चर्चेतील माणसं : श्रीमान आगलावे

Submitted by ASHOK BHEKE on 12 November, 2018 - 11:17

परवा *श्रीमान आगलावे* नावाचे गृहस्थ नेहमी प्रमाणे दसऱ्याचं सोने द्यायला आले सोने देताना अलिंगन दिले. अलिंगन देताना मनात अनेक विचार आले. हा माणूस फार भारी म्हणण्यापेक्षा अती कद्रू माणूस. ह्या बोटावरची थुकी त्या बोटाला कधी लावील कळणार नाही. त्याचे वर्णन करता येणार नाही. तो सडपातळ देखील नाही आणि जाडजूडा म्हणता येणार नाही. काळा की गोरा हे सांगायला मन तयार नाही. आमच्याच मातीत वाढला. नगाऱ्यासारखा फोफावला. त्यांच्या अंत:करणात काहीच राहत नाही. फक्त वितुष्ट आणण्यात त्यांना मिळत असलेल्या आत्मिक समाधाना शिवाय कुरुक्षेत्रात विजय मिळविल्याचा आनंद याचे मला त्यांच्या स्वभावाचे विच्छेदन करता येणे अशक्यच. परवा घारूअण्णाला फोन करून सांगितले, अरे अण्णा घरी बसून काय करतोस.... तुझ्या नावाने येथे गुळण्या केल्या जात आहेत. लगेच अण्णा आले. शहानिशा केली नाही. त्यांनी ऐकणाराला सुनाविले. आपलेपणा आणि परकेपणा यातील तर्कशास्त्र तंत्र श्रीमान आगलावेना माहितीच नाही. त्यांची सवय हि घातकीच असल्यामुळे त्यांच्यापुढे कोणता विषय चर्चेला आणणे. हे आमचे ठरवून असते. त्यांनीच विषय काढायचा आणि त्यावर आमच्याकडून प्रतिक्रिया काढून घ्यायच्या आणि त्या संबधिताला अशा पटवून द्यायच्या की, अरे तुझ्या मुलाच्या लग्नात मंडळाचे पैसे वापरले म्हणून कधी चर्चा न होता हि कानगुज करीत आगलावे कळीचे नारद झाले होते. कुणाची म्हैस कधी गाभण राहिली ह्याची बित्तबातमी फक्त आगलावेनी चवीचवीने चुरुमुरू करीत सांगावी. परवा आमच्या संतोषने सहज विचारले, आमच्यावर तुम्ही नाराज आहात....! मी चक्क नाही म्हटले. पण माझ्या लक्षात आले, यांना आगलावे भेटले की काय....! मी सरळ अमुक माणसाने काही सांगितले ना...! मग तू निर्धास्त रहा. आगलावे कमालीचा माणूस...! अशी बनवाबनवी कुणालाही शक्य नाही. जाईल त्याच्या तोंडावर गोड बोलायचे अन मागून निंदानालस्ती करणारा गडी. घात सारेच करतात. विश्वास ठेवावा कुणावर..? एकवेळ शत्रूवर डोळे झाकून विश्वास ठेवावा पण आगलावेंच्या छोट्या छोट्या करामती म्हणजे होळी पेटवून ठणाणा बोंबलणाराना पाहत बसायचे. किती दिवस असा स्वभाव बाळगणार.... एकदिवस हाच स्वभाव आगलावेंच्या घरावर घिरट्या घालून बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना सांगायचं म्हणजे विस्तवात हात घालून भाजून घेतल्यासारखे होईल.
