चैन पडेना आम्हाला……

Submitted by मोरपिस on 29 November, 2018 - 06:06

j माझ्या घरासमोर एक कम्युनिटी हॉल आहे. किंवा कम्युनिटी हॉलसमोर माझं घर आहे असं म्हटलत तरीसुद्धा घराच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काहीच फरक पडणार नाही. कम्युनिटी हॉलसमोरच माझं घर आहे हीच माझी मोठी समस्या आहे. या कम्युनिटी हॉलमध्ये प्रत्येक दिवशी लग्नसमारंभ, पार्ट्या, मीटिंग्स होत असतात.
पण, मला अजून एक समस्या आहे, ती अशी की माझ्या घराच्या अंगणात एक आंब्याचं झाडही आहे. एखादं शुभकार्य असेल आणि प्रवेशदारावर आंब्याच्या पानांचं तोरण नाही असं होऊच शकत नाही. कम्युनिटी हॉलच्या समोरच्या अंगणात जर आंब्याचं झाड असेल तर याची वेदना त्या झाडाच्या मालकालाच समजू शकते
जेव्हा यजमान शुभकार्य करण्याच्या दिवशी तयारीसाठी लवकर हॉलवर येतो त्या दिवशी सकाळी सकाळी आमच्या दाराची बेल वाजते कुणीतरी चांगल्या घरचा सज्जन किंवा सजनी मला विनम्रतेने विचारते,'सॉरी, तुम्हाला त्रास दिला. थोडी आंब्याची पानं मिळतील का? मुलीचं लग्न आहे. मंडपाला तोरण बांधायचं आहे. सगळं सामान तर घेऊन आलो, पण बघा ना, आंब्याची पानंच आणायला विसरलो आम्ही'.
बहुतेक आंब्याचं झाड दिसल्यावरच या लोकांना तोरण बांधायचं सुचतं. नकार कसा द्यायचा, ही कला मला अजूनपर्यंत अवगत झाली नाहीये. प्रत्येक वेळी हे गरजेपेक्षा जास्तच पानं तोडून नेतात. यातली काही पानं माझ्या स्वच्छ अंगणात इकडेतिकडे पसरून बेमोसमी पानगळीचा आनंद देतात. आणि काही पानं माझ्या घराकडून कम्युनिटी हॉलकडे जाताना बेवारशासारखी रस्त्यात पडून राहतात. ज्यांच्या घरचं लग्नकार्य आहे त्यांना याची कसलीच पर्वा नसते. पण मला माझं सर्वस्व हिरावून नेल्यासारखं वाटतं. हे माझं दुखणं मी कोणाला सांगू? कसं सांगू?
अहो! हि तर फक्त सुरुवात असते. यानंतर बराच वेळ "हॅलो, माईक टेस्टिंग, हॅलो!" चं गोड संगीत ऐकल्यावर फिल्मी गाण्यांची रेकॉर्डस् अगदी जोरजोरात वाजू लागतात. त्याच्यावर कळस हा कि मायक्रोफोनच्या स्पिकरचं तोंड नेहमी माझ्या घराच्या दिशेलाच असतं. असं वाटतं की इथे बहिऱ्यांचीच वस्ती आहे. जर मोठ्या आवाजात गाणी नाही लावली तर आम्हाला कस कळणार कि कम्युनिटी हॉलमध्ये लग्नसमारंभ आहे की नाही ते? याच्यामुळे आम्हाला घराच्या आतमध्येसुद्धा एकमेकांशी घसा फोडून बोलावं लागत.
यांच्या गाण्याच्या रेकॉर्डसने माझ्या मुलांचा अभ्यासाचा रेकॉर्ड बिघडवला आहे. हे लोक दिखाव्यासाठी खूप खर्च करतात. पण एका बाबतीत मात्र चांगलीच बचत करतात. असं समजलंय कि या सगळ्यांना वीज देणारे खूप हुशार आहेत. यांच्या बचतीसाठी विजेचं कनेक्शन गल्लीतल्या खांबामधून दिलं जातं कारण त्यामुळे कम्युनिटी हॉलच्या मीटरनुसार विजेचा खर्च अगदी नगण्य येईल.
नंतर येते नगरपालिकेची पाण्याची गाडी. ती बरोबर माझ्या घरासमोरच येऊन थांबते. हे पाणी हॉलच्या टाकीमध्ये पोहोचेपर्यंत जे पाणी वाहत जातं ते पाणी माझ्या घराला उतार असल्यामुळे माझ्या अंगणात गोळा होतं. बाकी काही नाही फक्त श्रावण महिन्यासारखं सुंदर चिखलाने भरलेलं वातावरण तयार होत. जर कोणी चिखलाने माखलेले पाय घरात घेऊन आलं तर ती व्यक्ती माझ्या रागाची शिकार बनते.
