भाई - व्यक्ती की वल्ली

Submitted by अमितव on 8 January, 2019 - 05:29

***तुम्ही चित्रपट बघणार असाल आणि कोरी पाटी ठेवुन बघणे पसंत करत असाल तर आधी बघा आणि मग इथलं वाचा. हा चरित्रपट आहे, त्यात सिक्रेट असं काही नाही पण तुमचं पूर्वग्रहविरहित प्रामाणिक मत वाचायला नक्कीच आवडेल. ***

आज 'भाई - व्यक्ती की वल्ली' बघितला. पुलंच्या सगळ्या पुस्तकांची, अभिवाचनांची, एकपात्री प्रयोगांची पारायणे केल्यावर आणि सुनिताबाईंच्या आहे मनोहर तरी, जीएंस पत्रे वाचुन प्रेमात पडल्यावर हा चित्रपट कसाही असला तरी बघणे क्रमप्राप्तच होते. ट्रेलर बघुन, त्यातील पुलंचे काम करणार्‍या अभिनेत्याचे हावभाव बघुन आणि पुर्वी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी ह्याची रंगमंचीय आणि प्रकाशवाणी वरील रुपांतरे बघण्याचा भीषण अनुभव पदरी असल्याने आणि त्यात चित्रपट महेश मांजरेकरांनी केलेला असल्याने तो बटबटीत असेल, उगाच हरीतात्या, नारायण, नाथा कामत, चितळे मास्तर, धोंडोपंत जोशी, रावसाहेब दोन चार संवाद म्हणून जातील किंवा एखाद्या संमेलनात ह्या सगळ्या वल्ली आल्या आहेत आणि त्यांना पुलं भेटताहेत गप्पा करताहेत असं काही तरी बघायला मिळेल इतपत माफक अपेक्षा ठेवूनच चित्रपटगृहात पाऊल टाकलेले. असं काहीही होत नाही हा एक सुखद धक्का होता.

गोष्ट सुरु होते ती प्रयाग हॉस्पिटलात. पुलं (विजय केंकरे असावेत) शेवटच्या आजारात मरणाच्या दारात उभे (का आडवे) आहेत, सुनीताबाईंना (शुभांगी दामले) भेटायला आप्त मित्र सगे सोयरे (सकल) येताहेत आणि त्यांचं मन वारंवार भूतकाळात जातंय त्यातील घटना बघतंय अशी साधारण मांडणी आहे. ही चौकट/ फॉर्म मला आवडला. ह्या फॉर्म मध्ये भूतकाळात जाताना कुठले प्रसंग दाखवायचे आणि कुठले दाखवले नाही तरी गोष्ट पुढे जाण्याला काही अडचण असणार नाही हे ठरवणे नक्कीच जिकिरीचे.

पुलंचं बालपण चांगलं दाखवलं आहे, पण नंतर एका सभेत तात्यासाहेब केळकरांना पुलंनी समजेल असे प्रश्न विचार म्हटल्यावर 'अंजिराचा भाव काय आहे?' हा प्रश्न विचारलेला हे आपल्याला माहित आहे, पण त्यासाठी ती सभा दाखवणे, त्यांच्या कॉलेज मध्ये त्यांना शिकवायला मर्ढेकर होते इतकंच सांगण्यासाठी त्यांचा एक तास दाखवणे आणि त्यात पुलं अगदीच काहीतरी पानचट आणि केविलवाणे विनोद करताहेत ते दाखवणे, मर्ढेकर कवी होते हे दाखवायला त्यांनी त्यांची कविता पुलंना चाल लावायला देणे, त्यांचे पहिले लग्न दिवाडकरांच्या मुलीशी कसे जमले ते इत्यंभूत दाखवणे, त्यांना बालगंधर्वांनी पेटी वादनासाठी शाबासकी दिली होती हे ३-४ वेळा वारंवार सांगणे अशा अनेक प्रसंगांची जंत्री कशासाठी दाखवली आहे हे मला नीटसं उमगलं नाही. त्या प्रसंगांचा त्यांच्या जीवनावर, मनावर खोलवर परिणाम झालेला दृष्य स्वरुपात तरी मला दिसला नाही. ना त्या प्रसंगांचा प्रेक्षक म्हणून मला काही फायदा झाला. त्यांचं काही आठवड्यांसाठी लग्न झालेलं आणि त्यांच्या पत्नीचे आजाराने निधन झालेलं हे इतकं डीटेल दाखवलं तर त्यात त्यांच्या मनात काय होत होतंते एका वाक्यात आटपतं घेतलं आहे. नक्की केहेना क्या चाहते हो! असं अनेकदा होतं. बरं पुलं इतके मनस्वी होते की समोरच्याच्या मनात काय चालू असेल याची त्यांना कल्पना ही नसे आणि ते समजुन घ्यायची त्या वेळी तरी त्यांची इच्छा नसे असं सांगायचं असेल तर ते ही नंतर अनेकदा अधोरेखित झालं आहे. थोडक्यात हे हे प्रसंग दाखवायचे आहेत पण का? यावर फार विचार न करता हा चांगला वाटतोय. घेऊन टाकू. अशा अविर्भावात एडिटिंग केलं असेल असं अनेकदा वाटत राहिलं.

