बापमाणूस

Submitted by ASHOK BHEKE on 16 November, 2018 - 10:20

आयुष्याचा चक्रव्यूह समर्थपणे पेलवणाऱ्या पण काही कारणास्तव असह्य झाल्यामुळं हाताच्या ओंजळीत डोकं लपवून एकटाच ओक्सापबोक्शीप रडणारा तो बापमाणूस पाहिला, अन मन हेलावल. काळोखलेल्या आकाशात कडाडणाऱ्या वीजेसारखे विचार एकामागोमाग सुरू झाले …विचारांचं थैमान थांबायला हवं पण विचारांचा प्रवाह मनाच्या खोलवर सैरावैरा फिरत राहिला. पुरुषाच्या सहनशीलतेचा बंध ( काही अपवाद वगळता ) फुटतो आणि तो असहाय होऊन टाहो फोडतो, तेव्हा परमेश्वर सुध्दा त्याच्या पीडा आणि यातनाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण परमेश्वर माणसाच्या सहनशक्तीपेक्षा अती भार माणसावर टाकत नाही. त्या बापमाणसाला मी वेगवेगळ्या रुपात पाहिले होते. आज तो का रडत होता, हे कळत नव्हते.वडिलकीचे नाते जपणे सोपे नाही. पण बापाने जाहीर पणे रडणे म्हणजे ते बायकी ठरते. त्यांचा भावनांचा आवेग थांबत नव्हता. भावनांचा कोलाहल माजला होता. खूप काही तरी सांगायचं होतं रितं व्हावसं वाटत होते. पण त्यांच्या हुंदक्यातून शब्द फुटत नव्हते.वाटलं होतं त्यांचं भावनांच्या लाटा त्या थकलेल्या मनातून मुसळधार वृष्टीप्रमाणे बरसतील.ते मौनाचं महासागर एकही शब्द व्यक्त करायला तयार नव्हता. पण मला ती मौनाची भाषा बरंचं काही सांगून गेली. वासराच्या वात्सल्याचे तपशील गायीच्या डोळ्यात डोळाभरून वाचता येतात. त्या प्रमाणे या थकलेल्या बापमाणसाच्या डोळ्यात वाचता आले.
कोवळ्या वयात मुलाची आई अकाली गेल्यानंतर त्यांचं पालनपोषण, डबा, शाळा, कपडे इथंपासून सर्वकाही करणारा, वयात आल्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा, जन्मभर खाली मान घालून काबाडकष्ट करीत त्यांच्या लग्नासाठी काडी-काडी जमवणारा बाप.. मुलाच्या पालन पोषणाची जबाबदारी आई होऊन त्यानेच घेतली. दुसरे लग्न न करण्याच्या निर्णयावर नातलगांनी मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण त्या बापमाणसापुढे आपल्या बच्छड्याचा चेहरा समोर उभा राही आणि तो भविष्यात डोकावून पाहत लग्नास नकार देई. आईविना बाळाची पुरुषाने पालकत्वाची जबाबदारी घेऊन जन्मापासून बाळ वाढविणे हे आपल्या समाजाला सवयीचे झाले आहे. पण एका बापमाणसाने समाज लग्न करण्याचा सल्ला देत असताना न ऐकणे म्हणजे हा परग्रहावरचा प्राणी म्हणजे हाच तितका शहाणा... अशाच नजरेतून बघणे,हे कितपत योग्य. असा एक बाप पाहिला की, समाजाचे चेहरे चिंता आणि प्रश्नांकित होतात. आता एखादी महिला विधवा अथवा विभक्त असेल तर समाजाकडून किती कौतुक आणि सहानुभूती... ! शिकला सवरलेल्या मुलगा मोठा होत गेला. आपण जपलेल्या रोपट्याचा विकास जोमाने होत चालला तर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहणार नाही. लग्न केले आणि सुनबाई घरी आल्या आणि काही दिवसातच आदळआपट सुरु झाली. बिचारा आयुष्याच्या उतरंडीला घरात अडगळ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची झालर चढली होती. दिवसभर काही तरी काम अन संध्याकाळी टाळ मृदुंग सोबत पांडुरंगाचे नाम.आलेल्या परिस्थितीशी सामना करीत व्हरांड्यात जिने जगत होता. वय झालं शारीरिक व्याधींनी त्रस्त असूनही मानाने खंबीर, आनंदी उत्साही असून ही मनाने खंगला होता.सुनबाईचे चिडचिडेपण तिरकस पण धारदार बोल हृदयावर आघात करीत होते.जिव्हारी लागे. मुलाचा या विषयावर अबोला होता. साधं खाकरण्यावरून अद्वातद्वा बोलणे हे केवळ सुनबाईचा आडमुठेपणा काही संपत नव्हता. त्याचे जीने असह्य झाले होते. त्याच्या कुशीत दडलेली रहस्य हे कुणालाही सांगत नव्हता. मनातल्या आशाआकांशाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. एका सामान्य बाप माणसाची आस्था धुळीस मिळाली होती. त्यामुळे तो रडून आपले मन मोकळे करीत असावा. ते दिवस मुली लग्न होऊन सासरी गेल्यानंतर चुलीसारख्या जळायच्या, भातासारख्या रटरटायच्या, गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या. ते दिवस कधीच संपले. आता हुंदके नाहीत, की भुणभुण देखील नाही. नवी पिढी आली आणि केवळ घरात राजा राणीचा संसार हवा. या विचाराने झपाटले गेले. स्वच्छंद आणि आनंदी जीवन हवे होते.

