बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...

Submitted by मार्गी on 4 November, 2018 - 13:52

बघता मानस होते दंग ८ (अंतिम): कष्टदायी परतीचा प्रवास...

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ५: राजापूर- देवगड (५२ किमी)

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ६: देवगड बीच आणि किल्ला

बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण

किनारी रस्त्याने कुणकेश्वरला फिरून आल्यानंतर दुस-या दिवशी सगळ्यांसोबत थोडं फिरलो. सायकल सोबत नसताना देवबाग बीच व तारकर्ली बीच बघितला. वेळेच्या अभावी सायकलवर अन्य कुठे जाता आलं नाही. निदान देवगड- आचरा बीच तरी जायची इच्छा होती. त्या रूटवर बीचबरोबर कोंकणातल्या आतली खेडेगावं दिसली असती. पण ते शक्य झालं नाही. बायको व मुलगी सोबत असल्यामुळे परतीच्या प्रवासात किमान गगनबावडापर्यंत जाण्याचीही इच्छा अपूर्ण राहिली. त्यांच्यासोबतच जावं लागलं. अर्थात् कुणकेश्वर- जामसंडेच्या रस्त्यावर जे तीव्र चढ आहेत, ते मी सायकलवर आरामात चढलो आणि मागच्या वेळी गाडीने जाताना तेच गगनबावडा घाटापेक्षा जास्त भितीदायक वाटले होते. त्यामुळे गगनबावडा घाट सायकलवर न जाता आल्याची खंत नाही. तसंही ह्या दिवसांमध्ये इतके चढ पार झाले आहेत की, एक घाट काहीच विशेष वाटत नाही आता. असो.

काही ठिकाणं बाकी राहूनही अतिशय जबरदस्त हा प्रवास झाला. सातही दिवस सुंदर नजारे मिळत राहून दंग व्हायला झालं. उत्साह तर आलाच, पण खूप काही शिकायलाही मिळालं. तसंच माझं स्वप्नातलं स्थान असलेल्या देवगडमध्येही छान फिरता आलं. आणि सायकलवर फिरताना आणखी एक विशेष हे जाणवलं की, सायकलमुळे मी वेगळ्या अँगलने देवगड बघितलं. जर आपण कुठे सायकलवर जात असू तर वेगळ्या दृष्टीने सगळ्या गोष्टी बघू शकतो. अनेक संधी खुल्या होत असतात. घरीही भेट मस्त झाली. त्यात आत्याने एक गोष्ट सांगितली की, मी लहान असताना आजोबांबरोबर राजापूरलाही‌ गेलो होतो. विजयदुर्ग बघितल्यावर आम्ही पावसला गेलो होतो. त्यामुळे राजापूर- देवगडच्या रूटवरचा आसमंत मला ओळखीचा वाटला होता! देवगड माझ्यासाठी स्पेशल आहे तसंच माझ्या करिअरमध्येही त्याची 'जागा' महत्त्वाची आहे. ह्याच ठिकाणी माझ्या करिअरमधल्या एका नाजुक टप्प्यावर मी बीएससी सोडून बीएकडे जाण्याचा निर्णय घेतला. अशा जुन्या व अदूसोबतच्या नवीन आठवणींसह आता देवगडचा निरोप घ्यायचा आहे.

आत्येभावाच्या गाडीत सायकल टाकून पुण्याला आणायची आहे. पण जेव्हा सायकल डिसमँटल केली, तेव्हा कळालं की सायकल तर गाडीत बसत नाहीय! मला वाटलं की, दोघी त्याच्यासोबत जातील व मी बसवर सायकल टाकून आणेन. पणा सगळ्यांनी विरोध केला. सायकल दुस-या एखाद्या गाडीने आणण्याविषयीही चर्चा झाली. सध्या हापूसचे दिवस नसल्यामुळे अशी गाडी लगेच मिळणार नाही. त्यामुळे बरीच चर्चा झाल्यावर सायकल तिथेच ठेवून गाडीने सगळ्यांच्या सोबत येण्याचं ठरलं. मी सुरुवातीला तयार नव्हतो, पण तयार झालो. त्यात माझा हाही एक स्वार्थ होता की, सायकल आणताना मला गगनबावडा घाटापर्यंत सायकल चालवता आली असती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकल काही दिवस आणखी त्या विशेष जागी राहील व एक प्रकारे विपश्यनाच करेल! म्हणून सायकल तिथे ठेवून परत आलो.

पण सायकल सोडून येणं इतकं सोपं गेलं नाही. सायकलसोबतचं नातं घट्ट आहे. त्यामुळे एक प्रकारे तो विरह जाणवला. तसंच मनाने थकायलाही झालं कारण सायकल मोहीमेचा टेंपो तसाच सुरू राहिला. मनात तेच विचार चालू राहिले. त्यामुळे मानसिक दृष्टीने ते दिवस कठीण गेले. आणि त्यात आणखी गुंतागुंती होत्या. एक तर ३० सप्टेंबरला माझी मॅरेथॉन होती. आणि त्यानंतर लगेचच ६- ७ ऑक्टोबरला जालन्यात योग संमेलन होतं जिथे माझ्या योग- सायकल यात्रेतले सगळे जण परत एकदा भेटणार होते. त्यामुळे मला तिथे सायकलवरच जायचं होतं. आणि त्याच्या अगदी आधीच ३० सप्टेंबरला मॅरेथॉन असल्यामुळे हातात दिवस फार कमी होते. आणि मध्ये येणा-या रविवारी गणपती विसर्जन होतं. मी कोल्हापूरपर्यंत सायकल आणली असती तरी तिथून पुण्याला आणणं कठीण होतं. शिवाय मला मॅरेथॉनच्या आधी जेमतेम सात- आठ दिवस मिळाले असते. त्यामुळे मॅरेथॉनला लक्षात घेऊन गणेश विसर्जनाच्या आधीच सायकल बसवरून आणायची, असं ठरवलं. मॅरेथॉननंतर लगेचच पुढच्या रविवारी जालन्याच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे एकच शनिवार- रविवार हातात होता. त्यामुळे देवगड- गगनबावडा- कोल्हापूर प्रवास सायकलवर झाला नाही. कदाचित नंतर कधी हे जमेल.

