पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २२. इत्तेफाक (१९६९)

Submitted by स्वप्ना_राज on 28 October, 2018 - 03:44

index_0.jpg

Chance. Stupid, dumb, blind chance. Just a part of the strange mechanism of the world, with its fits and coughs and starts and random collisions.

-- Lauren Oliver

रात्रीची वेळ. पोलीस स्टेशनमधून तातडीने बाहेर पडून पोलिसांच्या जीप्स आणि स्कूटर्स शहरातल्या सुनसान रस्त्यांवरून धावू लागतात. कॅमेरा एका घरात शिरतो तेव्हा दोन्ही बाजूला लोक जमलेले दिसतात. एका खोलीत जाऊन कॅमेरा स्थिरावतो. तिथेही पोलीस आहेत, त्यांचे फोटोग्राफर्स आहेत. आणि बेडवर पडलंय एका स्त्रीचं मृत शरीर. ही आहे सुषमा. मिस्टर दिलीप रॉयची बायको. जवळ उभी असलेली सुषमाची बहिण रेणू रडतरडत पोलिसांना सांगते की तिच्या बहिणीचा खून दिलीपने केलाय. तिच्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षी लग्न झाल्यापासून सुषमा वैवाहिक जीवनात खुश नव्हती. तिला पार्ट्यांना जायची आवड. पण आपल्या चित्रकलेत रमलेला दिलीप तिच्याबरोबर जायला तयार नसायचा. रेणू पोलिसांना सांगते की त्या रात्रीसुध्दा सुषमा त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोण्या हितचिंतकाने आयोजित केलेल्या पार्टीला जायची तयारी करत होती. पण दिलीपला एक चित्र पूर्ण करायचं होतं. त्याने तिला आधी पुढे जायला सांगितलं. त्यांच्यात भांडण झालं. चिडलेल्या सुषमाने दिलीपचं चित्र फाडलं. दिलीपचा पारा चढला आणि त्याने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. रेणू सांगते की ती शेजारच्या खोलीतून सुषमाच्या खोलीत आली तेव्हा सुषमाचा मृत्यू झालेला होता. दिलीप रॉय मात्र पोलिसांना ओरडून सांगत असतो की मी हा खून केलेला नाही. रागाच्या भरात तो पोलिसांच्या समोरच रेणूचा गळा आवळायला जातो तेव्हा पोलीस त्याला अटक करतात. त्याच्यावर खटला भरला जातो. तिथेही तो आपण निर्दोष असल्याचं सांगत राहतो पण कोणी ऐकून घेत नाही. त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षात येताच न्यायालय त्याची तपासणी करून रिपोर्ट सादर करायचा आदेश देतं. दिलीपला डॉ. त्रिवेदीच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यात येतं.

काही दिवसांनी एका पावसाळी रात्री पब्लिक प्रॉसिक्युटर खन्ना डॉ. त्रिवेदीकडे दिलीपची चौकशी करायला येतात. त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर दिवाणही असतो. डॉक्टर त्यांना सांगतात की दिलीप कायद्याचा अभ्यास करतोय. पण त्याच्या मानसिक स्थितीबद्दल सध्या तरी काही निश्चित सांगता येणार नाही. खन्नाच्या विनंतीवरून डॉक्टर रॉयला बोलावणं पाठवतात. आपल्या भविष्यात फाशी किंवा मनोरुग्णालय ह्यापैकी एक काहीतरी आहे हे पक्कं ठाऊक असलेला रॉय बोलताबोलता अचानक हिंसक होतो आणि डॉक्टरांवर हल्ला करतो. पोलिस त्याला परत त्याच्या खोलीत घेऊन जात असताना तो पळ काढतो. जाताना इन्स्पेक्टर दिवाणचं पिस्तुलही घेऊन जातो. त्याच्याविरोधात साक्ष दिलेल्या मेहुणीला त्याच्यापासून धोका आहे हे ओळखून पोलीस रेणूला फोन करून दिलीप पळाल्याची कल्पना देतात आणि तिच्या घराबाहेर २ कॉन्स्टेबल्स तैनात करतात.

