मिक्स व्हेज / कोरमा

Submitted by योकु on 7 December, 2018 - 06:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उगाच थोड्या थोड्या भाज्या उरतात कधी कधी तर त्यापासून हा एक प्रकार आज केला. नेहेमीपेक्षा निराळी आणि खूप छान चव जमली म्हणून इथे देतो आहे. नाव काय देऊ काही सुचलं नाही सो...
- अर्धी वाटी फ्लॉवर चे तुरे
- अर्धी वाटी मटार दाणे किंवा मक्याचे दाणे
- दोन मध्यम बटाटे नेहेमी प्रमाणे काचर्‍या करून पाण्यात घालून ठेवणे. सालासकटही वापरले तरी चालतील
- एक मध्यम मोठा कांदा, नेहेमीप्रमाणे चौकोनी चिरून
- दोन मध्यम सिमला मिरच्या, चौकोनी चिरून
- दोन मध्यम टोमॅटो, चौकोनी चिरून
- अर्धी वाटी पनीर चे क्यूब्स (लहान लहानच हवेत) हे ऑप्शनल आहेत; शक्यतो मी वापरत नाही
- अर्धी वाटी गाजराचे लहान लहान क्यूब्स
- पाव चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला
- १ टीस्पून जिरा पावडर आणि १ टीस्पून धणा पावडर
- १ टीस्पून लाल तिखट
- पाव टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- तेल, चिमूटभरच जिरं

क्रमवार पाककृती: 

- ही भाजी लोखंडी कढईत मस्त होते; सो लोखंडी कढई सणसणून तापवावी. जरा जास्तच तेल घेऊन चिमूटभर जिरं घालून फोडणी करावी आणि त्यात कांदा घालावा.
- कांदा जरा गुलबट - पारदर्षक झाला की टोमॅटो घालून मसाला पूर्ण गळू द्यावा.
- मसाल्याला चांगलं तेल सुटलं की सगळे कोरडे मसाले आणि चिरून ठेवलेल्या भाज्या, मटार /मका दाणे इ. घालाव्यात आणि ३ - ४ मिनिटं मोठ्याच आचेवर परतत राहावं.
- आता यात पाव वाटी पाणी घालून मंद आचेवर झाकण घालून भाजी शिजू द्यावी. नंतर मीठ आणि गरम मसाला घालून नीट हलवून घ्यावी.
- गरम गरम भाजी तेल/तूप लावलेल्या गरमच फुलक्यांबरोबर किंवा तव्यावरून ताटात अश्या पराठ्यांसोबत खावी. नाश्त्याला किंवा ब्रंचला म्हणून मस्त प्रकार आहे

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

- तेल, तिखट जरा जास्त हवं तरच चव स्वर्गीय येते
- भाज्यांमध्ये उन्नीस-बीस चालेल पण अपेक्षित चव यायला गरम मसाला, सिमला आणि टोमॅटो वगळू नका
- ही भाजी गरमच चांगली लागते आणि हो, जरावेळ मसाल्यात परतणं ही आवश्यक आहे
- अगदी गीर्र अशी ही शिजवायची नाही
- बाकी लाडात असाल तर काजूपेस्ट, क्रीम, इतर वाटणं घाटणं वगैरे बिन्नेस करू शकता

माहितीचा स्रोत: 
बायडी ची आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उरलेल्या ताज्या भाज्यांच आजच व्हेज क्रिश्पी ह्या पदार्थात रूपांतर केलं ..
पुढच्या वेळेस ही पाकृ करून बघेन.. मस्त लागेल चवीला Happy

मस्त पाककृती! मी पण उरलेल्या भाज्या अश्याच संपवते. Happy

कमी तिखट करायची असेल आणि वेळ असेल तर ...
- कांदा जरा गुलबट - पारदर्षक झाला की टोमॅटो घालून मसाला पूर्ण गळू द्यावा.>>> यात मी गरम मसाला, काजू आणि थोडेसे खोबरे घालते. थंड करुन मिक्सर मधे बारिक करुन घेते. परतलेल्या भाज्यांवर हे वाटण + तिखट घालून वाफ काढते. अशीही छान होते.

अहो योकु, लोखंडी कढईत केलेला पदार्थ लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा लागतो का? आणि कढई साफ कशी करावी? दरवेळी चिंचेने घासून काढावी लागते का? तेलाचा हात लावून ठेवावी लागते का?

प्राची, जर पदार्थांत काही आंबट असेल तर (शक्यतोवर इतर वेळीही) पदार्थ तयार झाल्याबरोबरच दुरर्‍या भांड्यांत काढावा. होत काही नाही पण रंग काळपट दिसतो; आंबट काही असेल तर मात्र कळकण्याची/ चव बदलण्याची शक्यता असते.
कढई साफ करायला काही विशेष नाही, नेहेमीप्रमाणेच धुवून घ्यायची. खूप दिवस ठेवायची असेल तर तेलाचा हात लावून ठेवली तर गंजाचा राप बसणार नाही.

कोर्मा/कुर्मा स्पेसिफिकली दह्यात शिजवला जातो. दही नसेल तर त्या भाजीला कुर्मा म्हणत नाहीत, असे माझे अल्पज्ञान साम्गते.