ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

Submitted by संजय भावे on 18 October, 2018 - 02:53

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

.

रात्री झोपताना सकाळी ७:०० चा अलार्म लावला होता. पण हॉटेलच्या अगदी जवळ असलेल्या व रुमच्या बाल्कनीतून समोरच दिसणाऱ्या चर्चच्या घंटानादाने सकाळी ६:०० वाजताच झोपमोड झाली.
अजून थोडावेळ झोपायचा प्रयत्न केला पण तो सपशेल अयशस्वी ठरला, नुसतं लोळत पडण्याचा पण कंटाळा आला तसा उठून बाल्कनीत जाण्यासाठी दरवाजा उघडला, बाहेर गारठा एवढा होता कि प्रतिक्षिप्त क्रियेने ज्या वेगात तो उघडला त्याच्या दुप्पट वेगात परत बंद केला. फोनच्या स्क्रीनवर बघितलं तर ॲक्युवेदर कैरोचं तापमान १०º C आणि रियल फील १२º C दाखवत होतं. साडेसहा वाजले होते. आयता चहा मिळण्यासाठी सात पर्यंत थांबावे लागले असते म्हणून ब्रश करून पँट्रि मध्ये गेलो आणि स्वतःच इलेक्ट्रिक केटल मधे पाणी उकळवून एका मग मध्ये ते पाणी, टी बॅग्ज व शुगर क्युब्स घातले आणि परत रुममध्ये येऊन व्हॉट्सॲपवर आलेले मेसेजेस बघत आरामात (आता सवयीचा झालेला कोरा) चहा पीत बसलो.
८ वाजता पिक-अप होता पण ७:२५ लाच तयार होऊन मी कॉमन रूम मध्ये कोणी आहे का बघायला बाहेर पडलो. तिथे मेहमूद एकटाच कुठल्यातरी आधी झालेल्या फुटबॉल मॅचचे हायलाईट्स बघत बसला होता. त्याला फुटबॉल आणि बास्केटबॉल ह्या त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभणाऱ्या खेळांमध्ये विलक्षण रस होता.
आजच्या माझ्या कार्यक्रमाची त्याला पूर्वकल्पना होती. उद्या म्हणजे २७ फेब्रुवारीच्या माझ्या अलेक्झांड्रीया टूर साठी मी त्याला कार बुक करून ठेवायला सांगितली. मग आमच्या अवांतर गप्पा चालू असताना पावणे आठला बेल बॉय मला पिक-अप करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला तिथे घेऊन आला.
माझ्याशी हस्तांदोलन करून “माझं नाव मोहम्मद, मी तुमचा आजच्या टूर साठीचा ईजिप्तोलॉजीस्ट गाईड आहे.” अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली आणि आपण तयार असाल तर निघायचं का? अशी विचारणा केली.
मी तयार असून आपण लगेच निघायला माझी काहीच हरकत नसल्याचे त्याला सांगितले. मेह्मुदने नाश्ता करून निघा असे सुचवले त्यावर माझ्या आजच्या पॅकेज मध्ये ब्रेकफास्ट, लंच सगळं इन्क्लुसिव्ह असल्याचे मोहम्मदने त्याला सांगितल्यावर त्याचा निरोप घेऊन आम्ही खाली उतरलो.
जवळच पार्क केलेल्या चकचकीत काळ्या रंगाच्या KIA ‘RIO’ ह्या कोरियन मेड सेडान मध्ये करीम नावाचा ड्रायव्हर आमची वाट बघत बसला होता. माझ्यासाठी कारचा मागचा दरवाजा उघडा धरून मी आत स्थानपन्न झाल्यावर गाडीला पुढून वळसा घालून मोहम्मद, करीमच्या शेजारच्या सीट वर जाऊन बसला. (ईजिप्त मध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह गाड्या आहेत.)
गाडी सुरु झाल्यावर त्याने मला आजचा कार्यक्रम कसा असेल ह्या विषयी माहिती देताना, सर्वप्रथम आपण ब्रेकफास्ट साठी थांबणार असून त्यानंतर सक्कारा चा स्टेप पिरॅमिड बघून पुढे मेम्फिस चे ओपन एअर मुझीयम. त्यानंतर गिझाचे पिरॅमिडस पाहून झाल्यावर ‘द ग्रेट स्फिंक्स’. नंतर लोकल रेस्टॉरंट मध्ये पारंपारिक ईजिप्शियन जेवण करून पपायरस इंस्टिट्यूटला भेट आणि शेवटी परफ्युम फॅक्टरीला भेट देऊन हॉटेल वर ड्रॉप ऑफ. सर्वसाधारणपणे जवळ असल्याने गिझा पासून सुरुवात होते पण सक्कारा आणि मेम्फिस येथे नंतर वाढत जाणारी पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी हा क्रम सुचवला आहे, हा क्रम तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बदलू शकता असे सांगितले.
पपायरस इंस्टिट्यूट आणि परफ्युम फॅक्टरी येथे भरमसाठ किमतीच्या वस्तू विक्रीसाठी असून आपण केलेल्या खरेदीवर मिळणाऱ्या कमिशन साठी ह्या ठिकाणी नेण्यात येत असल्याची कल्पना मला मेहमूदने दिलेली होती, पण पपायरस कसे तयार करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यामुळे मी त्याला हाच क्रम कायम ठेव, पण मला परफ्युम फॅक्टरीला भेट देण्यात स्वारस्य नसून पपायरस इंस्टिट्यूट झाल्यावर थेट हॉटेलवर ड्रॉप करण्यास सांगितले.

