वडिलांचे उत्तर

Submitted by अननस on 1 January, 2019 - 02:48

माझ्या प्रिय पिल्ला,

आम्ही काही दिवसांपूर्वी फेसबुक वरचे तुझे पत्र वाचले. अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचा तुझा निर्णय कसा योग्य आणि सर्व पिढीतील पालक घेतात त्याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आहे हे वाचले आणि वाचून आनंद वाटला. तुला अनेक दिवस लिहायचे मनामध्ये होते पण लिहिणे होत नव्हते. आज थोडी सर्दी आणि कसकस होती त्यामुळे घरकामातून मोकळीक होती.. विश्रांती घेताना मन मागच्या आठवणींमध्ये जात होते हीच योग्य वेळ साधून लिहीत आहे.

तू तुझ्या करिअर मध्ये घेतलेली भरारी पाहून मोठे समाधान वाटते त्याबाबतीत तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे. तुझा अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय तू घेतला आहेस या बाबतीत काही तक्रार नाही. आमचे आजोबाही कोकणच्या खेड्यातून मुंबई मध्ये येऊन स्थायिक झाले प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीच्या हितासाठी प्रयत्न करत असते. हा त्याचाच भाग आहे हे तुझं कारण आम्ही स्वीकारतो. लहानपणी तू पोळी भाजी न खाता चोरून लाडू खायचास आणि पकडल्यावर अपराधी चेहरा करत 'आई खूप भूक लागली होती' असं म्हणत थोडासा नाटकी रडवेला व्हायचास ते बघताना एक वेगळी मजा यायची तुझ्या विषयी राग आणि प्रेम दोन्ही खूप दाटून यायचे, पण ते तुझं कारण स्वीकारण्यात केवढा आनंद असायचा?

तुझे लहानपणाचे दिवस आठवले. लहानपणी शाळेत शिकवलेल्या सगळ्या धड्यांची तुझी आई घरी आल्यावर उजळणी करून घेत असे. मग हळूहळू तुला स्वतः चा स्वतः अभ्यास करायची सवय लागली आणि तू एक एक शैक्षणिक परीक्षा उत्तीर्ण होत गेलास. तुला कधी मदत लागली तर कायम आम्ही असायचो. जसा तू मोठा होत गेलास तशी मदत लागे नाशी झाली. अमेरिकेत तुझ्या घरी आलो होतो तेव्हा आठवते, एअर पोर्ट वर ट्रॉली पासून सगळ्या गोष्टींवर शुल्क आकारले जायचे. अमेरिकेमध्ये कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही त्याची काही ना काहीतरी किंमत मग ती आर्थिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक कोणत्याही स्वरूपाची असो, हेच त्या महासत्तेच्या यशाचे बीज आहे. हा जीवनातला धडा तू नीट शिकला आहेस ना?, सुदैवाने किंवा दुर्दैवाने या जीवनाच्या धड्याची उजळणी आमच्यासारखे तुझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारे कधीही करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुझ्या निर्णयाची किंमत मोजायची सर्वस्वी जबाबदारी तुझ्या स्वतःची आहे कारण हा निर्णय घेण्याएवढी तुझी मुले सज्ञान नाहीत.

तू १०-१२ वी मध्ये असतानाचे दिवस आठवले. आम्ही तुझ्या शाळेत विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला आलो होतो. खूप कौतुक होते तुझं,आणि तू मला माझ्या आई बाबांबरोबर माझे मित्र मैत्रिणी बघणार तर नाहीत ना अशा चिंतेत होतास. ते एक वेड वय असच असत. तुम्ही अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय पण थोड्याशा अशाच वेड्या वयात असता. अमेरिकेत नवीन आलेले भारतीय किंवा संध्याकाळी उशीरा भारतातून काम करणारे लोक पण 'अरे मॅनेजर अमेरिकेत असला तरी भारतीय आहे' या विचाराने निश्चिन्त असतात, आणि तुम्ही त्यांच्या कधी मधी होणाऱ्या प्रेसेंटेशन मधल्या चुका, भारतीय साधं मोकळं राहणं बोलणं चालणं पाहून एकदम ' अरे आजूबाजूचे मला त्यांच्यासारखाच अगदीच भारतीय तर समजणार नाही ना या चिंतेत असता... मग नकळत तुमचा R चा उच्चार अजूनच अमेरिकन होतो.. आपण कसे त्यांच्यासारखे दारू पिणे, विवाहपूर्व संबंध याला वाईट मानत नाही 'त्यांच्यासारखे' असा एक अविर्भाव कुठेतरी नकळत येऊन जातो..हे भारतीय कसे एकदम अनप्रोफेशनल आणि कळकट्ट अशी एक मूक तक्रार चेहऱ्यावर उमटून जाते ... मला मात्र १० वीतल्या त्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमामधली तुझी आठवण येते.

