*बंडखोर काका घाडीगांवकर*

Submitted by ASHOK BHEKE on 25 November, 2018 - 00:20

बंडखोर काका घाडीगांवकर हे शिर्षक पाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. हे शिर्षक देणे मला त्यांच्या आजपर्यंतच्या जीवनाला अनुसरून असल्याने उचित वाटते. कारण अन्याय, जुलुमाच्या, आक्रमणाच्या विरुध्द उभा ठाकतो तो बंडखोर.समाजमनाला आरसा दाखविणारा, नव्या युगाला प्रकाशमान करणारा बंडखोर. आपला माणूस चुकला भुलला तर त्याला सावरून घेणारा बंडखोर. संत तुकोबा सारखे समाजात अनेक बंडखोर अनेक क्षेत्रात उदयास आले.सूर्यासारखे तळपत राहिले. सध्या सोशल मिडीयावर गाजत असलेले, मालवणीभाषेविषयी ममत्व आणि आस्था बाळगताना बोलीभाषेचा नेमका आणि प्रभावी वापर थोडक्या शब्दात चाबकाचे फटकारे मारीत वळ उठविणारे, आपल्या उपहासात्मक शैलीत तिखट शब्दात समाचार घेताना समाजातील शोषण करणाऱ्या किंवा साध्या भाषेत वाटोळे करणाऱ्या, ती राजकीय प्रणाली असो वा स्वार्थी नीती.... त्यांनी कुंपणावर बसून बघ्याच्या भूमिकेत न वावरता बिनधास्तपणे कुणाचीही भीडभाड ने ठेवता असे स्वातंत्र्य विचार व्यक्त केले आहेत. लहानपणापासून आम्ही त्यांना पाहत आलो आहोत. खूप बोल्ड, मनमोकळी, आक्रमक आणि खूप बोलघेवडा.पण हाच माणूस महालक्ष्मी भक्त असल्याने नवरात्रीत नऊ दिवस मौनव्रत धारण करतो. आपणही त्यांना ओळखत असाल. फेरबंदर सार्वजनिक मंडळाची धुरा त्यांनी विनापद ३० वर्षे सांभाळली. युवक प्रतिष्ठान, इळये या संस्थेच्या माध्यमातून आपल्या गावी सामाजिक विधायक उपक्रम राबविले.
सन्माननीय शरदच्चन्द्र पवारांचे विचारसरणीची पताका खांद्यावर घेतलेला एकनिष्ठ अनुयायी. परखड लेखन, कोणतीही भीडभाड न ठेवता टीका करणे, आपल्याच लेखनातून विषयाचा गाभा अचूकपणे टिपत सौम्य शब्दात जनमानस ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात वादाला तोंड फोडणारा, कोकणातील देवगड तालुक्यातील इळये गावचे सुपुत्र. काळाचौकी फेरबंदर भागातील सामाजिक कार्यकर्ते काका. पूर्वी रावजी सोजपाळ चाळीत राहायचे आता ते काळाचौकी अभ्युदय नगरात राहतात. एकनाथ बांदल, सीताराम शेट्टी यांच्याशी त्यांचे घनिष्ट सबंध. १९८४ च्या विधानसभा निवडणुकीत भाई बांदल यांच्या सोबतीला राहून विरोधकांना घाम आणणारी रणनीती ठरविणारे काका नावाचे अस्त्र सर्वत्र सुपरिचित झाले. स्वत: मोठे होत नाहीत, पण सामान्य कार्यकर्त्याला प्रभावी नेता बनविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. मध्य रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेला ही वामनमुर्ती. अनेक समस्यावर आनंदाचा गुणाकार करीत दु:खाचा भागाकार करीत उत्तराला शून्य स्वरूप देणारे एक धडपडे व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू उर्फ काका घाडीगांवकर. मध्य रेल्वेत सेवेत असताना त्यांच्या एका कामगाराला एक पठाण कर्ज परतफेड करीत नव्हता म्हणून मारझोड करीत होता. अनेकजणांनी बघ्यांची भूमिका स्वीकारली असताना काकांनी त्या पठाणाला तेथेच अडविले आणि विश्वासू कामगाराकडून थोडे थोडे पैसे काढून त्या सावकाराचे कर्जफेड केली. तेव्हा अनेक कामगाराच्या मदतीसाठी अल्पव्याज दराने फंड सुरु