आणि डॉ. काशिनाथ घाणेकर - एकदम कॅडॅऽऽक

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

आजच मंगला टॉकिजच्या मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट पाहिला. घरी आलो, आणि नेटवर शोधलं, "नाथ हा माझा - कांचन घाणेकर ". त्या साईटवर "केवळ एकच प्रति उपलब्ध" असा संदेश होता. त्वरीत योग्य काम केलं.

बरेच चित्रपट ट्रेलरमधेच योग्य ठसा उमटवतात आणि चित्रपट पहायची आतुरता निर्माण होते. काही ट्रेलर पाहून वाटतं, की हा नंतर टीव्हीवर लागला तरी पहायचा नाही... काही चित्रपट तर कुठल्या चित्रपटावरुन उचलले आहेत तेही सहज लक्षात येते. मी घाणेकरांचा कुठलाही चित्रपट वगैरे पाहिलेला नाही. ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, आणि पहाण्याची आतुरता निर्माण झाली. "गोमु संगतीनं" चं जुनं आणि नव्याने चित्रीत केलं गेलेलं गाणं पाहिलं, आणि चित्रपटावर फुली मारावीशी वाटली. एकतर जुनं गाणंही बघायला बकवास वाटलं (क्वालीटीमुळे) , आणि नवं त्याहून बकवास - प्राजक्ता माळी सोडून. नंतर परत एकदा ट्रेलर पाहिला, आणि लगेच तिकीटे काढली. आता दुसर्‍यांदा कधी जावे ह्या विचारात आहे.

साधारण अडीच तासांचा चित्रपट आहे. टॉकिजमधून बाहेर पडताना हृदय धडधडत होतं. बरं हा काही रहस्यपट नाही, पण चित्रपटभर मी आणि बायको दोघेही एकमेकांशी एकही शब्द न बोलता स्तब्ध होऊन चित्रपट पाहत राहिलो होतो. ह्यामधे चित्रपटातल्या बॅकग्रांऊड स्कोअरचाही मोठा हात आहे.

चित्रपट सुरू असताना योग्य वेळी(च) लोकांच्या शिट्ट्या ऐकू आल्या, काही जणांनी टाळ्याही वाजवल्या.. चित्रपट संपल्यावरही काही जणांना उभे राहून टाळ्या वाजवाव्याश्या वाटल्या. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आम्ही एकमेकांना "कसा वाटला?" असं विचारावं, तर लोकं जोरजोरात "कॅडॅऽऽक" म्हणताना ऐकू येत होतं. चित्रपट संपल्यावर क्रेडीट्स दिसू लागतात, तेव्हा साधारणपणे सगळे उठतात. इथे मात्र चित्रपटातले कलाकार आणि त्यांची खरी पात्रं ह्यांचे फोटो पाहण्याचा मोह कोणालाच आवरला नाही.

मा. दत्तराम (सुहास पळशीकर) , प्रा. वसंत कानेटकर(आनंद इंगळे) , प्रभाकर पणशीकर(प्रसाद ओक) , सुलोचना(सोनाली कुलकर्णी ), त्यांची मुलगी कांचन(वैदेही परशूरामी) , भालजी पेंढारकर(मोहन जोशी) , डॉ. श्रीराम लागू(सुमीत राघवन) सादर केलेल्या सर्वच कलाकारांनी जबरदस्त काम केले आहे. कुठेही हे वेगळे कोणी आहेत असे वाटत नाही. ह्यात सध्या हयात असलेल्या मूळ कलाकारांनी(डॉ. लागू), तसेच इतर समकालीन कलाकारांनी घाणेकरांबद्दल चार शब्द बोलले, तर ऐकायला अजून आनंद होईल!

