पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २२. इत्तेफाक (१९६९)

Submitted by स्वप्ना_राज on 28 October, 2018 - 03:44

index_0.jpg

Chance. Stupid, dumb, blind chance. Just a part of the strange mechanism of the world, with its fits and coughs and starts and random collisions.

-- Lauren Oliver

रात्रीची वेळ. पोलीस स्टेशनमधून तातडीने बाहेर पडून पोलिसांच्या जीप्स आणि स्कूटर्स शहरातल्या सुनसान रस्त्यांवरून धावू लागतात. कॅमेरा एका घरात शिरतो तेव्हा दोन्ही बाजूला लोक जमलेले दिसतात. एका खोलीत जाऊन कॅमेरा स्थिरावतो. तिथेही पोलीस आहेत, त्यांचे फोटोग्राफर्स आहेत. आणि बेडवर पडलंय एका स्त्रीचं मृत शरीर. ही आहे सुषमा. मिस्टर दिलीप रॉयची बायको. जवळ उभी असलेली सुषमाची बहिण रेणू रडतरडत पोलिसांना सांगते की तिच्या बहिणीचा खून दिलीपने केलाय. तिच्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षी लग्न झाल्यापासून सुषमा वैवाहिक जीवनात खुश नव्हती. तिला पार्ट्यांना जायची आवड. पण आपल्या चित्रकलेत रमलेला दिलीप तिच्याबरोबर जायला तयार नसायचा. रेणू पोलिसांना सांगते की त्या रात्रीसुध्दा सुषमा त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोण्या हितचिंतकाने आयोजित केलेल्या पार्टीला जायची तयारी करत होती. पण दिलीपला एक चित्र पूर्ण करायचं होतं. त्याने तिला आधी पुढे जायला सांगितलं. त्यांच्यात भांडण झालं. चिडलेल्या सुषमाने दिलीपचं चित्र फाडलं. दिलीपचा पारा चढला आणि त्याने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. रेणू सांगते की ती शेजारच्या खोलीतून सुषमाच्या खोलीत आली तेव्हा सुषमाचा मृत्यू झालेला होता. दिलीप रॉय मात्र पोलिसांना ओरडून सांगत असतो की मी हा खून केलेला नाही. रागाच्या भरात तो पोलिसांच्या समोरच रेणूचा गळा आवळायला जातो तेव्हा पोलीस त्याला अटक करतात. त्याच्यावर खटला भरला जातो. तिथेही तो आपण निर्दोष असल्याचं सांगत राहतो पण कोणी ऐकून घेत नाही. त्याचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षात येताच न्यायालय त्याची तपासणी करून रिपोर्ट सादर करायचा आदेश देतं. दिलीपला डॉ. त्रिवेदीच्या मनोरुग्णालयात दाखल करण्यात येतं.

काही दिवसांनी एका पावसाळी रात्री पब्लिक प्रॉसिक्युटर खन्ना डॉ. त्रिवेदीकडे दिलीपची चौकशी करायला येतात. त्यांच्यासोबत इन्स्पेक्टर दिवाणही असतो. डॉक्टर त्यांना सांगतात की दिलीप कायद्याचा अभ्यास करतोय. पण त्याच्या मानसिक स्थितीबद्दल सध्या तरी काही निश्चित सांगता येणार नाही. खन्नाच्या विनंतीवरून डॉक्टर रॉयला बोलावणं पाठवतात. आपल्या भविष्यात फाशी किंवा मनोरुग्णालय ह्यापैकी एक काहीतरी आहे हे पक्कं ठाऊक असलेला रॉय बोलताबोलता अचानक हिंसक होतो आणि डॉक्टरांवर हल्ला करतो. पोलिस त्याला परत त्याच्या खोलीत घेऊन जात असताना तो पळ काढतो. जाताना इन्स्पेक्टर दिवाणचं पिस्तुलही घेऊन जातो. त्याच्याविरोधात साक्ष दिलेल्या मेहुणीला त्याच्यापासून धोका आहे हे ओळखून पोलीस रेणूला फोन करून दिलीप पळाल्याची कल्पना देतात आणि तिच्या घराबाहेर २ कॉन्स्टेबल्स तैनात करतात.

