पौष्टिक सलाडः- मूग-पनीर

Submitted by अतरंगी on 23 November, 2018 - 03:38

तेल, साखर, मीठ या सर्वाच्या अतीसेवनाने होणारे होणारे नुकसान सर्वांनाच माहित आहे. ते वगळून पण ताटातील सर्व महत्वाचे घटक आणि त्यातून मिळणारे पोषक मुल्य मिळतील अशा सलाडच्या पाककृतींसाठी ही मालिका. ही सगळी सलाड आपल्या जवळच्या भाजी मंडईत मिळणार्‍या घटकांपासून आणि घरी बनवता येण्यासारखी आहेत.

मी ही रेसीपी कुठे तरी वाचली होती. त्यातले ( माझ्या दृष्टीने) अनावश्यक घटक वगळून मी हे सलाड बनवतो.

घटक क्र १:- मोड आलेले मूग (एक मुठ)
घटक क्र २:- लेट्युस+ पार्सली ( एक वाटी)
घटक क्र ३:- टोमॅटो ( अर्धी वाटी)
घटक क्र ४:- पनीर किंवा फेटा चीज ( १०० ते १२५ ग्रॅम)
घटक क्र ५:- ऑलिव्हज

कृती:-
१. पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. थोडे बटर टाकुन परतून/ खरपुस भाजून घ्या. ( माझ्या सर्व सलाड मधला हा एक माझा नावडता प्रकार आहे. पण आठवडा/ पंधरा दिवसात एवढेसे बटर पोटात गेले तर काही बिघडत नाही. असे म्हणून स्वतःचे समाधान करुन घेतो. Proud )

PHOTO-2018-11-23-13-06-53 (2).jpg

स्वप्नाली यांनी ईथे केलेला पनीर टिक्का जरी बनवला तरी बहुदा यात चांगला लागेल.

खरेतर फेटा चीज या सलाड मधे मस्त लागते, पण चांगले फेटा चीज माझ्या जवळपास कुठे मिळत नाही. त्याला पर्याय म्हणून मी पनीर वापरतो.

२. लेट्युस, पार्सली निवडून घ्या.
PHOTO-2018-11-23-13-06-53.jpg

३. टोमॅटो चिरुन घ्या. मी हा पुर्ण बारीक चिरला आहे. सलाड साठी कापतात तसा लांब फोडी करुन टाकला तरी चालतो. फोटो मधे चांगला दिसतो. Happy
PHOTO-2018-11-23-13-06-53 (1).jpg

४. मूग वाफवून घ्या.
PHOTO-2018-11-23-13-06-53 (3).jpg

सगळे घटक पदार्थ एक बाउल मधे मिक्स करुन घ्या.
PHOTO-2018-11-23-13-06-53 (4).jpg

टीप्सः-
१. फेटा चीज वापरुन सलाड करणार असाल तर ऑलिव्हज शक्यतो टाकू नका.
२. लेट्युस आणि पार्सली दोन्ही असायलाच पाहिजे असे कही नाही. या पैकी काही एक असले किंवा बारीक चिरलेला पालक असला तरी या सलाड मधे टाकता येतो.
३. मुग पण परतून घेता येतील पण मला तितकेसे आवडत नाहीत म्हणून मी वाफवून घेतो.

मी स्वतः आहारतज्ञ नाही, मला त्यातले काही कळत नाही. मीठ, तेल, साखर विरहीत जेवण बनविण्याच्या अट्टहासात तयार झालेल्या/ मिळालेल्या/ ट्राय केलेल्या रेसीपी आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपी,
आजच सकाळी याचा गरीब चुलतभाऊ खाल्ला,
भिजवलेले , मोड आलेले मूग+ मोड आलेल्या मेथ्या + कांदा, टोमॅटो कोथिंबीर लिंबू+ किंचित काळे मीठ

पनीर असल्याने रेस्पी आवडली आहे. Happy
अतरंगी, तुम्ही कुठल्या वेळचं जेवण म्हणुन सलाड खाता? दुपारी की रात्री?

बटर वर परतलेले पनीर आवडत नसेल तर कच्चं ताजे पनीर हाताने कुस्करून सलादवर घालून बघा. छान लागते.
मी बऱ्याचदा सलाडमध्ये फेटा चीझ ऐवजी कच्चं पनीर कुस्करून घालते.

पनीर तळून मस्त लागतेच.पण बरेचदा पालकपनीरमध्ये ,पनीर घालताना कुकरमधे भाताबरोबर बंद डब्यात पनीर उकडून नंतर त्याचे तुकडे घालते.तेही मस्त लागतात.

तुम्ही कुठल्या वेळचं जेवण म्हणुन सलाड खाता? दुपारी की रात्री?>>>>

कामाच्या स्वरुपामुळे दुपारी...

तुम्ही जेवणाच्या ऐवजी हे सॅलाड खाता का?>>>>
हो

मी बऱ्याचदा सलाडमध्ये फेटा चीझ ऐवजी कच्चं पनीर कुस्करून घालते.>>>
कच्चं पनीर एका सलाड मधे ट्राय केलं होतं, पण न आवडल्याने मी ही पद्धत वापरली होती. पुढच्या वेळेस कच्चं परत वापरुन पाहतो.

तोफू चालेल का पनीर ऐवजी?>>>

चालतंय की Happy

मस्त दिसतंय सॅलड. पण मला पनीर ऐवजी फेटा आवडेल.
तुम्ही भारतात आहात का अतरंगी? तिकडे अरुगुला नावाची सॅलडकरता वापरली जाणारी पानं मिळतात का? मागे उन्हाळ्यात ही पानं, फेटा चीज, फळ बिया, बदामाचे काप आणि थोडं चिरलेलं कलिंगड असं सॅलड खाल्लं होतं आणि मग घरीही केलं होतं दोन तीन वेळा. भारी लागलेलं.

E74B9505-75B7-4BBE-AE4F-274EEA9961D2.jpeg

तुम्ही भारतात आहात का अतरंगी? >>>>
हो.
तिकडे अरुगुला नावाची सॅलडकरता वापरली जाणारी पानं मिळतात का?>>>
नेहमी जिथून सलाड घेतो त्याच्याकडे पाहिल्याचे आठवत नाही. शोधून पाहतो.

बाकी तुम्ही टाकलेलं सलाड करुन बघेन उन्हाळ्यात.