ही बाप माणसं कायम वेठबिगारी हमालासारखी जगतात. कोणी ऑफिसात तर कोणी शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. त्यांच्या रोजंदारीवर मुलं शिकतात पुढे जातात. मोठी होतात अन त्यांनाच म्हणतात, काय केले तुम्ही. तुमच्या पेक्षा आम्ही कर्तुत्ववान आहोत....! याच बाप माणसाने याला शिकविण्यासाठी अंगावरच्या कपड्यांना भोक पडले तरी थिगळ लावून वावरत असे. मुलाच्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून स्वत: घामात भिजणारा बाप. मुलाला चांगले बुट मिळावेत म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप. मुलगा आजारी पडला रात्री अपरात्री पाठीवर घेऊन दवाखान्यात नेणारा बाप. स्वत: उपाशी पोटी राहून मुलांच्या गरजा पुरविणारा बाप. ATM मशीन म्हणजे बाप. आयुष्यातली दोन शक्तीपिठे आपल्या घरात असतात आई आणि वडील .... त्यामुळे अन्य शक्तीपीठाचे दर्शन घेण्याची गरज भासत नाही. आई आणि बाप हे नातं स्त्री आणि पुरुष या पातळीपेक्षा उंच नेऊन समजून घ्यायला हवं. तसं झालं, तर एखाद्या प्रसंगात स्त्री जशी वागते, तसाच पुरुष वागेल, हा खोटा आशावाद राहणार नाही. विधात्यानं निर्माण केलेली ही दोन भिन्न आणि अतुलनीय शक्तिपीठं आहेत! स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. कुणीही कुणापेक्षा उंचीनं कमी अथवा जास्त नाही.
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या सारखं खूप काही आई विषयावर भरपूर लिहिले जाते पण बाप म्हणजे कठोर .... असं चित्र डोळ्यांसमोर उभं केल्यामुळे फणसाला कितीही काटे असले तरी आत किती गरे गोड असतात. त्यासाठी या बापमाणसाला समजावून घ्यायला हवं. बाप वरून शिस्तप्रिय असले तरी स्वत:च्या आवडी निवडी व्यक्त न करता मुलांच्या आवडी निवडीची हट्ट पुरविणारा, जपणारा कुटुंबात उपेक्षित राहत असतो.जणू काही मुलाचा शत्रूच. आपल्यातून निघून गेल्यानंतर त्याची किमंत कळते. बाप हा असा मोठा आधार आहे की, शब्दात सांगता येणे कठीणच. आईची थोरवी सर्वजन सांगतात पण कृष्णाला टोपलीत घेऊन सुरक्षित स्थळी नेणारा वसुदेव आपण का विसरतो....? पुत्र प्रेमासाठी ही बाप माणसं किती खस्ता खातात, हे आजच्या पिढीला कळनार कधी. आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व आहे . साधी सुई टोचली तर मुखातून ‘आई गं...’ येतं अन बाजूने सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रक ला पाहून ‘बाप रे’. हे आजच्या विचारधारेतील गणित कळत नाही.
दिवसभर मान मोडून काम केल्यावर भाजीवाल्याशी घासाघीस करून घेतलेली मेथीची जुडी एका हातात घेऊन चार-चार किलोमीटर चालत येणारा पूर्वीचा बाप टॅक्सीीचे दहा रुपये वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आजचा बाप दहा मिनिटं वाचवविण्यासाठी तीस रुपयांची रिक्षा अथवा टँकसी सहज करतो. ही गणितं बदलली की बदलत गेली, याचा स्वच्छ मनानं कधी तरी विचार करायला हवा! अनेक आघाड्या सांभाळत असलेल्या या पुरुषाला स्वत:ची राहून गेलेली अगदी छोटी इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीतरी निवांत वेळ हवा असतो. अशाच वेळेस मूल आशेनं त्याच्याकडं पाहत असतं. त्याला बागेत फिरायला नेण्यासाठी! अशा प्रसंगी स्वार्थी विचार करीत स्वत:च मौज करणारा पुरुष मी तरी अजून पाहिलेला नाही.