रेडियोवर आकाशवाणीवरून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी इस्पितळातून पळाल्याची बातमी सांगितली जाते. त्याचं वर्णन सांगून नागरिकांना खिडक्या-दरवाजे बंद करून घ्यायची सूचनाही दिली जाते. ती ऐकून एक स्त्री घराच्या खिडक्या बंद करू लागते. ही रेखा जगमोहन. ती शेवटची खिडकी बंद करायला जाणार तोच आधीच आत आलेला दिलीप तिच्या तोंडावर हात दाबून तिला दरडावतो. ती घरात आपण एकटीच असल्याचं सांगते. टेबलावर ठेवलेला फोटो पाहून दिलीप तिला तो कोणाचा आहे हे विचारतो. तो फोटो तिच्या नवरयाचा - जगमोहनचा - असतो आणि तो त्यावेळी शहरात नसतो. दिलीप घरातल्या सगळ्या खोल्या तपासतो - फक्त बेडरूम सोडून, कारण नवरा घरात नसताना परक्या पुरुषाने बेडरूममध्ये जाणं रेखाला मंजूर नसतं. त्याचे कपडे भिजलेले असतात म्हणून नवरयाचे कपडे त्याला आणून द्यायला रेखा वरच्या खोलीत जाते. कपाटात ठेवलेलं पिस्तुल ती काढणार एव्हढ्यात दिलीप तिथे येतो आणि त्यातल्या गोळ्या काढून घेतो. दोघे परत खाली येत असताना ट्रेनचा आवाज येतो. रेखा त्याला स्टेशन ५ मिनिटांच्या अंतरावर असल्याचं सांगते. दिलीप स्वयंपाकघरात कपडे बदलायला जातो तेव्हाही रेखा पोलिसांना फोन करायचा प्रयत्न करते पण दिलीप तो हाणून पाडतो.

एव्हढ्यात बेल वाजते. डॉ. त्रिवेदी रेखाला ओळखत असतात. ते इन्स्पेक्टर दिवाणला सोबत घेऊन तिथून जात असताना तिला हॉस्पिटलमधून पळालेल्या कैद्याबद्दल माहिती देऊन सावध राहायला सांगायला आलेले असतात. रेखा त्यांना जगमोहन कलकत्त्याला गेल्याचं तर सांगते पण दिलीप आतल्या खोलीतून पिस्तुल रोखून असल्याने त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. डॉक्टर आणि दिवाण निघून जातात तोच रेखाची शेजारीण मुलासाठी दूध मागायला येते. रेखा तिला कशीबशी कटवते. बरीच रात्र झाल्याने रेखा आणि दिलीप बाहेर हॉलमध्येच झोपायचं ठरवतात. ती सोफ्यावर आणि तो जमिनीवर. तिच्या बोलण्यातून दिलीपला कळतं की नवरा महिन्यातून २० दिवस कामानिमित्त बाहेर राहत असल्याने ती एकटेपणाला कंटाळलेली आहे.

रात्री कधीतरी दिलीपला जाग येते तेव्हा रेखा सोफ्यावर नसते. दिलीपकडे असलेली घराची चावी घेऊन ती आतून लॉक केलेला दरवाजा उघडून बाहेर जायचा प्रयत्न करत असते. दिलीपची चाहूल लागताच ती दरवाज्याजवळून पळते. तिला शोधण्याच्या प्रयत्नात दिलीप चुकून बेडरूममध्ये जातो तेव्हा बाथरूममधल्या टबमध्ये पडलेलं एका पुरुषाचं प्रेत त्याला दिसतं. तो भेदरून ओरडतो. त्याची किंकाळी ऐकू आल्याने घराबाहेर रस्त्यावर असलेला इन्स्पेक्टर दिवाण परत घरात येतो. तो कसून चौकशी करतो पण रेखा त्यालाही बेडरूममध्ये जाऊ देत नाही. तो निघून गेल्यावर दिलीप रेखावर तिने नवऱ्याचा खून करून प्रेत बाथटबमध्ये लपवल्याचा आरोप करतो. अवाक झालेली रेखा त्याला ओढत बाथरूममध्ये घेऊन जाते तर काय........बाथटब रिकामा असतो. रेखा दिलीपला सांगते की तुझ्या बायकोचं प्रेत पाहिल्यामुळे तुझ्या मनावर परिणाम झालाय. दिलीप मात्र हतबुध्द होऊन विचार करत राहतो - खरंच आपल्याला वेड लागलंय का बाथटबमध्ये प्रेत होतं?