बायोपिक करताना सहसा फक्त मुख्य कलाकाराच्या कामावरच भर दिल्याचे दिसून येते. तो एकटा शहाणा आणि बाकीचे बर्‍याच प्रमाणात मूर्ख असे दाखवण्याची प्रथा असताना इथे मात्र सहकलाकारांनाही बराच वाव दिलेला पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे मुख्य हिरो फ्रेममधे आला, की बाकीच्यांनी नुसता तीन चार शब्दांचा संवाद म्हटल्यासारखा करायचा, आणि मग शांत उभं राहायचं. तो मोठेमोठे डायलॉग मारतोय. तो योग्य ठिकाणी येऊन थांबला, की आजूबाजूच्यांनी भारून जाऊन पहावं, अभिमानानं त्याच्याकडे-एकमेकांकडे पहावं, टाळ्या वाजवाव्यात वगैरे..

इथे ईरावती घाणेकरांची भूमिका करणार्‍या नंदिता धुरी यांची भूमिका आणि संवाद लाजवाब. सुहास पळशीकरांची वाक्ये ऐकताना, विशेष करून शिवाजी महाराजांच्या वेशात, संभाजी राजेंच्या वेशातल्या काशीनाथ घाणेकरांना तुम्ही एक मोठे कलाकार बनणार आहेत ह्याची भविष्यवाणी करताना जे संवाद म्हणतात, त्याला नुसत्या शिट्ट्या आणि टाळ्या. संपूर्ण चित्रपटातले महाराजांचे आणि संभाजीराजेंचे संवाद अंगावर शहारे आणतात. कोल्हापूरी ढंगाने बोलणारी, शालीन कपडे घातलेली, सौम्य बोलणारी सोनाली कुलकर्णी खरी वाटते.

मुख्य चित्रपटात अमृता खानविलकरच्या गाण्याचा छोटासाच भाग दाखवला गेला असला तरी तो संध्या यांची योग्य आठवण करून देतो. विशेष म्हणजे हल्ली बरेचदा पुणेकर म्हणून टाईपकास्ट होऊन गेलेला आनंद इंगळे थोडे वेगळे, आणि चांगले काम करताना पाहून फार आनंद झाला.

सुबोध भावेचा काशीनाथ हा सुरुवातीपासूनच काशीनाथच वाटतो. त्याचे निळे डोळे, हे गिमिक वगैरे न वाटता पहिल्यापासून खरेच वाटतात. खरेतर एकदोन सीननंतर तिकडे लक्षही न जाता, मूळ गोष्टीवरच लक्ष राहते. काशीनाथ घाणेकर इतके बारीक, आणि त्या मानाने हा असा उंच, थोराड वगैरे वाटलं होतं, तेही पूर्ण विसरायला होतं. पावलोपावली त्याला मदत करणारा, तसेच वेळेला सावध करू पाहणारा मित्र प्रसाद ओकने जबरदस्त रंगवला आहे.

* * * * *

स्वत: डॉक्टर (डेंटीस्ट) असूनही अभिनयाच्या आवडीखातर प्रॉम्टिंग करणारा काशिनाथ, नंतर संभाजीराजेंच्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी गेलेला काशिनाथ आणि ह्या ऐतिहासिक भूमिका करून सुपरस्टार झालेला काशिनाथ पहाणं पर्वणीच आहे. सुरुवातीला स्वतःच नाटकात काम करण्यासाठी मोकळीक आणि साथ देणारी डॉ ईरावती (स्त्रीरोगतज्ज्ञ), नंतर घरात मदत करण्याची अपेक्षा करते, ते पाहून निराश होणारा काशिनाथ जेवढा समजू येतो, तितकीच ती विनंती करणारी ईरावतीही योग्य वाटते. इथे काशिनाथलाच सदैव बरोबर दाखवण्याचा अट्टाहास केला जात नाही. किंबहुना त्याच्या तरूणपणीच्या व्याभिचारी वागण्याला लपवण्याचा प्रयत्नही केल्यासारखे वाटत नाही.

सुरुवातीला नाकारला गेलेला माणूस महत्प्रयासाने स्वतःच्या हिमतीने, यशाच्या शिखरावर पोहोचतो. पण तो तिथे टिकता येण्यासाठी नव्हेच. कारण साळसूदपणा, विनम्रपणा इत्यादी गुणांपेक्षा बेदरकारी आणि स्वतःच्या गुणांवरचा आत्मविश्वास यांचा प्रभाव जास्ती आहे. तो शिखरावर चढतो, पण परत पडण्यासाठीच. मग पुन्हा सुरुवातीपासून चढाई सुरु... पण सोबत काळही बदलतो आहे. जुन्या चाहत्यांना आता जुनं नकोय. आता आहेत नवे स्पर्धक, आणि नवी स्पर्धा. सोबतीणीच्या सहनशीलतेचाही अंत होतो आहे.