हॉटेल ते सक्कारा हे अंतर ३३ किलोमीटर्स असून तेथे पोहोचण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे लागणार असल्याचे गुगल मॅप्स दर्शवत होता. थोडं पुढे गेल्यावर एका रेस्टॉरंट समोर नाश्ता करण्यासाठी करीमने गाडी थांबवली. त्या दोघांचा नाश्ता सकाळीच झालेला असून मी येथे काहीतरी खाऊन घ्यावं असं मोहम्मद म्हणाला.
जेमतेम सव्वाआठ वाजत होते, एकतर विशेष भूक पण नव्हती आणि आजचा जो भरगच्च कार्यक्रम होता त्यावरून दुपारचे जेवण उशिरा होईल ह्याचा अंदाज येत होता. त्यामुळे थोड्यावेळाने खाऊ असा विचार करून मी त्याला पार्सल घेता येईल का? असे विचारल्यावर तो हो म्हणाला आणि तेथे चांगल्या मिळणाऱ्या ४-५ पदार्थांची नावे सांगून ह्यापैकी तुम्हाला काय खायला आवडेल असे विचारता झाला. त्याने सांगितलेल्या पदार्थांत एकच नाव परिचयाचे होते ते म्हणजे फलाफेल सँडविच. हा प्रकार काल रात्री खाल्ला होता आणि मुख्य म्हणजे आवडलाही होता म्हणून मी त्याला तेच पार्सल आणायला सांगितले.

थोड्याच वेळात तो परत आला आणि पार्सलची पिशवी माझ्या हातात दिली ज्यामध्ये सँडविचचा बॉक्स, पाण्याच्या २ छोट्या बाटल्या, ओरिओ कुकीज आणि मॅंगो ज्यूसचा कॅन होता. पुन्हा प्रवास सुरु झाला, काही वेळाने शहरी भाग संपून ग्रामीण भाग सुरु झाला. कालव्याला समांतर असलेल्या रस्त्यावर छोटी मोठी घरे होती, पण रस्त्यात कुठेही टाकलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, जनावरांचे मल-मुत्र, उकिरडे ह्या सगळ्याच्या एकत्रित परिणामाने हा परिसर गलीच्छ वाटत होता. लवकरच वस्ती संपून वाळवंटी प्रदेश लागला. सक्काराची हद्द सुरु होते त्याठिकाणी एका पोलीस चेकपोस्टवर ड्रायव्हरचे लायसन्स आणि ईतर कागदपत्रे, गाईडचे ओळखपत्र व डिकी उघडून गाडीची तपासणी झाली. तिथून थोडंच पुढे असलेल्या तिकीट काउंटरवर जाऊन मोहम्मद माझं १२० पाउंडसचं एन्ट्री टिकेट घेऊन आला.

सक्कारा एन्ट्री तिकीट
सक्काराचे एन्ट्री तिकीट

छोट्या छोट्या टेकड्यांमधून वळणा-वळणांच्या रस्त्याने पुढचा प्रवास सुरु झाला. रस्त्याच्या कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूला लांबवर स्टेप पिरॅमिडचा वरचा भाग दिसत होता. साडेनऊ वाजता आम्ही Imhotep & Saqqara च्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो.

सक्कारा चा रस्ता
.
स्टेप पिरॅमिड.२
लांबून दिसणारा स्टेप पिरॅमिड.

साक्काराचे प्रवेशद्वार.
स्टेप पिरॅमिड संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर मी आणि गाईड मोहम्मद.

ईजिप्तची प्राचीन राजधानी मेम्फिस पासून जवळ असलेले सक्काराचे पठार (Sakkara, Saccara or Saqqara) हे पहिल्या राजवंश काळापासून (ई.स.पु. ३२००) पुढे सुमारे ३००० वर्षांपर्यंत वापरात असलेली शाही दफनभूमी म्हणून ओळखलं जातं. सात कि.मी. x दीड कि.मी. असे एखाद्या मध्यम आकाराच्या शहराएवढे क्षेत्रफळ असलेल्या ह्या दफनभूमीत पहिल्या ते आठव्या राजवंशातील अनेक राजांचे (फॅरोह) पिरॅमिडस व मस्तबा (Egyptian tomb) असून, त्यानंतरच्या काळात राजदरबारातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हि दफनभूमी वापरात आल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मोठ्या प्रमाणात कबरी बांधलेल्या आहेत. परंतु आकारातील वेगळेपणाने आणि काही खास वैशिष्ठ्यांमुळे विशेष महत्व प्राप्त झालेली वास्तू म्हणजे तिसऱ्या राजवंशातील पहिला फॅरोह ‘जोसर’ (Djoser) ह्याचा ‘स्टेप पिरॅमिड’.

स्टेप पिरॅमिड.
स्टेप पिरॅमिड.

फॅरोह जोसर (झोसर वा जोसेर असाही ह्याचा उच्चार करतात) चा कल्पक व स्थापत्यशास्त्राची चांगली जाण असलेला वझीर ‘इमहोटेप’ याने ई.स.पु. २७ व्या शतकात (सुमारे ४७०० ते ४७५० वर्षांपूर्वी) हे पिरॅमिड संकुल बांधले.

