आकांत

Submitted by स्वप्नील रसाळ on 22 December, 2018 - 01:10

दुष्काळाने हिरावला बाप
आणि आसवांचा बांध फुटला,
पण सावरला संसार माउलीने,
जेव्हा तान्हा पोरका झाला

का टाकले रे विठ्ठला,
असे दुर्भाग्य तिच्या माथी,
ना वारी चुकविली तिने कधी,
केला अट्टाहास तुझ्यासाठी

रमली भक्तीत तुझ्या ती,
आंधळा विश्वास ठेवला,
जपला फाटका संसारही पण
धनी तू चोरून नेला,

धगधगत्या उन्हात तिच्या,
डोईचा आधार हरपला,
जशी साथ सोडली सावलीने,
जेव्हा नभी सूर्य आला

माप ओसांडले निराशेचे
आणि उर दाटून आला,
पेरले कर्जाचे दाणे पण,
मातीत नाही तो बरसला

ना पिकले या भुईत काही,
विश्वास कापूर झाला,
विरली अनंतात ती माऊली,
तान्हा पुन्हा पोरका झाला

- स्वप्नील बाळासाहेब रसाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users