आता सोबत आहे, फक्त एक मित्र ज्याने सुरुवातीपासून साथ दिली आहे. आणि नव्या सोबतीणीची. यशोशिखरावर पोहोचण्यात तिनेही हातभार लावला आहे. आता तो मित्र पुन्हा हात देतो आहे, एक नवी सुरुवात करायला. ह्या सोबतीणीच्याही आता काही अपेक्षा नाहीत. आता फक्त सोबत हवी आहे. पण ह्याला आपल्या मुलीसाठी स्वत:ची चांगली आठवण निर्माण करायची आहे. एक नाटक, जे परत एकदा शिखरावर नेईल, आणि मग सगळं नीट होईल. १९८६मधल्या अमरावतीच्या त्या प्रयोगाची सारेच वाट पाहत आहेत. नाव आहे - "अश्रूंची झाली फुले".

* * *

मराठी मधले हिरो हे कायम पापभिरू. थापाडे पण मनाने चांगले. बावळट. तत्त्ववादी. ऑनस्क्रीन रोमान्स करायला घाबरणारे. सतत आईवडीलांना घाबरणारे यापैकी दाखवले गेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर बेदरकार "लाल्या" मुलामुलींना न आवडता तरच नवल होतं. कांचन घाणेकरांची एक मुलाखत यूट्यूबवर आहे. त्या म्हणतात, की "मी एकदम साधी सरळ होते. जे मी करू शकत नाही, ते सगळे काशीनाथ करत असत. त्यामुळे मी त्यांची फॅन होत गेले असावे". घाणेकरांचे तेव्हाचे आणि इथून पुढे फॅन बनणारे सारेच काही प्रमाणात तसे असावेत असं वाटत रहातं..

लाल्याच्या तोंडचे संवाद, त्याच्या हातातली सिगारेट, आणि आपण करतोय ते लोकांना म्हणजे तरूण पोरांना आवडतंय हे लक्षात आल्यावर घाणेकरांनी जो दंगा घातला असेल, त्याची कल्पना करूनच अंगावर काटा येतो. एण्ट्रीच्या आधी रंगमंचावर सिगारेटच्या धुराची वलयं सोडणं, एण्ट्रीला तोंडावर स्पॉटलाईट आणि बेदरकारपणे स्टाईलीश बोलणं एकदम ऐकून पोरंपोरी सुद्धा "कॅडॅऽक... " न म्हटली तरच नवल. प्रेक्षकांच्या गर्दीत घुसणारा तो खरा "लाल्या" आपल्याला पहायला मिळायला हवा होता, असं दहादा वाटून गेलं.

जवळपास तीच एनर्जी, तोच उन्माद सुबोध भावेने घाणेकरांच्या भूमिकेत निर्माण केला आहे असं वाटतं. सुबोध भावेचा घाणेकर एकदम कॅडॅऽऽक! हे सगळे घडवून आणणारे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडेही एकदम कॅडॅऽऽक आहेत सऽर !!!

विषय: 
प्रकार: 

सुंदर रसग्रहण आहे, आवडलं. हा सिनेमा पहायलाच पाहिजे असं वाटू देणारं लेखन !
डॉ घाणेकर यांचे पर्व काही अनुभवले नाही, पण पहायची उत्सुकता आहे.
उद्या परवा पहायचा विचार आहे.