रेडियोवर आकाशवाणीवरून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी इस्पितळातून पळाल्याची बातमी सांगितली जाते. त्याचं वर्णन सांगून नागरिकांना खिडक्या-दरवाजे बंद करून घ्यायची सूचनाही दिली जाते. ती ऐकून एक स्त्री घराच्या खिडक्या बंद करू लागते. ही रेखा जगमोहन. ती शेवटची खिडकी बंद करायला जाणार तोच आधीच आत आलेला दिलीप तिच्या तोंडावर हात दाबून तिला दरडावतो. ती घरात आपण एकटीच असल्याचं सांगते. टेबलावर ठेवलेला फोटो पाहून दिलीप तिला तो कोणाचा आहे हे विचारतो. तो फोटो तिच्या नवरयाचा - जगमोहनचा - असतो आणि तो त्यावेळी शहरात नसतो. दिलीप घरातल्या सगळ्या खोल्या तपासतो - फक्त बेडरूम सोडून, कारण नवरा घरात नसताना परक्या पुरुषाने बेडरूममध्ये जाणं रेखाला मंजूर नसतं. त्याचे कपडे भिजलेले असतात म्हणून नवरयाचे कपडे त्याला आणून द्यायला रेखा वरच्या खोलीत जाते. कपाटात ठेवलेलं पिस्तुल ती काढणार एव्हढ्यात दिलीप तिथे येतो आणि त्यातल्या गोळ्या काढून घेतो. दोघे परत खाली येत असताना ट्रेनचा आवाज येतो. रेखा त्याला स्टेशन ५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचं सांगते. दिलीप स्वयंपाकघरात कपडे बदलायला जातो तेव्हाही रेखा पोलिसांना फोन करायचा प्रयत्न करते पण दिलीप तो हाणून पाडतो.

एव्हढ्यात बेल वाजते. डॉ. त्रिवेदी रेखाला ओळखत असतात. ते इन्स्पेक्टर दिवाणला सोबत घेऊन तिथून जात असताना तिला हॉस्पिटलमधून पळालेल्या कैद्याबद्दल माहिती देऊन सावध राहायला सांगायला आलेले असतात. रेखा त्यांना जगमोहन कलकत्त्याला गेल्याचं तर सांगते पण दिलीप आतल्या खोलीतून पिस्तुल रोखून असल्याने त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. डॉक्टर आणि दिवाण निघून जातात तोच रेखाची शेजारीण मुलासाठी दूध मागायला येते. रेखा तिला कशीबशी कटवते. बरीच रात्र झाल्याने रेखा आणि दिलीप बाहेर हॉलमध्येच झोपायचं ठरवतात. ती सोफ्यावर आणि तो जमिनीवर. तिच्या बोलण्यातून दिलीपला कळतं की नवरा महिन्यातून २० दिवस कामानिमित्त बाहेर राहत असल्याने ती एकटेपणाला कंटाळलेली आहे.

रात्री कधीतरी दिलीपला जाग येते तेव्हा रेखा सोफ्यावर नसते. दिलीपकडे असलेली घराची चावी घेऊन ती आतून लॉक केलेला दरवाजा उघडून बाहेर जायचा प्रयत्न करत असते. दिलीपची चाहूल लागताच ती दरवाज्याजवळून पळते. तिला शोधण्याच्या प्रयत्नात दिलीप चुकून बेडरूममध्ये जातो तेव्हा बाथरूममधल्या टबमध्ये पडलेलं एका पुरुषाचं प्रेत त्याला दिसतं. तो भेदरून ओरडतो. त्याची किंकाळी ऐकू आल्याने घराबाहेर रस्त्यावर असलेला इन्स्पेक्टर दिवाण परत घरात येतो. तो कसून चौकशी करतो पण रेखा त्यालाही बेडरूममध्ये जाऊ देत नाही. तो निघून गेल्यावर दिलीप रेखावर तिने नवऱ्याचा खून करून प्रेत बाथटबमध्ये लपवल्याचा आरोप करतो. अवाक झालेली रेखा त्याला ओढत बाथरूममध्ये घेऊन जाते तर काय........बाथटब रिकामा असतो. रेखा दिलीपला सांगते की तुझ्या बायकोचं प्रेत पाहिल्यामुळे तुझ्या मनावर परिणाम झालाय. दिलीप मात्र हतबुध्द होऊन विचार करत राहतो - खरंच आपल्याला वेड लागलंय का बाथटबमध्ये प्रेत होतं?

१९६९ सालच्या बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित 'इत्तेफाक' ह्या चित्रपटाची ही कथा. विकिपीडियावर असं म्हटलंय की हा अमेरिकन चित्रपट Signpost To Murder चा रिमेक होता. असं असलं तरी त्याला अस्सल भारतीय रुपडं देण्यात पटकथालेखक जी. आर. कामथ यशस्वी झालेत. 'कोहरा' सारखी ही कथा कुठेही उपरी वाटत नाही. उलट दोन तासांपेक्षा कमी वेळात, जवळपास एका घरात आणि एकाच खोलीत मोजक्या पात्रांना घेऊन घडणारी ही गोष्ट वेगवान घटनाक्रमातून आपल्याला चांगलीच बांधून ठेवते. एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दिलीप रात्री रेखाच्या घरीच थांबायचं ठरवतो तेव्हा हॉलमध्ये झोपायची तयारी करताना दोघे मिळून जमिनीवर आणि सोफ्यावर बेडशीट्स अंथरतात, त्यावर पांघरूणं, उश्या ठेवतात. विपरीत परिस्थितीतसुध्दा माणूस normalcy शोधायचा कसा प्रयत्न करतो ते त्यातून दर्शवायचा प्रयत्न केला गेलाय असं वाटलं. नियतीने अश्या प्रसंगात रेखा आणि दिलीप ह्या दोघांना एकत्र आणण्याऐवजी त्यांना आयुष्याचे जोडीदार बनवलं असतं तर काय झालं असतं हाही विचार मनात चमकून जातो. ६० साली आलेल्या चोप्रांच्या 'कानून' प्रमाणेच ह्याही चित्रपटात अजिबात गाणी नाहीत. चित्रपटातलं नाट्य पातळ करणाऱ्या 'कॉमिक रिलीफ' लाही पूर्णपणे फाटा दिलाय हाही मोठ्ठा रिलीफ. एकूणात थ्रिलर चित्रपटांची आवड असल्यास हा चित्रपट चुकवू नये असाच आहे.

अभिनय चांगला नसेल तर कथा कितीही चांगली असली तरी चित्रपटाची वाट लागते हे खरं आहे. त्यातून रहस्यप्रधान चित्रपट म्हटलं की अभिनयाचा वाटा अधिक मोलाचा ठरतो कारण देहबोलीतून म्हणा किंवा संवादफेकीतून म्हणा, कुठलाही क्लू त्याच्या नियोजित वेळेआधी प्रेक्षकांना मिळणं कथेला मारक ठरू शकतं. ह्या चित्रपटात सर्वांचाच अभिनय तोडीस तोड आहे. मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या राजेश खन्नाने लाडक्या बायकोच्या मृत्यूने हबकलेला, आपण तिला मारलं नाही हे जीव तोडून पोलिसांना सांगू पाहणारा, आपलं कोणीच ऐकत नाही म्हणून चिडलेला, हताश झालेला आणि तरीही आपली सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवलेला चित्रकार दिलीप रॉय सुरेख उभा केलाय. एकाच वेळी vulnerable आणि dangerous दिसणं त्याने साध्य केलंय. आणि cute सुध्दा :-).