आगलावे सर्वांवर प्रेम करतात. सर्वांशी आदराने बोलतात. मिश्किली करतात. थट्टा करून हसवतात. समोरच्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. हवी ती मदत करीत असतात. पण हळूच त्याची माहिती काढून घेतात. तो आपल्या वरचढ असेल तर मात्र आगलावेंच्या जळाऊ लाकडाच्या वखारीत खाक झाला म्हणून समजा. कोणीतरी म्हटले होते महिला म्हणजे जळाऊ लाकडाच्या वखारी पण मुळातच ते चुकीचे असल्याचे आगलावे यांच्यावरून समस्त आमच्या मित्रपरिवाराला तरी कळलेच आहे. महाभारतात एकलव्य एकाग्रतेने बाण चालविण्याचे सुरु असायचे. पण आगलावे एकाग्रतेने आपल्या गोट्या उडविण्यात दंग. पसरलेल्या गोट्यापैकी कोणत्याना कोणत्या गोटीला त्यांची गोटी थडकलीच पाहिजे. अगदी नेमबहाद्दर... कधी कधी अशी गोफण फिरवी की, खडा हवा तेथे लागल्याशिवाय यांना चैन पडत नसे.
संजय आणि विजय दोन्ही बऱ्यापैकी मित्र होते. त्यांना काय अवदसा सुचली त्यांनी आगलावेशी मैत्री केली. आगलावेनी त्यांच्या दोघांमध्ये एक वीट घातली. रोज विटेवर वीट रचल्या जात होत्या. त्या मधल्या विटेवर बसून आगलावे कधी उजव्या कानात तर कधी डाव्या कानात कुरकुरत वातावरण गढूळ करीत आहे. मनं दुभंगत होती. आम्ही हे उघड्या डोळ्याने पाहतोय. पण आगलावेना आवरायचे कोणी...? असा गहन प्रश्न पडला आहे.
आता बाळोबा ( बाळासाहेब मुद्दामहून लिहिणे टाळतोय ) नावाचे एक सद्गृहस्थ वर्णाने सावळे, जबरदस्त प्रेमळ स्वभाव आणि लाघवी बोलणं. त्यांच्या लोकप्रियतेचे चटके न लागेल असे आगलावे कसले....! पण आगलावेना कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही.वाईट झाल्याचे दु:ख नाही. कोण मेला गेला त्याचे सोयरसुतक नाही. रसिकही नाही अन अरसिक देखील नाही. खरंच कधी कधी अशी माणसं कायम स्मरणात राहतात त्यांच्या लोक नावडत्या कर्तबगारीमुळे...! म्हणतात शत्रू असावा पण आगलावेसारखा मित्र नसावा. तरीही आम्ही कधी आगलावेना दुखावत नाही. एखाद्याला असते सवय म्हणून रेटत रेटत न्यायचं काम करतो. आज मी आगलावेचा गौरव केला आहे. तो केवळ त्यांच्या अफाट कर्तबगारी साठी केला आहे. अशी माणसे होती म्हणून रामाला वनवासाला जावे लागले. महाभारत झाले. समाजात अनेक अदृश्य आगलावे शक्ती आहेत त्यांच्या विकृत स्वभावाचा तोल पायरीपायरीने ढासळत असतो. त्यांचा विचित्रपणाचा सबंध मनाच्या जडणघडणीशी जुळवीत बेफाम उधळणाऱ्या श्रीमान आगलावेचा वारू समाजात वावरणाऱ्या किंवा घराघरात घुसू पाहत असेल तर आताच लगाम घालून आपणही त्यांना जरूर शुभेच्छा द्या. विसरू नका आगलावे आपलेच....!

*अशोक भेके*

*मी चर्चेतील माणसं लिहितो हे माझ्या मित्राने वाचले. सहज त्याने मला प्रश्न केला हि माणसं तुझ्या परिचयातील आहेत म्हणून लिहितोस. पण असे एक व्यक्तिमत्व शोध आणि कल्पनेत उतरवून लिहून दाखव. म्हणून मी एक काल्पनिक स्वरूपाचा साधा लेख माझ्या मित्रासाठी लिहिला आहे. आगलावे ही अदृश्य व्यक्तीचा कुणाशीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या संबंध नाही, याची जरूर नोंद घ्यावी.*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
खुसखुषीत लिहिलंय एकदम.

म्हणून मी एक काल्पनिक स्वरूपाचा साधा लेख माझ्या मित्रासाठी लिहिला आहे. >> छानच. अजून येऊ देत अश्या काल्पनिक व्यक्तींवरील लेख.