हॉलच्या स्वयंपाकघरात जेव्हा भट्ट्या तापवल्या जातात तेव्हा त्याचा धूर वाऱ्याच्या दिशेमुळे अचानक आलेल्या पाहुण्याप्रमाणे सरळ माझ्या घराकडे प्रस्थान करतो. तेव्हा हवाही माझ्यासोबत कोणत्या जन्माचं वैर काढते कोणास ठाऊक! वनस्पती तुपात केलेल्या मिठाईचा सुवास आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांच्या सुगंधामुळे आमच्या घरातल्या सदस्यांच्या पोटात भुकेने कावळे ओरडायला लागतात. प्रत्येककदिवशी घरातल्या कोणाला ना कोणालातरी त्या वासामुळे काहीतरी चमचमीत खाण्याची इचछा होते.
प्रत्येक दिवशी कम्युनिटी हॉलमध्ये होत असलेल्या मोठमोठ्या जेवणावळींमुळे माझ्या हातचं कोरडं जेवण माझ्या कुटुंबाच्या गळ्यातून खाली उतरत नाही. रोज हेच रडगाणं ऐकायला मिळतं,'कम्युनिटी हॉलमध्ये जसं जेवण बनतं तसं जेवण तुला वनवता येत नाही का? कधीपर्यंत हे असं बेचव जेवण जेवायचं आम्ही?' आता मला हे समजत नाहीये कि समोरच्या कम्युनिटी हॉलमध्ये होणारे कार्यक्रमच बंद पाडू की हे घरच बदलू?
जेव्हा नवरदेव मंडपात येतो तेव्हा तर मंडपात घाईगडबड आणि आरडाओरड अजूनच वाढते. भेटवस्तू, पाकिटं घेऊन आलेली माणसं हळूहळू हॉलमध्ये जाऊ लागतात. त्यांची स्कुटर, मोटर इ वाहनं माझ्याच घरासमोर उभी केली जातात. घरात यायचा - जायचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. माझं घर एखाद्या बेटासारखं वाटू लागतं.
काही माणसं अशीही असतात , जी कम्युनिटी हॉलच्या प्रत्येक समारंभाला उपस्थित असतात. हे समारंभाला आमंत्रित असतात की नाही हे माहित नाही पण त्यांच्या हातात एक लिफाफा जरूर असतो. हा लिफाफा ते वरवधुला देतात कि नाही हे त्यांचं त्यांनाच माहित. मला फक्त एवढंच समजत कि ते नेहमी तृप्तीचे ढेकर देत रुमालाने तोंड पुसत तिथून बाहेर पडतात.
लिफाफ्यात ११ रुपये टाकून, चांगले कपडे घालून, नटून - थटून कोणत्याही लग्नसोहळ्यात पोटभर जेवण करून येणं हे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्यापेक्षा खूप स्वस्त पडतं. वरपक्षातला व्यक्तीला वाटतं की हा वधूपक्षातला कोणीतरी आहे तर वधूपक्षातल्या लोकांना वाटतं की हा वरपक्षाचा पाहुणा आहे. 'तुम्ही इथे कसे आलात?' असं कोणीही विचारत नाही.
माझ्या घराच्या वरच्या मजल्यावरून या हॉलचा मागचा भाग स्पष्ट दिसतो. तिथलं वातावरण अगदी वेगळंच असतं. जशा मिठाईवर माशा भुणभुणत असतात त्याचप्रमाणे बऱ्याच लग्नांमध्ये भिकारी, भिक्षा मागणारे आधीपासूनच तिथे जमतात. यांचाबरोबरच गायी, कुत्री, मांजरीही आपली भूक भागवण्यासाठी येतात.
प्रत्येक पंगतीनंतर जेव्हा उष्ट्या खरकट्या पत्राबळ्यांचा ढीग पाठीमागे फेकला जातो. त्यानंतर माणसं आणि प्राण्यांमध्ये उष्ट्या पत्रावळ्यांसाठी होणारी मारामारी आणि ओढाओढी बघून मानवता आणि न्यायावरचा विश्वास उडतो.
हे दृश्य बघितल्याशिवाय कोणाचाच विश्वास बसणार नाही की माणसं उष्ट्या खरकट्यावरसुद्धा किती वाईट प्रकारे तुटून पडतात. याच्यासाठी मरायला आणि मरायलासुद्धा तयार होतात. गायींना तिच्या शिंगांनी ढकलून किंवा कुत्र्याला लाथ मारून त्याच प्राण्यांनी तोंड घातलेल्या उष्ट्या पत्रावळ्यांमधून अन्न आपल्या टोपलीत घेताना या माणसांना काहीच शरम वाटत नाही. हीच माणसं बहुतेक घरी जाऊन हेच खाणं त्यांच्या परिवारासोबत अगदी मिटक्या मारत खातील.
घराचा कुटुंबप्रमुख हा तुम्हाला फक्त दोनच ठिकाणी दिसू शकतो. एक तर हॉलच्या प्रमुख दरवाजावर, जिथे तो नटून - थटून प्रत्येक अमंत्रिताच स्वागत करत असतो किंवा दुसरं म्हणजे हॉलच्या पाठच्या बाजूला जिथे माणसं किंवा प्राण्यांपासून ऊष्ट खरकटं वाचवण्यासाठीे तो उभा असतो. त्याचबरोबर आचारी आणि आलेल्या कामगारांवरही लक्ष ठेवतो.
