मी टू !....

Submitted by पूर्वी on 23 December, 2018 - 07:18

मी टू !

आज सुमतीला सकाळी उठायला उशीरच झाला. पिंटुचे घाईघाईत आवरुन देत होती ती. तरी बरे,आज पिंटुची शाळा लवकर सुटणार म्हणून त्याला डब्यात घरातलाच चिवडा दिला होता तीने. तीचा स्वयंपाक राहिला होता ना अजून ! अन पिंटुची स्वारीही खुश ! डब्यात चिवडा म्हणून. त्याला चिवडा तर इतका आवडतो की त्याचे बाबा त्याला लाडाने चिवडेश्वरच म्हणतात.पिंटुला बाय केले आणि सुमती घरातील कामांकडे वळली.

स्नान लवकरच आटोपले.कुकर लावला. कुकर होईपर्यंत कणिक मळणे आणि भाजी चिरुन फोडणी टाकणे एवढे होतेच ! सवयीने सारे भराभर उरकत होते.

कुकरच्या शिट्ट्या झाल्या. तो उतरवून तीने छोट्या गॅसवर पोळ्या सुरु केल्या. पोळ्या करता करताच एकीकडे तोंडाने विष्णुसहस्रनामाचा पाठ चालु होता. इतक्यात तीला ‘अहोंची’ हाक ऎकु आली.खरे म्हणजे पाठ होईपर्यंत तीला कुणी व्यत्यय आणलेले आवडत नसे........तरीही तिकडे दुर्लक्ष करुन तीने स्वत:चे पोळ्या लाटणे चालू ठेवले अन पुर्णही केले.

तेवढ्यात तीच्या सासुबाई आल्या.त्यांचेसाठी दूध करता करताच तीने विचारले.
"आज उशीर झालाय माई, वरणाला फोडणी नाही देत.कालच केलेले लोणकढं तूप आहे. साधं वरण-तूप चालेल ना तुम्हाला? "
माई - " हो. अगं न चालायला काय झालं? असू देत.
तु तुझे आवर आणि बाहेर कधीचा तुझा नवरा आवाज देतोय.त्याला काय हवं ते बघ. हे दूध उकळले की घेते मी, जा तू. "

ती बाहेर आली.पेपर अस्ताव्यस्त पडलेला. नीट घडी ठेवून का नाही वाचत हे? मनातले मनात तीचे म्हणून झाले.
" काय हो,काय म्हणताय? "
राघव - " एं , हा शेर ऎक ना....."
त्याच्या हातात मोबाईल होता. म्हणजे नेहमीसारखच व्हाट्सॅप मित्रांचा ग्रुप असणार. मग कविता,शायरी,जोक्स,चॅटींग काय काय ते चालू असणार. तीला घाई होती तरी त्याला नाराज नको करायला म्हणून म्हणाली.
" अहो, सांगा ना."
राघव - " ऎक. अगं आवडला म्हणून मुद्दाम डायरीत लिहुन ठेवतोय."
तो लिहिता लिहिता वाचत होता......
लफ्ज.......ना कत्ल करते है.........ना इलाज करते है.....
हथियार है.......जो पनाह दे......उसिका काम करते है.......

एकीकडे ती पेपर, टॉवेल, पुस्तकं, चादर सारे आवरत होती.त्याच्या शब्दांचा अर्थ तीला कळतच नव्हता.
लिहुन झाले की त्याने तीच्याकडे पाहिले.ओळखले,आज उशीर होतोय म्हणुन परेशान आहे हे.तो समंजस होता.
तीला म्हणाला....
"तु ड्रेस बदलून घे.आपल्या दोघांसाठीचा आद्रकाचा चहा आज मीच करतो."
ती पुन्हा स्वयंपाक घरात आली. त्याच्याकडे लक्षच नव्हते. यांचे बरे आहे. बँक जवळच असल्यामुळे यांना घरातून दहाला निघाले तरी चालते.सव्वा दहाला बँकेत हजर ! पण तीला ८.४० ची लोकल पकडणे आवश्यकच होते , शाळा दहाला असली तरी. स्वयंपाक घरात तीने स्वत:चा डबा भरुन घेतला. मग ड्रेस बदलला.पर्स मध्ये आवश्यक ते पैसे, मोबाईल, चावी, रुमाल, पेन सारे ठेवले. ती बाहेर पडणार इतक्यात राघवने आवाज दिला.
"अगं....जरा दोन मिनिटे तरी इकडे जवळ ये."
आता मात्र हद्द झाली. साग्रसंगीत निरोप घेण्याची ही वेळ आहे का? माझी गाडी चूकेल ना !
कसाबसा राग आवरत.....
" आता नको.........वेळ होतोय........येते हो......."
ती घराबाहेर पडली. भराभर पावले स्टेशन जवळ करत होती.

