विजय मल्ल्या प्रकरण: अरुंधती भट्टाचार्य व इतर बँक अधिकारी नामानिराळे कसे?

Submitted by इनामदार on 8 January, 2019 - 02:13

कायद्यात बदल केल्याने विजय मल्ल्याच्या भारतातील मालमत्ता गोठवून त्यातून कर्जाची रक्कम वळती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशा स्वरूपाच्या बातम्यांतून आजकाल विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुळात हे प्रकरण "मल्ल्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि ते फेडले नाही" इतके सोपे नाही. अन्यथा इतका गदारोळ झालाच नसता. व्यक्तीला दिले जाणारे कर्ज आणि कंपनीला दिले जाणारे कर्ज ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्यपणे आपण जे गृहकर्ज वगैरे घेतो ते व्यक्तीला दिलेले कर्ज असते आणि त्याची परतफेड झाली नाही तर बँक कायदेशीर कारवाई व्यक्तीवर (आपल्यावर) करते. पण कंपनीला दिल्या गेलेल्या कर्जाची परतफेड झाली नाही तर कायद्याच्या दृष्टीने कोणी व्यक्ती नव्हे तर "ती कंपनी" जबाबदार धरली जाते. कारवाई कंपनीवर होते.

विजय मल्ल्याच्या केस मध्ये जे कर्ज दिले गेले आहे ते "किंगफिशर एअरलाईन" ह्या कंपनीला दिले गेले आहे. अर्थातच किंगफिशर बंद पडली तेंव्हा हे कर्ज वळते करण्यासाठी किंगफिशर ची सारी मालमत्ता विकून ते वळते करणे हा थेट पर्याय होता. खरे तर ते इतके सोपे असायला हवे होते. पण इतके सोपे असते तर इतकी चर्चा झाली नसती.

या प्रकरणाचे एकूण कंगोरे जे माझ्या वाचनात आलेत ते असे:

१. किंगफिशरला दिले गेलेले कर्ज हे त्या कंपनीच्या मालमत्तेपेक्षा कितीतरीपट अधिक होते.

२. सरकारी मालकीच्या एकूण सतरा बँकांकडून माल्ल्याला सात हजार कोटींचे कर्ज दिले गेले आहे. त्यात एसबीआयकडून सर्वाधिक म्हणजे दीड हजार कोटीचे कर्ज दिले गेले आहे.

३. मल्ल्याने यातील फार कमी रकमेसाठी वैयक्तिक हमी दिली आहे (दोनशे कोटी?) कायद्याच्या परिभाषेत मल्ल्या willful defaulter आहे. ते सुद्धा केवळ इतक्या रकमेसाठी

४. मल्ल्याने कर्जाचे पैसे अन्यत्र वळवून कर्ज मूळ हेतूसाठी न वापरता इतर कारणांसाठी त्याचा गैरवापर केल्याचा आरोप बँकांनी केला आहे

५. कायदेशीर पावले उचलण्याण्याआधीच मल्ल्या देश सोडून पळून गेला असे बँकांचे म्हणणे आहे

या सगळ्या गोष्टी विचारात घेता काही प्रश्न मनात येतात:

१. कर्ज किंगफिशर कंपनी ला दिले गेलेय तर विजय मल्ल्या देश सोडून का गेला असावा? दोनशे कोटी रुपयांसाठी? कि अजून काही कारण असेल

२. उद्योगांना कर्ज दिले जाते. उद्योग तोट्यात गेला तर ते कर्ज बुडते. अर्थविश्वात हे अनेकदा घडत असले तरी कर्ज देणाऱ्या बँका इतक्याही मूर्ख नसतात कि कोणत्याही उद्योगाला कितीही कर्ज द्यावे. अन्यथा अनेकांनी उद्योगाच्या नावाखाली साधे पानपट्टीचे दुकान टाकून कोट्यावधीची कर्जे उचलली असती. असे असताना किंगफिशरला इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज कसे दिले गेले?

३. दिले गेलेले कर्ज (कंपनीला असो वा व्यक्तीला) वसूल होत नसेल तर कर्ज देणाऱ्या आर्थिक संस्थाना (इथे या सतरा बँका) जबाबदार धरले जाते. आणि आर्थिक अनियेमिततेच्या आरोपाखाली संचालक मंडळावर गुन्हे दाखल होतात. "भुदरगड नगरी" तसेच इतरही अनेक उदाहरणे घडलेली आहेत. इथे मात्र असे काहीही न होता माल्ल्याचे नाव जबाबदार म्हणून माध्यमातून चर्चेत आणले जात आहे. (वास्तविक किंगफिशर आणि बँका यांच्यातील तो व्यवहार आहे. विजय मल्ल्या ह्या व्यक्तीचा संबंध नाही). हे काय गौडबंगाल आहे?

४. कोणत्याही कंपनीने अथवा व्यक्तीने कर्ज बुडवले तर बँकांची वसुलीची ठराविक प्रोसेस असते. त्यानुसार वसुलीची कारवाई होते. कर्ज बुडवणाऱ्या कंपनी/व्यक्तीचे नाव माध्यमातून जाहीर करून त्याची बदनामी करणे हा या प्रोसेस चा भाग नक्कीच असू शकत नाही. असे असताना या केसमध्ये मात्र विजय माल्ल्याचे नाव वारंवार माध्यमातून लोकांसमोर का ठेवले जात आहे?