१९६९ सालच्या बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित 'इत्तेफाक' ह्या चित्रपटाची ही कथा. विकिपीडियावर असं म्हटलंय की हा अमेरिकन चित्रपट Signpost To Murder चा रिमेक होता. असं असलं तरी त्याला अस्सल भारतीय रुपडं देण्यात पटकथालेखक जी. आर. कामथ यशस्वी झालेत. 'कोहरा' सारखी ही कथा कुठेही उपरी वाटत नाही. उलट दोन तासांपेक्षा कमी वेळात, जवळपास एका घरात आणि एकाच खोलीत मोजक्या पात्रांना घेऊन घडणारी ही गोष्ट वेगवान घटनाक्रमातून आपल्याला चांगलीच बांधून ठेवते. एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. दिलीप रात्री रेखाच्या घरीच थांबायचं ठरवतो तेव्हा हॉलमध्ये झोपायची तयारी करताना दोघे मिळून जमिनीवर आणि सोफ्यावर बेडशीट्स अंथरतात, त्यावर पांघरूणं, उश्या ठेवतात. विपरीत परिस्थितीतसुध्दा माणूस normalcy शोधायचा कसा प्रयत्न करतो ते त्यातून दर्शवायचा प्रयत्न केला गेलाय असं वाटलं. नियतीने अश्या प्रसंगात रेखा आणि दिलीप ह्या दोघांना एकत्र आणण्याऐवजी त्यांना आयुष्याचे जोडीदार बनवलं असतं तर काय झालं असतं हाही विचार मनात चमकून जातो. ६० साली आलेल्या चोप्रांच्या 'कानून' प्रमाणेच ह्याही चित्रपटात अजिबात गाणी नाहीत. चित्रपटातलं नाट्य पातळ करणाऱ्या 'कॉमिक रिलीफ' लाही पूर्णपणे फाटा दिलाय हाही मोठ्ठा रिलीफ. एकूणात थ्रिलर चित्रपटांची आवड असल्यास हा चित्रपट चुकवू नये असाच आहे.

अभिनय चांगला नसेल तर कथा कितीही चांगली असली तरी चित्रपटाची वाट लागते हे खरं आहे. त्यातून रहस्यप्रधान चित्रपट म्हटलं की अभिनयाचा वाटा अधिक मोलाचा ठरतो कारण देहबोलीतून म्हणा किंवा संवादफेकीतून म्हणा, कुठलाही क्लू त्याच्या नियोजित वेळेआधी प्रेक्षकांना मिळणं कथेला मारक ठरू शकतं. ह्या चित्रपटात सर्वांचाच अभिनय तोडीस तोड आहे. मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या राजेश खन्नाने लाडक्या बायकोच्या मृत्यूने हबकलेला, आपण तिला मारलं नाही हे जीव तोडून पोलिसांना सांगू पाहणारा, आपलं कोणीच ऐकत नाही म्हणून चिडलेला, हताश झालेला आणि तरीही आपली सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवलेला चित्रकार दिलीप रॉय सुरेख उभा केलाय. एकाच वेळी vulnerable आणि dangerous दिसणं त्याने साध्य केलंय. आणि cute सुध्दा :-).

अभिनेत्री नंदानेही त्याला पुरेपूर साथ देत सतत कामात गढलेल्या रुक्ष अरसिक नवऱ्याला कंटाळलेली, एकटी पडलेली, घरात अचानक शिरलेल्या गुन्हेगाराला पाहून भेदरलेली, सुटकेचे मार्ग शोधणारी रेखा जगमोहन कुठेही नाटकीपणा येऊ न देता (जिन्यावरून वर जाताना चालीत आणलाय तेव्हढा सोडून!) साकारली आहे. मला ती वयाच्या मानाने नेहमीच थोराड वाटत आली आहे. पण ह्या चित्रपटात ती फार सुंदर दिसते. इतकी सडपातळ मी तिला प्रथमच पाहिली. फक्त तिने आणि तिच्या शेजारणीची भूमिका करणाऱ्या शम्मीने आपापले पदर नीट सांभाळले असते तर बरं झालं असतं. कथानकाची कोणतीही गरज नसताना केवळ प्रेक्षकांना titillate करायच्या हेतूने हे दाखवण्याची गरज चोप्रांना का वाटावी आणि त्याला ह्या अभिनेत्रींनी विरोध का करू नये हे समजत नाही. असो.

जगदीश राज (इन्स्पेक्टर खान) आणि इफ्तेखार (इन्स्पेक्टर कर्वे) ह्या दोघांना इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पहायची एव्हढी सवय झालेय की ते दोघे सोडून आणखी कोणी पोलीस म्हणून नजरेसमोर येतच नाही. मात्र इफ्तेखार कुठल्याही अँगलने 'कर्वे' काही दिसत नाही. Happy ह्या दोघांच्या बरोबरीने सुजितकुमारलाही इन्स्पेक्टर दिवाण म्हणून खाकी गणवेश परिधान करायची संधी मिळालेली आहे. गजानन जागीरदार डॉक्टर त्रिवेदी झालेत. बाकी भूमिकांत बिंदू (दिलीपची मेहुणी रेणू) आणि मदन पुरी (पब्लिक प्रॉसिक्युटर खन्ना) दिसतात. जगमोहन झालेल्या कोणा बिचाऱ्या नटाला मात्र टेबलावरचा फोटो आणि बाथटब एव्हढ्या दोनच जागा काही क्षणांपुरत्या मिळाल्या आहेत त्यामुळे त्याच्या अभिनयात नावं ठेवण्यासारखं काही नाही असंच म्हणावं लागेल Happy

अर्थात प्रेक्षक म्हणून चित्रपटातल्या त्रुटी काढणे हा आपला जन्मसिध्द हक्कच आहे. तो न बजावून कसं चालेल? पण हा चित्रपट पाहणार असाल तर मात्र पुढे वाचू नका. पहिली खटकलेली गोष्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या रुग्णाकडे, तोही असा ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, सिगरेट लायटर कसा राहू दिला जातो? दिलीप रुग्णालयातून पळतो तेव्हाचा पोलिसांनी केलेला पाठलाग 'विनोदी' ह्या सदरात मोडतो. दिलीपशी आट्यापाट्या, खो-खो, हुतुतू खेळत बसण्याऐवजी पोलीस सरळ त्याच्या पायांवर गोळी का मारत नाहीत? कपडे बदलायला स्वयंपाकघरात जायच्या ऐवजी दिलीप रेखाला पाठमोरी व्हायला सांगून हॉलमध्येच कपडे का बदलत नाही? बाकी त्या बदललेल्या कपड्यांची भयानक रंगसंगती पाहून पु.लं.चा ठिगळे विजारीत झुरळ शिरल्यासारखा पळायच्या ऐवजी बेशुध्द पडला असता. Happy तो कपडे बदलत असताना पोलिसांना फोन करून 'हॅलो, हॅलो' असं ओरडण्याऐवजी रेखा दिलीपशी पोलिसांना ऐकू जाईल अश्या रीतीने का बोलत नाही? तिच्या घराबाहेर पोलीस का तैनात केलेले असतात? फक्त तिची डॉक्टर त्रिवेदीशी ओळख असते म्हणून? रात्री अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याऐवजी दिलीप तिच्या घरी थांबणं का पसंत करतो ह्याचाही उलगडा होत नाही. सकाळी आसपास लोकांची गर्दी असली तरी पोलिसांनी रातोरात त्याचा फोटो प्रसिद्ध केला असता तर त्याला पळून जाणं मुश्कील होणारच ना. जगमोहनच्या मृतदेहाचे कोणतेही फोटो न घेता त्याच्या हातातून बिल्ला काढून घेतला जाणे, color palette मध्ये सापडलेला मोती कोणतेही फोटो न घेता इन्स्पेक्टर कर्वेने काढून घेणे, डॉक्टर त्रिवेदी पोलीस नसताना त्यांना मृतदेहाला हात लावू दिला जाणे वगैरे बाबी पोलिसी तपासाची पार्श्वभूमी असलेल्या अनेक मालिका आताच्या काळात पाहिलेल्या असल्याने चांगल्याच खटकतात.

आणि तरीही चित्रपटाचा परिणाम कुठे कमी होत नाही हे विशेष. ह्या जगात बरंवाईट जे जे काही होतं ते कोणा देवाच्या इच्छेनुसार, नियतीच्या नियमांनुसार, सटवाईने ललाटी लिहिलेल्या लेखानुसार होतं का ती फक्त योगायोगांची एक अदृश्य साखळी असते हे आपल्यापैकी कोणालाच कधी नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण दैवयोगाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, एखाद्या पावसाळी रात्री काय घडू शकतं हे ह्या चित्रपटाच्या कथेचं मुख्य सूत्र आहे.

काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर वाचलेलं एक वाक्य उद्धृत करायचा मोह आवरत नाही.

Do you think the universe fights for souls to be together? Some things are too strange and strong to be coincidences.

-- Emery Allen

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर परीक्षण!!

अर्थातच दुरदर्शनवर पाहिला.
पहिल्यांदा पाहिला तेव्हा MSEB च्या कृपेने फक्त सुरुवात आणि शेवटाच्या अगोदर थोडा असा पाहिला. नंतर केव्हातरी पुर्ण पाहिला.
प्रत्येकाचा अभिनय चोख आहे.
फक्त ते जिना चढण आणि तो पदरपाडूपणा. त्यात चोप्राटाईपच्या हिरॉईनला आतून बाहेरून दाखवणाऱ्या साड्या. बर नंदाला फिगर आहे पण शम्मीला का पहायचं? त्यात शम्मी वयाला न शोभणार अंग घुसळत बोलते. तिला कॉमिक रीलिफ द्यायला आणलं असाव पण कुणा सुज्ञाच्या लक्षात आलं आणि तिला कापली.

राजेश खन्ना ने असा प्रयत्न पुन्हा रेडरोज मध्ये केला होता जो सपशेल फसला.

तुझ्यामूळे परत सारे जूने पिच्चर तूनळी वर शोधुन पाहायचा नाद लागला.. आता तर रिकमेंडेशन मधे सुद्धा तेच येतात.
हापन बघते आता..

बघितला आहे हा चित्रपट. ठिकठाकच वाटला होता. 'पोलिसी तपासाची पार्श्वभूमी असलेल्या अनेक मालिका आताच्या काळात पाहिलेल्या असल्याने चांगल्याच खटकतात.' <- यामुळे असेल.

रामुचा 'कौन' आला होता तेव्हा नेहमी इत्तेफाकचा उल्लेख व्हायचा.

याची आणि नवीन इत्तेफाक ( सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा) ची कथा सारखी आहे ना?
शेवट पण तसाच आहे का?

बाकी तुमची ही सिरिज खूप छान आहे. सगळे लेख वाचले. मस्त लिहीता तुम्ही.

गुगु.....appreciate your honesty....पण प्रश्न हा आहे की बाईची फिगर चांगली असली तरी तिचं प्रदर्शन का मांडावं? प्रेक्षकांची अभिरुची वाढवणे हीसुध्दा चित्रपट बनवणार्‍या लोकांची एक जबाबदारी असते....कोणी ती मानत नाही हा मुद्दा सोडून देऊ. मग प्रेक्षकांना असल्या सवयी लावायचं पाप का करावं? तेही चित्रपटात दम असताना? रच्याकने, शम्मी मला तरी फार जाड वाटली नाही.

अ‍ॅमी, 'कौन' मधलं रहस्य फार आधीच लक्षात आलं होतं तरी आवडला होता. बाकी मनोज बाजपेयी एव्हढा डोक्यात गेला होता की त्याला ती मारते तेव्हा मला आनंदच झाला होता Happy

पीनी, नवा इत्तेफाक मी पाहिलेला नाही. त्यामुळे त्याचा शेवट माहित नाही. सिरिजमधले पुढलेही लेख वाचाल अशी आशा करते Happy

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. लेखात सुधारणा करण्यासाठी काही सूचना करायच्या असतील तर त्यांचं स्वागतच आहे.

मस्त गं. मी नवा इत्तेफाक पाहिला आहे. आता जुना ट्राय करते Happy

बाकी मनोज बाजपेयी एव्हढा डोक्यात गेला होता की त्याला ती मारते तेव्हा मला आनंदच झाला होता >>> Proud मलापण!

इत्तेफाक ज्या कालात आला होता तेव्हा प्रेक्शकाना क्वालिटी पेक्शा क्वांटीटीत रस असे. पिक्चर जेवढा मोठा तेवढा पैसा वसूल . साधारण्तः १८ रीळ चे चित्रपट असत. ही संख्या सेन्सॉर सरीफिकेट वर उजव्या बाजून मध्ये असते . No. of Reels . म्हणून लोक पाहून आलेल्याना विचारीत किती रीळचा आहे . सेन्सॉर सर्टिकिकेट पडद्यावर येताच पहिली नजर या रीळ संखेवर जाइ Happy २२, २४ असा मोठा असेल तर आहा: असा समाधानाचा सामुदायिक सुस्कारा थिएटर भर घुमे.
इत्तेफाक हा १४ रीळाचाच होता त्यामुळे बर्‍याच लोकाण्नी तो मनोमन रिजेक्ट केलाच होता. चर्चाही चालायच्या काय यार १४ रीळाचाच तर आहे.. अशी. म्हनजे थाळी भरपेट नाही बुवा. त्यात शिवाय एकही गाणे नाही म्हनजे भयंकर पाप... टाळायला आनखी एक कारण. राजेश खन्ना त्यावेळी टॉप मोस्ट फॉर्म मध्ये होता . त्यामुळे चला दीड दोन तास निदान खन्ना डोळ्यासन्मोर तरी दिसेल या भावनेने लोक आले. अर्थात सस्पेन्सला रिपीट ऑडियन्स नसतो. येवढे करून ही चक्क हा चित्रपट चालला. कारण नो नॉन्सेन्स वेगवान पट्कथा आणि संकलन.
तेव्हा बर्‍याच मराठी येरूंना इत्तेफाक शब्दाचा अर्थही माहीत नव्हता. असे बरेच शब्द उर्दूतले आहेत की जे चित्रपटामुळे माहीत झाले. उदा: कश्मकश, यलगार, अलिकड चा ' दबंग' मसान .

नन्दा अभिनयात उजवी असली तरी तिच्या हिरॉइन मटेरियल कधीच वाटले नाही. अगदी शशी कपूर सारखे रोम्यांटिक हिरो सोबत असतानाही. एक तर ती थोराड दिसत असे आणि तिच्या चेहर्‍यावर एक सूक्श्म त्रासिक पणा जाणवे. तत्कालीन अवाढव्य नायिकांपैकी ती एक होती.
पदर सांभाळन्याविशयी धुंद मध्येही कॉमेन्ट झाल्यात. एक तर हे चित्रीकरण फारसे व्हल्गर नाही. त्या काळातही ते फारसे प्रोवोकेटिव नव्हतेच.

अर्रे हो इत्तेफाकचा रिमेकदेखील येऊन गेला ना इतक्यातच. किंचित फेरफार केला होता त्यात असं ऐकलंय.

===
> बाकी मनोज बाजपेयी एव्हढा डोक्यात गेला होता की त्याला ती मारते तेव्हा मला आनंदच झाला होता Happy >:D Lol कौन मलापण आवडला होता.

===
बाबा कामदेव, प्रतिसाद आवडला.
सारखे पदर पाडण्यास अश्लील म्हणून नाही पण इर्रिरेटिंग, फिजेटिंग सवय म्हणून माझा आक्षेप आहे. त्या राज कपूर आणि अजूनेक कोणतरी बाई आहे त्यांच्या गाण्यातपन ती नऊवारी घातलेली बाई सारखी पदर पाडते आणि सावरते. सरळ कमरेलाच गुंडाळून टाकायचा ना!!े

पदर सांभाळन्याविशयी धुंद मध्येही कॉमेन्ट झाल्यात. एक तर हे चित्रीकरण फारसे व्हल्गर नाही. त्या काळातही ते फारसे प्रोवोकेटिव नव्हतेच.>>>>

हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि आता काळसापेक्ष.

तेव्हा कुटुंबासोबत पडद्यावर अथवा टीव्हीवर पाहताना खूप विचित्र वाटायचे, काही दृश्ये तर कधी संपताहेत असे वाटायचे.
आज बिकिनीतली हिरॉईन बघतानाही मला काही वाटत नाही कारण अंग प्रदर्शन पाहायची सवय झालीय.

नव्या इत्तेफाकबद्दल विकीवर वाचले. स्टोरी पूर्ण बदलली आहे. हिरोईनचे विबासं असतात व हिरो लेखक असतो इतकेच साम्य आहे दोन्ही चित्रपटात.

{{ इत्तेफाक हा १४ रीळाचाच होता }}}

चूक. फक्त १२ रीळेच होती.
>>
अरेरे वॅल्यु फॉर मनी आणखीच कमी झाली Happy

अरेरे वॅल्यु फॉर मनी आणखीच कमी झाली Happy
नवीन Submitted by बाबा कामदेव on 30 October, 2018

असं असतं तर लोकांनी मेरा नाम जोकर डोक्यावर घेतला असता. सिनेमा लंबा नही बडा होना चाहिए बाबूमोशाय.

अरे बाप रे! २२-२४ रिळं म्हणजे किती तासांचा पिक्चर असायचा? Uhoh एव्हढा पेशन्स कुठून आणायचे लोक?

कथानकाची गरज नसताना स्त्रीदेहाचं प्रदर्शन माझ्या मते तरी व्हल्गरच आहे. कथानकाची गरज म्हणून केलं जातं तिथेही कितपत गरज असते हाही एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. साधना म्हणते तसं तेव्हाच्या काळात पिक्चर पहायला येणार्‍या स्त्रियांना ते पाहून नक्कीच ऑकवर्ड होत असणार. आणि त्यात exploitation आहे ज्याची मला अतिशय चीड आली.

>>तेव्हा रिळे असायची त्यामुळे कळायचे. आताच्या काळात पण अडीज तास चालणारे चित्रपट येतात की अधून मधून

हो ग. पण मी १४ रिळांना १०५ मिनिटं तर २२ आणि २४ रिळांना किती असं गणित करून बघितलं तर उत्तर १६५ आणि १८० मिनिटं आलं. ३ तास लई झाले यार.