अभिनेत्री नंदानेही त्याला पुरेपूर साथ देत सतत कामात गढलेल्या रुक्ष अरसिक नवऱ्याला कंटाळलेली, एकटी पडलेली, घरात अचानक शिरलेल्या गुन्हेगाराला पाहून भेदरलेली, सुटकेचे मार्ग शोधणारी रेखा जगमोहन कुठेही नाटकीपणा येऊ न देता (जिन्यावरून वर जाताना चालीत आणलाय तेव्हढा सोडून!) साकारली आहे. मला ती वयाच्या मानाने नेहमीच थोराड वाटत आली आहे. पण ह्या चित्रपटात ती फार सुंदर दिसते. इतकी सडपातळ मी तिला प्रथमच पाहिली. फक्त तिने आणि तिच्या शेजारणीची भूमिका करणाऱ्या शम्मीने आपापले पदर नीट सांभाळले असते तर बरं झालं असतं. कथानकाची कोणतीही गरज नसताना केवळ प्रेक्षकांना titillate करायच्या हेतूने हे दाखवण्याची गरज चोप्रांना का वाटावी आणि त्याला ह्या अभिनेत्रींनी विरोध का करू नये हे समजत नाही. असो.

जगदीश राज (इन्स्पेक्टर खान) आणि इफ्तेखार (इन्स्पेक्टर कर्वे) ह्या दोघांना इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पहायची एव्हढी सवय झालेय की ते दोघे सोडून आणखी कोणी पोलीस म्हणून नजरेसमोर येतच नाही. मात्र इफ्तेखार कुठल्याही अँगलने 'कर्वे' काही दिसत नाही. Happy ह्या दोघांच्या बरोबरीने सुजितकुमारलाही इन्स्पेक्टर दिवाण म्हणून खाकी गणवेश परिधान करायची संधी मिळालेली आहे. गजानन जागीरदार डॉक्टर त्रिवेदी झालेत. बाकी भूमिकांत बिंदू (दिलीपची मेहुणी रेणू) आणि मदन पुरी (पब्लिक प्रॉसिक्युटर खन्ना) दिसतात. जगमोहन झालेल्या कोणा बिचाऱ्या नटाला मात्र टेबलावरचा फोटो आणि बाथटब एव्हढ्या दोनच जागा काही क्षणांपुरत्या मिळाल्या आहेत त्यामुळे त्याच्या अभिनयात नावं ठेवण्यासारखं काही नाही असंच म्हणावं लागेल Happy

अर्थात प्रेक्षक म्हणून चित्रपटातल्या त्रुटी काढणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. तो न बजावून कसं चालेल? पण हा चित्रपट पाहणार असाल तर मात्र पुढे वाचू नका. पहिली खटकलेली गोष्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णाकडे, तोही असा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, सिगरेट लायटर कसा राहू दिला जातो? दिलीप रुग्णालयातून पळतो तेव्हाचा पोलिसांनी केलेला पाठलाग 'विनोदी' ह्या सदरात मोडतो. दिलीपशी आट्यापाट्या, खो-खो, हुतुतू खेळत बसण्याऐवजी पोलीस सरळ त्याच्या पायांवर गोळी का मारत नाहीत? कपडे बदलायला स्वयंपाकघरात जायच्या ऐवजी दिलीप रेखाला पाठमोरी व्हायला सांगून हॉलमध्येच कपडे का बदलत नाही? बाकी त्या बदललेल्या कपड्यांची भयानक रंगसंगती पाहून पु.लं.चा ठिगळे विजारीत झुरळ शिरल्यासारखा पळायच्या ऐवजी बेशुध्द पडला असता. Happy तो कपडे बदलत असताना पोलिसांना फोन करून 'हॅलो, हॅलो' असं ओरडण्याऐवजी रेखा दिलीपशी पोलिसांना ऐकू जाईल अश्या रीतीने का बोलत नाही? तिच्या घराबाहेर पोलीस का तैनात केलेले असतात? फक्त तिची डॉक्टर त्रिवेदीशी ओळख असते म्हणून? रात्री अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याऐवजी दिलीप तिच्या घरी थांबणं का पसंत करतो ह्याचाही उलगडा होत नाही. सकाळी आसपास लोकांची गर्दी असली तरी पोलिसांनी रातोरात त्याचा फोटो प्रसिद्ध केला असता तर त्याला पळून जाणं मुश्कील होणारच ना. जगमोहनच्या मृतदेहाचे कोणतेही फोटो न घेता त्याच्या हातातून बिल्ला काढून घेतला जाणे, color palette मध्ये सापडलेला मोती कोणतेही फोटो न घेता इन्स्पेक्टर कर्वेने काढून घेणे, डॉक्टर त्रिवेदी पोलीस नसताना त्यांना मृतदेहाला हात लावू दिला जाणे वगैरे बाबी पोलिसी तपासाची पार्श्वभूमी असलेल्या अनेक मालिका आताच्या काळात पाहिलेल्या असल्याने चांगल्याच खटकतात.

