असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review)

Submitted by रसप on 28 December, 2018 - 04:32

२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लागले आहेत. सामान्य माणूस - Layman - आणि त्याची कहाणी दाखवणारे सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले आहेत आणि असामान्य कहाण्या सांगणारे सिनेमे पाहताना प्रेक्षकांनी आपली सारासारविचारशक्ती परंपरागत सवयीनुसार थिएटरात येण्यापूर्वी मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवल्यासारखी काढून ठेवायचं बऱ्याच अंशी बंद केलं आहे. त्यामुळेच रेस-३, ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या मोठ्या स्टार्सच्या, बॅनर्सच्या सिनेमांना नेहमीप्रमाणे मिळणारं हमखास यश मिळालं नाही, तर बधाई हो, अंधाधून, स्त्रीसारखे 'लो प्रोफाईल' सिनेमे यशस्वी ठरले.

सुपरस्टार्सच्या बाबतीत आजकाल बहुतांश प्रेक्षकांचा एक तक्रारीचा सूर ऐकू येतो की, इतकं नाव, पैसा कमवून झाल्यावर तरी हे लोक वेगळ्या वाटेचे प्रयोगशील सिनेमे का करत नाहीत. पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास, अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा एक खूप मोठा आणि वेगळ्याच वाटेवरचा यशस्वी प्रयोग होता. आमीरचा 'दंगल'ही तसाच खूप वेगळा आणि शाहरुखचा 'डिअर जिंदगी' एक हटके प्रयोग होता. हृतिकचे आशुतोष गोवारीकरसोबतचे दोन्ही सिनेमे प्रयोगशीलच मानायला हवे. शाहरुखच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रा-वन' आणि 'फॅन' हेसुद्धा प्रयोगच होते.
मात्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो.
असो.

timthumb.jpg

मेरठच्या 'बौआ सिंग'ची ही कहाणी आहे. 'बौआ' ची शारीरिक रचना ठेंगणी आहे. घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे. 'झीरो' ही कहाणी 'बौआ सिंग'च्या 'मेरठ'च्या लहान-मोठ्या गल्ल्या, बाजारांपासून मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत, रस्त्यावरच्या टपोरीगिरीपासून बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत उठ-बस करण्यापर्यंत आणि जमिनीपासून ते अंतराळापर्यंतच्या प्रवासाची आहे.
हा प्रवास 'तर्क' नावाच्या सिद्धांताचं बासन गुंडाळून पार अगदी मंगळ ग्रहापर्यंत भिरकावून देतो. 'बोटाने स्मार्टफोनला स्वाईप केल्यासारखं आकाशाच्या दिशेने हवेत स्वाईप करून आकाशातले तारे पाडणं', ही हिंदी सिनेमाच्या इतिहासात तर्काने मारलेल्या सर्वात खोल डुबक्यांपैकी एक डुबकी असावी. एका प्रसंगी तर आकाशातले तारे इतके सुदुरबुदूर होतात की त्या काळ्याभोर प्लॅटफॉर्मवर मुंबईतल्या ऐन ऑफिस अवर्सच्या वेळेची एखादी लोकल ट्रेन येऊन थांबली असावी आणि चहूदिशांनी सगळ्यांची धावपळ सुरु व्हावी, तसं काहीसं वाटतं.

मात्र असं असलं, तरी ही सगळी अतर्क्यता बऱ्यापैकी आत्मविश्वासाने सादर झालेली आहे.
शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.
अनुष्का शर्माने कमाल केली आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्यात अनुष्का शर्माचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही. चित्रपटभर शाहरुखच शाहरुख असला, चर्चासुद्धा त्याच्याविषयीच होत असली तरी प्रत्यक्षात हा चित्रपट अनुष्का शर्माने जिंकलेला आहे. तिने साकारलेली निग्रही 'आफिया' तिच्या आजवरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.
'रईस'नंतर पुन्हा एकदा शाहरुखच्या पात्राचा 'साईड किक' म्हणून मोहम्मद झीशान अयुब सहाय्यक भूमिकेत जान ओततो. हा गुणी अभिनेता असल्या दुय्यम भूमिका करण्यातच गुंतत जातो आहे, ही हळहळ पुन्हा एकदा वाटते.
कतरिनाच्या भूमिकेची लांबी तिला जितका वेळ सहन केलं जाऊ शकतं, त्याच्याआत आहे.
तिगमांशु धुलियासह बाकी सर्वांना अगदीच कमी काम आहे. त्यामुळे काही दखलपात्र असं जाणवत नाही.