त्यांचं आणि सुनिताबाईंचं प्रेम कसं जुळलं, हे नीट दाखवणं आवश्यकच होतं, त्यावर अनेक दृष्य आहेत पण प्रेक्षक म्हणून आपण कन्विंस होतच नाही की सुनिताबाईंना भाईंमध्ये नक्की काय आवडलं. उगाच सुनिताबाईंच्या वर्गात बाळ ठाकरे होते आणि पुलं एक गुणग्राही असल्याने व्यंग्यचित्रे बघुन त्यांना बाळाचे पाय पाळण्यात दिसले ही एक फुटकळ माहिती मात्र आपल्याला मिळते. त्यांचं लग्न लागतं ते (कसं लागतं त्याचं इतकं हृद्य वर्णन आहे मनोहर तरी मध्ये आहे, ते दृष्य स्वरुपात बघणे जिवावर आलं, पण ते ठीकच) आणि मग त्यांच्या सहजीवनात पुलंचा मनस्वी स्वभाव आणि त्यांना भेटणार्‍या एक एक वल्ली आपल्याला भेटतात. हा भाग ओव्हरबोर्ड होणं सहज शक्य होतं, पण मोजक्या व्यक्ती घेउन ते टा़ळलं आहे. नाथा कामत, रावसाहेब काही प्रसंगात दाखवणे अशक्यच, पण गुणवैशिष्ट्ये दाखवुन उगाच पाल्हाळ लावुन त्या व्यक्ती बोर करत नाहीत. रच्याकने: पुलं त्यांच्या कॉलेज वयात कसला बोर आहे, बोर मारतोय अशी भाषा खरंच वापरत असतील का? का? हा प्रश्न वारंवार मला पडत होता. Wink

ते बेळगावला नक्की का जातात? आणि नंतर कशी निराशा होत रहाते आणि ते परत का येतात त्याचा उल्लेखही करायचा न्हवता तर बेळगाव जातात ते कशाला दाखवलं? अरे हो! रावसाहेब कसे दाखवता आले असते नाहीतर ? Wink

नंतर पुण्याला आल्यावर चित्रपट - पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन आणखी जोमात चालू होते, बरोबर भिमसेन, वसंतरावांच्या संगतीत संगीतातील मुशाफिरीही चालूच असते. आणि त्यातच चित्रपट संपतो. या चित्रपट दोन भागात आहे. पुढील भागात चित्रपट लेखन का थांबवलं आणि एकपात्री प्रयोग, नाटकं कशी होत गेली असा पुढील प्रवास असेल.
शेवटी हिराबाईंच्या घरी कुमार, वसंतराव, भिमसेन आणि पेटीच्या साथीला पुलं अशी चांगली तब्बल दहा एक मिनिटांची मैफल दाखवली आहे. अनुक्रमे भुवनेश कोमकली, राहुल देशपांडे आणि जयतीर्थ मेऊंडी या त्यांच्या नातवांनी/ शिष्यांनी सावरे ऐजयो आणि कानडा राजा पंढरीचा गायली आहेत. ही मैफल मात्र सुंदर जमली आहे.

