कई बार यूं भी देखा है, ये जो मन की सीमा रेखा है...!

Submitted by अतुल ठाकुर on 22 October, 2018 - 06:06

vlcsnap-2018-10-22-14h37m39s900.jpg

अनेकदा आपण एखाद्या बोल्ड गाण्याबद्दल वाचतो, ऐकतो आणि ते पाहतो देखील. त्यावेळी "बोल्ड" गाणे म्हणजे त्यातील द्वयार्थी शब्द किंवा त्यातील उत्तान नृत्य किंवा एखादे तसेच दृश्य असाच त्याचा अर्थ असतो. पण काही वेळा असे दिसते की गाण्याचा अर्थ हा काळाच्या फार पुढचा असतो. आणि ते तसे त्या चांगल्या अर्थाने बोल्ड असते. १९७४ साली आलेल्या रजनीगंधा चित्रपटातील "कई बार यूं भी देखा है" या गाण्याबद्दल मला अस वाटते. लग्न झाले असताना नवराबायकोचे बाहेर प्रकरण हे हिन्दी चित्रपटात नवीन नाही. पण लग्न झालेले नाही. प्रियकर आहे. त्याच्यावर प्रेमही आहे. सध्या तो बाहेर गेला आहे. आणि अचानक पूर्वाश्रमीचे प्रेम समोर येते. अशावेळी मनाची झालेली चलबिचलता अतिशय तरलपणे रंगवलेली चित्रपटात नेहेमी आढळणार नाही. ती या गाण्यात दिसते हे या गाण्याचं पहिलं वेगळेपण. अशावेळी ही चलबिचलता स्विकारून त्याबद्दल विचार करणारी नायिका येथे दाखवली आहे. लगेच पापपुण्याचे हिशोब मांडून सारे काही सोपे केलेले नाही. हे या गाण्याचे दुसरे वेगळेपण. आणि ही स्थिती तशीच ठेवून गाणे संपले आहे. कुठलातरी निर्णय पटकन घेतलेला नाही. हे या गाण्याचे तिसरे वेगळेपण. आणि खरंच, प्रत्यक्ष आयुष्यात असे निर्णय सोपे नसतातच.

चित्रपट बासु चटर्जींचा आहे म्हणजे त्याला वेगळी "ट्रिटमेंट" असणार. हे गाणे त्याला अपवाद नाही. पुर्वाश्रेमीचे प्रेम दिनेश ठाकूरच्या रुपात समोर उभे राहते आणि चेहर्‍यावर दडपलेला भाव घेऊन विद्या सिन्हा पडद्यावर दिसते. मुकेशच्या भारदस्त आवाजार सुरु होते " कई बार यूं भी देखा है..." मुकेशचा आवाज अशा गाण्याकरता वापरणे हे फार विचारपूर्वक घडले आहे असे मला वाटते. गाण्यातील अवस्था चिंतनाची आहे. ही कोवळी नवथर तरुणी नाही. तिला पहिल्या प्रेमाचा अनुभव आहे. कदाचित त्यात तिचा अपेक्षाभंगही घडलेला असण्याची शक्यता आहे. मात्र ते दिवस ती व्यक्ती ती पूर्णपणे पुसू शकलेली नाही. अशावेळी एक प्रौढा जेव्हा आपल्या अवस्थेचा विचार करेल तेव्हा गाण्यात आक्रस्ताळेपणाही असणार नाही आणि धाय मोकलून रडणेही असणार नाही. समोर आपले प्रेम आल्यावर तिचे चित्त अस्थिर झाले आहे. आताचे प्रेम स्विकारावे की पुर्वीच्या प्रेमाला साद द्यावी अशी तिची अवस्था होण्याची शक्यता आहे. भूतकाळाच्या बरेच पुढे आल्यावर मागचे आवडणारे काही दिसले, मन अस्वस्थ झाले तरी त्याचा समजूतीने विचार करणारी अशी ही प्रौढा आहे. आणि नेमक्या या पार्श्वभूमीवर मुकेशचा आवाज हा चपखल बसला आहे.