दोन वर्षे झाली,तीला या शाळेत नोकरी मिळुन. पिंटु आता मोठा झालाय.दिवसभर घरी राहण्यापेक्षा तीने ही खाजगी शाळेतील नोकरी स्विकारली होती.पण मग रोजच सकाळी तीला घाई होत असे.

स्टेशन आले. लगेच गाडीही आली.खूप गर्दी होती, नेहमीसारखी नीट उभेही राहता येत नव्हते. अशीच पंचवीस मिनिटे काढायची असतात. पंधरा मिनिटेही झाली नसतील , तिच्या डोक्यावर हलकेच कुणीतरी टपलीसारखे ढकलले अन........" ए पागल........." आवाज आला. नक्कीच कुणाच्या तरी पायावर पाय पडला असणार आपला ! नाहीतर लगेच पागल ?.........समजत कसे नाही लोकांना? एवढ्या गर्दीत त्रास झालाच तर सोसायला नको?

चिडून तिने गर्रकन मान वळवली. मला पागल म्हणणारी ही कोण शहाणी आहे ते पहावे म्हणून ! तर........तर.........तिची बालमैत्रिण.........सुलभा.....सुलु......अग्गोबाई.....किती वर्षांनी अशी अचानक......इथे कशी ही?

दोघींची नजरानजर झाली. आश्चर्य...आनंद.....प्रश्न.....मी पागल आणि तु ? वेडी......वेडी रे वेडी......दोघींनाही खळखळून हसु आले.
नीट बोलता येत नव्हते,नीट ऎकता येत नव्हते. कसा बसा संवाद झाला अन मग रात्री फोनवर निवांत बोलू असे ठरवून सुमती तिचे स्टेशन आले म्हणून उतरली.

गडबड गर्दीचा त्रास थोडा ओसरला. सुलु आणि ती घट्ट मैत्रिणी. शाळेत सारे मनातले एकमेकींना सांगत. पागल, वेडी याच नावाने एकमेकींना एकांतात म्ह्णून भरपूर हसत. बालपणात रमतानाच शाळा आली. जणू सारे बालपणच विस्तारुन तिच्या सामोरे आले.त्या बालगोपालांच्या गर्दीत ती शिरली... गर्दीशी एकरूप झाली..प्रार्थना झाली आणि सारे आपापल्या वर्गात गेले.

सुमतीनेही वर्ग घेतले...सलग तीन ! नंतर तिचा एक मोकळा तास असायचा, त्या वेळेत ती डबा खात असे. तिच्या सोबतची शिक्षिका, मीना तिची मैत्रीण झाली होती. दोघी मिळून स्टाफ़रूम मध्ये बसून जेवत.......
अशात दोन महिन्यांपुर्वी एक नवीन तूपकर सर शाळेत आले होते. ते मात्र जेवताना नेहमी त्यांना जॉइन होण्याचा प्रयत्न करत. क कुणास ठाऊक, पण सुमतीला ते सोबत असणे अजिबात नको वाटे.त्यांनी बोलावले की , आज घाई आहे, आज उपवासच आहे असे काहीतरी कारण सांगुन ती त्यांना टाळत असे.

आज मीना आली नव्हती. आपल्याला एकटीलाच जेवावे लागेल असा विचार करत सुमती स्टाफरूममध्ये शिरली. पहाते तर काय , टेबलच्या दूसर्‍या टोकाला समोरुन तूपकर सर नेमके त्यांचा टिफीन उघडण्याच्या तयारीत होते.

तूपकर सर - " अहो मॅडम, असे समोर ...जवळ या ना."
एक संतापाची तीव्र लहर तिच्या मस्तकात गेली. गेली पंधरा दिवस झाले टाळतेय यांना, तरी कळत कसे नाही? आजकाल मी टू ची जी चर्चा चालली होती ती ऎकुनही ती जरा सावध, साशंक आणि अस्वस्थच झाली होती.