जसजसा विवाह सोहळा रंगत जातो तशी काही वर्हाडी मंडळी मंदिरापानासाठी अधीर होतात. लग्नात जाणं आणि पिणं हे तर हल्ली लग्नाचं एक महत्त्वाचं अंगच बनत चाललं आहे. एखाद्या लग्नघरात, जिथे वर्हाडी मंडळींना मद्यपानाची परवानगी दिली जात नाही, त्यांचे वर्हाडी कम्युनिटी हॉलमधून बाटल्या घेऊन माझ्याच घराचा आसरा घेत हे शुभकार्य संपन्न होतं .
मला माहित आहे जसं जसं हे पेय आपला रंग दाखवायला लागेल तसं तसं त्यांच्या तोंडातू अतिशय वाईट अपशब्द बाहेर पडतात म्हणून त्याच्याधीच मला माझ्या घराची दारं - खिडक्या बंद करून घ्यावी लागतात.
अशा प्रकारे पूर्ण दिवस मोठ्या आवाजात वाजणाऱ्या अर्थहीन फिल्मी रेकॉर्ड्सच्या आवाजामुळे आमचे कान फुटतील की काय असं आम्हाला वाटतं. दिवस कसातरी संपतो,पण जेव्हा वरात निघायची वेळ होते तेव्हा कानाच्या आणि डोक्याच्या नसा तडकवण्यात जी कसर राहिली असेल ती कसर हे बँडबाजेवाले भरून काढतात. ऐन दरवाजावर उभे असलेले बँडमास्टर आपली सगळी ताकद लावून बँड वाजवत असतात.
थोड्याच वेळात काही तरुण मुलं डिस्को आणि नागिन डान्सशी मिळताजुळता डान्स करायला लागतात. बघताना बँडवाले आणि नाचणाऱ्यांमध्ये कोणतीतरी स्पर्धाच सुरु आहे असं वाटतं. नाचताना नोट च्या नोट निछावर केल्या जातात. हा कार्यक्रम भरपूर वेळ चालतो.
हे कान कुठे गहाण ठेवता आले असते तर किती बरं झालं असतं! मी डॉक्टरला तरी कसं सांगू की मला बीपीचा त्रास मी जाड असल्याने नाही तर माझं घर कम्युनिटी हॉलच्या समोर असल्यामुळे होतो. पण मला माहित आहे की याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
लग्नकार्य पार पडलं की संध्याकाळी वरातीला सुरुवात होते. वरातीला जाड थर लावून नटलेल्या तरुण मुलींपासून ते अगदी आयबायांपर्यंत सगळ्यांची फॅशन परेड आणि त्यांचे चमकते आणि भडक रंगाचे दागीने बघून माझ्या मनात नेहमी विचार येतो की,'वा! किती सुंदरसुंदर साड्या आहेत यांच्याकडे! त्याही लेटेस्ट फॅशनच्या! आता काही होवो यावेळेस अशा एखाद्या साडीची फर्माईश नवर्याकडे नक्की करणार!
दागिन्यांची तर गोष्टच निराळी! माझी दुर्बिणीसारखी नजर एकेकीच्या दागिन्यांना आणि कपड्याना परखु लागते. त्या कांजीवरम साडीवर मोत्यांचा सेट किती छान दिसत आहे. त्या नऊवारी साडीवर तो काय मस्त हार आहे. सात तोळ्यांचा तरी नक्की असणार! आणि त्या शिफॉन साडीवरचा हिऱ्यांच्या हार घातलेली ती महिला तर एखाद्या राजघराण्यातलीच असावी. पण काय माहित , हे हिरे असली आहेत की नकली!
या वरातीतल्या स्त्रियांकडे मी माझी शुद्ध हरपून बघत असते. जशी वरात पुढे सरकते तसा वेगवेगळ्या परफ्युुम्सचा सुगंध माझ्या खिडकीवर येऊन आदळतो आणि मी एका दुसऱ्याच दुनियेत वावरायला लागते.
लग्न झाल्यावर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून जातात . त्यातलं कोणीही तिथला आवार साफ करण्याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे आम्हा शेजार्याना त्या कुबट वासाचा सामना करावा लाहतो.
संध्याकाळी जेव्हा सर्व यजमान आणि पाहुणे मंडळी आपापल्या घरी जातात तेव्हा मीही अशाच शांतीचा आनंद घेते जसा एखादा बाप आपल्या मुलीचं कन्यादान करून निवृत्त होतो.

Group content visibility: 
Use group defaults

चांगलं लिहील आहे. वेदना पोहोचली ..
आमचं पुर्वीचं घर एका लॉन हॉल समोर होतं. नवरात्र सुरू झालं की गरब्याच्या आवाजाने आणि दिवाळी नंतर लग्नाचा सिझन सुरू झाला की माईकच्या आवाजाने ... अगदी नको नको व्हायचं ते थेट पावसाळा सुरू होईपर्यंत.
पावसाळा आणि पितृपक्ष असेल तेव्हा शांती.

तुम्हाला होणाऱ्या त्रासाची कल्पना आली. खरंच वैताग येत असणार तुम्हाला.
पण, गायींना तिच्या शिंगांनी ढकलून किंवा कुत्र्याला लाथ मारून त्याच प्राण्यांनी तोंड घातलेल्या उष्ट्या पत्रावळ्यांमधून अन्न आपल्या टोपलीत घेताना या माणसांना काहीच शरम वाटत नाही. >> हे वाक्य खटकलं. त्यांच्यावर ही वेळ येते याचं वाईट वाटावं तर त्यांना शरम वाटत नाही असं का म्हणता? हां आता हे असं कुत्र्याने तोंड लावलेलं अन्न गोळा करून ते जर दुसऱ्या कोणाला देऊन 'परोपकार' करत असतील तर मात्र निर्लज्जपणाच आहे.

त्याच प्राण्यांनी तोंड घातलेल्या उष्ट्या पत्रावळ्यांमधून अन्न आपल्या टोपलीत घेताना या माणसांना काहीच शरम वाटत नाही<<<<
प्रत्येक पंगतीनंतर जेव्हा उष्ट्या खरकट्या पत्राबळ्यांचा ढीग पाठीमागे फेकला जातो. त्यानंतर माणसं आणि प्राण्यांमध्ये उष्ट्या पत्रावळ्यांसाठी होणारी मारामारी आणि ओढाओढी बघून मानवता आणि न्यायावरचा विश्वास उडतो.<<<<<<<
Uhoh Uhoh Uhoh
उष्ट खरकटं कोणाला आवडीने खायचं नसतं, तर तशी वेळ येते. एखाद्याच्या अन्नाच्या भुकेबद्दल नाव ठेवणं मला तरी योग्य वाटत नाही.

जशा मिठाईवर माशा भुणभुणत असतात त्याचप्रमाणे बऱ्याच लग्नांमध्ये भिकारी, भिक्षा मागणारे आधीपासूनच तिथे जमतात<<<<<<
भुकेने कासावीस लोकांची तुलना मिठाईवरील माश्यांशी करणं हे अत्यंत दुर्देवी आहे.

गायी, कुत्री, मांजरीही आपली भूक भागवण्यासाठी येतात.<<<< हे पण फार खटकलं

तुम्हाला वाटणारा त्रास पोहचला कथेतून..चांगले वर्णन आहे.
>>>पण, गायींना तिच्या शिंगांनी ढकलून किंवा कुत्र्याला लाथ मारून त्याच प्राण्यांनी तोंड घातलेल्या उष्ट्या पत्रावळ्यांमधून अन्न आपल्या टोपलीत घेताना या माणसांना काहीच शरम वाटत नाही. >>> खटकले हे वाक्य..भुके पुढे कुणाला काय वाटणार...अशी वेळ त्यांच्यावर आली आहे तेच वाईट.. राग यायला पाहिजे ते ताटात भरपूर अन्न घेवून अर्धवट खावून टाकायला सोडतात आणि नासाडी करतात त्यांचा राग यायला हवा..त्यांना शरम वाटायला हवी...हवे तेवढेच घेवून चांगले उरलेले अन्न गरिबांना देवू शकतो ना..मग नासाडी का करावी