गावगोष्टी (ग्रीस ७)

Submitted by Arnika on 5 November, 2018 - 06:04

गाढ झोप लागली होती. स्वप्न पडल्याचंही आठवत नाहीये मला... आणि अचानक मी पलंगावरून घसरायला लागले. सबंध खोली पुढेमागे हलत होती. दहा सेकंद झाली, पंधरा झाली तरी खोली डुगडुगायची थांबेना. चांदण्यात माझ्या डोळ्यादेखत समुद्राची अख्खी तबकडी सरकत होती आणि कितीतरी वेळ जीव मुठीत धरून बसले होते मी खिडकीपाशी. भूकंप. पण इतका मोठा? आणि एवढा वेळ? सुरुवातीला मला घटनाक्रम कळलाच नाही – भुकंपामुळे मी पडल्ये की मी पडल्यामुळे भूकंप झालाय? हादरे संपल्यावर मी फक्त किनारा पाहिला. काही पडझड झाली नव्हती इतकंच बघून डोळे मिटून घेतले.

ग्रीसमध्ये आले त्यावेळी डोंगरच्या डोंगर वणव्याने पेटले होते. वाटेतली घरं गिळत आग समुद्रापर्यंत पोचली आणि जीव वाचावा म्हणून लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या. गेल्या महिन्यातल्या स्वच्छ पौर्णिमेनंतर वारं असं काही फिरलं की गळ्यापर्यंत लाटा उसळायला लागल्या. आकाश डागाळलं. चार दिवसाच्या पुरात सिक्यातली सड्यावरची घरं चिखलात रुतली. आणि काल मी अत्तापर्यंत अनुभवलेला सगळ्यात मोठा भूकंप. समुद्रात, पाण्याच्या दहा किलोमीटर खाली घोळ झाला होता आणि ग्रीसचे सगळे किनारे हलले. भूकंप झाला किंवा आम्ही जोरदार डगमगलो यापेक्षाही तो कितीतरी वेळ चालूच राहिला याची मला भीती बसल्ये. दादर स्टेशनला संध्याकाळी सहाच्या खुनी वातावरणातही मी लोकलमध्ये चढल्यावर जे काही अभेद्य वाटायचं ना मला, तो सगळा तोरा एका भुकंपाने उतरवला. पंचमहाभूतांनी दोन महिन्यांत आपापले दोन्ही चेहरे दाखवले.

किनाऱ्यांमुळे प्रसिद्ध असला तरी ऐंशी टक्के ग्रीस डोंगराळ आहे. एकवेळ समुद्र दिसायचा नाही, पण डोळ्यांना डोंगर लागत नाही असं क्वचितच होतं. “आज वर जाणार आहत का?” आणि “आज उतरायचा विचार आहे का?” म्हणजे सड्यावरच्या गावात जाणार की किनाऱ्यावर असं विचारायची पद्धत आहे यांच्यात. आम्ही या ना त्या कारणाने सतत वरखाली करत असायचो. जितके वर जायचो तितक्या चविष्ट भाज्या आणि कोंबड्या मिळायच्या. जितके पाण्यापाशी येऊ तितके दैवी मासे मिळायचे. आणि वर-खाली कुठेही गेलो तरी अवली माणसं भेटायची.

एखादा प्रश्न असतो खास, स्वतःबद्दल विचारलेला, जो आपल्याला सिक्रेटली आवडत असतो. माझ्यासाठी लहानपणापासून तो “तू कुठली?” हा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत गल्ली, शाळा, कोकण, ठाणं, महाराष्ट्र, लंडन, भारत, आशिया-युरोप असं खुलं होत गेलेलं उत्तर मलाच मनातल्या मनात आवडतं. जबाबदारी आल्यासारखं वाटतं की बाबा मी जे बोलत्ये, जशी वागत्ये, जो पाहुणचार करत्ये त्यावरून मी जिथून आले आहे त्या जागेची पारख करतंय समोरचं माणूस.

इंग्लंडमध्ये सगळ्यांना भारतीयांच्या सोबतीने नांदायची सवय आहे. अर्वाचीन ग्रीस नाही आपल्याला तितकंसं ओळखत! इकडे आलेली बहुतांश पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि भारतीय माणसं होड्या बांधायला, गाड्या धुवायला किंवा अशी शारीरिक कष्टाची मजुरी करायला गेल्या पंधरा वर्षांत आलेली आहेत, किंवा मग कधीतरी सुट्टीसाठी रईस भारतीय कुटुंबातली माणसं एखाद्या बेटावर आलेली ग्रीक लोकांनी पाहिली आहेत. बरं मी ग्रीक बोलत्ये पण चाॅकलेटी आहे; ग्रीसमध्ये काम करत्ये पण गाड्या धूत नाहीये; आणि किनाऱ्यावरच्या होटेलवर राहात्ये तरी श्रीमंत नाहीये हे गणित सिक्यामधल्या लोकांना सुटायला वेळ लागला. त्यामुळे माझा आवडता प्रश्न खूपदा विचारला गेला. मी दर वेळी जास्तच रंगात येऊन उत्तर दिलं. मग ‘सिक्यामधली ती भारतीय मुलगी’ म्हणून पुढच्या-मागच्या गावात उगाच गवगवा! हळुहळू मी सायकल चालवताना पारावर गप्पा मारणाऱ्यांना हात करून सुखदुःखाच्या वगैरे गप्पा मारायला लागले, दुकानदारांना गुड मॉर्निंग घालायला लागले, वाटेतून चालणाऱ्या लहान मुलांच्या हाकेला ओ द्यायला लागले आणि ओळखीच्या झालेल्या कुत्र्यांशी थांबून खेळायला लागले. सिक्यामध्ये अनामिक असणं आणि नंतर ओळखीची होणं, दोन्ही साजरं करता आलं.

