बालकांचे गड किल्ले......!

Submitted by ASHOK BHEKE on 10 November, 2018 - 23:39

या वर्षी प्रत्येक चाळीत इमारतीत बालकांनी निर्मित केलेल्या गड किल्ल्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. मातीचीच तटबंदी, विहीर, शेती गुहा तयार करून किल्ल्याच्या अवतीभवती शेतजमीन आणि त्यात उगवलेले धान्य. दिवाळीच्या तोंडावर कांचबिल्डींग येथे अगदी दोन ते चार वर्षे वयोगटातील मुले किल्ला तयार करीत होती. एक लहानसा मुलगा हातानेच तेथे विहीर खणत होता.त्याची उर्जा आणि मनातला उत्साह पाहता काही क्षणातच ती विहीर त्याने तयार करून दाखविली. त्यांची कल्पकता आणि आकलन शक्ती मोठ्यांना चकित आणि अचंबित करणारी करणारी होती. आईने ओरडून सांगावे, मातीत हात घालू नको. उलट आईनी बाबांनी आपल्या मुलांना स्फूर्ती, प्रेरणा द्यायला हवी. आमच्या बालदोस्तांनी मात्र निर्विकारपणे सारे आई बाबांचे नियम बासनात गुंडाळून ध्येय प्राप्त करावे, हे वैशिष्ट्ये.
किल्ले बनविणे हि महाराष्ट्राची परंपरा. महाराष्ट्रात गड किल्ल्यांना आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्यावेळेच्या राजे-महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतात. मातीचे किल्ले आणि दिवाळी हे अतूट नाते आहे. मराठमोळ्या दिवाळी सणाची सुट्टी पडताच बच्चेमंडळीना वेध लागतात ते गड किल्ले बनविण्याचे. हे मातीचे किल्ले बनविण्याची मजा काही औरच. सांघिक कला म्हणून या कडे पाहताना त्या चिमुरड्यांना त्यासाठी जमा करावे लागणारे साहित्य. शंभर एक किलो माती इकडून तिकडून जमा करताना त्यांची पुरती दमछाक होत असते. पण चेहऱ्यावर त्याचा लवलेश नसतो. दगड विटा पाणी बारदाणे जमा कराव्या लागतात. आता गड सर करायचा म्हटल्यावर कष्ट उपसावे लागतात हे त्या बालमनावर त्याचवेळी पडते. देवांच्या बागेतील कळ्या म्हणजे लहान मुले. त्यांना फुलविणे, वाढविणे हे कर्त्या धर्त्या समजदाराचे काम...! मोबाईल विश्वात रमणारी हि पिढी या दीपावलीनिमित्ताने पूर्व प्राथमिक टप्प्यावरील काळ मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकतात. तेव्हा प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धाचे आयोजन अनेक ठिकाणी केले जाते. जेथे केले जात नसेल तेथे स्थानिक संस्थांनी करायला हवे. शाबासकीची कौतुकाची थाप पाठीवर पडली तर त्या मुलांचा आनंद द्विगुणीत होईल.
आमच्या सोसायटीत देखील लहान लहान मुलांनी गड किल्ला तयार केला. शेतजमीन होती तर आळीव बनविलेले दिसत होते. ठिकठिकाणी मावळे हातात भाले घेऊन उभे आहेत, तर किल्ल्याच्या मचाणीवर छत्रपती सिंहासनारूढ दर्शविलेले बघताक्षणी असमजदार देखील कौतुक करतील असा नयनरम्य देखावा साकारला होता.
*अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी*
*मध्ये वाहते कऱ्हा*
*किल्ले पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा*

अनेकांनी वाहव्वा केली. मुलांना शाबासकी दिली पण ती अल्पकाळ ठरली. दुसऱ्यादिवशी सकाळी किल्ला जमीनदोस्त झाला. कुणी तरी येऊन मधल्या प्रहरी हल्लाबोल केला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने गाफील गडावरचे मावळे इकडे तिकडे धारातीर्थी पडले होते. विहीर देखील माती जाऊन बुजली होती. तोफांचा मारा व्हावा या रीतीने गडकिल्ल्याची तटबंदी अस्ताव्यस्त झाली होती. हा हा म्हणता या हल्ल्याची बातमी सोसायटीत पसरली अन अंथरुणातून ती बच्चे मंडळी डोळे चोळीत चोळीत किल्ल्यावर पोहचली. चवताळली होती. त्यावेळेस गनीम हाताला लागला असता तर नक्कीच त्याचे काही खरे नव्हते. कोण गनीम म्हणून शोधाशोध सुरु झाली. समजदार मंडळी जमा झाली. गनिमावर तोंडकी शेले मारू लागले. कोण्या तळीरामाने तर करामत केली नाही ना? गडकिल्ल्याभोवतालचा बच्चेमंडळींचा वेढा अजून वाढत चालला होता. हे गडकिल्ले तयार करताना अनेक समजदार थोराड जळू मुलांना हे पाहवत नाही. रात्रीच्या अंधारात मात्र आपली विकृती ते दाखवितात. नाताळबाबा भिंतीवर लटकावलेला असताना ते उध्वस्त करून टाकतात. हे तर जमिनीवरचे गड किल्ले. चंगळवादी संस्कृतींचे अनुकरण करणारा एक समूह या गोष्टींच्या विरोधात आहे. कदाचित त्यांनी तर हा हल्ला केला नाही ना....! असे अनेक प्रश्न तेथे उपस्थित झाले. रंगलेल्या चर्चेत ती मुले आ वासून पाहत होती. सुदैवाने या वर्षी सोसायटीत CCTV लावले असल्याने या प्रकरणाचा छडा लावला जाणार होता. गनीम कोण ? कळणार होते. समजल्यावर त्याचा गडावरून कडेलोट करायचा की, स्वराज्य सरकारच्या स्वाधीन करायचे...! हे सर्व प्रश्न चवीचवीने चर्चिले जात होते. CCTV च्या माध्यमातून मागोवा घेतला तेव्हा प्रत्यक्षात गनिम कोण ते लक्षात येताच मात्र मुलांचे अवसान गळून गेले. डोळ्याची त्वेषाची आग होती तेथे शीतल लहरी दौडू लागल्या. कोण गनिम...? भटक्या श्वानाचे प्रताप दिसून आले. एक नाही अर्ध्या डझन श्वानांचा रात्रीच्या अंधारात झालेला हल्ला. पुन्हा मुले कामाला लागली. पण तो उत्साह नव्हता. कसाबसा किल्ला तयार केला. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या रेघा मारून तटबंदी चितारली. *छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बालमनावर प्रभावित व्हावा* याखातर मुलांनी इतिहासाच्या पुस्तकातील हुबेहूब साकारलेले दुर्गकिल्ले म्हणजे आपली संस्कृती परंपरा आपला इतिहास आठवण करून देत असतात.
त्या सर्व बच्चेमंडळींचे *घोडपदेव समूह* कौतुक करीत आहे. या वर्षी छान साकारलेले गडकिल्ले पुढच्या वर्षी याहीपेक्षा सुंदर चितारावेत हीच शुभेच्छा....!

*अशोक भेके*

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण गनिम...? भटक्या श्वानाचे प्रताप दिसून आले. >>>
कारण काय असावे पण ? कुत्रे कचर्‍याचा डबा उलथा पालथा करतात काही खाण्यासाठी आहे का म्ह्णुन, पंण किल्यावर त्यांनी आक्रमण का करावं?
असो आमच्या किल्ल्यांना दुसर्‍या कॉलिनीतल्या कार्ट्यांपासुन धोका असे रात्री किल्ला झाकुन ठेवायचो आम्ही. कधी कधी तर पहाराही दिलेला आहे.
--किल्ला प्रेमी, अग्निपंख