दिनेश ठाकूर हा टिपिकल कलाप्रांतातला दिसतो. त्याचे ते सतत सिगारेट फूंकणे आणि दाढी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर त्याच्यातही तो हिरवटपणा उरलेला नाही. दोघेही आयुष्याच्या या टप्प्यावर गंभीर झाले आहेत. पार्श्वभूमीवर हे गाणे चालु असताना फक्त नायिकेच्याच मनातील आंदोलने दाखवली आहेत. बहुधा द्विधा स्थिती ही तिचीच झाली आहे. त्याला फारसा फरक पडताना दिसत नाही. तो शांतच आहे. गाण्यात तिला एक दोनदा अमोल पालेकर बरोबर आणि दिनेश ठाकुर बरोबर दाखवले आहे. त्यातदेखिल अमोल पालेकरच्या चेहर्‍यावरील मध्यमवर्गिय निरागसपणा उठून दिसतो. विचार करतानाच ती दोघांची तूलना करत असावी. इतक्या वर्षानंतर झालेल्या द्विधा मनस्थितीमुळे ती स्वतःच दडपून गेली आहे कदाचित तिला काहीसे अपराधीदेखिल वाटत असावे. आणि हे बेयरिंग संपूर्ण गाण्यात विद्या सिन्हाने अतिशय सूरेख घेतले आहे. तिचे ते खिडकीबाहेर पाहणे, तिच्या पदराचे दिनेश ठाकुरच्या हाताजवळ फडफडणे, तिचा मनाची चाललेली आंदोलने आणि याने मात्र गॉगल लावून फक्त खिडकीबाहेर पाहणे या प्रत्येक फ्रेममध्ये दिग्दर्शक बासुदांनी काहीतरी संपून गेले आहे आणि नवी सुरुवात पुन्हा होणार आहे की नाही काही कळत नाही या टप्प्यावर दोघेही आहेत हे परिणामकारकरित्या दाखवले आहे.

या तरल भावना, ती आंदोलने टिपली आहेत ती कवि योगेश यांच्या शब्दांनी ...

कई बार यूं ही देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अन्जानी प्यास के पीछे
अन्जानी आस के पीछे
मन दौड़ने लगता है

राहों में, राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल फूल मुस्कुराके
कौन सा फूल चुराके, रख लूं मन में सजाके
कई बार यूं ही देखा है ...

जानूँ न, जानूँ न, उलझन ये जानूँ न
सुलझाऊं कैसे कुछ समझ न पऊँ
किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूं ही देखा है ...

आदर्श भारतीय नारीच्या कल्पना चित्रपटात वारंवार दाखवली जात असताना, आपले मन जुने प्रेम समोर उभे राहिल्यावर अस्वस्थ झाले आहे, त्याच्याकडे ओढ घेत आहे हे हिन्दी चित्रपटात दाखवणे, ते नायिकेने मनोमन कबूल करणे ही दूर्मिळ गोष्ट या गाण्यात दिसते. आणि असा स्वतःशीच संवाद घडताना त्याला साजेल अशी काहीशी संथ पण गोड चाल सलील चौधरी यांनी लावली आहे. कथेला पुढे नेणारे हे गाणे आहे. एका गाण्यात अनेक वर्षांचा इतिहास तर सांगितला आहेच. शिवाय शेवटी "किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ" असे म्हणून आता पुढे काय होणार याबाबत प्रेक्षकाची उत्सुकतादेखिल वाढवली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे गाणे आवडण्याचे एक महत्त्वाचे कारण बहुधा यात मी स्वतःच्या मर्यादांसकट स्वतःला पाहू शकतो हे असावे. कारण जुने प्रेम दिसल्यावर मन चाळवणारच नाही. कुठेतरी बारीकशी का होईना कळ उठणारच नाही इतका आदर्श मला झेपणारा नाही. म्हणून आता हे गाणे कुठेतरी खुप आपलेसे वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! खूप छान लिहीलेत. तुम्ही लेखाची सुरुवात गाण्यानेच करता, त्यामुळे ते गाणे आपोआप ओठावर येऊन गुणगुणणे सुरु होते. एकदम सही लिहीलत, कारण दिनेश ठाकूर च्या हालचालीतुन वेगळे काही जाणवत नाही पण विद्या सिन्हाची द्विधा मनस्थिती गाण्यात चांगलीच जाणवते.

अतुलजी, खुप छान लिहिलंय.
ह्या आवडत्या गाण्यबद्दलचे माझेच विचार मांडलेत.
अशा अनवट सुंदर गाण्यांबद्दल लिहित रहा.

मुकेश ला ह्या गाण्यासाठी नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालं होतं.