'अजय-अतुल'कडे सध्या काही मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आलेले आहेत. पैकी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फुसका बार ठरला. 'झीरो' त्या मानाने खूपच उजवा आहे. 'मेरे नाम तू..' हे गाणं तर मनाचं ठाव घेणारं आहे. त ऐकत असताना एक वेगळाच विचार मनात आला. प्रसिद्धीमध्ये ह्या गाण्याच्या तुकड्याला 'थीम'प्रमाणे वापरलं असतं तर ? एकंदरीतच संगीताच्या बाजूला अजून जास्त आक्रमकतेने सादर करायला हरकत नव्हती. त्यात तितकी कुवत आहे, असं वाटलं.

'आनंद राय' हे काही दिग्दर्शकांपैकी खूप मोठं क्रिटीकली अक्लेम्ड नाव आहे, असं मला वाटत नाही. आनंद रायचे चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवूनच केलेले असतात, हे त्यांच्या फिल्मोग्राफीला पाहून लगेच लक्षात येतंच. त्यांनी इथेही दुसरं कुठलं गणित मांडलेलं नाही. मात्र आव मात्र तसा आणला असल्याने 'करायला गेले गणपती आणि झाला मारुती' अशीच गत झाली आहे !

शाहरुखच्या सुजाण चाहत्यांसाठी 'झीरो' म्हणजे पुन्हा एकदा एक अपेक्षाभंग आहे. मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2018/12/zero-movie-review.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी ठीक आहे, पण अनुष्का शर्माचं कौतुक? तिची सर्वोत्तम कामगिरी? दिल धडकने दो मधली फारा चांगली केली होती की तिने. इथे तिला अजिबात झेपलेला नाही अभिनय. उपरोधाने लिहिलं असेल तर ठीक आहे.
अ आणि अ आहे हा संपूर्ण सिनेमा. काही प्रसंग सुटे सुटे बरे जमलेत. सुरुवातीचा शाहरुख वडिलांना फाडफाड बोलतो तो एक (त्यातही मोठ्या भावाने वडिलांना जाम धरून ठेवले आहे पण त्या मानाने वडील काही अनावर झाल्यासारखे दिसत नाहीत). कतरिनाबद्दल सहमत. सर्वात चांगला अभिनय माधवनने केलाय. त्याला काहीही चांगलं दिसतं तशी ती हेअरस्टाईलही चांगली दिसली आहे Wink

{{{ पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. }}}

ट्युबलाईट हा एक प्रयोग समजायला हरकत नसावी. रेवतीचा फिर मिलेंगेही प्रयोगच म्हणायला हवा.

>> शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.

+११११११ अगदी मुद्द्याचं. फक्त इतकेच लिहिले असते तरी चालले असते. (बादवे, इथे देह आशिष सिंग नावाच्या नवख्या अभिनेत्याचा (?) आहे. त्यामुळे शाहरूख ला देहबोली दाखवायचा काही स्कोपच नव्हता. दिग्दर्शक, आणि तांत्रिक टीम यांची ती जबाबदारी होती)

m.youtube.com/watch?v=mh54d7W8LLA

आलाय यु ट्यूब वर झिरो

लेख आवडला, पण बाकीच्या चित्रपटांशी तुलना न करता फक्त झिरो कसा आहे ते लिहिलं असतं तर अजून छान वाटलं असतं..

छान परीक्षण रसप.
तुमचे मुद्दे पटतात. नाही पटतात. पण परीक्षण नेहमीच आवडते.
तुर्तास ईथे रुमाल Happy

अनुष्का पेक्षा कतरिना ने चांगले काम केलेय. +१
पण अनुष्काला स्कोप नाहीये? उलट भरपूर स्कोप होता. सगळा वाया घालवलाय.

रब ने बना दी जोडी
जब तक है जान
जब हॅरी मेट सेजल
झिरो
...
अनुष्काचा हा शाहरूखसोबत चौथा चित्रपट ना?
दोघांत सोबत कतरीनाही होती हे विशेष.

तुर्तास ईथे रुमाल Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 28 December, 2018 - 09:20 >>> जास्त वाट बघायला लाऊ नका.... शक्य तेवढे लवकरात लवकर लिहा... खूप ऊत्सुकता लागली आहे.

धन्यवाद हायझेनबर्ग
आधी रुमाल मग धमाल अशी आमच्याईथे प्रथा आहे ...

घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे.
√√√√√√
उपयुक्त माहिती.
काही जणांनी याचा सोयीस्कर अर्थ काढलेला, असा - की तो शाहरूख असल्याने आपला स्टारडम मिरवत होता, आणि सहकलाकार त्याला दबकून काम करत होते.

-------

सलमानबाबत सहमत. तो वेगळे काही करू शकावे ईतकी क्षमता त्यात नाही.
पण अर्थात, आज जे आहे ते सुद्धा सही आहे. त्यावर चाहत्यांच्या उड्या पडायच्या थांबल्या की तो थांबेलच.