आणि तरीही चित्रपटाचा परिणाम कुठे कमी होत नाही हे विशेष. ह्या जगात बरंवाईट जे जे काही होतं ते कोणा देवाच्या इच्छेनुसार, नियतीच्या नियमांनुसार, सटवाईने ललाटी लिहिलेल्या लेखानुसार होतं का ती फक्त योगायोगांची एक अदृश्य साखळी असते हे आपल्यापैकी कोणालाच कधी नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण दैवयोगाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, एखाद्या पावसाळी रात्री काय घडू शकतं हे ह्या चित्रपटाच्या कथेचं मुख्य सूत्र आहे.

काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर वाचलेलं एक वाक्य उद्धृत करायचा मोह आवरत नाही.

Do you think the universe fights for souls to be together? Some things are too strange and strong to be coincidences.

-- Emery Allen

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नर्स जी डॉक्ट र वर प्रेम करून हाय खाउन टीबी होउन मरते नाहीतर हिरोची बहीण जी रेप होउन मारली जाते.>>>>>>>>>>>>> अशक्य काहीही आहे हे Lol

आर्ट सिनेमांत केलं तर कथानकाची गरज आणि कमर्शिअल सिनेमात केलं तर गल्ला भरायला. हे म्हणजे ये करे तो रासलीला और दुजा करे तो कॅरेक्टर ढीला असा प्रकार झाला.

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 1 November, 2018 - 22:46

Can't agree more !

आर्ट सिनेमांनी मध्यंतरी उत आणला होता.
एक माणूस सिगरेट ओढताना दाखवला की कमर्शियल सिनेमा.
आणि तो विडी ओढताना त्याच्या नाकपुड्यात आणि घशात कॅमेरा नेला की आर्ट सिनेमा व्हायचा.

नंदाला दोनच रोल बेस्ट. नर्स जी डॉक्ट र वर प्रेम करून हाय खाउन टीबी होउन मरते >>>>>> आता हा आणि कुठचा चित्रपट नंदाचा? Uhoh

एखादा माणूस ' सक्काळच्या पारी ' टमरेल घेउन निघला आणि त्याच्या मागे मागे दहा मिनिटे कॅमेरा नुसता जाताना दाखवला की तो ' आर्ट ' सिनेमा.

सामान्यांच्या आयुष्यातली अपरिहार्यता अधो रेखित करणारे चित्रण !!

/** Spoiler Alert Begin */
/** Spoiler Alert Begin */

टबमधला मृतदेह रेखाचा नवरा जगमोहनचाच असतो. तिचे आणि इन्स्पेक्टर दिवाणचे विबासं असतात. कोलकात्याहून अचानक आल्याने जगमोहन दोघांना रंगेहाथ पकडतो म्हणून दिवाणने त्याचा खून केलेला असतो. दिलीप हॉस्पिटलमधून पळाल्याने पोलिस बंदोबस्तात अचानक वाढ होते. त्यांना बॉडी डिस्पोज ऑफ करता येत नाही म्हणून ती टबमध्ये ठेवलेली असते. योगायोगाने दिलीप तिथे आल्याने त्यांचा बेत फसतो. दिलीपची किंकाळी ऐकून दिवाण एकटाच पुन्हा घरात येतो तेव्हा तो दिलीप आतल्या खोलीत असल्याचा फायदा घेऊन ती बॉडी बाथरुमबाहेर काढतो. तेव्हढ्या वेळात घराजवळून ट्रेन गेल्याने त्याचा आवाज दिलीपला ऐकू येत नसतो. आणि रेखा खोलीबाहेरच उभी असल्याने दिवाण काय करतोय तेही दिसत नसतं.