तूपकर सर तर पन्नाशीच्या वर ! मला माझ्या वडीलांसारखे शोभणारे ! किती निर्लज्ज असतात ना माणसे ? ते काही नाही.....आज यांचा सोक्षमोक्ष लावायचाच ! " कशाला बोलवत असता हो सारखे ? "असा चांगला खरमरीत जाब विचारणार. काय घाबरते की काय मी यांना ?

विचारांच्या तिरमिरीत ती उठली. सरांच्या समोरच्या खुर्चीवर दणकन जाऊन बसली. नकळत पर्सही टेबलवर दणकन ठेवली. ही रागाने, तिरस्काराने त्यांचेकडे पहाते तर काय......त्यांचे तिकडे लक्षच नाही. टिफीन उघडण्यात गुंतलेली नजर आणि हात.
ते म्हणाले " अहो, आज माझा उपवास. साबुदाण्याची खिचडी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणतो. आमची एकुलती एक मुलगी शालु, तिचे मागच्या वर्षी लग्न झाले.तेव्हापासून खिचडी शेअर करण्याचा आनंद मिळतच नव्हता. तुम्ही दिसला अन मला तिची आठवण आली. म्हणून म्हटले तुम्ही तरी काय , माझ्या शालुसारख्या......."
आहोटी लागताच सर सर पाणी उतरावे , तसे तिचा राग, चिडचिड ,तिरस्कार सारे ओसरले.

शी : उगीच काय काय विचार करत होते मी ! मनातच ती खंतावत होती.

जवळ या......या त्यांच्या शब्दाने तिलाही तिच्या बाबांची आठवण आली. एक वर्षापुर्वीच गेले होते ते. मन गलबलुन आले. भावनांचा आवेग तीने मनातच हलके थोपवला.

" मलाही आवडते खिचडी ! " - ती.
" पण.... पुरे हो, तुम्हालाच उपवास आहे, राहु देत."
" घ्या हो........." तूपकर सरांचा आग्रह.
दोघांनी खाणे आटोपले. तीला नंतर फ़क्त दोन तास घ्यायचे होते. ते घेतले. शाळा सुटली. पुन्हा ती निघाली.....स्टेशनवर.
पुन्हा तीच गर्दी. पण आता तीला त्या गर्दीचा त्रास जाणवत नव्हता. आपापल्या पिलांकडे धावणार्‍या सार्‍या जणी तिला तिच्या सख्या वाटत होत्या.

पंचवीस मिनिटे संपली. आज "जवळ या" या तूपकर सरांच्या शब्दांची चीड गेली. गेले कित्येक दिवस त्यांचे मनावर येणारे दडपण दूर झाले. हलके, मोकळे वाटायला लागल्रे. मनामध्ये आश्वासक, शांत असा पितृवत्सल भाव निर्माण झाला.

ती घरी आली. हे अजून बँकेतून आलेले नसतात. पिंटु खेळायला गेला असे. सासुबाई आज भजनाला जाणार होत्या. घराला कुलूप...तिने पर्स उघडली. चावी काढली. दार उघडले. हातपाय धुवून फ़्रेश होऊन बैठकीत आली.
सकाळी तिच्यासाठी अहोंनी केलेला चहा घ्यायचा तसाच राहिला होता. तिने मग उचलून धुवून ठेवला. अन म्हणजे चहा घेण्यासाठी हे बोलवत होते तर ! तीला कसेसेच वाट्ले. टेबलवर शायरीची वही होती. काय बरं सांगत होते हे सकाळी ? तीने वहीवर नजर टाकली......

लफ्ज.......ना कत्ल करते है.........ना इलाज करते है.....
हथियार है.......जो पनाह दे......उसिका काम करते है.......

तीला मनातल्या मनात हसू आले. यांना सांगावे लागेल......
" अहो आजचा पुर्ण दिवस , मी तुमची ही शायरीच तर अनुभवतेय ! "

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहोत खूब!!
ग हू सोबत कीडे दळतात ते छान सांगीतले !!

सुरेख Happy

छान लिहिलं आहे. #metoo वादळानंतर असे प्रसंग ( म्हणजे उगीचच शंका) खरेच घडत असतील.