आता विचार करतोय तर, पुलंवर चित्रपट काढायचा - चरित्रपट (बायोपिक) काढायचा म्हणजे कसा करता येईल?
'तो काढूच नये... त्यांची पुस्तकं, नाटकं, ललितं, प्रवासवर्णनं, पेटीवादन, चित्रपट-कथा, संगीत हे जाणून उमजूनचा पुलं समजावून घ्यावेत, पुलं चित्रपटात मावणार नाहीत.' अशा मताचा मी अजिबातच नाही. पण चरित्रपट काढायचा म्हणजे मर्त्य मानवाच्या स्टेप्स की बालपण, शिक्षण, लग्न, मूल.. या दाखवल्याच पाहिजेत का? त्या ऐवजी ठळक मुद्दे घेउन आणखी ठसठशीत (इंपॅक्टफुल) करता आला असता का?

एक मात्र फार फार आवडलेली गोष्ट म्हणजे पुलंना गणपती बनवुन मखरात अजिबात बसवलेलं नाही. त्यांना दुसर्‍याच्या इमोशन्स न समजणे, त्या गृहित धरणे, आत्मकेंदित असणे, घाबरट असणे .. हे जे काही सुनिताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये लिहिलेलं आहे तसेच दाखवले आहे.

पण ज्यांना पुलं माहित नाहीत त्यांच्या दृष्टीने विचार केला तर पुलं कोण होते हे पहिल्या भागात तरी काहीच कळत नाही. घटना घडत आहेत पण एक कथासूत्र नसल्याने आणि ही घटना का निवडली आहे त्याच्या मागे नक्की काय मुद्दा ठोसपणे प्रेक्षकांना सांगायचे आहे ते अजिबातच नक्की नसल्याने मनावर एक खोल परिणाम अजिबात होत नाही.

सगळयात खटकलेली गोष्ट म्हणजे चित्रपट बघून झाल्यावर पुलं एक हरहुन्नरी, विविध क्षेत्रातील फक्त जाणच नाही तर निष्णात कलाकार होते हे कुठे मनावर ठसतंच नाही. त्यांचं पात्र आवडलेच पाहीजे असं नाही पण मनावर ठसलं तर पाहिजे! पण ते ही करण्यात चित्रापट अपयशी ठरतो. आता गटणे आणतील, आता नाथा कामत असं आपल्याला माहीत असल्याने आपण म्हणतो. पण ते ग्रेट का हे नवख्या व्यक्तीला ... कशाला मलाही समाजावण्यात ममां सपशेल हरले आहेत.

शुभांगी दामल्यांनी आणि इरावती हर्षे यांनी सुनिताबाईंची भूमिका फारच सुंदर केली आहे. त्या अगदी सुनिता बाईच वाटतात. पुलं (सागर देशमुख) मात्र काही ठराविक दृष्यात चांगले वठले आहेत, बाकी ते पुलं वाटतच नाहीत. वसंतरावांचं काम केलेला अभिनेता ही वसंतरावच वाटतो. त्यांचे आई, वडील, रमाकांत सगळे चपखल. रावसाहेब आणि अंतू बरवा ही उत्तम. पण पुलं विनोद करतात ते अनेकदा फारच बाश्कळ वाटतात, आणि सागर देशमुखला ही विनोदाचं टायमिंग अगदीच सापडलेलं नाहीये त्याने ही अनेक विनोद गरीब वाटतात.

चित्रपट संपुन बाहेर पडताना सावरे ऐजय्यो डोक्यात रुंजी घालतं होतं. गाडीत बसल्यावर वसंतरावांच्या आवाजात ज-मुना कि-नारे मेरो गाव... गाव.. आणि नंतर गॉव वर घेतलेली मींड परत परत ऐकुन मग नेक्सचं बटण दाबल्यावर दुसरं गाणं न लागता एकदम अचानक 'नामू परीट' लागलं. गूगल फार जास्त स्मार्टनेस दाखवतंय, हा माझी तिकिटं बघुन सर्च टेलर करत असेल तर हा हलकटपणा आहे असलं काही काही डोक्यात न आणता 'सदैव कपड्यांच्या दुनियेत राहुनही इतका नागवा माणूस माझ्या बघण्यात नाही' पर्यंत निमुट ऐकत राहिलो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त परीक्षण Happy

