किशोर कुमार- एक अवलिया

Submitted by AMIT BALKRISHNA... on 6 December, 2018 - 02:35

किशोर कुमार- एक अवलिया
किशोर म्हंटल कि आवाजाची जादू, किशोर म्हणजे वेडेपणा, बालीशपणा, किशोर म्हणजे प्रेमवीराचा आवाज, किशोर म्हणजे दु:ख, करुणा, हास्याचा फवारा अशी एक ना अनेक रूपे किशोर दा जगले आणि आजही आपल्या स्मृती मध्ये जिवंत आहे !! ‘किशोर दा’ अस म्हणालो कि किशोर जवळचा वाटतो, अगदी घरातला एक सदस्य हो ना ? आपले लाडके किशोर दा ,यांची आज पुण्यतिथी. आपल्यातून जावून आज ३१वर्षे झाली पण त्यांच्या आवाजामुळे आजही दादा आपल्या आजू-बाजूस आहेत असेच वाटते. कारण त्यांच्या आवाजाची जादू न्यारीच होती, कुणीही अगदी सहज प्रेमात पडेल, कोणालाही सहज मोहून टाकेल (अनेक उदाहरणे देता येतील, पण शराबी चित्रपटातील “लोग कहते है मै शराबी हुं”,या गीताचा शेवट असाच मोहून टाकणारा आहे). संगीत न शिकलेले पण सुरात कधीच कमी न पडलेले किशोर दा म्हणजे बॉलीवूड ला देवाने दिलेली एक देणगी च !!!
करिअर ची सुरुवात अभिनेते म्हणून केली हे आपण सर्वजण जाणतो, ते एक उत्कृष्ट कलाकार होते त्यांनी कित्येक चित्रपटात प्रमुख भूमिका देखील निभावल्या आहेत आणि त्या जिवंत हि केल्या आहेत. पण “ये बॉलीवूड है, यहा कुछ भी हो सकता है” आणि खरच तस घडलय देखील, मो.रफी साहेबांनी किशोर दा साठी आवाज दिला, आहे ना आश्चर्य !! रागिणी या १९५८ साली रिलीज झालेल्या चित्रपटात किशोर कुमार गाण म्हणताना ओठ हलवत असतात, स्क्रीन वर भाव दाखवितात खरा पण आवाज रफी साहेबांचा होता. यानंतर देखील कारकीर्द जोरात असताना रफी साहेबांनी किशोर दा ला आवाज दिला, तो म्हणजे १९७२ साली आलेला “प्यार दिवाना” या चित्रपटात मुमताज जिं च्या मागे लट्टू बनून “अपनी आदत है सबको सलाम करना” अस म्हणत गाण म्हणणारे किशोर कुमार , पण आवाज रफी साहेबांचा !!
किशोर कुमार तसे खट्याळ, मनमौजी होते, त्यांच्या या खट्याळ पणाचा फटका बऱ्याच कलाकारांना बसला आहे. कर्ज या चित्रपटाच्या वेळी लक्ष्मीकांत प्यारेलाला यांना देखील याचा फटका बसला होता, गाण होत “मेरी उमर के नौजवानो” हे गाण रिकॉर्ड करायचं होत पण रेकॉर्डिंग ला किशोर दा आलेच नाहीत आणि इकडे सुभाष घई जी नी याच गाण्याच शुटींग पूर्ण करायचं ठरवल, आता लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची झाली पंचाईत, मग त्यांनी एक शक्कल लढवली, लक्ष्मीकांत जी नी गाण त्यांच्या आवाजात रिकॉर्ड केल त्यावर शुटींग पूर्ण झाल, ऋषी कपूर जी नी लक्ष्मीकांत जी नी ज्याप्रकारे गाण म्हंटल त्याप्रकारे लिपसिंग केले आणि शुटींग पूर्ण झाल. नंतर किशोर दा आले आणि लक्ष्मीकांत जी ना म्हणाले चला रेकॉर्डिंग करू , यावर लक्ष्मीकांत जी नी सांगितले कि ज्या प्रकारे ऋषी कपूर जी नी लिपसिंग केले आहे त्याप्रकारे तुम्ही गा, मग काय त्याप्रकारे किशोर दा नी गाण गायलं आणि शेवट मात्र किशोर स्टांईल ने केला, हीच दादा ची जादू होती, ताकद होती.
असाच प्रकार गाईड या एक अल्टीमेट चित्रपटाच्या वेळी झाला. बर्मन दा आणि किशोर दा एक वेगळच समीकरण होते, दादा बर्मन दा च्या खूप जवळ होते, एका मुलाखतीत किशोर दा नी दोघातील बरेच किस्से सांगितले आहेत.त्यावरून ते बर्मन दा च्या किती जवळ होते ते कळते. पण दादा चा स्वभाव इथे देखील गम्मत करून गेला, बर्मन दा नी सगळी गाणी किशोर दा कडून गावून घेणार होते पण किशोर दा रेकॉर्डिंग च्या वेळी आलेच नाहीत, उगीच काहीही कारण सांगून रेकॉर्डिंगला यायचे टाळले. मग काय बर्मन दा नी ठरवल कि सगळी गाणी रफी साहेबांकडून गाऊन घ्यायची, आणि त्यांनी तस केले देखील. हे जेंव्हा किशोर दा ना कळाल ते लागलीच बर्मन दा कडे गेले आणि रेकॉर्डिंग करू अस म्हणाले, यावर बर्मन दा म्हणाले सगळी गाणी रेकॉर्ड झाली आहेत फक्त एक गाण राहील आहे, “गाता रहे मेरा दिल” बघ रफी साहेब तुला म्हणायची परवानगी देतात काय, ते परवानगी देत असतील तर मला काहीच अडचण नाही. यावर दादा नी रफी साहेबांना संपर्क केला आणि त्यांना रिक्वेस्ट केली, रफी साहेब तयार झाले आणि गाईड मध्ये ते अजरामर गीत किशोर दा नी म्हंटल , “गाता रहे मेरा दिल, तुही मेरी मंझील”. मेहबूबा या चित्रपटात “मेरे नैना सावन भादो” ह्या गीताचं मेल,फिमेल दोन्ही व्हर्जन आहेत, पंचम यांनी दादांना सांगितले कि लता दीदी सुद्धा हे गीत गातील, मग काय लागलीच दादा नी पंचम ना सांगितल “पहले लता से गवाओ फिर मै गाऊंगा” दीदींच रेकॉर्डिंग ऐकून मग दादा नी गीत गायलं तेही अजरामर झालं.
असे अनेक किस्से सांगता येतील. “ज्याने क्या सोचकर नही गुजरा एक पल रातभर नही गुजरा” गुलजार साहेबांनी किनारा या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत आपली परिस्थिती विषद करते. आपला सुद्धा “एक पल” देखील दादां ची आठवण केल्याशिवाय जात नाही, नाही का?
किशोर दां च्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults