मालसे काकांना मालसे म्हणायचं की मालशे हा प्रश्न आजही सुटलेला नाही. त्यांची मुलगी मालसे असं आडनाव सांगायची तेव्हां ती बोबडे बोलत होती आणि मी थोडासा मोठा होतो. तेव्हांपासून आपलं मालसेच.
आमची पुण्याच्या बाहेरची पहिली अशी कॉलनी होती जी नीटनेटकी वसाहत होती. आगाखान पॅ लेसच्या अलिकडेच पण त्या वेळी गावाच्या बाहेर समजले जाईल. रिक्षावाले यायला तयार नसत. आता या भागात इच्छा असूनही फ्लॅट सुद्धा घेता येत नाही. त्या वेळी दहा इमारतींनी बनवलेल्या चौरसाकृती आकारात आमची वसाहत डौलाने उभी होती. मधल्या भागात मोठे पटांगण होते. तिथे आमचं क्रिकेट चालायचं. प्रौढ माणसं व्हॉलीबॉल खेळत.
आणि आम्ही वयात आल्यावर आमचं क्रिकेट सुरू झालं की वयात आलेल्या मुली तळमजल्याच्या घरांच्या पाय-यावर येऊन बसत. त्या आल्या की सिक्सर ठोकण्याच्या नादात चांगला सेट झालेला फलंदाज बाद होत असे आणि फिरकी गोलंदाजी करणा-या गोलंदाजाच्या अंगात ५२ हत्तींचं बळ येऊन तो प्रती कपिलदेव असल्याच्या अविर्भावात त्याच्याही पेक्षा वेगात चेंडू फेकत असे. अशाच एका हंगामी कपिलच्या गोलंदाजीवर पोरी आल्यामुळे स्टंप्सच्या अगदी जवळ जाऊन यष्टीरक्षण करण्याच्या नादात माझे नाक फुटले होते.
या दहा इमारतींच्या मागे चाळी होत्या. आर्थिक उत्पन्न कमी असलेला गट होता तो. चाळ आणि बिल्डींग अशी खुन्नस असायची. चाळीतली मुलं बिल्डींग्जमधे लाईन मारायला येत असत. त्यामुळे काही थोर मुलं अस्वस्थ होत. त्यातून हाणामा-या व्हायच्या आणि एक भिंत उभी राहिली होती.
पण पहिल्या चाळीत भाई सामंत रहायचे. ते कामगार प्रश्न सोडवण्यात प्रसिद्ध होते. त्यांच्या दारात नेहमी पांढ-या अँबॅसिडर्स उभ्या असत. केव्हां केव्हां पोलिसांच्या पिवळ्या दिव्याच्या गाड्या असत. चाळीच्या त्या टोकाला मालसे काका रहायचे.
मालसे काकां बद्दल मनात कुठल्या भावना होत्या हे त्या वेळीही नेमके सांगता आले नसते. पण त्यांचं आकर्षण वाटायचं.
लालबुंद गोरा वर्ण, चमचमणारे टक्कल, त्या खाली खांद्यावर रूळणारे केस आणि बुल्गॅनीन दाढी. बुल्गॅनिन दाढी राखणारा खरा खुरा मर्द पहिल्यांदाच पाहिला होता. त्या आधी पडद्यावरच असे लोक पाहीलेले असल्याने त्यांच्याबद्दल कुतूहलमिश्रित आदर असे.
आमच्या इथे सारेच मध्यमवर्गीय. त्यामुळे कोपरी विजार अशा पोषाखात पुरूष मंडळी सकाळी खाली फिरत. मैदानाच्या मध्यभागी बसून वर्तमानपत्राचे सामूहीक वाचन चाले. पुण्यात तेव्हां कुणी शॉर्ट्स घालत नसे. पी बिल्डींगमधले जोशी तर अपुरा टॉवेल लावूनच खाली येत. सगळे आपापले वर्तमानपत्र आणत आणि दुस-याकडे घेऊन सामूहीक वाचनाचा कार्यक्रम चाले. गप्पा अर्थातच राजकारणाच्या. इंदिरा गांधी गेल्या तेव्हां बाईने मुलाच्या हातातल्या घड्याळाची चौकशी केली ते कळलं का असा अनुनासिक हेल काढून विचारलेला प्रश्न ध्यानात राहिला.
अशा काळात मालसे काका चौकड्याची लुंगी नेसून वर पिवळे किंवा फिकट निळे ती शर्ट घालून जर्मन शेफर्ड कुत्र्याला घेऊन फिरायला येत. त्यांच्यात आणि पतके काकांमधे ३६ चा आकडा होता. ते आले की "पोराबाळांचे खायचे वांधे झाले पण कुत्रा मात्र इंग्लीश पाळलाय हो शायनिंग मारायला " असा त्यांचा डायलॉग आला नाही असे व्हायचे नाही. त्यांची मुलंही हाच डायलॉग मारत असत.
मग हळूह्ळू त्यांच्याबद्दल "नाटकी मनुष्य साला" असे ऐकू येऊ लागले.
मालसे काका नाटकात काम करायचे हे समजलं आणि त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढलं.
नाट्यसृष्टीशी आमच्या इथे बहुतेकांचा संबंध यायचा नाही. एकदा येरवड्यात नटसम्राट नाटक आणलं होतं. तेव्हां पहिल्यांदा ते पाहीलं. ते बहुतेक दत्ता भट करत होते. दोन तीन ट्रेलर जोडून स्टेज बनवलेले होते. आमच्या पैकी कुणीही शाळेतही नव्हते तेव्हांची ही गोष्ट.
दुस-या दिवशी नटसम्राट बद्दल चर्चा चालू होती. तेव्हां मालसे काका म्हणाले होते,
" आपल्याला हवंय का नटसम्राट ? मला सांगायचं ना .. डिस्काउंट मधे आणतो ! "
मालसे काकांनी काही नटसम्राट आणलं नाही.
पण तरूण मुलांना नाटकाच्या आणि सिनेमाच्या गप्पा सांगून वर्षानुवर्षे नादी लावण्यात त्यांचा हात कुणीच धरणारे नव्हते. अर्थात पुढे पुढे त्यांची वयात आलेली निळ्या डोळ्यांची सुंदर मुलगी हे ही कारण त्यामागे असू शकेलच.
ते कधी कुणाच्या घरात येत नसत. दारातूनच "आहेत का ?" अशी हाळी देत.
"या या, आलोच" असा आवाज येईपर्यंत, "या खाली, वाट बघतोय" हे उत्तर तयार असायचे.
आमच्या घरात ते कधीच आत आले नाहीत. त्यांनी यावं असं मला लहान असताना खूप वाटायचं. कारण ते हसून खेळून बोलत. आमचे दादा खूप उग्र आणि तापट होते. मालसे काकांचा जिंदादिल स्वभाव आणि दादांचा चुका शोधत फैलावर घेण्याचा स्वभाव यामुळे दादांचा खूप राग यायचा.
पण एकदा रात्री मालसे काका दादांना घेऊन गेले होते. येरवड्यात त्यांच्या बायकोला कुणी तरी छेडले होते. त्या दिवसापासून दोघे जण त्यांच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहत. मालसे काकांचे प्रयोग किंवा तालमी असल्याने ते घरी नसायचे.
दादांनी त्यांच्या तापट स्वभावाप्रमाणे मागचा पुढचा विचार न करता त्या दोघांच्या कानाखाली सणसणीत ठेवून दिल्या. त्यांचे व्यायामाचे शरीर होते. त्यामुळे कानाखाली मारली की झिणझिण्या येतात हे स्वानुभवाने ठाऊक होते. ते दोघेही हेलकांडत माफॉ मागत निघून गेले. त्या वेळी चूक असताना शिक्षा दिली तर डूख धरून जीव घ्यायचा विचार वगैरे होत नसे. आजच्या सारखे वाईट वातावरण नव्हते. त्यामुळे गंभीर परिस्थिती ओढवली नाही. दुस-या दिवशी पुरूष मंडळी गेल्यावर काकू आमच्या आईकडे आल्या होत्या. खूप उपकार झाले म्हणाल्या. पहिल्यांदा आणि शेवटच्या त्या घरी आल्या होत्या.
आई म्हणायची. "इतकी सुंदर आणि शालीन बाई हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा नाही. कशी काय ही बाई त्या नाटकवाल्या सोबत संसार करते कुणास ठाऊक ?"
थोडक्यात बायकांमधे मालसे काकूंबद्दल सहानुभूतीची भावना होती आणि पुरूषांमधे मालसेकाकांबद्दल असूयेची.
"फसली बिचारी नाटकवाल्याला " जोशी काका.
"दुस-यांच्या मंडळीबद्दल असे बोलू नये " मोहीते काका
" अहो वीर सरदार, आम्हाला नका सांगू .... गढीवर अंगवस्त्रं ठेवणा-यांनी आम्हाला उपदेश करावेत यापेक्षा डोळे का नाहीत मिटलेस रे भगवंता ?" अत्रे काका हे वाक्य अगदी वेगवेगळे हेल काढून असे काही बोलत की मोहीते चिडलेच समजा.
एक दिवस पुरूष मंडळी आणि शाळेतील मुलं यायच्या वेळेसच कॉलनीत बायकांची लगबग चालू होती. आम्ही घरी आलेलो पाहून आई आली. दादा घरी आले तोच आईने सांगितले
"अहो ऐकलंत का ?"
"थांब तरी, हात पाय धुवू दे "
फ्रेश झाल्यावर दादांनी विचारलं
" सांग आता "
"अहो आपल्या सर्वांना नाटक बघायला मिळणार आहे "
" कुठलं "
" ते नाही का केसांचं !"
" केसांचं ? मी नाही ऐकलं "
" अहो ते नाही का गुंता गुंता ?"
" हे कसलं नाटक "
" अहो , काय बाई करावं. .. गुंतता केश हे "
" अगं असं काय करतेस ! गुंतता हृदय हे असं नाव आहे नाटकाचं "
" तेच ते हो, त्याचे फ्री पासेस मिळणार आहेत "
" कसे काय ?"
" मालसे काकांकडे बरेच पासेस आहेत. मघाशी ते सांगत होते. ज्यांना ज्यांना यायचं , त्यांनी माझ्याकडून घेऊन जा म्हणून . प्रथम येणारास प्राधान्य तत्त्व "
" अगं मग संपलेही असतील"
" नाही हो, त्यांची मुलगी आली होती आईचा निरोप घेऊन. हवे असतील तर लवकर सांगा, नाहीतर मग संपून जातील . त्यांनी आपले काढून ठेवले आहेत "
आमचे दादा म्हणजे सिनेमा नाटकाचे दुश्मन होते. लहानपणापासून काबाड कष्ट केल्याने असले षौक नव्हते. पण आम्हाला कधी जाऊ नका म्हणाले नाहीत. त्यामुळे आईसोबत सिनेमा बघणे हा आवडता कार्यक्रम असायचा.
दादांना कसे बसे तयार करून दोन तिकीटं बुक केली गेली.
त्या दिवसापासून दादांना नाटकांची आवड लागली.
मग रात्री मालसे काकां सोबत चालायला जाणे होऊ लागले.
आमच्या दादांमधेही थोडासा नाटकीपणा येऊ लागला. त्यामुळे मालसे काकांचा राग आजही येतो.
नाटक सिनेमा दूर ठेवणे टीव्ही मुळे शक्य नव्हते. महिन्यातून एकदा एक नाटक दाखवले जाई आणि तीन शनिवार मराठी सिनेमे.
बेबंदशाही हे नाटक दाखवले गेले.
नंतर नटसम्राट !
त्या वेळी डॉ लागू नटसम्राट करीत असत.
मुलं कशी वैरी बनतात यावर अनेक नाटकं निघत. त्यातून ते भग्नदीप की ज्ञानदीप नावाचा एक प्रकार असायचा. त्यात मुलांनी घराबाहेर काढलेले आईवडील आणि त्यांची परवड हा विषय हटकून असायचा.
नटसम्राट च्या वेळी दादा लागूंच्या स्वगताला " अरे अरे अरे " अशी मोठ्याने दाद देत. एकूणच ते नाटक खूपच नाटकी आणि अनैसर्गिक आहे असं त्या वयात मत झालं होतं. आम्ही का असे वागू ? नाहीच वागणार .. मग का आमच्या दादांचे डोके फिरवता असा प्रश्न पडत असे.
असेच एक आई वडीलांना बाहेर काढायचे दूरदर्शन निर्मित नाटक टीव्हीवर झाले. त्या वेळचे कलाकार आता लक्षात नाहीत. पण दादा आईला म्हणाले होते " ए, आपण मुलांकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही बरं का... म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:खच वाट्याला येणार नाही "
मालसे काकां बरोबर रात्रीच्या बैठका वाढत चालल्या होत्या.
मालसे काका बोलताना नाटकी सूर टाळू शकत नसत. थोड्या फरकाने मधुकर तोरडमल यांच्यासारखी संवाद होती त्यांची. आपल्या नेहमीच्या आयुष्यात हा सूर अगदी विचित्र वाटत असे.
त्या वेळी लाऊड संवाद हे अत्यंत कॉमन होते. दवणीय लिखाण देखील अतिशय लोकप्रिय होते. त्यालाच मान्यता होती म्हटले तरी चालेल.
आणि चांगल्या कादंब-या म्हणून श्रीमान योगी, स्वामी, राधेय, कौंतेय, शहेनशहा , झुंज, झेप ही नावे ठरलेली असत. शाळेत असतानाच दादांनी हे ग्रंथ आणून दिले होते आणि मी ते वाचूनही काढले होते. मीच नाही तर त्या पिढीला दर्जेदार लिखाण म्हणजे हीच नावे ठाऊक असत. रहस्यकथा, भयकथा प्रकार हे अशिष्ट होते.
तख्तपोशी, गवाक्ष, तावदाने, झुंबर , गालीचे यातच मराठी साहीत्य येरझारा घालत होते की काय असे वाटायचे.
नाटकांची देखील अशीच गत.
वेटींग फॉर गोदो पाहण्यात आले आणि मग हे प्रकर्षाने जाणवू लागले.
अर्थात दादांसाठी असे साहीत्य, अशी नाटकं हे "सुधारल्याचे" लक्षण होते. कदाचित कुठेतरी आम्हालाही रस आहे बरं का असे दाखवण्याची स्वाभाविक उबळ देखील असावी.
अशा नाटकांतला नायक हा सेल्फ पिटीचा आणि स्वस्तुती या विकारांचा कायम बळी असे. त्याच्या स्वगतांमधून नेहमी आपण कसे वा-याला अमूक करू, पर्वताला भिरकावतो आणि अमक्या तमक्याला धडका मारतो या बढायांच्या पाठोपाठच... अरेरे , पण आज तोच पराक्रमी सूर्य आज कसा निस्तेज झालायज, आपल्याच पिल्लांपुढे ... असले कीव यावी असे संवाद असत. त्याला नाट्यगृहात दाद मिळत असे.
त्या मानाने मराठी सिनेमात नैसर्गिक बोलणे होई. मात्र भालजींच्या सिनेमात एक वेगळाच टोन असे "एक माणूस रागावलंय बरं का " हा सूर सर्वांच्याच बोलण्यात असे. असे वाटायचे की महारा़जांच्या काळी खेडो पाडी असेच बोलत असतील.
मालसे काका हे त्या काळाचे पात्र होते. त्या काळाला अनुसरून ते जगले.
रात्री माणसं जमवून नाटकातले संवाद म्हणणे हा नवाच कार्यक्रम आता लोकप्रिय होत चाललेला होता.
मालसे काका नेमक्या कोणत्या नाटकात काम करतात हे कुणालाच ठाऊक नव्हते.
पण सिनेमात पण त्यांनी काम केलेलं आहे अशा वदंता होत्या.
एका अशोक सराफच्या सिनेमात ते दिसलेही होते. चाळीत ते शेजारी असतात आणि फुकट मागून आणत असतात असं काही तरी.
" अशोक सराफने आग्रह केला म्हणून केला रे तो रोल "
असे मालसे काका तरूण मुलांना सांगत फिरायचे.
त्यांचे एक नाटक आले. त्यात त्यांचा फोटोही सकाळ मधे आला होता. ते नाटक चक्क चांगले चालू लागले होते.
मालसे काका आता दिसत नव्हते. खूपच बिझी झाले होते. मला ते नाटक बघायची खूप इच्छा होती.
मी आईच्या मागे भुणभुण लावली होती.
नंतर समजले की ते प्रौढांसाठीचे नाटक होते.
जंगली कबूतर या गाजलेल्या नाटकाच्या चालीवरच त्याने काहीतरी नाव होते.
मग मालसे काका खूपच बिझी झाले. अजून दोन तीन "तसली" नाटकं येऊ लागली.
नाटकाच्या हिरविनी टंच आहेत असा रिपोर्ट अत्र्यांनी आणला होता. अत्रे म्हणजे आमचे अत्रेकाका.
मालसे काका घरी येईनासे झाले.
काकू मात्र काकांची नाटकं चालायला लागल्याने आता दिवस पालटतील या आशेवर होत्या. मुलगी उद्या लग्नाची होईल तेव्हां कामाला येईल हे असे त्यांना वाटत होते.
मालसे काका मात्र पिंकी नामक कुणा हिरविनीच्या प्रेमात पडले होते.
तिला पुण्यात खोली घेऊन दिली होती. ते ही तिथेच राहू लागले होते.
त्यात दारूचे व्यसन लागले.
खूप दिवसांनी एकदा ते घरी आले. तेव्हां कडाक्याची भांडणं सर्वांनी ऐकली.
काकांना चालता येत नव्हते.
परत तुझ्या दारात येणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करताना त्यांचा तोल जात होता. भकाभका सिगारेटी ओढत होते.
टकलाच्या काठावरचे लांब केस अस्ताव्यस्त झाले होते.
डोळे लाल् बुंद
मला ते रूप भीतीदायक वाटले.
मला बघून ते हसले. ते दारू पिल्यानंतरचे हसणे अजून ओंगळवाणे होते.
गालाला हात लावून काही तरी सांगत होते पण तो भपकारा नाकात शिरला आणि मला तिथेच वांत्या झाल्या.
त्यांची मुलगी जुईली शरमेने चूर होऊन खाली बघत होती.
तिच्या आठवणीत तिचे बाबा असेच राहीले असतील का ?
पण नाही.
दोन दिवसांनी मालसे काका परत आले
या वेळी बराच काळ दिसले.
गणपतीसाठी त्यांनी एक नाटक लिहीले होते. त्यांनीच ते बसवले. आम्हा सर्वांना भाग घ्यायला लावला. त्यांनी त्यात छोटी भूमिकाही केली. गाणी गायले.
नवरात्रीत पुन्हा ते गायब झाले. दौरे होते म्हणे.
तीन वर्षे आले नाहीत.
या वेळी आले तेव्हां दुस-या दिवशी दारात नव्या नाटकाची हिरवीन आली होती. तिने भांडण उकरून काढले होते. काका तिला शांत करायला बघत, तसा तिचा आवाज चढायचा.
कधी न ऐकलेल्या घाणेरड्या शिव्यांचा मारा चालू होता. काकू तर हातात डोकं धरून मटकन खाली बसल्या होत्या.
ती जाताना काही तरी दमबाजी करून गेली. बहुतेक परिणाम वाईट होतील, सांगून ठेवते असं काही तरी होतं.
मालसे काकू खचल्या.
कॉलेज मधे याच माणसाच्या अभिनयावर, नाटकावर खूष होऊन होतं नव्हतं ते सोडून त्या पळून आल्या होत्या. पुढचे शिक्षणही याच माणसापायी अर्धवट राहीले होते.
मलाही आता चांगलेच समजत होते. कॉलेजच्या दुस-या वर्षाला होतो.
जुईली माझ्या मागे एक वर्ष.
माझ्याही मनात अंकुर फुटत होते.
पण दादांचा क्रूर अक्राळविक्राळ चेहरा आठवून ते विझायचे.
स्वतःच्या पायांवर उभे राहू तेव्हां जुईलीला मन की बात सांगायची असे ठरवले होते.
पण त्या एका भीषण संध्याकाळी...
जुईली रिक्षावाल्याचा हात धरून पळून गेल्याची बातमी आली.
दिसायला काळाकुट्ट, गुंडच असा रिक्षावाला तिला का आवडला असेल या प्रश्नाने छळ छळ छळले.
कदाचित आपण सांगितले असते तर तिच्या आयुष्याचे वाटोळे झाले नसते असे विचार सारखे मनात येत. फारच वाईट्ट वेळ होती ती. त्याच वेळी सुपरमॅन सिनेमा आलेला. त्यात धरणीकंप होतो आणि सुपरमॅन उलटे फेरे मारून काळ पुन्हा मागे नेतो. तसं काही करता आलं तर किती छान... असं वाटू लागलेलं.
जुईली गेली... म्हणजे हात धरून गेली हे दु:ख काही पचवता आलं नाही.
सर्वात वाईट म्हणजे ते शेअर करण्याची ही सोय नव्हती.
कारण
सर्वांची तीच अवस्था होती.
मालसे काकूंना वाईट वाटलेय असे मात्र वाटले नाही.
बायकांच्या बोलण्यातून कळाले की
वडलांच्या वागण्याने तिच्या मनाला खोल जखमा झाल्या होत्या.
माहेर या शब्दाबद्दलही तिटकारा निर्माण झाला होता.
मग एकदा मालसे काका घरी आले.
उद्ध्वस्त झालेले !
ज्या चार पाच बाया त्यांच्या आयुष्यात होत्या त्यांनी ओरबाडून हाकलून दिलं होतं. जिला खोली घेऊन दिली तिनेही एकदा थंडीच्या रात्री त्यांना घरात घ्यायला नकार दिला होता. यातली कुणीच त्यांची लग्नाची बायको नव्हती म्हणायला. त्यांनी यांच्या पडत्या काळात आधार द्यावा अशी अपेक्षाही ठेवणं चुकीचं होतं.
घरी त्यांचं पिणं सुरू झालं.
एक आहे, मालसे काकांना टक्कल होतं म्हणून सुरूवातीला ते मोठे दिसत. पण त्यांचं वय आहे तिथेच थांबलेलं होतं. आम्ही मोठे झालो तरीही ते तसेच दिसत. काकूही तशाच राहील्या.
आमचे सर्वांचे आईवडील मात्र वयानुसार बदलत गेले. वयस्कर दिसायला लागले होते.
मालसे काकांनी टोप लावलेला होता. चांगले हँडसम दिसत.
पिणं मात्र हाताबाहेर होत चाललेलं होतं.
बायकांबद्दलचा राग पिल्यानंतर उफाळून येई.
बायांबद्दल शिवीगाळ सुरू झाली कि शेजारपाजारचे दरवाजे बंद होत.
तरूण मुलांना सांगत "पोरीच्या नादाला लागू नकोस ! काय रे भो**च्या ?"
पोरं हसत असत.
काकू अबोल होत चाललेल्या होत्या.
वयाने त्या आमच्या पेक्षा थोड्याशाच मोठ्या दिसत.
यांचं पिणं सुरू झालं की त्या घराबाहेर पडत.
कधी भजनासाठी देवळात जात.
तर कधी बाजारहाट
एक दिवस मालसेकाकांच्या आरड्या ओरड्यानेच रात्री सर्वांना जाग आली.
ते काकूंना मारहाण करीत होते.
"कुल्टा, घराण्याचं तोंड काळं केलंस ...." वगैरे बडबड चालू होती.
दुस-या दिवशी बायकांची खुसूरफुसूर चालू होती. या अशा खास आवाजातलं फक्त बायकांना नेमकं कसं ऐकू येतं आणि कळतं हे एक रहस्यच आहे.
आणि मग एक दिवस काकू सय्यद मटकावाल्याबरोबर रहायला गेल्याचा बाँब त्या सात्विक कॉलनीत फुटला.
त्या काळी हे क्रांतीकारी नव्हे तर अनर्थकारी पाऊल होतं.
काका सुन्न होऊन बसले होते.
सर्वस्व लुटल्याप्रमाणे त्यांची सेल्फ पिटी ची स्वगतं सुरू होत. मग दमले की सुन्न होत.
पुन्हा पडचा उघडल्याप्रमाणे नवीन प्रवेश !"
अरबी घोड्यावरून वा-यालाही थोपवणारा मी
ज्याच्या तलवारीची धार पाहून खुद्द तेज ओशाळून हात जोडून उभे राहत असे
तो मी..
आज लाचार आहे
बेबस आहे
चक्काचूर झालाय रे माझ्या तेजाचा
मालसे का़कांचं हे स्वगत अंगावर येणारं होतं
त्या काळच्या नाटकात , लाऊड असलं तरीही मनाचा ठाव घेणारं होतं
लाऊड स्वगतं पेलायची असतात. नटात ती ताकद असावी लागते असं एकदा ते म्हणाले होते.
त्याचा अनुभव घेत होतो.
एक उत्तम अभिनयाविष्कार समोर होता आणि प्रेक्षक कुणीही नव्हतं..
ना रंगमंच होता
ना कुणी समीक्षक !
त्यांच्या आयुष्याचं नाटक नियतीनेच लिहीलेलं होतं
मालसे काकूं बद्दल मग खमंग चर्चा होत राहील्या. बायका पदर लावून डोळे मोठे करून आश्चर्य व्यक्त करायच्या.
" वाटलं नव्हतं बाई, पण कुणाचा भरंवसा देता येतो का आजकाल ?"
"काय गं बाई"
" मी सांगते, हे आधीपासूनच असणार "
हळू हळू मालसे काकांना सहानुभूती मिळू लागली.
त्यांचे दारू पिणे आणि स्वगतं बडबडणे वाढत चालले होते.
त्याच तारेत ते फिरत राहत.
एकदा येरवड्याच्या चौकात स्वगतं म्हणत असताना पोराटोरांनी दगड मारले होते.
दार उघडं ठेवून फिरत असल्याने घरातलं सगळं चोरीला गेलं होतं.
मूळचा गौरवर्ण काळवंडला होता. त्यावर मळाची पुटं चढत होती.
कॉलनीतल्या लोकांनी मेंटल हॉस्पिटलला कळवलं.
एक दिवस गाडी येऊन काकांना घेऊन गेली.
दोनेक वर्षांनी काका पुन्हा आले.
काहीच नव्हतं जवळ.
दोन दिवस शेजा-या पाजा-यांनी खायला घातलं.
नंतर परवड सुरू झाली.
काका भीक मागू लागले.