केला. गरजवंताला मदत करीत त्यातून व्याज जमा झाले त्या रक्कमेतून प्रत्येक कामगाराचा दीर्घ स्वरूपाचा भारतीय विमा उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यामुळे सेवानिवृत्तीला आलेला कामगार सुखावला गेल्याचे आजही चर्चिले जाते. सेवानिवृत्त होताना देखील त्यांनी रेल्वेत गुणवंत काम करणारे ज्यांना प्रशासकीय अडचणीमुळे त्यांच्या कामाचा मानमरातब राखला गेला नाही. त्या १२५ कामगारांचा विशेष भेट देऊन सत्कार करण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला. विशेष या सत्कार सोहळ्याला रेल्वे अधिकाऱ्याव्यतिरिक्त मनसे नेते बाळा नांदगावकर, कुलदीप पेडणेकर आवर्जून उपस्थित होते. तरीही या कार्यक्रमासाठी आधार दिला तो संजय नाईक यांनी....! त्यांचा मित्रपरिवार केवळ एकाच पक्षात नसून सर्वच पक्षात आहे.
सहकारातील बोकाळलेल्या भ्रष्टाचार आणि प्रथांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने २०१३ साली ९७ वी घटना दुरुस्ती करून त्यात राज्य सरकारने किरकोळ बदल सभासद मुलभूत हक्क या अन्वये सभासदांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे यासाठी झगडणारे.... समाजातील विकलांग, विधवा, असहाय ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून सुसह्य जीवन जगण्यासाठी मिळत असलेले तुटपुंजे अनुदान दिवसाला फक्त किमान २० रुपये दिले जातात. महिना ६०० रुपये फक्त. प्रचंड महागाई वाढलेली असताना सरकारी व्यवस्थेच्या अनास्था आणि नाकर्तेपणावर उपहासगर्भ शैलीतून कोरडे ओढीत दीनदुबळ्या मायबाप यांच्यासाठी आवाज उठविणारे, सामान्यांची कड घेत त्यांच्या काळजाचा तळाशी खोल बुडी मारून थांग लावणारा अवलिया काका,प्रशासकीय कामात बाप आणि प्रचलित कायद्याचे ज्ञान असल्याने मुत्सदीपणाचे दर्शन आपसूकच होते. ते समाजासाठी वापरले तर सोन्याहून पिवळे होते. अभ्युदय मधील प्रयास सोसायटीला आवश्यक दिशा दाखविण्याचे काम त्याकाळी त्यांच्या अनुभवातून झाले.
परेल भागात नव्याने झालेले वर्मा ट्रस्ट या संस्थेने दिल्लीस्थित एका धनदांडग्या कंपनीला चालविण्याचा ठेका दिला. सदर जागा हि मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्यामुळे किमान १५% खाटा या गोरगरीबांसाठी राखल्या पाहिजेत. पण सदर रुग्णालयात पैसा कमविण्याचे उद्दिष्ट असल्याने गरीब माणसाला तेथे विचारीत नाहीत म्हणून हल्लाबोल करणारे काका. कधीतरी सोशल मिडीयांवर राजकीय कार्यकर्त्यांची भांडणे होऊ लागतात.तेव्हा समेट घडविण्यासाठी धाव घेणारे काका. मुंबई इतकेच त्यांचं त्यांच्या गावावर प्रेम दिसून येते. गांगेश्वर भक्त असलेल्या काकांना या गावच्या कुलस्वामीनी सुखी माणसाचा सदरा दिला आहे, असेच वाटते. अनेक संस्थावर ते काम करून आपला प्रभाव दाखवीत असतात.त्यांची काम करण्याची विलक्षण हातोटी तरुणाईला लाजवील अशीच आहे. घाडीगांवकर समाजासाठी समाजभवन असावे असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या काका घाडीगांवकर यांना घोडपदेव समूहाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देताना इतकेच सांगेल काका घाडीगांवकर आगे बढो.....!

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users