म्हणून फक्त एक दिवसासाठी देवगडला गेलो. पुन: निर्जन झालेल्या घरात काही तासांसाठी थांबलो. संध्याकाळच्या बसचं तिकिट बूक केलं होतं. पण जेव्हा बसवर सायकल लोड करण्याची वेळ आली, तेव्हा कळालं की, ह्या बसला टपावर स्टँडच नाही आहे! पण दुसरा पर्याय होता. सायकल डिसमँटल केली. दोन्ही चाक वेगळे केले. मग अशी सायकल सहजपणे ड्रायव्हरच्या सीटच्या मागे बसून गेली. जुन्या दोन्ही सायकली अनेकदा बसमधून- बसवरून नेल्या आहेत. पण ह्या प्रकारे डिसमँटल करून नेली नव्हती. आज तेही बघून झालं! आणि हे शक्य होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे कोंकणातले साधे सरळ लोक. जर तिथे दुस-या ठिकाणचे ड्रायव्हर व कंडक्टर असते, तर त्यांनी विरोध केला असता. हे केल्यावर मात्र काही अडचण आली नाही. पहाटे पुण्यात पोहचलो. चिंचवड स्टँडवर दोन मिनिटामध्ये चाकं परत सायकलला जोडली आणि पंचवीस किलोमीटर सायकल चालवून घरी पोहचलो. एक मोठा श्वास घेतला! हुश्श!


(आत्येभावाने घेतलेले फोटोज)

आता मैरेथॉनसाठी फक्त आठ दिवस बाकी होते. त्यामुळे चांगला आराम करायचा होता, फक्त छोटे रन्स करायचे होते. पण... पण ह्या प्रवासाचा अँटी क्लायमॅक्स आला! सलग दोन रात्री बसने प्रवास केल्यानंतर खूप थकायला झालं. तब्येत डाउन झाली. आणि नंतर तर डोकेदुखी व ताप आला. वायरल इन्फेक्शनची लक्षणं दिसायला लागली. तीन- चार दिवस बेड रेस्ट करावी लागली. तेव्हा मॅरेथॉनला जाणं कठीण झालं. आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे तर मॅरेथॉन हातातून गेलीच. ३० सप्टेंबरची त्र्यंबकेश्वरला होणारी माझी ही पहिली फुल मॅरेथॉन होती. पण नाही जाऊ शकलो. कारण अशक्तपणा खूप आला होता. आणि मॅरेथॉनबरोबरच जालन्याच्या योग संमेलनालाही सायकलवर जाता आलं नाही. संमेलनात सहभाग घेऊ शकलो, पण त्यानंतरही काही दिवस अशक्तपणा होता. तब्येत परत नाजुक होती. त्यामुळे ज्या कारणासाठी धावपळीने सायकल आणली, तेही मिस झालं व मॅरेथॉनही गेली! असो.

(आत्येभावाने घेतलेले फोटोज)

पण मला हेच वाटतं की, एखाद्या इव्हेंटचं इतकं महत्त्व नसतं. गंतव्यापेक्षा प्रवासाचं महत्त्व जास्त असतं. उद्दिष्टापेक्षा वाटचाल मोठी असते. सप्टेंबर महिन्यात सायकल प्रवासावर निघण्याच्या अगदी आधी ३६ किलोमीटर केले होते. हे ३६ किमी जरी असले तरी‌ सोबत पाणी, पाठीवर सॅक असं सामान ठेवल्यामुळे हा रन खूपसा फुल मॅरेथॉनच्या ४२ किमीसारखाच होता. त्यामुळे मनात पूर्ण विश्वास वाटत होता. २१, २५, ३०, ३६ अशा टप्प्यांमधून फुल मॅरेथॉनच्या स्तरापर्यंत तयारी केली होती. त्या वाटचालीत खूप काही शिकायला मिळालं, खूप काही एंजॉय केलं. त्यामुळे मॅरेथॉन मिस झाल्याचं दु:ख नाही. ३० सप्टेंबर राहिलं असलं तरी २० जानेवारीचं माझं तिकिट कन्फर्म आहे! तसंच मला वाटतं की, इव्हेंटचं इतकं महत्त्व नसतं, तो फक्त एक टप्पा असतो. आणि माझ्या मते तरी एव्हेंटला रूटीन ट्रेनिंग म्हणून बघायला हवं‌ व नेहमीच्या ट्रेनिंग़ला इव्हेंटसारखं स्पेशल मानायला हवं. माझे रनिंगशी संबंधित सगळे अनुभव अजूनही लिहायचे बाकी आहेत. ती 'माझे पलायन' लेखमाला असेल. पण सतत त्या लेखमालेचं 'पोस्टपोनायनच' सुरू आहे! असो. तेही अनुभव लवकरच लिहेन. ह्या सगळ्या गोष्टींनंतर कोंकण सायकल प्रवासातील दंग करणा-या आठवणींसह ह्या लेखनाला आता विराम देतो. ज्यांनी ज्यांनी ह्या प्रवासात मदत केली, सोबत दिली, त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता आहे. लवकरच आपल्याला भेटेन. धन्यवाद!

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults