पनिर फ्रँकी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 December, 2018 - 04:58

मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विदेशी पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी.

मला साहित्य लागल ते म्हणजे

मेन म्हणजे चपाती. त्या आपल्या सगळ्यांकडेच होतात त्यामुळे मी त्याबद्दल मी काही देत नाही. फक्त जर तुम्हाला जास्तच मऊ वगैरे हव्या असतील तर थोडा मैदा मिसळायचा. पण मी मैदा टाळते त्यामुळे नेहमी सारख्याच चपात्या केल्या.

अमुल बटर
चाट मसाला
चिज
मेयॉनिज
गुंडाळण्यासाठी अ‍ॅल्यूमिनियम फॉईल

आतील कटलेटसाठीचे सामान

१ वाटी वाफवलेले मटार
२-३ मोठे बटाटे उकडून मॅश करुन
वाटीभर होईल अस कुस्करून पनीर
हिंग
हळद
मिरची पुड १ चमचा
१ चमचा गरम मसाला (आवडत असल्यास)
तेल
गरजे नुसार मिठ

काही सजावटीसाठी भाज्या

कोबी
गाजर
सिमला मिरची (मी तीन रंगाच्या घेतल्या आहेत. लाल, पिवळी आणि हिरवी)
कांदा
कोबी
ह्या सगळ्या भाज्या लांबट कापुन घ्यायच्या.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हिंग, हळद टाकून मटार टाका. परतवुन मिरची पावडर व गरम मसाला घाला ते परतवल की पनीर आणि मॅश केलेला बटाटा घाला. मिठ घाला एक वाफ आल्यावर गॅस बंद करा.

हे मिश्रण थोड थंड झाल की त्याचे लांबट कटलेट बनवा.

हे कटलेट पॅनमध्ये थोड्या तेलावर शॅलो फ्राय करुन घ्या.

सजावटीच्या भाज्या एका पॅनमध्ये थोड्या तेलावर परतवा. त्यात चाट मसाला टाका. पण शिजवायच्या नाहीत. कडक राहिल्या पाहिजेत.

पहिला चपाती थोडी शेकवून चपातीला बटर लावून घ्या.

आता त्यावर मेयॉनिज पसरवा.

मध्यभागी सजावटीच्या भाज्या उभ्या लावायच्या आणि त्यावर कटलेट ठेवून त्यावर चिज किसून पसरवायच. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवायचा

मग चपातीची जी बाजू बेस करणार आहोत ती आधी दुमडायची मग त्यावर बाजूच्या दोन बाजू दुमडायच्या.

गुंडाळून झाल की खाली अ‍ॅल्युमिनीयम फॉईल गुंडाळायची झाली तुमची फ्रॅ़ंकी तय्यार.

कशी दिसतेय?

उचला आता पटापट.

ही फ्रँकी घरात सगळ्यांना आवडली व एक नविन पोटभरीच्या पदार्थाची सोय झाली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.!
शेवटचा फोटो तर काय भारी..लगेच एक उचलून घ्यावासा वाटतोय..!

भारी जमलीय. तो सजावटीचा माल मस्त.

फार आवडीचा प्रकार आहे. वरचेवर खाणे होतेच. बरेचदा दरदिवसाआड सुद्धा. आजचे नाही तर अगदी वीस वर्षांपूर्वी शाळेत हाल्फचड्डीत असताना जेव्हा ईतर पोरे वडापाव खायचे आणि त्यांची मजल हॉटडॉगपलीकडे जायची नाही तेव्हा आम्ही खास फ्रॅन्की खायला खालसा कॉलेज गाठायचो. रुईया कॉलेजवळही मिळायची पण खालसाजवळची फेमस मस्त आणि स्वस्त होती. एका हातात सॉसची बाटली घेऊनच असायचो, आणि दर घासाला तिच्या उघड्या तोंडावर सॉस शिंपडत राहायचो Happy

मस्त रेसिपी, फ्रॅंकी unusual डिश आहे सहसा स्नॅक म्हणून प्रसिद्ध नाही पण एकदम टेस्टी आणि पौष्टीक. फोटो भारी आलेत.

मस्त रेसिपी, आमच्याकडे कॉमनली होते. न खपणाऱ्या कोबी इ भाज्यांमधे फॅन्सी केचप्स / सॉस / चीज घालून रोल करून दिले की कोणाला कळत नाही. कायम भाजी चे फ्रॅंकीज बनवते, पण अशा कधी केल्याच तर अमूलच्या रेडी पॅटीज वापरते, त्यामुळे ते पनीर कटलेट बनवण्याची स्टेप स्कीप होते.

सगळ्यांना धन्यवाद.
धनवन्ती Happy धन्यवाद.

जूई मेयॉनीज न लावताही चालेल. चवीत थोडा फरक पडेल पण भरपूर बटर लाव.

जबरदस्त दिस्तेय फ्रॅन्की. मला असले पदार्थ आवडत नाहीत शक्यतो
पण तु केलेस की काहिहि आवडते, पटकन उचलून खाता आलं असतं तर किती बरं झालं असतं Happy

छानच दिसतयं!!

आम्ही आपले पोळीत नुसते रोल करुन तव्यावर भाजून खातो!

Pages