चित्रपट संपुन बाहेर पडताना सावरे ऐजय्यो डोक्यात रुंजी घालतं होतं. गाडीत बसल्यावर वसंतरावांच्या आवाजात ज-मुना कि-नारे मेरो गाव... गाव.. आणि नंतर गॉव वर घेतलेली मींड परत परत ऐकुन मग नेक्सचं बटण दाबल्यावर दुसरं गाणं न लागता एकदम अचानक 'नामू परीट' लागलं. गूगल फार जास्त स्मार्टनेस दाखवतंय, हा माझी तिकिटं बघुन सर्च टेलर करत असेल तर हा हलकटपणा आहे असलं काही काही डोक्यात न आणता 'सदैव कपड्यांच्या दुनियेत राहुनही इतका नागवा माणूस माझ्या बघण्यात नाही' पर्यंत निमुट ऐकत राहिलो.+!११११११११११११११११११११११

छान लिहिले आहेस

>>>>>>एक मात्र फार फार आवडलेली गोष्ट म्हणजे पुलंना गणपती बनवुन मखरात अजिबात बसवलेलं नाही.>>>>
अगदी हाच फीड back ऐकला होता .

अजून पहिला नाहीये , बहुतेक या वीक एंड ला पाहीन

छान लिहीले आहे!

पुलंच्या शाब्दिक कोट्या हा त्यांच्या प्रतिभेचा सर्वात सामान्य आविष्कार आहे. अनेक लोक त्याच त्याच उगाळत बसतात याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. सचिन तेंडुलकरच्या बॅटिंग चे कौशल्य तो भारतातील पाटा पिचेस वर ऑफ चा बॉल लेग ला भिरकावून द्यायचा या एकाच गोष्टीवर जोखल्यासारखे आहे ते. त्या कोट्या पहिल्यांदा जेव्हा ऐकल्या तेव्हा विनोदी वाटल्या पण एरव्ही एखाद्या गप्पांमधे त्यांची त्या अचूक वेळी मारल्या यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही. पण त्या कोट्यांच्या पलीकडे त्यांचा विनोद हिमनगाच्या पाण्याखालच्या भागासारखा प्रचंड आहे. तो यात दिसतो का याचे मला कुतूहल आहे.

ट्रेलर पाहिल्यावर बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती. तू वरती लिहील्याप्रमाणे भीषण चित्रीकरण असेल असे मलाही वाटले होते - असा मी असामी चे नाट्यरूपांतर मला अजिबात आवडले नव्हते. पण जवळजवळ सर्व रिव्यूज चांगले आहेत. त्यामुळे आता नक्की बघायचा आहे.

ट्रेलर पाहिल्यावर बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती. तू वरती लिहील्याप्रमाणे भीषण चित्रीकरण असेल असे मलाही वाटले होते - असा मी असामी चे नाट्यरूपांतर मला अजिबात आवडले नव्हते. पण जवळजवळ सर्व रिव्यूज चांगले आहेत. त्यामुळे आता नक्की बघायचा आहे. >>> + १२३

छान लिहिलंय अमितव.
ऑनलाईन आला की पाहणार आहे.
पुलंच्या आकाशवाणी कारकिर्दीतलं काहीच दाखवलं नाहीये का? ते प्रोड्यूसर म्हणून जबरदस्त होते. दूरदर्शनचे ते पहिले प्रोड्यूसर होते. त्यांचं दिल्लीतलं वास्तव्य त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं होतं असं मला वाटतं.
बिल्हण या संगीतिकेबद्दल मी खूप ऐकलंय. जितेंद्र अभिषेकी, व्यंकटेश माडगूळकर, पुलं अशी बडी बडी मंडळी या संगीतिकेत होती.