आजपर्यंत मी जिथे जिथे गेल्ये तिथे मला भेटलेल्या आज्या खास होत्या. सिक्यामधल्या स्ताव्ह्रूला आजीने ती जबाबदारी घेतली होती. वाकलेली म्हातारी मला गावातल्या पारावर बोलावून म्हणाली, “कशाला जात्येस परत? राहा इथेच आणि शोध एखादा सुंदर मुलगा. एखाद्या भाषेबरोबर झोपलीस की अजूनच अस्खलित बोलायला लागशील! म्हणून बघ, आम्हाला ग्रीक सोडून काही येतच नाही मेलं!”
अशा वेळी तुम्ही फक्त मुंडी हलवून “बरं” म्हणू शकता. त्या जख्खड म्हाताऱ्यांच्या भिशीत मी अजून काय उत्तर देणार होते? भाषेबरोबर झोपणे? सगळ्या शिक्षणपद्धतीचाच नव्याने विचार करायला लागणार होता मला...

हिवाळा लागल्यावर आम्ही कोरिन्थीयामधले दोन डोंगर चढून आलो. नेम्मेआ-केफ़ालारीचा डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा पावसामुळे अंधारत आलं होतं. तरीही दोन मुलांना बरोबर घेऊन दीमित्रा, तिचा नवरा, मी, आणि आमचे केफ़ालारीचे मित्र एलेना आणि थानासिस मिळून डोंगर चढायला लागलो. चढ असला तरी फार घसरायला होत नव्हतं, किंवा ग्रीकमध्ये म्हणतात तसं – माती मायाळू होती. परतीच्या वाटेवर मात्र आभाळ जे काही फाटलंय की बास! पोरांना थंडी वाजायला लागली म्हणून आम्ही आडरस्त्याला येऊन थांबलो. दहा मिनिटांत तिथून दोन शेतगाड्या खडखडत येताना दिसल्या त्यांना हात करून गाडीने गावात उतरायचा विचार होता. गाडी थांबवली तर ती सरपंचाची निघाली! म्हंटलं सोडतोस का? चढा म्हणे मागे, पण सांभाळून. माझ्या डुकरिणी आहेत मागे.

सामान्य नागरिकांबरोबर प्रवास करतच नाही आम्ही, आमचा ड्रायव्हरपण सरपंच असतो बघा! मग काय, चढलो आम्ही डुकरिणी ओलांडून गाडीत आणि आलो चिखलात बसून पुन्हा एलेनाच्या गावात (काही वाक्य माझी मलाच खरी वाटत नाहीयेत, पण मी डुकराशप्पथ खरं सांगत्ये).

एका संध्याकाळी मी आमच्या ‘बेडूक उड्या’ यूट्यूब चॅनलसाठी गाणं लिहीत बसले होते गावातल्या कॅफेत. तिथल्या मालकिणीला शांतता सोसत नाही. ती माझ्या वहीत डोकं घालून प्रश्न विचारायला लागली. अर्थात दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावरच्या सगळ्यांना माहीत झालं की ही मुलगी लहान मुलांसाठी वेगळ्याच भाषेत गाणं लिहीत होती. दोन दिवसांत एका बालवाडीच्या बाईंनी रस्त्यात भेटून मला त्यांच्या शाळेत मराठी गाणी म्हणायला बोलावलं. नवीनच काहीतरी कानावर पडत होतं आणि त्यावर पोरांनी जोरदार चर्चा केली (तुमची गाडी झुकझुक का करते? आमची चाफ-चुफ करते). नशिबाने मी आणि अपूर्व दादाने लिहिलेली गाणी भाषांतर करून सांगायला सोपी होती. पण ‘भोलानाथ’ ही कॉन्सेप्ट ग्रीकमध्ये सांगताना ‘माझा हा अवतार इथेच संपवावा’ असं वाटून घ्यायची वेळ आली .

पुढे खूप दिवस अनोळखी माणसं येऊन सांगायची की “तू गाणी म्हणतेस असं ऐकलं. आमच्या मुलांनी त्यादिवशी खूप मजा केली.” काही दिवसांनी माझे आभार मानायला बालवाडीतल्या मुलांनी एका भारतीय गोष्टीवर कठपुतळ्यांचं नाटक केलं – माकडाच्या काळजाची गोष्ट बरं का!

माझ्या वयाची सिक्यात राहिलेली मुलं-मुली वकिली, नाट्यशास्त्र, नर्सिंग, शेती अशा डिग्र्या घेऊन जवळपासच्या होटेलांमध्ये, बारमध्ये काम करतात. नोकऱ्या नाहीचेत तर शहरात जाऊनही त्यांना हीच कामं करायला लागणारेत हे माहित्ये त्यांना. मग अथीनाच्या गर्दीत जाऊन कुढण्यापेक्षा सुखाने गावात राहून तरी काम करू म्हणून त्यातलं कोणी गाव सोडत नाहीये. त्यांनी मला आजुबाजूची बारकी बारकी गावं दाखवून आणली.

बाकी आठवडा बाजारात किती ओले पिस्ते खाल्ले, खिडकीतल्या आकाशातून किती चंद्र पाहिले, उठता-बसता समुद्राचे किती गोडवे गायले आणि रानात बसून किती वेळा वहीचे रकाने भरले याची मोजणी न केलेलीच बरी... माझी स्क्रिप्ट जे कोणी लिहितंय त्यांना खूप मार्क आहेत. घर झालेल्या गावाचं, भेटलेल्या माणसांचं असं कॉम्बिनेशन मी स्वतःच्या कल्पनेने लिहू शकले नसते. माझ्या नशिबातल्या योगायोगांनी सिक्यामध्ये गर्दी केली म्हणूया. पुन्हा एकदा वाट बघत्ये मी, “तू कुठली?” या प्रश्नाची. उत्तरात भर पडत्ये. माझी गावं लहान लहान होत जातायत आणि जग मोठंमोठं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त मस्त!!

तुझे जग उत्तरोत्तर अजूनच मोठे मोठे होत जाओ ही शुभेच्छा !>>> +१

माझी स्क्रिप्ट जे कोणी लिहितंय त्यांना खूप मार्क आहेत. घर झालेल्या गावाचं, भेटलेल्या माणसांचं असं कॉम्बिनेशन मी स्वतःच्या कल्पनेने लिहू शकले नसते.
खूप आवडलं!

बाकी आठवडा बाजारात किती ओले पिस्ते खाल्ले, खिडकीतल्या आकाशातून किती चंद्र पाहिले, उठता-बसता समुद्राचे किती गोडवे गायले आणि रानात बसून किती वेळा वहीचे रकाने भरले याची मोजणी न केलेलीच बरी... माझी स्क्रिप्ट जे कोणी लिहितंय त्यांना खूप मार्क आहेत. घर झालेल्या गावाचं, भेटलेल्या माणसांचं असं कॉम्बिनेशन मी स्वतःच्या कल्पनेने लिहू शकले नसते. माझ्या नशिबातल्या योगायोगांनी सिक्यामध्ये गर्दी केली म्हणूया. पुन्हा एकदा वाट बघत्ये मी, “तू कुठली?” या प्रश्नाची. उत्तरात भर पडत्ये. माझी गावं लहान लहान होत जातायत आणि जग मोठंमोठं.+>>>>>>हे खुप आवडलं

बाकी लेख एकदम खुमासदार, नेहमीप्रमाणे!

एवढया सुंदर लिखाणापुढे काय प्रतिसाद द्यावा हेच समजत नाही अगदी दिगमूढ होऊन जातो महान आहात आपण , या दीपावालीच्या आपणास अनेक शुभेच्छा

मस्त लेख !
तुझे जग उत्तरोत्तर अजूनच मोठे मोठे होत जाओ ही शुभेच्छा !++११११

निरागस आणि सुंदर.

एव्हढ्या हौसेने परक्या (फारसं कोणी जात नसलेल्या) ठिकाणी जाऊन राहणं आणि तरिही स्वतःचं वेगळेपण जपणं सोपं नाही.
तसंच वाचता वाचता मला वाटलं हे किती निरागस, गोड गोड आहे. प्रत्यक्षात कुठे कधी असं असतं का? मग वाटलं कदाचित कायम शहरात राहून त्याच त्याच चाकोरीबद्ध आयुष्यात राहून अशा प्रकारचे जेडेड विचार होऊन जातात. त्याकरता तू घेतेस तसे कधी न ऐकलेले अनुभव घ्यायला हवेत. म्हणजे तू वर्णन करतेस तसं चैतन्य अनुभवता येईल.

कमाल! 'माझी स्क्रिप्ट जे कोणी लिहितंय त्यांना खूप मार्क आहेत' - या वाक्यात कल्पना आली की किती अनुभव-समृद्ध काळ आहे! तुझी स्क्रिप्ट पुढेही कायम अशीच वैवैध्यपूर्ण आणि समृद्ध रहावी अशी त्या स्क्रिप्टलेखकाकडे प्रार्थना.