एक विदेशी कंपनीत पदविभूषित असलेला मुलगा कार्यालयीन कामांकरिता एका कंपनीत गेला. त्याच्या स्वागत तयारीत सदर कंपनीतील संचालक उभे होते. दरवाज्याजवळ असलेल्या वृध्द गृहस्थाने मुजरा करीत दरवाजा उघडला. वीज चमकावी तसा मुलगा चमकला. नजरानजर झाली. दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले.बाबा.....! नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले. तुम्ही इथे...! बराच वेळ बापलेक गळ्यातगळा घालून रडत होते. सभोवतालच्या लोकांना या प्रसंगाने गहिवरून आले. पण त्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते त्याला आनंदाची किनार होती. अभिमान वाटत होत. मुलगा आपले नाते विसरला नव्हता. मनुष्याचे मोठेपण त्याच्या विचार आणि कर्तुत्वावर अवलंबुन असते.असाही बापमाणूस आणि त्याच्यावर प्रेम करणारा मुलगा.
गावाकडची ही बाप माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी बंडी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वाहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला कडदोरा हीच काय ती संपत्ती. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही नांगर धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत ; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या - लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण.चतकोर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावर गप्पा. असा त्यांचा दिनक्रम.

बाबा लहानपणी गोष्ट सांगत असत . ती एकच गोष्ट दररोज आपल्याला ऐकावी लागत असे. पण ते ती इतकी रंगवून सांगत, की दर खेपेस नवीनच वाटे! गोष्ट सांगताना त्या त्या प्रसंगानुसार ते आडवेतिडवे लोळायचे. चित्रविचित्र चेहरे करायचे. निरनिराळ्या पात्रांचे आवाज काढायचे. जीभ बाहेर काढून त्या गोष्टीत आपला प्राण ओतणारे बाबा. त्याचं अस्तित्व आहे तो पर्यंत त्यांची किमंत कळत नाही पण ते गेले की, पोकळी निर्माण झाल्याचे दिसून येते. आपण दशक्रिया विधीला पाहतो बाप मेला तर पंचपकवान्नाचे जेवण ठेवतात. पण जिवंत असताना दवाखान्यात न्यायची तसदी घेतली असती तर ईश्वराने निर्माण केलेल्या विश्वात एक माणूस आणखीन काही काळ राहिला असता, ह्याचा विचार का करीत नाहीत. आजच्या पिढीच्या गळ्यातला मफलर ही फँशन आहे पण बापाच्या गळ्यातली मफलर ही त्यांची गरज होती, हे कोणी समजावूनच घेत नाहीत. बापाची चप्पल पायात यायला लागली तर मी फार मोठा झालो. ही विचारधारा आजच्या पिढीत फोफावलेली दिसून येते. ही बापमाणसं म्हणजे अनुभवाची महासागरे. अनुभवाच्या शिदोरीच्या झोळीतून घ्यायचं असतं. विशेष म्हणजे त्यांची झोळी कधी रीती होतच नाही.
कसं का असेना... घरात बापमाणूस हा आधारच....!

बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार...
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान...
ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात
म्हणून बाप हे नातं उंच पातळीवर न्यायला हवं.
घरातील बापमाणसं ही तशीच असतात...त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.

अशोक भेके

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users