जत्रा ( एक भयकथा ) संपूर्ण -४

Submitted by शुभम् on 22 October, 2018 - 23:31

पुढे चालू

तो हाडाचा सापळा नष्ट झाला . तिथेच एक आकृती अवतरली . बहुदा तोच आत्मा होता ज्याने हे सगळे कारस्थान केले होते .

" प्रताप तू " शेवंता म्हणाली

जॉन म्हणाला " तू याला ओळखतेस

" हो , हा माझा बालमित्र आहे .

" प्रताप तू केलंस हे सगळ पण का...?
त्या विशाल काळा समुद्राचा साऱ्यांना विसर पडला होता . इतका वेळ खवळलेला समुद्र पुढचा बळी न मिळाल्याने शांत झाला होता . पण तो अघोर समुद्र होता . त्याला जाणीव झाली होती घडणाऱ्या घटनांची . कुठेतरी नोंद घेतली जात होती या साऱ्यांची . आदेश दिले जात होते पुढच्या गोष्टीसाठी . पण या साऱ्यांची जाणीव कोणालाच नव्हती..

" सांगतो सोने , सांगतो , माझं ऐकून तरी घे "

" शेवंताला लहानपणी सारे सोनीच म्हणायचे . ती होतीच सोन्यासारखी . आम्ही सारे मिळून राजा राणीचा भातुकलीचा खेळ खेळायचो . त्यात सोनी राणी आणि मी राजा . पण ते फक्त खेळात होतो हे अजून मनाला पटत नाही . पुढे सोनी मुंबईला शिकायला गेली आणि सुट्टीपुरतच गावाला येऊ लागली . तरीही सुट्टीला आली की आम्ही खेळायचो . वय वाढले तसे खेळ बदलत गेले . हळूहळू खेळ बंद झाले . फक्त बोलनं वाढत गेलं . सोनी मला सारं काही सांगायची . मला वाटायचं मी तिचा खास मित्र आहे . त्या तारुण्यसुलभ वयात मी माझ्या मनाचा भलताच समज करून घेतला होता . आणि तिथेच मी चुकलो . सोनी सुट्टी पुरती यायची आणि परत जायची . पण मी मात्र पुढच्या सुट्टीची अधाशासारखी वाट पाहायचो .

शेवटी तिची शाळा संपली . सुट्टीला घरी आली होती . तेव्हा मी माझ्या मनाचा हिय्या करून , मनातली गोष्ट तिला सांगितली . तिचे बाबा केव्हाही तयार झाले असते कारण गावात तेवढा मान-मतराब होताच आमचा . पण ती मला नाही म्हणाली . तिने मला झिडकारलं आणि तिने कारण सांगितले की
" मला अजून शिकायचे आहे . कॉलेज करायचं आहे आहे . आत्ताच लग्न करायचं नाही आणि तसंही लग्न करून गावात राहायचं नाही "

माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली मी माझ्या बाकडे गेलो व बाला झालेली सारी हकीकत सांगितली . माझा बा लगेच पाटलाकडे माझ्यासाठी मागणी घालायला गेला . पाटील नाही म्हणणार नव्हता कारण प्रसंगी माझ्या बापानेच पाटलाला कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढला होता . पाटलाला पोरीचे पुढे साऱ्याचा विसर पडला .
म्हणाला
"पोरीला पुढे शिकवायचा आहे , थोडासाठी माघार नको . "

माझा बा म्हणला " शिकवू द्या , शिकल्यावर लगीन लावलं तरी चालल की. "

तरीपण नाहीच म्हणाला
" पोरीला तर पसंत पाहिजे "

माझ्या बानं लय समजावलं
" कोण विचारतो पोरींची पसंत वगैरे वगैरे..."

पण पाटील पुरता इंग्रजाळलेला होता . कसले आधुनिक का फिधुनिक विचार होते त्याचे . शेवटी माझा बा तरी किती समजावणार . तो पण माघारी आला .