बिपिन....
तस होतं खरं तेव्हा. तीन तासापेक्सा कमी म्हणजे नाय चालबे. गाणीही भरमसाठ असायची. केवळ गाणी ऐकायला पिक्चर पहायला जावे लागायचे. राज कुमारचे डायलॉग ऐकायला . विचारू नका. एकेक भन्नाट क्रायटेरिया असत. वेळच भरपूर होता. तिकीट १ रुप्याचे. करमुक्त असेल तर ६५ पैसे. आमच्या ' शहरात " दोन रुपये सर्वात उच्च तिकीट. आमचा एक होस्टेल मित्र कुणी चित्रपट पाहून आला की त्यात फायटिण्ग आहे का ते आवर्जून विचारायचा. चांगली दणादण्णी असली तरच जायचा. असो.

सुजीत कुमार आणि रजेश खन्ना मित्र होते. राजेशच्या बर्‍याच चित्रपटात सुजीत कुमार दिसे . इफ्तेखार ला कर्वे म्हणणे कुछ हजम नही हुआ. सक्सेना, वर्मा वगैरे ठीक आहे. पण कर्वे ? उद्या अमजदखानला देशपांडे म्हणाल.

हा सिनेमा बघायला सुरू करताच राजेश खन्ना त्याची बायको मेल्यावर जी काही over acting करत होता ते पाहून बंदच करून टाकला. अगदी दुसरी तिसरीच्या गॅदरिंग मधलं नाटक आठवलं Lol

त्या रिळांवरून आठवलं, ते सुरवातीचे सर्टीफिकेट दाखवायचे तेव्हा वाचायचे किती रीळांचा पिक्चर आहे. त्यावरून छोटा आहे का मोठा अंदाज बांधायचा. आवर्जून तो आकडा वाचायचाच. जसं आपल्याला फार कळतंय यातलं Proud

काल मी पण हा युट्युबवर पाहयला सुरू केला. राजेशची ऑव्हर अ‍ॅक्टींग पाहून जाम हसायला आलं> तेव्हाच्या काळात तीच अ‍ॅक्टींग भारी वाटत असेल.

मी कित्येक चित्रपट रस्त्यावर पाहिलेले आहेत, रिळे किती हे आवर्जून पाहिले जायचे. भरपूर रिळे = भरपूर करमणूक.

चित्रपट म्हणजे तीन तासच. त्यापेक्षा कमी म्हणजे फसवणूक.

राजेश खन्नाला कृपया नावे ठेऊ नका. तो किती प्रचंड लोकप्रिय होता याची आजच्या पिढीला कल्पना करणेही अशक्य आहे. आज 10 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. तेव्हा एकटा राजेश सगळे अवकाश व्यापून होता. पुरे देश की धडकन. त्याची एकटींग बिकटिंग कुणी बघत नव्हते, तो पडद्यावर असणे पुरेसे होते.

त्यात त्याने मान कलती करून, डोळे मिचकावून नंतर ते बंद करून बुगु बुगू नंदीबैलासारखी मान वरखाली हलवून डोळे उघडून कॅमेऱ्याला जवळ यायचा इशारा केला की पोरी कामातून जायच्याच. अख्खे करीयर त्याने ह्या दोन तीन अदांवरती निभावले. मी त्याची नुसती फॅन नाही तर 2 टनी एसी आहे. Happy Happy

वा! वा! माझा एक आवडता सिनेमा.

भारतीय प्रेक्षकांना हिंदी थ्रिलर्स बघण्याची फारशी सवय नसण्याच्या काळात हा सिनेमा आला होता + राजेश खन्ना अशा सिनेमातही काम करतो, हा अ‍ॅडेड बोनस होता.

माझे बाबा, काका, आत्या सगळे हिंदी सिनेम्यांचे प्रचंड फॅन्स; राजेश खन्ना असून या सिनेमात एकही गाणं नाही, ही त्यांच्यासाठी अद्भुत गोष्ट होती! या सिनेमाबद्दल आम्ही त्यांच्याकडून हीच गोष्ट सर्वात आधी ऐकली.
त्यांच्या दृष्टीने हा सिनेमा `हायली रेकमेंडेड' होता. सिनेमाची कथा, पटकथेचा वेग तेव्हाच्या अस्सल फॅन्सना खूप आवडला होता.

कुठलाही सिनेमा कोणत्या काळात बनला, हे पाहणं आवश्यक आणि महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं. त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातूनच तो पाहिला जायला हवा.
प्रत्येक पिढीला आवडलेला सिनेमा त्यांच्या पुढच्या पिढीला आवडेलच याची खात्री नसते. (उदा. बॉबी. या सिनेमाला लोकांनी इतकं का डोक्यावर घेतलं, असं मला प्रथम पाहताना पदोपदी वाटलं होतं. Lol )

(नव्या इत्तेफाकची स्टोरी वेगळी आहे. तो पण मला आवडला होता. पण सिद्धार्थ मल्होत्राला शून्य अभिनय येतो.)