न्यू जर्सीत येऊन गेला, दोन तीनदा. मला टीपापा वरील लोकांनी सांगितले म्हणून बघता आला. ज्यांना महिती असते अश्या लोकांबरोबर मैत्रीचे संबंध असल्याचा फायदा.
<<इथे मात्र चित्रपटातले कलाकार आणि त्यांची खरी पात्रं ह्यांचे फोटो पाहण्याचा मोह कोणालाच आवरला नाही.>>
आमची निराशा झाली या बाबतीत, आमच्या समोरच हत्तीएव्हढ्या जाड्या नि आमच्याहून उंच अश्या बायका उभ्या राहिल्या. खाली बसा म्हंटले तर त्यांनी दुर्लक्ष करून तश्याच उभ्या!! त्यामुळे आम्हाला फक्त त्यांची रुंद अशी पाठ दिसली!
आता नेटफ्लिक्स वर आला की पहातो.

जख्खी बुवा मला नाही वाटत त्या बसल्या असत्या तरी तुम्हाला दिसले असते म्हणून ! तुमची उंची किती तुम्ही बोलता किती ?

मस्त लिहीलंय. अनुमोदन.
सुबोध भावेनी कमाल केलीये. आमच्याकडे सिनेमा संपल्यावर सन्नाटा पसरला होता. झाडून सर्वांनी शेवटचे फोटो पाहिले व चुपचाप न बोलता बाहेर पडले.
सगळीकडे, सिनेमा न पाहिलेल्यांनी ‘गोमु संगतीनं‘ ला नावं ठेवलीयेत त्याबद्दल घाणेकरांचे स्वतःचे काय मत होते तो संवाद पण ठळकपणे सिनेमात आहे. इथे लिहीत नाही. पहा, मग कळेल.

अरे काय मस्त लिहीले आहे! हे नक्की कोणत्या ग्रूप मधे आहे? मी आज सहज माझ्या ग्रूप्स बाहेर जाउन चेक केले म्हणून सापडले.

कधी मधी 'ग्रुप' च्या बाहेर पडलेलं बरं असतं. दृष्टिकोन वगैरे विस्तारतो, घुसमट कमी होते, स्वतः चे अस्तित्व कळते असे मोठे लोक म्हणतात.

नंद्या43 त्या बायका आपल्या त्या ह्या नव्हेत ना.. नाही जिथे तिथे अरेरावीची सवय ओळखीची वाटली.