पण ज्यांना पुलं माहित नाहीत त्यांच्या दृष्टीने विचार केला तर पुलं कोण होते हे पहिल्या भागात तरी काहीच कळत नाही. <<< चित्रपटाच्या प्रत्येक जाहिरातीची सुरुवात साधारण “पुलं माहीत नसलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.“ अशी होते. Wink

पुलंची स्वतःची मूळ सादरीकरणं बर्‍यापैकी सहज उपलब्ध आहेत आणि बघितलेली असल्याने त्यांची संवादफेक, शैली परिचयाची आहे. त्याच्याशी ट्रेलरमध्ये दिसणार्‍या पुलंची तुलना मनात होतेच (अपरिहार्य). त्यामुळे चित्रपटाला जायचा मुहूर्त लांबत जातोय.

ज्यांना कुणाला पहायचा असेल त्यांनी या शुक्रवारपर्यंत वेळात वेळ काढुन भाई पहावा. नंतर नवीन चित्रपटासाठी स्क्रीन्स मोकळे करावे लागणार असल्याने हा चित्रपट गुरुवारनंतर थेटर्स मधे असण्याची शक्यता नगण्य आहे असं माझ्या चित्रपट वितरण व्यावसाईक मित्राने कालच बजावले आहे.

सगळयात खटकलेली गोष्ट म्हणजे चित्रपट बघून झाल्यावर पुलं एक हरहुन्नरी, विविध क्षेत्रातील फक्त जाणच नाही तर निष्णात कलाकार होते हे कुठे मनावर ठसतंच नाही. त्यांचं पात्र आवडलेच पाहीजे असं नाही पण मनावर ठसलं तर पाहिजे! पण ते ही करण्यात चित्रापट अपयशी ठरतो. आता गटणे आणतील, आता नाथा कामत असं आपल्याला माहीत असल्याने आपण म्हणतो. पण ते ग्रेट का हे नवख्या व्यक्तीला ... कशाला मलाही समाजावण्यात ममां सपशेल हरले आहेत.
हे ऍड केलं आहे

छान लिहिलंय.
मांजरेकर नाव असल्यामुळे अपेक्षाच नव्हती की चित्रपट चांगला असेल. पण रिव्ह्यू सगळे चांगले येत आहेत. यूएसमध्येही व्यवस्थित रीलीज आहे पण घाणेकरच्या तुलनेत पब्लिसिटीत कमी पडले असावे.

मला अजूनही बघावासा वाटत नाहीये. पुलंनी त्यांच्या शब्दांनी मनात उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा दुसऱ्या कुणाच्यातरी कल्पनेने रंगवलेल्या व्यक्तिरेखांशी जुळणार नाहीत असं वाटतं.
तसंच, शेवटल्या गाण्यात तानपुरा न दिसल्यामुळे वाईट वाटलं.

कालच पहिला इकडे हा चित्रपट. गर्दीपण होती बऱ्यापैकी.
एक उत्तम कलाकृती, सगळ्याच कलाकारांनीं काम उत्तम केली आहेत, फक्त पात्रांची जरा भाऊ गर्दीच वाटली ... काही पात्र तर का होती हे कळलेच नाही ...

शेवटची मैफिल तर वाह वाह क्या बात है ... पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय

कास्टींग -
माझ्या मते इरावती हर्षे ला नीट सुनीता बाई वठवत्या आल्या नाहीत. बरेच ठिकाणी ती चक्क 'अ‍ॅक्टींग' करीत होती असे जाणवले.

शुभांगी दामले एकदम परफेक्ट!

भीमसेन आणि वसंतराव ही मला झेपले नाहीत.

एकदा चित्रपट पहायला नक्कीच चांगला आहे.

