शहर को नज़र का टीका (ग्रीस ९)

Submitted by Arnika on 17 November, 2018 - 17:01

चॉकलेट केकच्या धांदरटपणे कापलेल्या तुकड्यासारखं दिसतं हे शहर. वेगवेगळ्या शतकांचे एकावर एक चढवलेले नीटस, पण आता एकमेकात मिसळलेले थर. रेल्वे रुळांच्या आजुबाजूने मधेच भग्न बाजारपेठ दिसते. उंच सोसायट्यांच्या रानातून मान वर काढून बघणारं पार्थेनोनचं देऊळ दिसतं. कचकड्याच्या दागिन्यांची हातगाडी आद्रियानोस राजाने बांधलेल्या लायब्ररीसमोर दिसते. ओस पडलेल्या भिंतींवरच्या ग्रफ़ीटीपलीकडेच एखादं जुनं, कष्टाने जपलेलं चर्च दिसतं. एक पुरातन पेठ, तिच्यामागे रोमन पेठ, दोघींच्या मधे आजची पेठ आणि त्या वाटेत जिथे जिथे कोपरा मिळेल तिथे उपाहारगृह.

सिक्यामध्ये राहात असतानाही सुट्टीच्या दिवशी अथीनाला दोनदा येऊन गेले होते, पण घाईघाईने शहराबद्दल लिहायचं टाळलं. स्तंभांची उंची आणि खडकाचा प्रकार, युद्धाचं साल आणि तिकिटांच्या किमती यावरून मला आजपर्यंत कुठलंच शहर कळलेलं नाहीये. हे सगळं ठाऊक असणं, सांगणं, महत्त्वाचं असेलही कदाचित, पण त्याहीपेक्षा तिथे उभं राहिल्यावर किती ठेंगणं वाटतं हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. कुठल्या स्टेशनवर उतरून काय बघायचं या माहितीपेक्षा चुकीच्या स्टेशनवर उतरून चालत जाताना वाटेत काय दिसलं ते जास्त मोलाचं आहे. अमुक ठिकाणी करायचा वीस गोष्टी किंवा मस्ट्-गो प्लेसेस शोधून रांगोळीच्या ठिपक्यांवरून चालण्यातली गंमत कधी समजली नाही मला…

डोकं पाठीला टेकलं तरी संपतच नाहीत इतकी उंच देवळं; घुबडासारखी मान करूनही डोळ्यात मावत नाही अशी आद्रियानोसची लायब्ररी, भग्न असूनही शहरावर पहारा देणारं पार्थेनोन. असं भव्य काहीतरी डोळ्यासमोर असतानाच त्याच्या पलीकडचं, पाचशे वर्षांनंतर बांधलेलं अजून काहीतरी दिसतं. तिथे फिरताना दर पावलाला “मातीवर चढणे एक नवा थर अंती” हे आठवणंच होतं मला. तशी रुडियार्ड किपलिंगची एक सुंदर कविता आहे : Cities and thrones and powers. काळाच्या नजरेत या सत्ता, महानगरं, साम्राज्य म्हणजे रोज उगवून कोमेजणाऱ्या फुलांसारखी आहेत. त्या दोन्ही कवितांचा जप करायला लावते अथीना.

दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत ग्रीसचा धर्म आपल्याला माहीत असलेल्या आपोल्लोना, ईफ़ेस्तोस, दीयास (झ्यूस) वगैरे बारा देवांच्या मंडळाचा होता. त्याला एल्लेनिस्मोस म्हणतात. या देवांच्या पूजाअर्चा, त्यांचे मानापमान, त्या देवांना पूज्य मानून घडवलेल्या वास्तू आणि त्यांच्यावर ओमिरोसने लिहिलेली दोन महाकाव्य, इलियादा आणि ओदीस्सिया, हे आपल्याला त्यातल्या त्यात माहीत असलेलं ग्रीस आहे (तेच ते, होमरने लिहिलेली इलियड आणि ओडिसी ही महाकाव्य. पण ग्रीक नावं मराठीत लिहिणं शक्य असताना मी उगाच इंग्लिश नावं घेणार नाहीये). सिकंदर आपल्या पायरीशी येऊन ठेपला म्हणून तो इतिहास आपण चवीपुरता वाचलेला आहे, पण तो जन्माला येण्याच्या शंभर वर्ष आधी या राज्याच्या सुवर्णकाळ होता. तेव्हा ते युनायटेड स्टेट्स ऑफ ग्रीस म्हणायचे स्वतःला. शहरातली पुरातन पेठ, देशातली अनेक देवळं, जुनी ओलिंबीया त्या काळात बांधलेली आहेत.