अमेरिकन माणूस मात्र आपल्यापेक्षा वेगळ्या संस्कृतीतल्या, उच्चराच्या, आचरण पद्धतीतीच्या माणसाला समजून घेत असतो, आणि दिवसाच्या शेवटी आपण कसे आपल्याहून वेगेळ्या आचार विचारांच्या व्यक्तीकडून सकारात्मक काम करवून घेतले या सर्वसमावेशक अमेरिकन संस्कृतीचा सार्थ अभिमान डोळ्यात घेऊन जातो. मला त्या जेमतेम विशी तिशीतल्या अमेरिकन मॅनेजर चे कौतुक पण खूप वाटते आणि कोठेतरी 'माझ्या सहिष्णू भारताला कोणाची दृष्ट लागली?' याची खंत पण जाणवते.

आमचे आजोबा कोकण सोडून मुंबईत आले, त्यांनी कोकणातल्या खेड्यासाठी तसे काही फार केले नाही, पण खेड्याचे त्यांच्यावाचून अडले पण नाही. नवीन शेतकरी, नवीन ग्रामस्थ नेते, यांनी खेड्याचा योग्य तो विकास केला. यावरून मी जे शिकलो ते गुपित सांगतो. आपल्यावाचून कुणाचे काही अडत नाही हे जस समजायला लागते तस आपण इतरांच्या आणि आपल्या स्वतःच्या जास्त उपयोगी पडत जातो. तू अमेरिकेला गेलास, तू पुण्यात ज्या टीम मध्ये काम करत होतास त्याचे काम अजूनही नीट चालले आहे असे तुझ्या एका मित्रा कडून ऐकले. त्यामुळे भारतात अत्यंत भ्रष्टाचार आहे, आणि आरक्षण आहे त्यामुळे आपल्यासारखे हुशार, सुशिक्षित, कष्टाळू, द्रष्टे, निष्ठावान देश सोडून जात आहेत अशा अहंगंडात तू अडकू नकोस. जे प्रोमोशन तुला मिळाले असते ते विदर्भाच्या खेड्यातून आलेल्या साताऱ्याच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये वसाहतीगृहात राहून शिक्षण पूर केलेल्या तुझ्या टीममेट ला मिळाले आहे असे ऐकले. वाढलेल्या पगारातून त्याने पुण्यात दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला आणि आता त्याचे आई बाबा, खेड्यात शिकून इथे पुण्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी त्याची बायको राहतात. मागच्या रविवारी गाण्याच्या कार्यक्रमाला त्यांची भेट झाली. म्हाताऱ्या जोडप्याच्या डोळ्यात मुलाच्या कतृत्वाचे केवढे समाधान होते? मी सुरुवातीला तुझ्या अमेरिकेत जाण्याच्या निर्णयाला थोडा विरोध दर्शवला असला तरी त्यादिवशी मला तुझ्या निर्णयाचा खूप अभिमान वाटला.