वावे, आकाशवाणी/ दूरदर्शन बद्दल पुढील भागाची असेल. काही क्षणचित्रे दाखवली त्यात ते उल्लेख होते.
सुलु, शुभांगी दामले फारच चपखल आहेत. ते वय, चष्मा, नीटनेटकेपणा, मृदू पोक्त पण करारी बोलणं, चालण्यात वावरण्यात एक साधेपणाची ऐट असते ना तशा. माझ्या मनात जी सुनिता देशपांड्यांची प्रतिमा होती अगदी तशाच. इरावती हर्षेही मला ठीक वाटली. तिची (तरुण सु.दे.) व्यक्तीरेखा नीट उभी मात्र लेखकाने केलीच नाहीये. मनातली जी बंडखोरी आहे ती नुसती संवादात दिसुन चालत नाही. लग्न करायचं नाही, नंतर करायचं ठरल्यावर कसं करायचं, वारंवार घडणार्‍या अपेक्षा भंगांनंतर ही वागण्यात आलेली पोक्तता तरी जपलेला निरागस उत्साह यामागची विचारप्रक्रिया अजिबातच कुठे दिसत नाही. नुसते संवाद म्हणून आपण मानून घ्यायचं की अरे हो.. हे असंच झालं असेल असं टिपिकल मराठी स्किन डीप (सौजन्यः स्वाती_आंबोळे) उत्तरं, जी त्यांच्या जीवनात अजिबात स्किन डीप न्हवती आणि त्यांनी त्यांची कारणमिमांसा परखडपणे केलेली आहे, जी अजिबात कुठे दिसली नाही. हा इरावती हर्षे पेक्षा कथा/ पटकथा/ दिग्दर्शकाचा कच्चेपणा वाटला मला.
पांढर्‍या शुभ्र पलंगपोसावर डाळिंब सोलायला मात्र सुनिताबाई कधी बसल्या असतील असं वाटत नाही. Wink

सागर देशमुख आणी रिशिकेश जोशी अशी दोन नावे मनात असताना ममानी रिशीकेश ला घ्यायला हव होत अस नक्किच वाटल कारण त्याची उपजतच विनोदी बुद्दी आणि हजरजबाबीपणा मॅच झाला असता पण, ममानी लुक्सला मह्तव दिलेल दिसतय, मला तरी सागर देशमुख पटला नाही बा़की आमच्या मन्डळाने चित्रपट २ तास ड्राइव्ह वर आणलाय त्यामूले बघण्याची शक्यता शुन्य आहे.

पांढर्‍या शुभ्र पलंगपोसावर डाळिंब सोलायला मात्र सुनिताबाई कधी बसल्या असतील असं वाटत नाही.

>>> हे आवडलं.

आवडले परीक्षण. आधीच बघायची इच्छा नव्हती त्यात परीक्षणातला खालील परीच्छेद वाचून पूर्णच काट मारली.

त्यांना दुसर्‍याच्या इमोशन्स न समजणे, त्या गृहित धरणे, आत्मकेंदित असणे, घाबरट असणे .. हे जे काही सुनिताबाईंनी आहे मनोहर तरी मध्ये लिहिलेलं आहे तसेच दाखवले आहे. >>> म्हणजे पुल सुनीताबाईंच्या नजरेतून तसे होते. खरेखुरे तसेच होते का?

जर हेच दाखवायचे होते तर चित्रपटाचे नाव "आहे मनोहर तरी" किंवा "सुनीताबाईंच्या नजरेतून पुल" असे ठेवायचे. प्रसिद्धी एन्कॅश करायला नाव 'भाई" ठेवावे हे खूपच खटकले. (पुल सद्गुणांचा पुतळा वगैरे होते असे अजीबातच म्हणायचे नाहीये)

पण नाहीतरी पुलंची पुस्तकं वाचून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांबद्दल अशी किती माहिती मिळते?

आहे मनोहर तरी सुद्धा रूढार्थाने सुनीताबाईंचं आत्मचरित्र नाहीच. त्यांनी त्यांना सांगावसं वाटलं तेवढंच सांगितलं आहे. आणि सुनीताबाईंच्या पुस्तकाकडे फक्त पुलंच्या पत्नीचं पुस्तक म्हणून पाहणं हे अन्यायकारक आहे. जरी त्या आपल्याला पुलंची पत्नी म्हणून मुळात माहीत झाल्या असल्या तरीही.