दिलीपच्या बायकोचा खून त्याची मेहुणी रेणू हिने बहिणीच्या संपत्तीपायी केलेला असतो.

पोलिस दिवाण आणि रेणूला घेऊन जातात. रेखा डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या करते.

/** Spoiler Alert End */

पब्लिकहो "शक्ती" चा दिग्दर्शक रमेश सिप्पी. प्रकाश मेहरा नव्हे. हे दोन्ही दिग्दर्शक त्यांच्या नायिकांना बळंच कहानी की माँग मधे दाखवण्याबद्दल अजिबात फेमस नव्हते. सिप्पीच्या शोले मधले "आ जब तक है जा" मधली ग्रेसफुल हेमा आणि मनोजकुमारच्या क्रांती मधली "जिंदगी की ना टूटे लडी" मधली लोळणारी हेमा पाहा - लगेच फरक कळेल.

आणि स्मिताचे या दोन्ही चित्रपटांमधले सीन्स तेव्हाच्या नॉर्म्स च्या पेक्षा काही विशेष जास्त वगैरे नव्हते. किंबहुना स्मिता आणि शबाना मधे हाच फरक जाणवतो की कमर्शियल मधे सुद्धा स्मिता एन्जॉय करत आहे असे वाटायचे, तर शबाना खूप अवघडल्यासारखी वाटायची.

" शबाना ने कच्चा खाल्लाय स्मिता ला." - ह्या वरून, 'हे गवयी तरी हा असला नरभक्षक तबलजी कशाला घेतात, कुणास ठाऊक' ची आठवण झाली. Happy

या सिनेमाची स्टोरी इन्व्हर्स केली तर -

म्हणजे नंदा आणि तिचा प्रियकर दोषी दाखवलेत त्याऐवजी ते निरपराध असतील
त्या दोघांनी खून केलाय आणि ते तो आळ राजेश खन्नावर आणतातय याउलट त्यांनी खून न करताही स्वतःच हत्या केल्याची कबूली दिलीय
राजेश खन्नाने नंदाच्या नवर्‍याचा खून केला नसतानाही तो त्या आरोपात गुरफटलाय असे घडण्याऐवजी त्यानेच खून केला असून निरपराध लोक स्वतःवर गुन्ह्याचे पातक घेताना तो बघत राहतोय.

अशा प्रकारे पूर्ण कथा उलटीपालटी करुन बनविलेला हा सिनेमाही बराच सुसह्य आहे -

https://www.youtube.com/watch?v=1RXvG5nNMqs

खन्नांच्या राजेशने या चित्रपटात जबरदस्त अभिनय केलेला आहे. लहान असताना मलाही नंदा राजेश खन्नाची आई वाटायची (नंतर एक क्रश थेट तिच्यासारखी दिसायला होती म्हणून आवडू लागली).
रहस्यमय चित्रपट म्हटले की कानून आणि इत्तेफाक हे मैलाचे दगड आहेत. याशिवाय ज्वेल थीफ आणि सीआयडी हे गाण्यांसहीत आवडलेले सिनेमे. या सर्वांमधे इत्तेफाक खूपच उजवा वाटतो.
परीक्षण झकासच. पण त्या काळच्या मानाने थोड्याशा चुका अशा चित्रपटात माफ केल्या पाहीजेत. हा सिनेमा नसून एक नाटक आहे असे वाटत राहते. (काही आउटडोअर दृश्ये वगळता ).

Pages