प्राचीन काळी ईजिप्शियन लोकांची ‘मृत्यू नंतरचे जीवन’, ‘पुनर्जन्म’ व ‘अमरत्व’ ह्या संकल्पनांवर गाढ श्रद्धा होती. मुख्यत्वे सुर्याची उपासना करणारे हे लोक इतरही अनेक देवी देवतांची उपासना करत होते. राजातही देवाचा अंश असून मृत्यु नंतर त्याला देवत्व प्राप्त होते किंवा त्याचा पुनर्जन्म होतो अशीही त्यांची समजूत होती. त्यामुळे राजा मेल्यानंतर त्याच्या प्रेताची जाळून अथवा जमिनीत पुरून विल्हेवाट न लावता आत्म्याला पुन:प्रवेश करण्यासाठी त्याचे मूळ शरीर शाबूत असावे म्हणून मृतदेहाचे ममीफिकेशन करून तो मस्तबा मध्ये जतन करून ठेवण्याची परंपरा होती.

मस्तबा म्हणजे मृतासाठी बांधलेला अनंतकालीन निवारा. नाईलच्या पात्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या चिखला पासून तयार करून उन्हात सुकवलेल्या विटा, लाकूड व दगड वापरून बांधलेल्या भूमिगत खोल्या व त्यावर विटांनी बांधलेले साधारणपणे ३० फुटाच्या आसपास उंचीचे, चारही बाजू आतल्या बाजूला झुकलेले, सपाट पृष्ठभाग असलेले आयताकृती थडगे असे त्याचे स्वरूप असे. भूमिगत खोल्यांपैकी एकीचा वापर दगडी शवपेटी (sarcophagus) ठेवण्यासाठी व बाकीच्यांमध्ये त्या मृत व्यक्तीला, मृत्यू नंतरच्या जीवनात उपयोगी पडतील म्हणून अर्पण केलेल्या वस्तू जसे कि अन्न धान्य, कपडे, अत्तरे, शस्त्रे, मूल्यवान वस्तू वगैरे ठेवल्या जात.
एकच ठोकळेबाज मस्तबा बांधण्याच्या ह्या प्रचलित पद्धतीत क्रांतिकारक बदल करून, एकावर एक बांधलेले, आकाराने कमी कमी होत जाणारे सहा मस्तबा असे स्वरूप असलेला, ६२ मीटर (२०३ फुट) उंचीचा हा दगडी पिरॅमिड इमहोटेपने फॅरोह जोसर साठी बांधला. ह्याचे खालचे दोन मस्तबा चौकोनी असून वरचे चार पारंपारिक आयताकृती आकाराचे आहेत. ह्याच्या पायऱ्यां सारख्या दिसणाऱ्या आकारामुळे (‘स्वर्गात जाण्याचा जिना’ अशी कल्पना त्यामागे असावी.) हा पिरॅमिड ‘स्टेप पिरॅमिड’ म्हणून ओळखला जातो.

मानवाने दगड तासून, त्यांना विशिष्ठ आकार देऊन (cut stone) त्यापासून बांधलेली ईतिहासातली पहिली दगडी इमारत व जगातला पहिला पिरॅमिड अशी ह्याची ख्याती आहे. इमाहोटेप च्या कामावर खुश झालेल्या फॅरोह जोसरने इथल्या वास्तूंवर स्वतःच्या नावा बरोबर इमाहोटेपचे नाव देखील कोरायला लाऊन त्याचा यथोचित सन्मान केला आहे. ४० एकर क्षेत्रफळावर बांधलेल्या ह्या पिरॅमिड संकुलात मैदान, धर्मगुरुंसाठी खोल्या, मंदिरे, सभागृहे अशा अनेक वास्तू आहेत.
रिस्टोरेशन चे काम सुरु असल्याने सगळ्या गोष्टी नीट नाही पाहता आल्या. बाहेर पडलो तेव्हा १०:२५ झाले होते. आता येथून ६.५ कि.मी. अंतरावर असलेल्या मेम्फिस च्या दिशेने प्रवास सुरु झाला.

स्टेप पिरॅमिड संकुलातील ईतर काही वास्तूंची छायाचित्रे.
सक्कारा १
.
सक्कारा २
.
सक्कारा ३
.
सक्कारा ४
.
सक्कारा ५

सकाळी भेटल्यापासून मोहम्मदच्या मनगटावरची ब्रेसलेट सारखी, फायबर आणि चांदीपासून बनलेली एक वस्तू तिच्या वेगळेपणामुळे सारखं माझं लक्ष वेधून घेत होती. शेवटी न राहवून मी त्याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा, ह्याला ‘कर्तुश’ म्हणतात, फायबरच्या बँड वर मध्यभागी चांदीच्या पट्टीवर जी चित्रे दिसत आहेत ते प्राचीन हायरोग्लीफिक लिपीत लिहिलेलं त्याचं ‘मोहम्मद’ हे नाव असून खालच्या बाजूला असलेल्या लॉक वरची चिन्हे हि त्याच लिपीतली शुभचिन्हे असल्याचे त्याने सांगितले. मला तो प्रकार आवडला होता, मी माझ्यासाठी असं कर्तुश कुठे मिळेल असं विचारल्यावर, गिझाला त्याच्या मित्राचं सोनाराचं दुकान असून त्याला ऑर्डर दिली तर दुपारपर्यंत तो तुमच्या नावाचं बनवून देऊ शकेल असं म्हणाला. मी होकार दिल्यावर त्याने त्याच्या सोनार मित्राला फोन केला व किंमत वगैरे विचारून दुपारपर्यंत वस्तू मिळण्याची खात्री करून घेतली, व त्याच्या सांगण्यानुसार माझं नाव त्याला टेक्स्ट मेसेज वर पाठवले. ‘कर्तुश’ म्हणजे नाव, उपाधी किंवा पदवी. ईजिप्तमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी पुतळे, मुर्त्या व स्मराकांवर हे कोरलेले दिसेल त्यावरून समजते कि ते कोणत्या फॅरोहचे आहेत किंवा कोणत्या फॅरोहच्या काळात बनवले गेले आहेत अशीही माहिती त्याने दिली. १०:५० ला आम्ही Mit Rahina Museum म्हणजेच मेम्फिस ओपन एअर मुझीयमच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. मोहम्मद माझं तिकीट घेऊन आला, इथे एन्ट्री फी ६० पाउंडस होती.

Mit Rahina Entry Ticket.
मेम्फिस ओपन एअर मुझीयम चे एन्ट्री तिकीट.

मेम्फिस
मेम्फिस ओपन एअर मुझीयमचा नकाशा.

ईजिप्तची प्राचीन राजधानी असलेल्या मेम्फिस येथे उत्खननात सापडलेल्या मूर्ती, पुतळे, शवपेट्या, स्तंभ, शिल्पे ह्यांचे पूर्णावस्थेत वा भग्न स्वरुपात, एक छानसा बगीचा बनवून त्यात उघड्यावर प्रदर्शन मांडलेले आहे.
अपवाद फक्त रॅमसेस II (Ramesses ll) ह्याच्या भव्य पुतळ्याचा. सुमारे १० मीटर उंचीचा असलेला हा पुतळा मात्र एका दुमजली टुमदार इमारतीत तळमजल्यावर, रोमन लोकांनी उकळतं तेल आणि पाणी ओतून तो पाडताना केलेल्या तोडफोडीत पाय नष्ट झाल्यामुळे आडवा, म्हणजे झोपल्यासारखा ठेवला आहे, आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी पहिल्या मजल्यावर एक गॅलरी आहे. हा पुतळा तो हयात असताना बनवला गेला होता. पुतळ्याची दाढी जर सरळ असेल तर तो ती व्यक्ती जिवंत असताना बनवलेला आणि जर दाढी पुढच्या बाजूला वळलेली असेल तर तो मृत्युपश्चात बनवलेला अशी सोपी पद्धत आहे हे ओळखण्याची.
ईजिप्त मधील ग्रेट स्फिंक्स नंतर आकाराने मोठा असलेला दुसऱ्या क्रमांकाचा, अलाबस्टर दगडात कोरलेला स्फिंक्स ह्या ठिकाणी आहे. परंतु त्यावर ‘कर्तुश’ कोरलेले नसल्याने तो कोणाचा आहे हि माहिती उपलब्ध नाही. ह्या परीसरात पिटाह चे मंदिर, मुख्य धर्मगुरूची कबर, रॅमसेस II व हॅथोर टेम्पल, सेटी l व रॅमसेस II चे छोटे देऊळ ह्या वास्तू अवशेष स्वरुपात आहेत.

रॅमसेस II
रॅमसेस II चा पुतळा.

मेम्फिस ओपन एअर मुझीयम मधील काही छायाचित्रे.
रॅमसेस II-१
.
रॅमसेस II-२
.
मेम्फिस १
.
मेम्फिस २
.
मेम्फिस ३
.
मेम्फिस ४
.
मेम्फिस ५
.
मेम्फिस ६
.
मेम्फिस ७

साडे-अकरा वाजता तेथून बाहेर पडलो तेव्हा ऊन खूप होते पण हवेत अजूनही गारवा होता. पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. येथून गिझा पिरॅमिडस पर्यंतचे अंतर २४ किलोमीटर होते. कुकीज आणि मॅंगो ज्यूस मी आधीच फस्त करून झाले होते, आता भुकेची जाणीव झाल्याने सँडविचचा बॉक्स उघडला आणि ते खायला सुरवात केली. सलाड थोडं रंगीबेरंगी होतं आणि चवीला आंबट-गोड होतं हि गोष्ट मोहम्मदला सांगितल्यावर तो म्हणाला, सलाड मध्ये फ्रेश फिग चे (ओल्या अंजिराचे) काप असल्यामुळे ते चवीला आंबट-गोड लागत आहे. इथे ईजिप्तमध्ये फलाफेलची चव जवळपास सगळीकडे सारखीच असेल पण वरचं ड्रेसिंग (सो कॉल्ड पीटा ब्रेड) आणि आतल्या सलाड मध्ये मात्र विविधता बघायला मिळेल. हे ऐकल्यावर मला एकदम वडापाव ची आठवण आली. आपल्या इथे नाही का, वडा बनवण्याची पद्धत जवळपास सगळीकडे सारखीच असते, पण पाव वेगवेगळ्या चवीचे आणि आकाराचे असतात, तसेच पावात वड्याच्या जोडीला ओली, सुकी चटणी आणि कांद्या बरोबर कोणी मका, उकडलेले हरभरे, कैरीच्या फोडी, कोबी वगैरे घालतात, काही महाभागांनी तर पिठलं (झुणका) घालण्या पर्यंत पण मजल मारली आहे, तसाच काहीसा प्रकार वाटला हा.

असो, प्रवास सुरु होता, करीमने एफ.एम. वर अरबी गाणी लावली होती. मला त्यांचा अर्थ काहीच कळत नव्हता पण संगीत ऐकायला चांगलं वाटत होतं. गिझा शहर जवळ यायच्या खूप आधीपासून पिरॅमिडस दिसायला लागले होते. १२:२५ ला आम्ही गिझा पिरॅमिडस च्या प्रवेशद्वारावर पोचलो. पुन्हा मोहम्मदने तिकीट काउंटरवर जाऊन १२० पाउंडसचं माझं तिकीट आणलं आणि सिक्युरिटी चेक पार पाडून गाडीने आत प्रवेश केला.

गिझा एन्ट्री तिकीट
गिझा पिरॅमिडसचे एन्ट्री तिकीट.

गिझा गेट
गिझा पिरॅमिडसचे तिकीट काउंटर आणि मागे दिसणारा ‘द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा’.

एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर आम्ही गाडीतून उतरलो आणि खुफुचा पिरॅमिड म्हणजेच ‘द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा’ च्या दिशेने चालत निघालो. सुमारे तीनेकशे मीटर अंतरावर पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी आजही अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य दिमाखात उभे होते. जसजसे त्याच्या दिशेने पुढे जात होतो तसतसे त्याच्या तळापासूनच्या डाव्या-उजव्या बाजू आणि वरचे टोक नजरेच्या टप्प्यातून बाहेर जात होते.

खुफू
‘द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा’ म्हणजेच खुफू चा पिरॅमिड.

तळाच्या चारही बाजू प्रत्येकी २३०.४ मीटर (७५५.९ फुट) लांब आणि १३८.८ मीटर (४५५ फुट) उंच असलेला, सरासरी प्रत्येकी दोन ते पंधरा टन वजनाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या, अंदाजे २३ लाख चुनखडीच्या दगडांचा वापर करून, ५१ अंशाच्या कोनात, अचूक मापात व आकारात (टॉलरन्स ± १५ ते ५५ मी.मी.) ४५०० वर्षांपूर्वी (ई.स.पु. २५८०-२५६०) चौथ्या राजवंशातला दुसरा फॅरोह ‘खुफू’ (Khufu or Cheops) ह्याने स्वतःसाठी बांधलेला हा पिरॅमिड नक्की कसा व कोणते तंत्रज्ञान वापरून बांधला असेल हे आजही न उलगडलेले एक कोडे आहे.

खुफू १
माझ्या मागे दिसणाऱ्या दगडांच्या आकारावरून त्यांच्या वजनाचा अंदाज येईल.

ह्याचा पाया व अंतर्भाग ग्रॅनाईट ह्या कठीण दगडापासून बांधला आहे जो गिझा पासून ८०० किलोमीटरहून अधिक दूर असलेल्या अस्वान मधील खाणींमधून इथपर्यंत नाईल नदीतून बोटी किंवा ताराफ्यांवरून वाहून आणला आहे. आतल्या किंग्स चेंबर मधील काही ग्रॅनाईटच्या दगडांचे वजन तर २५ ते ८० टन एवढे प्रचंड आहे.
जेव्हा बांधला गेला तेव्हा १४७ मीटर (४८१ फुट) उंच असलेला हा पिरॅमिड हजारो वर्षांत झालेली झीज आणि शिखरावरचा पिरॅमिडीयन (Pyramidion or Capstone) बेपत्ता असल्याने (जेथे सध्या वायरलेस अँटेना लावलेली दिसते) आजघडीला १३८.८ मीटर (४५५ फुट) उंचीचा झाला आहे. आज त्याच्या बांधकामासाठी वापरलेले आतील दगड दृष्टीस पडतात, पण जेव्हा त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते तेव्हा त्यावर, आपण टाईल्स लावतो त्याप्रमाणे पांढऱ्या चुनखडीच्या तासून गुळगुळीत केलेल्या दगडांचे आवरण होते. कैक वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या भूकंपात निखळून पडून व नंतरच्या काळात झालेल्या लुटालुटीत हे आवरण नष्ट झालेले आहे.

हजारो वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक यंत्रसामुग्री आणि हत्यारे नसताना कसा काय बांधला असेल हा भव्य पिरॅमिड हा प्रश्न नव्याने मनात घोळवत गाडीपाशी आलो आणि खुफू च्या पिरॅमिड पासून एक किलोमीटरवर अंतरावर असलेला त्याच्या मुलाचा, म्हणजे चौथ्या राजवंशातील चौथा फॅरोह ‘खाफरे’ (Khafre, Khefren or Chephren) चा पिरॅमिड बघायला निघालो.

उंची व आकाराने खुफूच्या पिरॅमिड नंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा असलेला हा पिरॅमिड ई.स.पु. २५७० मध्ये बांधला गेला.
तळाच्या चारही बाजू प्रत्येकी २१५.५ मीटर (७०६.९ फुट) लांब आणि १३६.४ मीटर (४४८ फुट) उंचीचा (बांधला तेव्हा १४३.५ मीटर – ४७१ फुट उंचीचा असलेला) आकाराने खुफुच्या पिरॅमिड पेक्षा किंचित लहान असलेला खाफरेचा पिरॅमिड, १० मीटर (३३ फुट) उंचीच्या एका दगडी टेकडीवर ५३ अंशाच्या कोनात बांधल्यामुळे खुफूच्या पिरॅमिड पेक्षाही थोडा जास्त उंच असल्याचा भास होतो. दोन्ही पिरॅमिडस दिसायला जवळपास सारखेच आहेत. परंतु खाफरेच्या पिरॅमिडच्या वरच्या टोकाला असलेले आवरण खुफूच्या पिरॅमिड प्रमाणे संपूर्णपणे नष्ट झाले नसून अजून बऱ्यापैकी शाबूत आहे.

खाफरे
खाफरे चा पिरॅमिड.

खाफरे १

हा पिरॅमिड बघून झाल्यावर आम्ही इथून दीड किलोमीटरवर असलेला खाफरेचा मुलगा आणि चौथ्या राजवंशातला पाचवा फॅरोह मेनकोर वा मायकेरीनोस (Menkaure or Mykerinos) ह्याचा पिरॅमिड पाहण्यासाठी मार्गस्थ झालो.

ई.स.पु. २५१० मध्ये १०२ x १०४.६ मीटर्स (३३५ x ३४३ फुट) असा आयताकुती तळ असलेला, ६५ मीटर्स उंचीचा व ५१ अंशाच्या कोनात बांधलेला मेनकोरचा पिरॅमिड हा खुफू आणि खाफरे च्या पिरॅमिडस पेक्षा उंची व आकाराने बऱ्यापैकी लहान आहे. हा देखील चुनखडीचे व ग्रॅनाईटचे दगड वापरून बांधण्यात आला आहे. वडील आणि आजोबांच्या पिरॅमिडस प्रमाणे ह्याच्यावारही वरच्या टोकापासून खालपर्यंत तासलेल्या पांढऱ्या चुनखडीच्या दगडांचे आवरण चढवण्याचे काम सुरु होते पण कदाचित ते पूर्ण होण्याच्या आधीच फॅरोह मेनकोर चा मृत्यू झाला असावा त्यामुळे तळापाशी हे काम अपूर्ण राहिलेले होते. आज ह्या पिरॅमिड वरचे आवरणही खुफुच्या पिरॅमिड प्रमाणेच नष्ट झाले आहे.
बाराव्या शतकाच्या अखेरीस अय्युबी साम्राज्याचा, कुर्दिश वंशाचा सुन्नी मुसलमान असलेला ईजिप्तचा दुसरा सुलतान ‘अल-अझीझ उथमान’ ह्याने सर्व पिरॅमिडस पाडून टाकण्याचा निर्णय घेतला आणि मेनकोरच्या पिरॅमिड पासून ह्या विध्वंसाला सुरवात केली. सुमारे आठ महिने ह्या कामासाठी राबणारे मजूर दिवसाला केवळ एखाद-दुसरा दगड काढण्यात यशस्वी होत होते. अखेरीस ह्या वास्तू पाडण्यासाठी मुळात त्या बांधायला जेवढा वेळ, धन आणि श्रम लागले असतील त्याहून अधिक वेळ, श्रम आणि धन खर्च होईल हा निष्कर्ष निघाला आणि मेनकोरच्या पिरॅमिडला उत्तरे कडच्या बाजूला एक मोठे उभे भगदाड पडण्यावर ह्याची (आणि इतरही पिरॅमिडसची) सुटका झाली. ह्या गोष्टीवरून पिरॅमिडसच्या बांधकामाचा दर्जा सहज लक्षात येतो.

मेनकोर
हा मेनकोर चा पिरॅमिड आणि प्रवेशद्वाराच्या वर दिसतंय ते बाराव्या शतकाच्या अखेरीस त्याला पाडलेलं भगदाड.

३
डावीकडचा खुफुचा पिरॅमिड , मधला खाफरेचा पिरॅमिड आणि उजवीकडचा मेनकोरचा पिरॅमिड .

गिझा मधला हा शेवटचा मोठा पिरॅमिड बघून आता आम्ही पावणेदोन किलोमीटर्स अंतरावर असलेल्या ‘ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा’ च्या दिशेने निघालो.

सिंहाचे शरीर व मानवाचे डोके (राजाचे) असे स्वरूप असलेले ‘ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा’ हे भव्य शिल्प पूर्व-पश्चिम असे सरळ रेषेत, अखंड चुनखडीच्या दगडात कोरलेले आहे. ह्याची पुढच्या पायांच्या पंजांपासून शेपटीपर्यंतची लांबी ७३ मीटर्स (२४० फुट), रुंदी १९ मीटर्स (६२ फुट) आणि उंची २१ मीटर्स (६६ फुट) आहे.
अनेकवेळा वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने आणि नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना तोंड देताना पडझड झालेल्या ह्या शिल्पाची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली आहे. आज त्याच्या पायथ्याशी दिसणारे दगडी ठोकळे हे मूळ शिल्पाचा भाग नसून, रिस्टोरेशनच्या कामाचा भाग आहेत.

स्फिंक्स
'ग्रेट स्फिंक्स'

स्फिंक्स १
स्फिंक्सच्या मागे दिसणारा खाफरे चा पिरॅमिड.

स्फिंक्स २

स्फिंक्स हा ग्रीक भाषेतला शब्द असून हे नाव ह्या आणि अशा प्रकारच्या ईतर शिल्पांना नंतरच्या काळात दिले गेलेले आहे. प्राचीन काळात ईजिप्शियन लोकं अशा शिल्पांना ‘शेसेप-अंख’ (Shesep-Ankh) ह्या नावाने ओळखत होते. ‘शेसेप-अंख’ चा अर्थ ‘जिवंत प्रतिमा’ असा आहे. सुर्योपासक प्राचीन ईजिप्शियन समाजाची स्फिंक्स कोरण्या मागची मुख्य भावना हि मावळतीच्या द्वाराचा म्हणजे पश्चिम दिशेचा रक्षक अशी असली तरी नंतरच्या काळात देवळांचा आणि दफनभूमी संकुलांचा रक्षणकर्ता म्हणूनही त्यांची स्थापना होत गेली.
गिझाचा हा स्फिंक्स नक्की कोणत्या काळात कोरला गेला व त्यात दिसणारा मानवी चेहरा नक्की कोणत्या फॅरोहचा आहे ह्याविषयी अनेक मतभेद आहेत. सर्वसामान्यपणे ह्याची निर्मिती फॅरोह खाफरेच्या राजवटीत ई.स.पु. २५३२ ते २५५८ मध्ये झाली असून ह्याचा चेहरा देखील खाफरेचा असल्याचे मानले जात असले तरी, खुफुच्या शासन काळातील पपायरस वर ह्याचा उल्लेख असल्याचा दावा काही ईतिहास संशोधकांनी केला आहे. तर काहींच्या मते ह्याची निर्मिती खुफुच्याही आधीच्या काळात झालेली आहे.
स्फिंक्सच्या शेजारी एक बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले अंत्यसंस्कार मंदिर आहे, त्यामध्ये जेथे ममीफिकेशन केले जात असे ती खोली आणि ईतर अनेक दालने आहेत.

temple १
अंत्यसंस्कार मंदिर.

temple
ममीफिकेशन केले जात असे ती खोली. आता छप्पर नाही राहिलंय.

ग्रेट स्फिंक्स आणि अंत्यसंस्कार मंदिर बघून बाहेर पडलो तेव्हा ३:१० झाले होते. अजून लोकल रेस्टॉरंट मध्ये पारंपारिक ईजिप्शियन जेवण आणि पपायरस इंस्टिट्यूटला भेट असा कार्यक्रम बाकी होता. साडेतीन च्या आसपास आम्ही गिझा शहरातील एका रेस्टॉरंट मध्ये पोचलो. तेथे माझ्या व करीम साठी ईजिप्तची नॅशनल डिश समजला जाणाऱ्या कोशरी ह्या शाकाहारी पदार्थाची ऑर्डर देऊन मोहम्मद माझे तयार झालेले ‘कर्तुश’ आणायला तिथून जवळच असलेल्या त्याच्या मित्राच्या दुकानात गेला.
एका मोठया बाउल मध्ये भात, पास्ता, नुडल्स, छोले वगैरेंचे मिश्रण आणि त्याच्या जोडीला दुसऱ्या दोन छोट्या बाउल्स मध्ये तळलेला कांदा, लसूण आणि विनेगर घालून तयार केलेली टोमॅटोची ग्रेव्ही व हॉट सॉस अशा स्वरुपात हा पदार्थ सर्व्ह करण्यात आला. जगभरातून येणारे पर्यटक अतिशय आवडीने खात असलेला आणि ईजिप्शियन लोकांच्या रोजच्या आहारातला हा पदार्थ टोमॅटोच्या डॉमीनन्स मुळे मला तरी विशेष नाही आवडला. कसाबसा मी ती डिश संपवायचा प्रयत्न करत असताना मोहम्मद माझं कर्तुश’ घेऊन आला. मला कोशरी आवडली नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तुम्हाला नसेल जात तर राहूद्या, आपण दुसरं काहीतरी मागवूया असं म्हणाला. पण अजून नवीन काही मागवून खायला पोटात जागा नसल्याने मी त्याला नकार दिला आणि नेटाने ती कोशरी खाऊन संपवली. मग कोकाकोला पिऊन आम्ही तिथून बाहेर पडलो आणि कैरो मध्ये असलेल्या पपायरस इंस्टिट्यूटला जायला निघालो तेव्हा चार वाजले होते.

कर्तुश
माझं 'कर्तुश'

दहा-बारा मिनिटात आम्ही पपायरस इंस्टिट्यूटच्या बैठ्या इमारती मध्ये पोचलो. नावात इंस्टिट्यूट असले तरी हे एक निव्वळ व्यापरी उद्देश असलेले, पपायरस वर केलेल्या पेंटिंग्ज आणि पपायरस पासून बनवलेल्या कलाकृतींचे शोरूम आहे. दोन-अडीचशे पाउंडस पासून लाखभर पाउंडस किमतीच्या विविध आकाराच्या कलाकृती येथे विक्री साठी उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात येथे पपायरसची निर्मिती होत नाही पण ते कसे तयार करतात त्याची प्रक्रिया प्रात्यक्षिक दाखवून विविध भाषांमध्ये समजवली जाते. ‘पपायरस’ हि नाईलच्या त्रिभुजप्रदेशात आढळणारी एक वनस्पती असून तिच्यापासून थोडा जाडसर कागदासारखा परंतु लवचिक, मजबूत आणि अतिशय टिकाऊ पदार्थ (जो त्या वनस्पतीच्याच नावाने ओळखला जातो.) बनवण्याचे तंत्र ई.स.पु ३१०० (सुमारे ५१०० वर्षांपूर्वी) ईजिप्शियन लोकांनी आत्मसात केले आणि त्याचा वापर लेखन, चित्रकला तसेच चटया, दोरखंड, पादत्राणे अशा अनेक वस्तू बनवण्यासाठी केला. त्याकाळात पपायरस वर केलेल्या नोंदी, लेखन आणि चित्रे आजही शाबूत आहेत.
किमती भरमसाठ असल्या तरी इथली पेंटिंग्ज लाजवाब आहेत. फारच आवडली म्हणून मी एक मध्यम आकाराचे आणि एक छोटे अशी दोन पेंटिंग्ज (ज्यांची किंमत आधी १२० डॉलर्स सांगण्यात आली होती.) २५ डॉलर्सना खरेदी केली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. तेहरीरच्या आधीच्या चौकात मोहम्मद त्याचे काहीतरी काम असल्याने उतरला, मग करीमने मला हॉटेलवर ड्रॉप केले आणि तो निघून गेला तेव्हा सव्वा पाच वाजले होते.
एकंदरीत दिवस चांगला गेला होता. मोहम्मदने सर्व स्थळांबद्दल छान माहिती दिली होती. कुठल्याही ठिकाणी वेळेचे बंधन नव्हते त्यामुळे सगळी स्थळे व्यवस्थित बघता आली.

हॉटेलवर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये शिरताना अरुणकुमारचा फोन आला. त्याची सगळी कामे आटपली होती आणि तो अर्ध्या तासात त्याच्या हॉटेलवर पोचणार होता, मग सात वाजता नाईलच्या किनारी, दोघांना मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘द नाईल रिट्झ कार्लटन’ हॉटेलच्या प्रवेशद्वारासमोर भेटण्याचे ठरले.

रिसेप्शन मध्ये अहमद बसला होता. तिथेच त्याच्याबरोबर चहा पिता पिता त्याला थोडक्यात आजच्या स्थलदर्शनाचा वृत्तांत सांगितला आणि मग रुममध्ये जाऊन बेडवर लोळत पडलो. परत बाहेर जायचे असल्याने साडेसहाला उठून फ्रेश होऊन अरुणकुमारला मी बाहेर पडत असल्याचा मेसेज व्हॉट्सॲपवर पाठवला आणि रूम मधून निघालो. अहमद अजून रिसेप्शन मधेच होता. त्याला मी आता बाहेर जात असून रात्री जेवूनच परत येईन असे सांगून खाली उतरलो आणि नाईलच्या किनाऱ्याच्या दिशेने निघालो.
रस्त्यावर भरपूर रहदारी होती. ६:५५ ला मी भेटीच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो होतो. अजून अंधारही पडला नव्हता आणि किनाऱ्यावर कालच्या सारखी गर्दीही नव्हती. पाच-सात मिनिटात अरुणकुमारही आला. मग खाली किनाऱ्यावर जाऊन एका बेंचवर बसून आमच्या दोघांचे ईजिप्त मधले दोन दिवस कसे गेले ह्याविषयीच्या गप्पा सुरु झाल्या. त्याचा कालचा बॅगचा किस्सा मजेदार होता. आज त्याचा कामाचा पहिलाच दिवस चांगला गेल्याने तो समाधानी होता. माझे आजचे गिझाचे फोटो बघून त्यानेही आहे अजून ५ दिवस ईजिप्त मध्ये तर नक्की पिरॅमिडस बघण्याचा निश्चय केला. मग तिथून उठून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत किनाऱ्यावर एक चक्कर मारून आम्ही तेहरीर चौकात असलेल्या KFC मध्ये डिनर साठी गेलो.

अरूणकुमार
मी आणि अरुणकुमार.

जेवण आटपल्यावर सकाळी मला लवकर अलेक्झांड्रीयासाठी निघायचे असल्याने पुन्हा भारतात गेल्यावर भेटण्याचे ठरवून ९:०० वाजता एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या मुक्कामावर जाण्यासाठी निघालो. हॉटेलवर आलो तेव्हा मेहमूद आलेला होता. मग त्याने मला उद्या सकाळी ७ वाजता पिक-अप असून अलेक्झांड्रीया मध्ये काय काय बघायचं आहे ह्या विषयीच्या सूचना दिल्या. आज दिवसभर भरपूर भटकंती झाल्याने आता झोप यायला लागली होती, त्यामुळे मीही तिथे जास्तवेळ न थांबता रूम गाठली. सकाळी ६:०० चा अलार्म लावला, खरंतर आज सकाळच्या अनुभवावरून तो लावण्याची गरज नव्हती पण सेफर साईड म्हणून लावला आणि झोपी गेलो.

क्रमश:

संजय भावे

पुढील भाग:

आधीचे भाग:

तळटिप: १२ भागांची ही लेख मालिका ‘मिसळपाव डॉट कॉम’ संस्थळावर माझ्या तिथल्या ‘टर्मीनेटर’ ह्या सदस्य नावाने ३ जून २०१८ ते २३ ऑगस्ट २०१८ ह्या कालावधीत आधी प्रकाशित झालेली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ साधना - बरोबर.
"27 व्या शतकात म्हणजे इसवीसन 2700 वर्षे."
इसवीसन पूर्व २७०० वर्षे + २०१८

@Sanjay

Very nice description!
Pyramid entry fee is not EGP1000, but somewhere around EGP360. It is worth experiencing "climbing" through a very narrow and steep passage. The sarcophagus chamber is at the top - but as you have rightly mentioned, there is nothing in that room. The room is empty with a security guard who makes sure that you do not take photographs.

छान आहे मालिका. आज वाचायला सुरुवात. कसलं सविस्तर आठवतंय? Happy

इजिप्त म्हटले की एक गूढ भावनाच मनात येते. प्रत्यक्ष पहाताना मस्त, वेगळंच रहस्यमय काहीतरी वाटलं असेल.
गजानन यांनी लिहिल्याप्रनाणे, पिरॅमिडच्या आत पोकळ जागा असेल असे वाटायचे ही समजुतच धुळीला मिळाली. अर्थात आता ते बरोबरच वाटतंय. शेवटे एक प्रेत ठेवलेलं, तिथे सहज जाता येईल अशी रचना करुन उपयोगी नव्हती. खरंच कसं बांधलं असेल ते?? मानवाने अशा कितीतरी खास कौशल्याबद्दल लिहुन न ठेवल्याने आपले खुप नुकसान झाले आहे.
पण ती ममी आता कुठे आहे म्हणे? (गुगलला न विचारता इथेच विचारते, आणि तसाही ईतिहास कच्चाच) Happy

Pages