काल पाहिला. 'मैत्र', 'गणगोत', 'व्यक्ती आणी वल्ली', 'आहे मनोहर तरी', 'कोट्याधीश पु. ल. आणी पु. लं.ची काही भाषणं वाचलेली असतील, तर नवीन काही नाही. महेश मांजरेकर चा सिनेमा असल्यामुळे सचिन खेडकर हा कंपल्सरी आहेच. सादरीकरण तुटक वाटलं. पु. ल. हे मराठी माणसासाठी एकीकडे 'लार्जर दॅन लाईफ' आणी त्याच वेळी अगदी घरातले वाटावेत अशी आपुलकी असणारं व्यक्तीमत्व आहे. ते समोर नाही आलं. धांदरटपणा दाखवायच्या नादात पु. लं.च्या स्वभावातल्या स्नेहभावनेकडे, ऋजुतेकडे अगदीच दुर्लक्ष झालं. त्यांच्यातल्या कलाकाराची सर्जनशीलता न दिसता, पाचकळ विनोद करत, दारू-सिगरेट (कन्सिस्टंसी चा अभाव. पहिल्या भागात 'सिगरेट' म्हणणारे पु. ल., मध्यांतरानंतर 'सिगारेट' का म्हणायला लागले?) च्या मागे जात, जाता जाता एखादं नाटक लिहून टाकणारे (ते सुद्धा बायकोनं सिगरेट चं पाकीट लपवलं म्हणून) पु. ल. सिनेमात दिसले. शेवटचा १०-१५ मिनीटाचा भाग, जिथे पु. ल., भीमसेन आणी वसंतराव देशपांडे, दारू प्यायला मिळेल म्हणून हिराबाई बडोदेकरांकडे जातात (ह्यांचा स्टॉक कमी असतो म्हणून), आणी तिथे ते तिघं, आणी कुमार गंधर्व गाणं म्हणतात, तो भाग वेगवान झालाय (गाण्याचा, पिण्याचा नव्हे). पण तोपर्यंत सिनेमाचा वेग संथ आणी तुटक वाटला. दुसर्या भागात, हा वेग कायम ठेवला असेल अशी आशा आहे. नाहीतर एखाद्या बेन किंग्जले ला बोलावून पु. लं.चा बायोपिक परत करून घ्यावा असं वाटतं. Wink

पु. लं.च्या स्वभावातल्या स्नेहभावनेकडे, ऋजुतेकडे अगदीच दुर्लक्ष झालं.
>>> ऋजुता म्हणजे काय

पांढर्‍या शुभ्र पलंगपोसावर डाळिंब सोलायला मात्र सुनिताबाई कधी बसल्या असतील असं वाटत नाही
>>>
Lol एक नंबर!

इरावती आवडती अॉ क्टर आहे खरं तर. पण तिने सुनिताबाईंवर जरा जास्तच प्रमाणाबाहेर.विचार केला असावा. इतकंच नव्हे, तर निर्माता दिग्दर्शकांनीही 'सुनिताबाई काय म्हणतील' या धास्तीनेच सारा सिनेमा केलाय असं वाटतंय.

मात्र, सागर.देशमुखची.निवड परफेक्ट आहे. (अख्ख्या सिनेम्यात त्याची आणि ऋषिकेश जोशी या दोघांचीच निवड परफेक्ट वाटकेय). सारी लाडकी व्यक्तिमत्वं अशी देव्हार्यातून बाहेर काढून कँज्युअल आणि युजर फ्रेंडली करून टाकली पाहिजेत, ही पहिली गोष्ट. त्याने छान केलंय, ही दूसरी.

पांढर्‍या शुभ्र पलंगपोसावर डाळिंब सोलायला मात्र सुनिताबाई कधी बसल्या असतील असं वाटत नाही >>> अगदी अगदी

सुनीताबाईंच्या पुस्तकाकडे फक्त पुलंच्या पत्नीचं पुस्तक म्हणून पाहणं हे अन्यायकारक आहे. जरी त्या आपल्याला पुलंची पत्नी म्हणून मुळात माहीत झाल्या असल्या तरीही. >> असहमत! पु लंच्या पत्नीनी पु लंवर लिहीलेलं पुस्तक हीच तर त्या पुस्तकाची ओळख आहे. तरीही सुनीताबाईंचं कौतुक अशासाठी वाटतं की त्या एक उत्तम साहित्यिकही आहेत. उदा: धामापूर आणि त्यांच्या आजीबद्दल लिहीलेलं केवळ अप्रतिम आहे. असो.

सिनेमा बघायला मिळाला नाही. शक्य झाल्यावर नक्की बघणार.

Pages