तिला धन्यवाद म्हणून, मला तिच्या प्रतिसादावरचा हक्क गमवायचा नाहीये, Because her support is way way more than just a simple thanks.

धन्यवाद उर्मिला व ऍमी!
सध्या दिवसातले २५ तास काम करत असल्याने वेळ नाहीये मिळत Wink
पण लवकरच पोस्ट करतो!