राज कपूर, दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शशी कपूर वगैरे आघाडीच्या अभिनेत्यांसाठी (पक्षी: हिरो) पार्श्वगायन केल्यानंतर, मुकेश ला नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळालं, ते एका अशा गाण्यासाठी, जे रूढार्थानं पार्श्वगीत नाही (म्हणजे पडद्यावर ते कुणी गाण्याचा अभिनय करत नाही) आणी दिनेश ठाकूर हा रूढार्थानं 'हिरो' ही नाही.

सुंदर!
मी ह्याचा वेगळा अर्थ घेतलेला, नायिका खरे तर नाराज आणि दुखी असते ज्या पद्ध्तीने अमोल तिला वागवतो. अमोल पालेकर खूप काही भावनाशील किंवा भावना बोलुन दाखवणारा नसतो. त्यामुळे तिला तो आत्मविश्वास अजुनही वाटत नसतो ह्या नवीन नात्यात.
जरी तिने हे नवीन नाते स्विकारलेले असले तरी, अजुनही जुन्या नात्याच्या स्मृतीत ती अडकली असते. आणि अश्या हिंदोळ्यावर ती असताना, आणि शहरात एकटेपण असे असताना अचानक जुना प्रियकर भेटल्याने, मनातली अस्वस्थतता उफाळून येते.
पण ती नवतरुणी नाहीये, जुन्या नात्यात सुद्धा अपेक्षाभंग झालाच असेल म्हणून दुरावलेले असतात ना.. त्या विचारात ती दाखवली आहे.
शेवटी, तुलना तेव्हाच होते जेव्हा जुनं गाव, शहर , लोकं आणि नातं विसरलं “पुर्णपणे” नसेल माणूस आणि नवीन नात्यात अजुन ती परीपुर्णता मिळत नसेल किंवा रुजली नसेल तरच. तसही, पहिलं प्रेम कोण पुर्ण विसरतं... अनलेस इट वाज वेरी बिटरब्रेकाअप.

मी शेवट विसरले ह्याच्ना... ती अमोल पालेकर बरोबर जाते? कोणी सांगेल मा?

> नायिका खरे तर नाराज आणि दुखी असते ज्या पद्ध्तीने अमोल तिला वागवतो. अमोल पालेकर खूप काही भावनाशील किंवा भावना बोलुन दाखवणारा नसतो. त्यामुळे तिला तो आत्मविश्वास अजुनही वाटत नसतो ह्या नवीन नात्यात. > +१. त्यामानाने जुना प्रियकर आता फारच चांगला वागवत असतो तिला.

> मी शेवट विसरले ह्याच्ना... ती अमोल पालेकर बरोबर जाते? कोणी सांगेल मा? > हो अमोल पालेकरसोबत जाते.

क्या बात है. मस्त लिहिले आहेत. हे गाणं फार आवडतं, पण सिनेमा पाहिलेला नाही, त्यामुळे काहीच रेफरन्स माहित नव्हता.
इन जनरलच, रजनीगंधा सिनेमाबद्दल खूप ऐकलं आहे, काही लोक एकदम 'फॉन्डली' बोलतात या सिनेमाबद्दल. आता या गाण्याकरता आणि त्याच्या पार्श्वभूमीकरता तरी पहायला हवा Happy

छान लिहिलय. हे आणि इतरही गाणी फार सुरेख आहेत ऐकायला. तेव्हाच्या मुंबईच होणारं दर्शन फारच सुखावह.

अत्यंत आवडत गाणं आणि चित्रपट. कितीतरी वेळा पाहिला. हा चित्रपट बघताना बर्‍याच गोष्टी अशा न बोलता दाखविल्या आहेत.
त्यातला एक सिन मला फार आवडतो. ती दोघ फिरायला बाहेर जातात त्यावेळची सोनेरी संध्याप्रकाशातली, जुन्या किल्ल्याचे अवशेषाची दिल्लीतली बाग आणि फारसा एक्स्प्रेसिव नसणारा अमोल पालेकर बोलता बोलता तिला 'फिर मेरी श्यामे कैसे कटेंगी ?' हा प्रश्न विचारतो तेव्हा तिच्या चेहर्‍यावरचे भाव. फार मस्त दाखवलय ते.
तसचं जेव्हा तिला शेवटी ठाकुरचे पत्र येत त्यात बाकि शेष वाचून तिच्या लक्षात येत कि तो मुव्ह ऑन झालेला आहे. फार सुरेख दाखवलय तेही.