कुणीतरी खरच म्हणले राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो . मी रागाच्या भरात माझ्या बापाचा खून केला . त्यामुळे मला परागंदा व्हायला लागलं . तरीपण शेवंताला प्राप्त करण्याची इच्छा सोडली नव्हती . मला गावागावात फिरता येत नव्हतं म्हणून नुसती जंगलात फिरत होतो . शिकारी येत होती म्हणून बरं झालं . किती दिवस फिरत होतो काय माहित ?

एक दिवस जंगलात एक विचित्र प्रकार दिसला . दोन-चार सुंदर ललना एका वडाच्या झाडाखाली भर दिवसा नृत्याविष्कार करत होत्या . मला फार विचित्र वाटलं .इतक्या जंगलात हे शक्यच नव्हतं . मी पुढे गेलो पण त्यांचं माझ्या कडे लक्षच नव्हते . त्या फक्त नाचत होत्या . तिथे एक सडपतळ इसम पडला होता . दाढी हातभर वाढली होती . अंगावर माणसांचा एकही तुकडा नव्हता . नुसता हाडांचा सापळा व त्यावर कातडी असल्यासारखे ते शरीर होतं .संपूर्ण शरीराला कसलं तरी पांढरे भस्म का काही लावलेलं होतं आणि फक्त लंगोटी घातलेली होती . तो नशा करून पडलेला असावा मी त्याला उठवलं , शुद्धीवर आणलं तेव्हा मला कळालं की हे त्यांना स्वतःच्या मनोरंजनासाठी केलेले चेटूक होतं .

मी त्याला माझी कहाणी सांगितली . मला काय पाहिजे ते सांगितलं . तेव्हा त्याच्या डोळ्यात एक असूरी आनंद दिसला . पण त्यावेळी मला तो जाणवला नाही . तेव्हाच माझा शाळा सुरू झाली . तो सांगेल तसे करत करत गेलो . नंतर माझं काहीच चालेना , त्याचा गुलाम झालो , त्याच्या हातातलं बाहुलं झालो . जेव्हा त्याने जॉनला उचलायला सांगितलं . तेव्हा मला खूप आनंद झाला पण त्यालाही त्यांनं गुलाम बनवलं . त्याला वेठीस धरून शेवंता बरोबर जे काही केलं त्यावेळी मी त्याचा शेवटचा विरोध केला आणि त्या वेळीच त्यांना माझं अस्तित्वच संपवलं व मी नेहमीसाठी त्याच्या मध्ये विलीन झालो .

तो वाढत गेला . बळी घेत गेला . बळी देत गेला . शक्ती वाढवत गेला . आताही तो आहे . तो गेलेल्या नाही . हे त्याचंच ठिकाण आहे बळी देण्याचे , त्याचंच ठिकाण आहे आपल्या साऱ्या शक्ति वाढवण्याचे , याच ठिकाणी आतापर्यंत कित्येक बळी देऊन त्याने आपली शक्ती वाढवली आहे , याच ठिकाणी त्याचा अघोर समुद्राला बळी देऊन तो अघोराकडून शक्ती प्रदान करून घेतो , आता आपल्या साऱ्यांचा बळी देऊन तो या अघोर समुद्राचा स्वामी बनेल .
कारण अघोर स्वामी बनण्यासाठी त्याने केलेल्या खेळातील हा शेवटचा डाव होता .

आता मला कळतंय , की तो क्षणिक राग जर मी केला नसता तर तुम्हा साऱ्यांचं आयुष्य वाचलं असतं । पण माझ्या मनात त्या वेळी प्रबळ झाली होती ती काळी , दुष्ट , नकारात्मक अपवित्र , अमंगलमय बाजू .
मला माफ कर अशी म्हणायची सुद्धा माझी लायकी नाही पण मी तुम्हा सर्वांची माफी मागतो

" हा ss हा sss "
एक क्रूर हास्याचा आवाज सर्वत्र घुमला .
त्या कातळ काळोखाच्या अघोर समुद्रामध्ये लाटा उसळल्या. कर्णकर्कश्य ध्वनी आसमंतात घुमू लागला .
" माग , माफी माग . कारण थोड्याच वेळात माफी मागायला तुही नसशील आणि ज्यांना माफी मागायची आहे तेही नसतील . "
आणि लाटा अधिकच जोमाने उसळू लागल्या .लाटा उसळत होत्या .
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users