महिलांच्या दर्शनासंबंधाने: असे आहे कि हे दर्शन महिलांना ऑकवर्ड होते पण त्या काळात किंबहुन आताही पैसे टाकून तीन तास मनोरंजनासाठी पिक्चर बघणारा बहुतांश प्रेक्षक्वर्ग पुरूश आहे. तेव्हा इतके ही परस्त्री दर्शन अवघड कॅटेगरीतले होते बायका साड्या नीट नेसत. तेव्हा गोर्‍या स्त्री शरीराचे दर्शन होणे ही एक पर्वणी प्रेक्षकांसाठी त्यात दिग्दर्शक व प्रॉडुसर हे सर्व पंजाबी. दकियानू सी मानसिकतेचे लोक. आजही बॉलिवूड्चा जो कोअर आहे तो हाच पंजाबी सिंधी आहे गोर्‍या शरीर प्रदर्शन करणार्‍या बिन्डोक सुंदर्‍या म्हणूनच आपल्याला बघाव्या ला ग तात.
त्या कुणाची तरी काही तरी गरज पूर्ण करतात. गार एसीत बसून तीन तास जीवनातले कश्ट, मेहनत व त्रास विसरून एका वेगळ्याच जगात रमणे हीच ती गरज. हिरो हिरॉइनच्या मागे धावतो तिला त्रास देतो तेव्हा प्रेक्षक त्याजागी स्वतःला प्रोजेक्ट करतात. गुरू शनाया अफेअर चवीने पाहणारी पण एक मानसिकता प्रेक्षकांत आहे. बनव्णा रे लोक त्यांना इग्नोअर करू शकत नाहीत.

प्रत्येक नटी स्मिता शबाना सुचित्रा सेन माधवी नसते. टिकू शकत नाही स्पर्धेत.

हे कटु वास्तव आहे. त्या नंदा व शम्मी ह्यांनी कॉट्रॅ क्ट साइन करताना प्रदर्शन कर णार नाही असे कलम घालायला हवे होते.

प्रत्येक पिढीला आवडलेला सिनेमा त्यांच्या पुढच्या पिढीला आवडेलच याची खात्री नसते. >>>>>> अगदी बरोबर आहे. पुढ्ची पिढी कशाला? आपल्यालाच एके काळी प्रचंड आवड्लेले सिनेमे काही वर्षांनंतर पुन्हा पाहिले तर स्वतःच्या आवडींबद्दल आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. for example, "मैने प्यार किया" तेव्हा पाहिला तेव्हा खलास व्हायला झालेलं. त्याची "जादू है नशा है" कित्येक दिवस नव्हे कित्येक महिने उतरली नव्हती. MPK मधला सलमान हा माझा first and last celebrity crush होता. ( १३ वं सरुन १४ वं लागण्याचा काळ आणि अशा vulnerable काळात नजरेला पडलेला MPK चा सलमान . you can imagine! any ways! ) असो.
तर मुद्दा असा की तोच mpk आता पाहिला तर "का आवडला होत हा सिनेमा तेव्हा एवढा? " असा प्रश्न पडतो. (त्यातला सलमान अजूनही तेवढाच आवडतो. mpk मधल्यासारखा तो पुन्हा कधीच दिसला नाही. mpk तला सलमान कुणीतरी वेगळाच होता असं वाटण्याइतका तो नंतर बदलला. )

त्याची एकटींग बिकटिंग कुणी बघत नव्हते, तो पडद्यावर असणे पुरेसे होते.>> हो ग साधना. माझी आई, मावशी वगैरे भरपूर फॅन गर्ल्स आहेत घरात! त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचे किस्से ऐकून आहे. फक्त हा इत्तेफाक त्याला युनायटेड प्रोड्युसर्सची टॅलेंट हंट स्पर्धा जिंकून जे १२ चित्रपट मिळाले त्यापैकी असावा. त्यामुळे नवखेपणा + over acting हे मिश्रण आहे. नंतर आराधना पासून polished वाटतो तो.

प्रत्येक नटी स्मिता शबाना सुचित्रा सेन माधवी नसते. टिकू शकत नाही स्पर्धेत.
>>
या दर्जेदार नट्यांनीही एक्सपोजर केले आहे. स्मिताचा नमक हलाल पहा. माधवी, आणि सुचित्रा सेन या तर व्यावसायिक च होत्या.

Pages