कुठे कुठे जत्रेत अभिनय करून पैसे मिळवू लागले होते.
" ट्रॅजेडीच झाली नाही का मालसेंची ?"
हाच प्रश्न लोक एकमेकांना विचारत.
कॉलेजला असताना गणपतीसाठी नाटक बसवत होतो. मी स्वतः लिहीलेलं होतं.
सगळी मुलं मुलंच नाटक करणार होती.
तालमी चालू असताना काका येऊन उभे राहत.
" ए मला पण काम द्या "
आम्ही हो हो म्हणून वाटेला लावायचो.
एक दिवस दादांनी पाहीलं.
दादा म्हणाले " मालसेला छोट का होईना काम द्या रे "
मी काहीच बोललो नाही. मी घाबरायचोच दादांना.
पण पोरं म्हणाली " दादा, पण आमची फजिती झाली तर ?"
दादा म्हणाले " बाळांनो, काही होणार नाही "
हो ना करता त्यांना गाणी द्यावीत आणि प्लान बी म्हणून रेकॉर्डही करून ठेवावीत असे नियोजन झाले.
गणेशोत्सव सुरू झाला.
प्रयोगाचा दिवस आला.
सकाळी सकाळीच काका २५ रू मागायला आले. मी घाबरलो.
पण त्यांना कुठूनतरी २५ रू मिळाले. आता पिऊन धिंगाणा होणार असे वाटत होते.
पण तासाने मालसे काका परतले ते अगदी चकचकीत होऊन.
दाढी केलेली.
पुन्हा पहिल्यासारखेच लाल बुंद झालेले.
आम्ही त्यांना आपालया घरातले जुने कपडे दिले होते. ते त्यांनी धुवून नीट इस्त्री करून घातल्याने रूबाबदार दिसत होते.
दारूच्या खुणा नाहीशा झाल्या नव्हत्या.
पण मंडपात मागच्या बाजूला बसून त्यांनी चेह-याला रंग लावला.
आणि एकही चूक न करता पाठीमागून सगळी गाणी धमाल म्हटली.
टेप लावायची पाळीच आली नाही.
नाटक संपले.
टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक कौतुक करू लागले.
मालसे काकांना स्फुरण चढले होते.
ते दमले होते. पण उत्साह वाढता होता.
कुणाचेही न ऐकता स्टेजवर गेले.
"थांबा थांबा... घरी जाऊ नका "
कुठल्याशा नाटकातला जुना कॉस्ट्युम अंगावर चढवलेला.
गर्दी पाहून ते हरखून गेले होते.
आणि
अगदी धीरगंभीर आवाज लावून त्यांनी माईक हातात घेत स्वगताला सुरूवात केली
" कुणी घर देता का घर "
अंगावर सरसरून काटा आला.
नटसम्राट या नाटकातलं हे स्वगत मालसे का़कांच्या त्या आवाजात ऐकलं त्याची सर कुणालाच नाही.
ते एकामागून एक स्वगत म्हणत होते.
प्रेक्षक स्तब्ध झाले होते. मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
लाऊड नाटकांतल्या स्वगतांबद्दलची अढी नाहीशी झाली होती.
खूप थकलोय. जरा टेकतो
असे म्हणत ते खाली बसले.
मग पॉझ घेतला. लोक टाळ्या वाजवत अभिनयाला..
दादा समोरून स्टेजवर चढले. मालसे काकांच्या नाकाला हात लावला.
आणि माईकवरून घोषणा केली
"मालसे गेले "
टाळ्या वाजायच्या थांबल्या आणि सन्नाटा पसरला...
एक्झिट सुद्धा अगदी नाटकी पद्धती ने घेतली होती काकांनी अगदीच धक्कादायक
पक्का नाटकी माणूस....
नाटक जगला आणि नाटकातच मेलाही
घाणेकरांचा ट्रेलर
...
छान लिहिलंय.. आवडलं..
छान लिहिलंय..
आवडलं..
आवडली कथा पण ही खरी गोष्ट
आवडली कथा पण ही खरी गोष्ट आहे का ?
छान लिहिलंय.. आवडलं..
छान लिहिलंय..
आवडलं..
जबरदस्त सुंदर व्यक्तीचित्र.
जबरदस्त सुंदर व्यक्तीचित्र.
कथेतले धक्के अचनक आले असले तरी "वास्तवच" वाटत राहिले..... वास्तवासारखेच दाहक!
अशा कथा पाहताना नेहेमी मला मनात वाटत रहाते कि पुढे हे सारे बदलेल ; काहीतरी चांगले घडेल... आणि भरकटलेलं शिड परत मार्गाला लागेल , किनारा गाठेल!