सुंदर लेख. त्या गाण्याची खुपच चांगली ओळख करून दिलीत. रजनीगंधा हा बघायचा राहून गेलेला चित्रपट आहे. आता या ओळखीमुळे बघावासा वाटायला लागला आहे. अमोल पालेकर - विद्दा सिन्हा ही जोडी आवडती आहे माझी.

अमोल पालेकरच्या जमलेल्या पिक्चरपैकी एक, माझा खूप आवडता पिक्चर। विद्या सिन्हा फारशी आवडत नाही पण या आणि छोटीसी बात मध्ये तिची साडी लांब वेणी कानात रिंग्स हि स्टाईल मस्त दिसते तिला। गाण्याचं रसग्रहण छानच केलंय। रजनीगंधा गाण्याबद्दल पण लिहा।

न बोलता बरेच काही भाव आणि नात्यातील गुंतागुंत चेहर्‍यावरील हावभावाने विद्या सिन्हाने चांगली दाखवलीय. आणि ती सुंदर मुंबई ७० मधली.
विद्या सिन्हाचा लूक हा एकदम ७०-८० मधील आहे, तो छोटा ब्लॉउज, ती पर्स आणी त्यावेळी फेमस असलेल्या सुळसुळीत फ्लोरल प्रिंटच्या शिफॉन/ जॉर्जेट साड्या , खांद्यावरून पदर.
हा आणि “ छोटी सी बात“ हे दोनच तिचे मूवी बघण्यासारखे आहेत. ( मला तरी असे वाटाटॅ).

माझ्या आईचे असे फोटो आहेत त्यावेळचे ती काही दिवस मुंबईत नोकरी करत असताना.

गाणं आवडतं आहे. वाचतानाच गुणगुणायला लागले. लेख आवडला.

हा सिनेमा इतक्यातच कधीतरी दूरदर्शनवर बघत होते. तरलता इत्यादी समजण्याइतका मोठा नसलेला मुलगा शेजारी होता. विद्या सिन्हा दोन-तीन वेळा निशीगंधाची सुकलेली फुलं बाल्कनीतून खाली टाकते. मुलाला ते फार धक्कादायक वाटलं! ' कचरा असा टाकतात का' वगैरे बडबड करून झाली. आता मलाही रजनीगंधा सिनेमा म्हटलं, की तेच आठवतं!

**विषयांतराबद्दल क्षमस्व**

अतुल,
कृपया हा आणि ह्या सिरिजमधले संबंधित लेख चित्रपट विभागात हलवणार का? तुमची ही गाण्यांची सिरीज पूर्णपणे चित्रपटांशी संबंधित आहे आणि ती त्याच विभागात असणे योग्य.
नुकतेच अ‍ॅडमिननी स्वप्ना_राज ह्यांचे चित्रपटांविषयीचे वीसेक धागे ललित विभागातून चित्रपट विभागात हलवले.

अतुल,
कृपया हा आणि ह्या सिरिजमधले संबंधित लेख चित्रपट विभागात हलवणार का? तुमची ही गाण्यांची सिरीज पूर्णपणे चित्रपटांशी संबंधित आहे आणि ती त्याच विभागात असणे योग्य.
नुकतेच अ‍ॅडमिननी स्वप्ना_राज ह्यांचे चित्रपटांविषयीचे वीसेक धागे ललित विभागातून चित्रपट विभागात हलवले.

नक्की. कसे हालवायचे? दिवाळीच्या सुट्टीत करतो ते काम. जर अ‍ॅडमीन हलवू शकत असतील तर त्यांना विनंती करतो. आणी यापूढचे लेख चित्रपट विभागात येतील याची काळजी घेईन.

सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशा तर्‍हेच्या वेगळ्या गाण्यांबद्दल नेहेमी लिहावंसं वाटतं. गाण्यांबद्दल मला वाटणारं आणखी एक कुतुहल म्हणजे नेमेक्या याच गायकाला त्या गाण्यासाठी का निवडलं असावं हे. काहीवेळा ही मैफल इतकी मसत जमलेली असते की त्या गायकाशिवाय इतर कुठल्याही गायकाचा त्या जागी विचारही करता येत नाही. दुसरं म्हणजे गाणे, त्याप्रमाणे त्याचे झालेले छायाचित्रण. त्यातील बारिकसारिक जागा शोधणे हा तर माझ्या आनंदाचा झराच आहे.