पुढे रोमराज्य आलं. इटलीतलं रोमराज्य संपल्यावरही हजार वर्ष त्यांची ग्रीसमधली शाखा चालू होती. हेच ते व्हिझांतीनी साम्राज्य. या काळात ग्रीक ख्रिश्चनांनी कॅथॉलिक धर्मापासून फारकत घेतली. त्यांचं वेगळं संगीत, कला, कीर्तनं या हजार वर्षांत बहरली. त्यांच्या कोन्स्तान्दीन राजाने नवी राजधानी वसवली : कोन्स्तान्दिनोप्पोली. म्हणजे अत्ताचं तुर्कस्तानातलं इस्तांन्बूल. अहमदनगरला कसं नगर म्हणतो आपण, तसं इकडे कोन्स्तान्तिनोप्पोलीला अजूनही पोली म्हणतात. अर्थ तोच. नगर. युरोपची गजबजलेली बाजारपेठ; त्यांच्या व्यापाराचा आणि संस्कृतीचा गाभा! १४५३ सालापर्यंत व्हिझांतीनी साम्राज्य तग धरून होतं. मग चारशे वर्ष तुर्की ओटोमन राज्य आलं.

ग्रीक लोककथांमधून तुर्कांच्या राज्याची फार बोलकी वर्णनं आहेत. त्यात जिज़िया कर भरणं आहे. दर पाच मुलांमागे एक तुर्कांकडे मुसलमान म्हणून वाढवायला सोपवणं आणि त्याला तुर्की सैन्यात भरती करणं आहे. पोटचं पोर तुर्कांना द्यायला लागू नये म्हणून आईनेच मुलाला मारझोड करून अपंग केल्याच्या गोष्टी आहेत. झालंच तर ग्रीक भाषेतल्या म्हणींमध्ये सारखा तुर्कांचा उल्लेख येतो. त्यातल्या सगळ्याच म्हणी सांगण्यासारख्या नाहीयेत, पण त्यातल्या त्यात सभ्य म्हणजे, “तुर्काने शांतीची घोषणा केली म्हणजे युद्ध नक्की” वगैरे वगैरे. शेजार-शेजारच्या या दोन्ही देशांत असलेला बेबनाव अजूनही जागोजागी दिसतो. दोन्हीकडच्या जनतेला बराच त्रास, मायभूमीचा विरह, कत्तल, युद्ध या सगळ्यातून जावं लागलंय. कारण कितीही वेगळी राज्य आणि राजे म्हंटले तरी तो भूभाग एकच आहे. पोलीमध्ये जुन्या ग्रीक आणि अथीनामध्ये तुर्की वस्त्या अजूनही आहेत. पिढ्या न् पिढ्या पोलीमध्ये राहाणाऱ्या ग्रीकांना तुर्कस्तानातून निघून यावं लागलं त्यावर एक सुंदर पिच्चर आहे – पोलीतिकी कुज़ीना. त्यातला पोलीतिकी शब्द मुद्दाम अस्पष्ट ठेवलाय कारण पोलीतिकी म्हंटलं तर अर्थ ‘पोलीचं स्वयंपाकघर’ होतो आणि पोलितिकी म्हंटलं तर ‘राजकीय स्वयंपाकघर’!

आता इतक्या मोठ्या अजस्त्र इतिहासातून मी हीच तीन साम्राज्य निवडून का सांगितली, तर त्यांची सावली मला ग्रीसवर अजूनही दिसते. हा उंबरठा आहे आशिया आणि युरोपचा. युरोपच्या शहरांसारखी अथीना आवरलेली, शिस्तीची नाहीये पण आपल्याला जरासं परकं वाटावं असं युरोपीयन तिच्यात काहीतरी आहे. पूर्वेकडच्या प्रत्येक नगरीसारखं तिलाही वाटतं की आपल्यापासूनच संस्कृतीचा उगम झालाय, पण अत्ता आपले बरे दिवस नाहीत याची जाणीव आहे तिला. पश्चिमेचा अभ्यासक्रम आणि पूर्वेचा अभ्यासूपणा; पश्चिमेचे सण पण ते साजरे करण्याची रीत पूर्वेसारखी; पश्चिमेचे मसाले नि पूर्वेकडचं स्वयंपाकघर; पश्चिमेचं चलन आणि पूर्वेसारखं व्यवस्थापन; पश्चिमेचा हिवाळा आणि पूर्वेचा उन्हाळा; पश्चिमेचे शब्द आणि पूर्वेसारखं व्याकरण; पश्चिमेची घरं आणि पूर्वेसारखं घरपण; पश्चिमेचे पाव आणि पूर्वेची भाजी… खूप झालं ना? थांबू? ओके! थोडक्यात ओळखीची म्हणावी तर एकदम वेगळी वाटणारी आणि अनोळखी म्हणावी तर अगदीच घरची वाटणारी आहे अथीना.