पण तसे होता होता राहून जाते.
का कुणास ठाउक , कथा वाचताना नंदा प्रधान आठवत राहिला.
सुरेख....
सुरेख....
अप्रतिम व्यक्तीचित्रण.
अप्रतिम व्यक्तीचित्रण.
आवड्लं.
अशी परवड झालेली माणसं पाहिलीत.
छान लिहिलंय, वाईट वाटलं वाचून
छान लिहिलंय, वाईट वाटलं वाचून..
व्वा, आवडलं व्यक्तिचित्रण!
व्वा, आवडलं व्यक्तिचित्रण!
अतिशय खिळवून ठेवणारं
अतिशय खिळवून ठेवणारं शब्दचित्रं.
मालसे काका खूपच आवडून गेले, मनस्वि वाटले एकदम.
अप्रतीम..!
अप्रतीम..!
अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण.
अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण. अप्रतिम लिखाण
कलाकारांच्या संसाराची परवडच
कलाकारांच्या संसाराची परवडच का होते!
वाईट वाटले
>>>> का कुणास ठाउक , कथा
>>>> का कुणास ठाउक , कथा वाचताना नंदा प्रधान आठवत राहिला. <<<<
मला फेरफार केलेले काशिनाथ घाणेकर...
सुन्दर व्यक्तिचित्रन....शेवट
सुन्दर व्यक्तिचित्रन....शेवट खुपच भावनिक......अप्रतिम....
आभार सर्वांचे.
आभार सर्वांचे.
मालसे काका खरोखरच होते. लिहीताना थोडेसे रंजक पद्धतीने लिहीले आहे. काही घटनांचा क्रम मागे पुढे झाला असेल तर तो स्मरणदोष आहे.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
किरणुद्दीन..... फार भारी
किरणुद्दीन..... फार भारी लिहिलेत तुम्ही हे व्यक्तिचित्रण !! एक न एक प्रसंग डोळ्यासमोर आला.
किरणुद्दीन तुमचे लिखाण आवडते
किरणुद्दीन तुमचे लिखाण आवडते मला. छान आणि चपखल लिहिता.
जबरदस्त लिहिलंय!!
जबरदस्त लिहिलंय!!
> इंदिरा गांधी गेल्या तेव्हां बाईने मुलाच्या हातातल्या घड्याळाची चौकशी केली ते कळलं का असा अनुनासिक हेल काढून विचारलेला प्रश्न ध्यानात राहिला. > हे चुकलंय का? 'संजय गांधी गेले तेव्हा बाईने....' हवं ना?
छानच झालंय व्यक्तिचित्रण!
छानच झालंय व्यक्तिचित्रण! वाईट वाटलं त्या सगळ्या कुटुंबासाठी.
ते संजय गांधी असावं असं मलाही वाटलं.
छान लिहिलंय !!!
छान लिहिलंय !!!
त्या वेळी चूक असताना शिक्षा दिली तर डूख धरून जीव घ्यायचा विचार वगैरे होत नसे. >>> खरंय
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय
देवकी, प्रसन्न, असुफ , किल्ली
देवकी, प्रसन्न, असुफ , किल्ली धन्यवाद'
दक्षिणा मनापासून आभार
अॅमी, वावे >> इंदिराजी गेल्या तेव्हांही संजय गांधींच्या हातात असलेल्या घड्याळाची चौकशी त्या करत होत्या याबद्दलच काही लोकांना चर्चा कराविशी वाटत होती. तुम्ही म्हणता ते ही चूक नाहीच अर्थात.
छान लिहिलयं
छान लिहिलयं
> इंदिराजी गेल्या तेव्हांही
> इंदिराजी गेल्या तेव्हांही संजय गांधींच्या हातात असलेल्या घड्याळाची चौकशी त्या करत होत्या याबद्दलच काही लोकांना चर्चा कराविशी वाटत होती. > ओह्ह :-|
खुप छान.. शेवटी डोळे पाणावले.
खुप छान.. शेवटी डोळे पाणावले..
वाह निव्वळ अप्रतिम!
वाह निव्वळ अप्रतिम!
किरणुद्दीन प्रचंड कौतुक.
खरं सांगतो आडनाव पाहून वाचायला घेतलं आणि कधी गुंतून गेलो कळलच नाही.
मालसे नाही बरं माssssलsssशेsss
आवडले व्यक्तीचित्रण..
आवडले व्यक्तीचित्रण..
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम!
Pages