५. ज्या बँकांकडून कर्ज दिले गेले आहे त्या सगळ्या सरकारी मालकीच्या बँका आहेत. आणि हा केवळ योगायोग असू शकत नाही. सरकारी मालकीच्या बँकांचा तोटा म्हणजे या देशातील कर भरून जगणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा तोटा. कारण ते नुकसान करामधून भरून काढले जाते. याचा अर्थ बँकेचे अधिकारी आणि तत्कालीन राजकीय नेते यांच्या संगनमताने हि बँकांची लूट झालेली असू शकते आणि मल्ल्या हे त्यासाठी केवळ प्यादे म्हणून वापरले गेले नसेल काय?

या प्रकरणाचा इंटरनेटवर धांडोळा घेतला असता कर्ज देणाऱ्या बँकांचे अधिकारी साळसूदपणे नामानिराळे राहिलेत असे दिसून येते. हि बाब विलक्षण खटकणारी आहे. खरे तर कर्ज घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला जास्त जबाबदार धरले जायला हवे. पण इथे उलटे घडताना दिसत आहे (जनतेच्या डोळ्यात धूळफेक?)

हद्द म्हणजे इतक्या बेजबाबदारपणे किंगफिशरला सर्वाधिक कर्ज दिलेल्या बँकेची मुख्य अधिकारी अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर मल्ल्या प्रमाणे या कर्जाची सामाईक जबाबदारी टाकणे राहिले बाजूलाच या म्याडम चक्क रघुराम राजन यांच्यानंतर रिझर्व बँकेच्या गवर्नर पदाच्या शर्यतीत होत्या! याला काय म्हणावे? म्हणजे दीड दोन हजार कोटीचे वसूल न करता येण्यासारखे कर्ज देण्याचा "पराक्रम" केल्याबद्दल बाईसाहेबांना कोणीतरी रिझर्व बँकेच्या गवर्नर पदापर्यंत पोहोचवायला चालले होते? अरे काय चाललंय काय या देशात?

माझ्या तर्कबुद्धीला जितके पटते त्यानुसार हे माझे निष्कर्ष आहेत. पण मी स्वत: कोणी अर्थतज्ञ वगैरे नाही. त्यामुळे कदाचित हे निष्कर्ष चुकीचेही असू शकतात. मायबोलीवर आर्थिक विषयात गती असलेले अनेक सन्माननीय सदस्य आहेत. त्यांची मते जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष ओ पी भट आणि अन्य काही उच्च अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आहेत.
प्रकरण अरुंधती भट्टाचार्य यायच्या आधीच्या काळातले असावे.

छान लेख . ह्या सर्व महिला उच्च पदस्थ व्यक्तिं बद्दल मनात एक भाबडा आदर होता तो आता गेला आहे.

मल्ल्याचा महाघोटाळा वेगळाच काहितरी असणार आहे ज्याचा पर्दाफाश अजुन ४-५ वर्षांनी समोर येईल. एवढे पैसे बुडालेले असताना सरकारी व्यवस्था त्याला असा साळसुदपणे विदेशात जाऊ देणार नाहीत. याच्यामागे सरकारी लोकांचे हात ओले झाले असण्याचीच दाट शक्यता आहे.
"असा घोटाळा गेल्या ७० वर्षात झाला नाही" यावर पब्लिक चवीचवीने चर्चा करेल.

अटक झालेल्या , चौकशी चालू असलेल्या बँक अधिकार्‍यांची नावे - former IDBI Bank Chairman Yogesh Agarwal , former IDBI Bank deputy managing director B.K. Batra, former members of the bank’s credit committee, O.V. Bundellu and S.K.V. Srinivasan and then bank general manager R.S. Sridhar.
याव्यतिरिक्त स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या काही आजी आणि माजी उच्चपदस्थ अधिकार्‍यांची चौकशी सुरू आहे.

अरुंधती भट्टाचार्य या निवृत्तीनंतर कोणता कंपनीत कुठल्या हुद्द्यावर आहे का हे कुणाला ठाऊक आहे का ?

एकंदर पावणेसहा लाख कोटींची कर्जे एनपीए झाली तरी बँकांनी समाधानकारक पावले उचललेली नाहीत. शिवाय त्याच त्या संचालकांच्या कंपन्यांना कर्जे मिळतात हा योगायोग नाही. या अरुंधती भट्टाचार्य यांनी शेतक-यांची कर्जे माफ केल्याने त्यांना सवय लागेल असे वक्तव्य केले होते.

अरुंधती भट्टाचार्य या निवृत्तीनंतर कोणता कंपनीत कुठल्या हुद्द्यावर आहे का हे कुणाला ठाऊक आहे का >>>>>>

नै ब्वा.. त्या आमच्या ओळखीत नाहीयेत. नाहीतर विचारून तुम्हाला सांगितले असते.