जीवनसत्वे - आरोग्याचे रक्षणकर्ते : लेखमाला (भाग १)

Submitted by कुमार१ on 6 January, 2019 - 22:40

शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो.
आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. सुरवातीस संशोधकांचा असा अंदाज होता की ती सर्व रासायनिक दृष्ट्या amines आहेत. ती शरीराच्या वाढ, विकास व पोषणासाठी अत्यावश्यक आहेत. या दोन गोष्टींची सांगड घालून त्यांना Vital amines, अर्थात व्हिटामिन्स असे नाव दिले गेले. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली. नंतर त्या प्रत्येकाचे सूत्र माहित झाले व त्यानुसार प्रत्येकाला त्याचे अधिकृत नाव मिळालेले आहे. तरीसुद्धा जनमानसात आणि वैद्यकविश्वात त्यांची ऐतिहासिक एकाक्षरी नावे आजही प्रचलित आहेत. इतिहासात डोकावता त्यांच्या शोधाची सुरवात १९व्या शतकाच्या पूर्वार्धात झाली आणि १९४८मध्ये अखेरचे जीवनसत्व (ब-१२) शोधले गेले.

त्यानंतर काही रासायनिक पदार्थांना जीवनसत्वांच्या यादीत स्थान देण्याचा प्रयत्न झाला आहे. पण, त्यापैकी कोणत्याच पदार्थाला अधिकृत स्थान मिळालेले नाही. आजपर्यंत जीवनसत्त्व-संशोधनासाठी १७ नोबेल पुरस्कार दिले गेले आहेत. यातून त्यांचे आरोग्यातील महत्व अधोरेखित होते.

वर्गीकरण:
१३ जीवनसत्वांचे २ गटांत वर्गीकरण करतात:
१. मेदात विरघळणारी : A, D, E, K.
ही यकृतात वा मेदात साठवली जातात. म्हणून गरज नसताना त्याच्या गोळ्या दीर्घकाळ खाल्ल्यास नक्की दुष्परिणाम होतात.

२. पाण्यात विरघळणारी : सर्व B (8) व C . इथे B-१२ चा अपवाद वगळता ती शरीरात साठवली जात नाहीत. म्हणून गरज नसतानाही जास्त खाल्लीत तर नको तो भाग सरळ लघवीतून बाहेर जातो. त्यामुळे या गटाचे सहसा दुष्परिणाम नाहीत.

काही जीवनसत्वे (उदा. ‘ड’) आपल्या शरीरात देखील तयार होतात. पण ते प्रमाण पुरेसे नसल्याने ती आहारातूनही घ्यावी लागतात. वनस्पती व जीवाणू मात्र अनेक जीवनसत्वांची निर्मिती करू शकतात. आपल्या आतड्यांतले मैत्रीपूर्ण जीवाणू आपल्याला काही जीवनसत्त्वे पुरवतात.

या लेखमालेचा उद्देश प्रमुख जीवनसत्वांची माहिती सामान्यजनांस करून देण्याचा आहे. ती खालील मुद्द्यांच्या आधारे देणार आहे:
* आहारातील स्त्रोत
* शरीरातील कार्य
* त्याच्या अभावाने होणारा आजार

* त्याच्या अतिरिक्त सेवनाने होणारे दुष्परिणाम आणि
* समाजातील समज-गैरसमज
************************************************
(क्रमशः)
टीप: या लेखमालेतील काही लेख दै. सकाळ आणि ‘मिपा’ संस्थळावर प्रसिद्ध झालेले आहेत. काही सुधारणांसह येथे प्रकाशित.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्वांचे आभार !
झंपी,
‘ड’ यकृतात व्यवस्थित साठवले जाते. अधिक माहिती संबंधित लेखात येईल.