चित्रपटाचे रसग्रहण चांगले आहे. चित्रपटही चांगलाच आहे. आता थोडे चित्रपटनायकाबद्दल अवांतर.
अश्रूंची झाली फुले आणि रायगडाला जेव्हा जाग येते ही घाणेकरांच्या लोकप्रियतेची अत्युच्च शिखरे. या लोकप्रियतेच्या लाटेवर गारंबीचा बापू आणि आणखी एक दोन नाटके तरून गेली. पण घाणेकरांकडे उच्च अभिनयक्षमता नव्हती. या संदर्भात माबोवरच दुसरीकडे महिन्याभरापूर्वी दिलेला प्रतिसाद थोडा बदल करून इथे चिकटवावासा वाटतो.
" काशीनाथ घाणेकर हे पडद्यावर कधीच खुलून दिसले नाहीत. गोरा रंग आणि भेदक निळे डोळे या व्यतिरिक्त पडद्यावर लागतो तो चेहेऱ्याचा रेखीव किंवा नीटसपणा त्यांच्याकडे नव्हता. पडद्यावर क्लोझपमध्ये नाकीडोळी नीटसपणा आणि सूक्ष्म भावदर्शन हे खूप आवश्यक असते. एखादाच ओमपुरी, नसीरुद्दीन, स्मिता पाटील अथवा गेला बाजार अमिताभ बच्चन चेहरा नसूनही प्रचंड सूक्ष्माभिनयाद्वारे पडदा जिवंत करतो. घाणेकर पडद्यावर त्या ताकदीचे नट नव्हते. रंगमंचावर त्यांना थोडाकाळ यश आणि लोकप्रियता मिळाली. चित्रपटापेक्षा रंगमंचावर थोडा लाउड अभिनय आवश्यक असतो. कधी कधी तो आक्रस्ताळाही वाटू शकतो. श्रीराम लागू आणि घाणेकर यांच्यात वैमनस्य होते आणि चित्रपटातही ते दाखवले आहे. श्रीराम लागूंनी दोन माध्यमांतला हा फरक ओळखला होता. पण म्हणून रंगभूमीवर त्यांनी कधी लाउड, सवंग, प्लेयिंग टू द गॅलरीज असा अभिनय केला नाही. ( चित्रपटांत तर नाहीच.) शिवाय त्यांना देखण्या चेहऱ्याची देणगी होती. त्यामुळे पडद्यावर घाणेकरांपेक्षा लागू कितीतरी पटींनी श्रेष्ठ ठरले. लागूंना पी डी ए सारख्या प्रायोगिक रंगभूमीची पार्श्वभूमी होती. या लोकांकडे अभिनयाची एक वेगळी अशी शास्त्रशुद्ध पठडी असते. घाणेकरांकडे ती नव्हती. ते 'तरुणाईचे लाडके' होते हे सत्यच आहे. पण हे बिरुद क्षणजीवी असते. तरुणाई ओसरली की बिरुदाचा महिमा ओसरतो. कोणताही अभिनेता सदैव ॲंग्री यंग मॅनच्या भूमिकेत राहू शकत नाही. घाणेकरांना जर थोडे अधिक आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभते तर ॲंग्री यंग मॅन सोडून वयाला साजेशा वेगळ्या भूमिका करताना त्यांच्या उणीवा उघड्या पडल्या असत्या. कारण नंतर मराठी रंगभूमीचा चेहरा मोहरा बदलला. ती अधिक प्रयोगशील झाली. प्रतिमायुक्त नटाची गरज राहिली नाही. रंगभूमीवर आणि चित्रपटांतही श्रीराम लागू हे खरे नटसम्राट होते. घाणेकर कदाचित स्वत:च्या प्रतिमेत अडकले असतील, नार्सिसससारखे स्वत:च्या प्रेमात पडले असतील, 'आपण सर्वश्रेष्ठ ' या गंडात गुरफटले असतील, कुणास ठाउक. पण एका मनस्वी व्यक्तिमत्त्वाच्या नायकाच्या जीवनपटावर शोकांतिका घडावी हे क्लेशदायक होते. त्यांना स्वत:ला आणि त्यांच्या चाहत्यांनाही. "

आज पाहिला. मस्त चित्रपट आहे. सुबोध भावे सकट सर्वांनी कामे जबरी केली आहेत. नक्कीच पाहण्यासारखा आहे.

हे रसग्रहण पण आवडले.
बायोपिक करताना सहसा फक्त मुख्य कलाकाराच्या कामावरच भर दिल्याचे दिसून येते. तो एकटा शहाणा आणि बाकीचे बर्‍याच प्रमाणात मूर्ख असे दाखवण्याची प्रथा असताना इथे मात्र सहकलाकारांनाही बराच वाव दिलेला पाहून आश्चर्याचा धक्का बसतो>>> +१

मेधावि यांच्या धाग्यावर दिलेली प्रतिक्रिया इकडे परत -
काल मस्कत मराठी मंडळाने स्पेशल शो आयोजित केला होता. ६००+ प्रेक्षकांची उपस्थिती होती. मध्यांतरात सगळ्यांनाच 'कडक' चहा पाहिजे होता Happy
सिनेमा आवडला. सर्वच कलाकारांचे काम आवडले. 'नाथ हा माझा' आधी वाचल्याने सिनेमातल्या गोष्टी नवीन नव्हत्या.
तो काळ, त्यांची नाटकं, सिनेमे, त्या वेळेचा मिडीया ( हा मोठ्ठा फरक!) काहीच पाहिला नसल्याने 'नाथ' हे पुस्तक फार बोल्ड वाटलं होतं. आवडलंच नव्हतं. काल सिनेमा पाहताना एक प्रकारे पुस्तकाची उजळणी झाली आणि कांचन घाणेकरांच्या प्रामाणिक लेखनाचं कौतुक वाटलं .

एक प्रतिभावान, ताकदीचा , मनस्वी आणि स्वतःच्याच प्रतिमेत अडकलेला कलाकार म्हणून घाणेकरांचं कौतुक वाटलंच, तितकंच त्यांची शोकांतिका पाहून वाईट वाटलं.