या वेळी भारतात येशील तेव्हा माझ्या साठी i-phone चे दर वर्षी येणारे नवीन व्हर्जन आणू नकोस. तू मागच्या वर्षी i -phone चे मागच्या वर्षीचे लेटेस्ट व्हर्जन आणलेस. आपण केवढे महागाची भेट आणली याच समाधान तुझ्या चेहऱ्यावर होत. तुझं ते समाधान पाहून 'दर वर्षी होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा निस्तरण म्हणजे एक काम होऊन बसलय' ही तुझ्या आईची भावना लपवताना झालेली धांदल मला अजून आठवून हसू येत. तुझं कॉलेज संपलं तेव्हा तुझ्यासाठी आणलेला नोकिया ३३१० मी अजून जपून ठेवला आहे. मध्ये एक दोनदा चौकातल्या दुकानातून दुरुस्त करून आणावा लागला पण अजूनही त्यातून आवाज चांगला ऐकू येतो. ते दिवस आठवतात जेव्हा तू आमच्या होणाऱ्या सुनबाई शी रात्री उशीरापर्यंत या फोन वर चोरून बोलत असायचास. आम्हाला तू सांगितले नव्हतेस पण तुला कधी तुझ्या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवता आल्या का? तुला जशी तेव्हा त्या फोन वर होणाऱ्या सुनबाईचे शब्द ऐकून छान झोप यायची तशी मला पण तुझा आवाज ऐकून येते.

आज अनेक विकसित देशांमध्ये भारतीय संस्कृती, योग, कला याविषयी मोठी उत्सुकता आहे. अनेक पाश्चात्य लोक भारतीय योग, संगीत शिकण्यासाठी भारतात येतात किंवा त्या देशातील संस्थांशी संपर्क साधतात. यामध्ये काही भारतीय असे ही आहेत कि जे पाश्चात्यदेशात उत्सुक व्यक्तीना आमच्या कला, योग याची महती सांगून सन्मान मिळवतात आणि भारतात i-phone आणि i-pad ची खोकडी देऊन पाश्चात्य तरुणाईच्या स्वैर जीवनाचे गोडवे गातात. मग अशा सन्माननीय महाभागांच्या नादाला लागून पाश्चात्य देशात तरुण योग,शास्त्रीय संगीत शिकायला लागतात तर आमच्या देशातले तरुण-तरुणी ३१ तारखेला दारू पिऊन पडायला लागतात. कोणतेही नैपुण्य, कला किंवा योग तपश्चर्या आणि आत्मसंयम याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही हे तू तुझ्या आत्तापर्यंतच्या करिअरच्या प्रवासा वरून शिकला असशील. आमची म्हातारपणाची काठी तू व्हावास अशी कधीच अपेक्षा नव्हती, तू तुझ्या देशासाठी, संस्कृतीसाठी प्रत्यक्ष पणे काही करू शकत नसलास, तरी या सांस्कृतिक तस्करीचा भाग होऊन आमची सांस्कृतिक डोकेदुखी होऊ नकोस. तू या सांस्कृतिक तस्करीचा भाग झालास तर कधीतरी आमच्या मनाविरुद्ध का होईना पण आम्हाला आपल्या या भावनिक नात्याच्या दाराला कायमचे कुलूप लावावे लागेल.

तेथे स्थायिक झाला आहेस तर तेथील संस्कृतीशी समरस हो. तुमचे कॉर्पोरेट भाषणांमध्ये ऐकले जाणारे जागतिक नागरिकत्व फक्त इतर संस्कृतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी न राहता तुझ्या जीवनात उतरू दे. आपला धर्म, आपली संस्कृती पूर्ण सोडून दे असं सांगत नाही पण आपण लहानपणी शनिवारी संध्याकाळी टेकडीवर मारुतीच्या देवळात जायचो तेव्हा देवळात घंटी वाजवल्यावर मनात जी पवित्र भावना यायची तशी चर्च ची घंटा ऐकल्यावर पण मनात येऊ दे. ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या प्रचाराला बळी पडू नकोस पण विवेकानंदांची ख्रिस्तजीवनाची महती सांगणारी भाषणं पण विसरू नकोस. ख्रिस्ताच्या त्यागाने भरून येणाऱ्या अमेरिकेतल्या शेती सांभाळून तुझ्या कारखान्यात काम करणाऱ्या आणि तुझ्या सारख्या परप्रांतीयांना थोड्या साशंकपणे कपाळावर आठ्या आणून पाहणाऱ्या कामगाराला तू 'रेड नेक' अशी उपाधी लावू नकोस. आत्मकेंद्रित ता विसरून समरस होणे मग ते कुटुंबात असेल, समाजात असेल, संस्कृतीमध्ये असेल, कामात असेल, कलेमध्ये असेल किंवा भक्ती मध्ये असेल, समरसते मध्येच मानावी जीवनाचे पूर्णत्व आहे. ते शक्य झाल्यास प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न कर.