मुळात आपण कोण यांना सांगणारे की आता तुमची पन्नाशी झाली आता थांबा. दुकान चालायचे थांबले, चाहतेच कंटाळले की आपसूक थांबतीलच. गाडी ब्रेक मारूनच का थांबवायचा हट्ट, पेट्रोल संपायची वाट बघा ना..

सचिन निवृत्त झाला तेव्हा मन भरून आलेले. सचिन वयाच्या साठाव्या वर्षीपर्यण्त खेळावा असे वाटायचे. ते देखील त्याच्या नाही तर माझ्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत. पण चाळीशी आली आणि तो थकला. देशहितासाठी त्याची थांबायची वेळ आली आहे हे एक चाहता म्हणून मनाने मान्य केले. खेळ आहे तो. त्यात वयावर एका वयानंतर मात करता येत नाही. पण पिक्चरचे तसे नाहीये. शाहरूख सलमान असो वा देवानंद ते रजनीकांत, कोणत्याही वयापर्यंत हिरोची भुमिका करू शकतात. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही त्यांनी त्या केल्यात तर आवडेलच ..

शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे.
>>>>>>

याच्याशी प्रचण्ड सहमत.
मुळात त्या माणसात बरेपैकी अभिनयक्षमता आहे. भले ग्रेट अभिनेता नसेल पण तो आपल्यातील पोटेंशिअल पुरेपूर वापरत नाही. जितकी मेहनत तो ईतर गोष्टींवर घेतो तितकी कॅरेक्टर उभे करायला घेत नाही जे आमीर करतो. असे तो का करतो कल्पना नाही. कदाचित दिग्दर्शक निर्मात्यांचीही ती अपेक्षा नसावी आणि त्यासोबत त्यांनाही ती मेहनत घ्यायची नसावी. त्याचे स्टारडम ईजी कॅश कसे करता येईल याच चक्करमध्ये सारे असतात... तो खुद्द स्वत:ही

मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.
>>>

नेक्स्ट प्रोजेक्ट - राकेश शर्मावरचा बायोपिक साईन केलाय .. डोन्ट वरी Happy

मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? >> 'हॅप्पी न्यू ईयर' आणि 'दिलवाले' हे दोन्ही सिनेमे त्याने मैत्रीखातर, स्क्रिप्ट आजिबात न वाचता केले होते असे ऐकले आहे. त्यांच्या आचरट असण्याचे खापर शाहरूखवर फोडणे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे आहे.
हा आचरटपणा अजय देवगणने केला की त्याला गोलमाल म्हणतात.... आणि त्याला तो माफ आहे... मग शाहरूखला वेगळा न्याय का?
हा सुपरस्टार मैत्रीला जागणारा डाऊन टू अर्थ माणूस आहे एवढाच अर्थ त्याच्यातून घ्यायचा. सिनेमा पडून पण लोकांच्या लेखी सुपरहीरो असणार्‍याला (हारकर भी जितनेवाले को) काय म्हणतात माहित आहे ना.... बरोबर.. बाजीगर ऊर्फ शाहरूख.

>> 'हॅप्पी न्यू ईयर' आणि 'दिलवाले' हे दोन्ही सिनेमे त्याने मैत्रीखातर, स्क्रिप्ट आजिबात न वाचता केले होते असे ऐकले आहे. त्यांच्या आचरट असण्याचे खापर शाहरूखवर फोडणे त्याच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. <<

खिक् ! ह्या हिशोबाने तर महाहाग्रूंनाही त्या 'मुंबई'वाल्या गाण्यासाठी माफ करायला हवं. ते त्यांनी दोस्तीखातरच केलं होतं, तसं एक्स्प्लेनेशन देणारी पोस्टच ओतली होती त्यांनी फेबुवर !

>> हा आचरटपणा अजय देवगणने केला की त्याला गोलमाल म्हणतात.... आणि त्याला तो माफ आहे... मग शाहरूखला वेगळा न्याय का? <<

कारण शाहरुखकडे क्षमता आहे. देवगण तसा बिचारा लिमिटेडच आहे. इंटेन्स्ड (सिरिअस) भूमिकांतच कन्व्हीन्सिंग वाटतो मला तरी.

दिलवाले मी पाहिलाच नाही पण हॅपी न्यू ईयर टीव्हीवर पंधरा वीस मिनिटे पाहिला. आणि तेवढाच बघू शकलो. तो शाहरूखने खरेच स्क्रिप्ट न वाचता केला की काय असेच वाटत होता. त्यातला शाहरूख हा शाहरूखच वाटत नव्हता. आणि मला तेच बघवले नाही. पण पुढे ऐकले की चित्रपटाने बरेपैकी कमाईही केली. खरे खोटे महीत नाही. पण खरे असेल तर खरेच आश्चर्य आहे.