कर न भरण्याच्या वृत्तीचं तर काय विचारता! दीमित्राच्या होटेलचं रंगकाम करताना रंगाऱ्याने पंधरा हजार यूरो किंमत सांगितली. तिने पावती मागितली तर म्हणाला, “पावतीसकट एकोणीस हजार होतील”. लहानात लहान कामापासूनच हे गणित सुरू होतं. बहुतेक लोक स्वतःच्या फायद्याचं बघतात आणि विदाउट पावती पर्याय निवडतात. दीमित्राने पावतीसकट एकोणीस हजार भरायचेत म्हंटल्यावर रंगारी रडायचा बाकी होता, की बाई गं, तू वेड्यासारखा कर भरत्येस तो भरत्येस वर मलाही भुर्दंड का?

मी राहात्ये तो भाग म्हणजे प्रभात रोडची घरं घंटाळीच्या चिंचोळ्या रस्त्यावर मांडली तर कशी दिसतील? तसा प्रकार आहे. फुटपाथच्या फरश्या वर येणं, वाटेत कचराकुंडी असणं, चांगल्या बांधलेल्या कुंपणातून एक ब्रह्मचारी लोखंडी सळई बाहेर आलेली दिसणं या रोजच्या गोष्टी आहेत. गावातले फेरीवाले, हातगाडीवर लाउडस्पीकर घालून गावभर फिरणारी दवंडी, गॅलरीत वाळत घातलेले कपडे आणि तुमचं घर किती बी.एच.के आहे यावरून तुमची पारख होणं हेही सध्याच्या ग्रीकांना सवयीचं आहे. “कशी आहेस?” “तुझं वजन किती?” आणि “कर भरल्यानंतर हातात किती पगार उरतो?” हे हलक्याफुलक्या संभाषणातले प्रश्न असतात. यांची लोकसंख्या पाचपट आणि इथली आर्द्रता दुप्पट झाली की देश अजूनच ओळखीचा वाटेल ना?

देव किती मानतात याबद्दल शंका आहे, पण इथे धर्माची पकड जोरकस आहे. ख्रिस्तपूर्व काळातल्या देवदेवतांची नावं ठेवली तर आजही काही पापूली बाळांना बाप्तिस्मा द्यायला तयार होते नाहीत. अशा वेळी आई-वडील दोन नावं देतात. म्हणजे यासोनास-नीकोस. एक ग्रीक पुराणातला आणि एक ख्रिस्ती संत. वाढदिवसापेक्षा ‘नामदिवस’ मोठे असायचे यांच्यात. म्हणजे तुमचं नाव आंगेलोस असेल तर सेंट आंगेलोसचा दिवस हा तुमचा नामदिवस. शाळेत खाऊ वाटणं, लोकांना पार्ट्या देणं हे वाढदिवसापेक्षा या दिवशी जास्त असतं. आजीआजोबांची नावं मुलांना द्यायची पद्धत असल्यामुळे शेकडो वर्ष तीच तीच नावं कुटुंबात फिरत राहातात आणि त्या नामदिवसांचा मोठा उत्सव होतो. शिवाय पूर्वी जन्मतारीख ठाऊक नसायची तेव्हा या नामदिवसांवरूनच वयं मोजली जायची.

परवा आमचा स्तेल्योस केक-चॉकलेटचे पंधरा तुकडे घेऊन आला. म्हणे आज सगळ्या मिख़ालिस आणि गाव्रिलीयांचा नामदिवस होता; त्यांनी खाऊ वाटला. म्हंटलं आण इकडे. ‘म्हैस’ मधल्या दामल्यासारखं, “शेवटी काय हो स्तेल्योसशेठ? सगळे धर्म सारखेच!” चोकलेऽट. घडून गेलेल्या आणि पुढे घडतील अशा सगळ्या प्रसंगांसाठी पु.लं नी काहीतरी लिहून ठेवलंय, त्यामुळे नेमकं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे वाक्य तोंडून यावं यासारखा मोठा न्याय नाही! आणि हो, त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मी ग्रीसमध्ये मनापासून पाळल्ये. “जिथे जायचं तिथे जावं, पाहावं, खायचं असेल ते खावं आणि यावं. ती खरेदी कशाला?”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्निका,
किती सुंदर , सहज लेखणी आहे तुझी ! प्रवास वर्णना पेक्षा कालवर्णनच आहे ! इतके अनुभव, इतकी माणसे, इतकी माहिती कशी सोप्या शब्दात, छोट्या वाक्यात मांडलीस , आणि तरीही नेमकेपणाने डोळ्यासमोर उभा केलास तुझा ग्रीस ! आणि तुझ्या एकटीच्या ह्या साहसाला तर अनंत टाळ्या !
इतर देशातले, गावातले अनुभव पण लिही तुझ्या त्या जादूच्या लेखणीने !

कुठल्या स्टेशनवर उतरून काय बघायचं या माहितीपेक्षा चुकीच्या स्टेशनवर उतरून चालत जाताना वाटेत काय दिसलं ते जास्त मोलाचं आहे. ।।।।

किती अभ्यास , निरीक्षण, आवड आणि लेखन ।।। हॅट्स ऑफ
उगाच नाही तुमचे चाहते झालो

सुरेख Happy

मस्त! Happy