तुझी आठवण होते पण त्या बरोबरच आता आमचा वानप्रस्थ सुरु झाला आहे याचीही जाणीव होते. त्यामुळे तू येथे नाहीस याची खंत आहे तसाच आनंद सुद्धा आहे. आमचा हा वानप्रस्थ भक्तीचा का सक्तीचा हे आमचे पूर्व कर्मच ठरवेल. असो, पुष्कळ लिहिले, आनंदात राहा.

तुझे -

Group content visibility: 
Use group defaults

हे घर के ना घाट के असतात. ऑफिस, जिम,जेवण, टीव्ही, झोपणे रिपीट असे मोनोटोनस लाईफ जगतात.
भारतात जो स्पॉंटेनियास आहे तो परदेशात नाही.

<<<त्यामुळे भारतात अत्यंत भ्रष्टाचार आहे, आणि आरक्षण आहे त्यामुळे आपल्यासारखे हुशार, सुशिक्षित, कष्टाळू, द्रष्टे, निष्ठावान देश सोडून जात आहेत अशा अहंगंडात तू अडकू नकोस. >>>
<<<आपल्यावाचून कुणाचे काही अडत नाही>>>>
हे खरे आहे. भारतावर प्रेम असायला भारतातच अडकून बसायला हवे असे नाही. आ़ज कित्येक भारतीय अमेरिकेत राहून भारतीय प्रकल्पांना मदत करताहेत. स्वार्थी असू नये. पण म्हणून, स्वतःचे भले होऊच द्यायचे नाही, झाले तर ते चूक आहे, असल्या कल्पना करू नयेत.

<<मग अशा सन्माननीय महाभागांच्या नादाला लागून पाश्चात्य देशात तरुण योग,शास्त्रीय संगीत शिकायला लागतात तर आमच्या देशातले तरुण-तरुणी ३१ तारखेला दारू पिऊन पडायला लागतात.>>
तरुणाईला नेहेमीच नाविन्याची ओढ असते - जिथे दारू पिऊन धिंगाणा घालणे नेहेमीच होते तिथे योग, "Ïndian culture" ची उत्सुकता, तर जिथे तिथे "भारतीय संस्कृती" आहे असे म्हणतात त्यांना परदेशी लोकांचे अनुकरण करावेसे वाटते.

याला काही संदर्भ वगैरे आहे का? फेसबुकवर व्हायरल झालेल्या एखाद्या लेखाला उत्तर वगैरे असावं असं सुरवात वाचून वाटतंय. Uhoh

छान लिहिलंय!

अरे आजूबाजूचे मला त्यांच्यासारखाच अगदीच भारतीय तर समजणार नाही ना या चिंतेत असता... >>>>>>>>आवडलं.

अजून एक राहिले,

तिकडे स्थायिक झालास, तिकडचे नागरिकत्व मिळाले तर जरूर घे, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जोपासणे काही गैर नाही, पण मग स्वखुशीने जे मागे सोडले आहेस त्यात गुंतू नकोस,
परदेशात बसून भारतीयांना तुमचे चॉईस कसे चुकीचे आहेत वगैरे समजावत बसू नकोस,

तू ज्या देशाचा नागरिक उरला नाहीस, तो देश कसा चालावा याबद्दल तुझी मते कितीही चांगली (आणि तुझ्या विचाराने) खरी असली तरी लोकांना पटवायला जाऊ नकोस.

हा लेख कशाचीतरी प्रतिक्रिया वाटत आहे. आणि तो मूळ लेख न वाचल्याने पूर्ण संदर्भ कळला नाही.

लेखातील भावना सहज पोहोचण्यासारखी आहे. अमेरिकेतील काही संदर्भ चपखल आहेत (ते अहंगंड वगैरे तर नक्कीच), पण काही समजले नाहीत. ते सांस्कृतिक तस्करी वगैरे.

बाय द वे, असेच पत्र त्या विदर्भातून पुण्यात आलेल्या आणि पुन्हा विदर्भात स्थायिक व्हायला परत जाण्याची शक्यता कमी असलेल्या टीममेटलाही त्याचे वडिल लिहीतील का? Happy