पाटील v/s पाटील - भाग ९

Submitted by अज्ञातवासी on 10 January, 2019 - 12:06

खूप दिवसांनी भाग टाकतोय! माफी असावी. गोड मानून घ्या!

पाटील v/s पाटील - भाग ८
https://www.maayboli.com/node/66690

'पाटीलबुवा, किती दिवस वाट बघायला लावणार आहात.'
मोहन त्याच्या बंगल्यात उभा होता, त्याने आवाजाच्या दिशेने मान वळवली.
...सोनी लाजत उभी होती...
मोहन धावत जाऊन तिला मिठीत घेणार,
तेवढयात अलार्म वाजला.
सध्या निवडणुकीचा सिजन होता, रात्री अपरात्री केव्हाही गाडी लागायची अण्णांना. आजही गावाच्या बाहेर २८ मैलांवर अण्णा प्रदेशाध्यक्षांच्या फार्महाऊसवर तिकिटाची बोलणी करायला निघाले होते.
"मोहन सांभाळून, उसाच्या फडात रात्री कोल्हे घुसतात."
"अण्णा, तुम्ही कोल्ह्याला निवडणुकीच्या फडात नाही घुसू देणार पण!"
अण्णा हसले. मारोतराव कोल्हे हा अण्णांचा पक्षांतर्गत विरोधक. तोही तिकिटाच्या रेसमध्ये होता!
फार्महाऊसवर पोहोचताच अण्णा चपापले. मारोतराव पेढे वाटत होता...
"अण्णा तोंड गोड करा, आणि आशीर्वाद राहू द्या, निवडणुकीला तुम्हीच उभे आहात असं समजा. आताच AB फॉर्म घेऊन आलोय बाहेर!"
अण्णांनी कसानुसा चेहरा करत पेढा खाल्ला.
"चला जरा प्रदेशाध्यक्ष साहेबाना भेटून येतो, असं म्हणत अण्णा तिथून सटकले."
अण्णा बराच वेळ मध्ये होते, आणि मोहन गाडीत बाहेर!
थोड्या वेळाने अण्णा बाहेर आले. मोहनने गाडी काढली, दोन्ही निघाले.
"म्हणतात पाटीलवाडी सोडून तुमचा एवढा प्रभाव नाही, म्हणून तिकीट गेलं. काय माहीत रे यांना, एकटी पाटीलवाडी अक्खा मतदारसंघ आणला तरी भारी पडलं."
मोहनने अण्णाना घरी सोडलं, आणि शांतपणे तोही परत वळला,
फार्महाऊसकडे!
दुसऱ्या दिवशी मोहन उशिराच अंबावर पोहोचला. अण्णांच्या १७ मिस कॉलला त्याने एकही उत्तर दिलं नव्हतं.
"काय रे, प्रदेशाध्यक्षबरोबर तिकिटासाठी मिटिंग करत होता काय, एकही कॉल उचलला नाही. अण्णानी जीव लावला तर लगेच नाटक सुरू का? चल, कोल्हापूरला निघायचंय. दुसरी पार्टी तिकीट देतेय, बस झाली पक्षनिष्ठा. आता बंडखोरी!"
"काही जायचं नाही," मोहन म्हणाला
"काय? सकाळी टाकली का?"
"नाही, आणि तुम्हाला कसं कळलं, प्रदेशाध्यक्ष साहेबांबरोबर मिटिंग होती ते?"
"मोहन, आता कुठलाही विनोद ऐकायच्या मनस्थितीत नाहीये मी."
"असं? मग हा घ्या फॉर्म."
मोहनने खिशातून AB फॉर्म काढला, आणि अण्णांना दिला.
अण्णा अविश्वासाने पाहू लागले.
"कसं, म्हणजे काय, म्हणजे काय केलं तू, म्हणजे कसा आणला फॉर्म?"
"अण्णा," मोहन नाटकी अश्रू ढाळत, अण्णांकडे पाठ करून बोलू लागला.
"मी काही ड्रायवर आनंदाने झालो नाही अण्णा, माझ्याकडे बारा डीग्र्या आहेत, मुक्त आणि विमुक्त विद्यापीठांच्या. तुमच्या कार्याचा रिपोर्ट बनवला, प्रेझेन्टेशन बनवलं, वाचमनचे पाय धरले, आणि मध्ये गेलो. माझ्यावर कुत्रे सोडले, पण मी डगमगलो नाही, धावता धावता रिपोर्ट दिला,आणि त्यांनीही तुमच्या कार्याचा धावत आढावा घेऊन, तिकीट मंजूर केलं"
"मोहन, आधी जीव वाचवला, आता इज्जत वाचवलीस रे! बोल काय हवंय तुला?"
"सोनी द्या ना..." मोहन पुटपुटला.
"काय?" अणांनी कान टवकारून विचारलं!
"सोनं जरी दिलंत तरी घेणार नाही, असं म्हणालो मी.... असं सोन्यासारखं घर, सोनीसारखी...सोन्यासारखी माणसे, नशीबवान माणसाला मिळतं."
"अण्णा जा आणि मारुतीला नारळ फोड! मी नवस केला होता! मोहन वर ये!"
वरून चित्कारायचा आवाज आला. अंबा ओरडत होती.
अण्णा लगबगीने बाहेर गेले. मोहन वर गेला.
"बस"
मोहन बसला.
"खुर्चीवर नाही, मांडी घालून बस खाली."
मोहन रागाने उठला, आणि खाली मांडी घालून बसला...
...आणि अंबा म्हणाली...
"... मग कशीये राधी!!!!!!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users