ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना २०

Submitted by स्वप्ना_राज on 11 October, 2018 - 08:05

उम्रने तलाशी ली तो जेबोंसे लम्हे बरामद हुए
कुछ गमके, कुछ नम थे, कुछ टूटे
बस कुछ सही सलामत मिले
जो बचपनके थे

त्या संध्याकाळी किती दिवसांनी संधिप्रकाश पाहिला. संधिप्रकाशच म्हणतात ना त्याला? सूर्यास्ताच्या आधी आकाशात भरून राहिलेला सोनेरी रंग असतो तो? काही काही शब्द फक्त कवितेत वाचले, प्रत्यक्ष पाहिले किंवा अनुभवले नाहीत. झुंजूमुंजू होणं म्हणजे काय असतं? हळदुली उन्हं काय असतात? आकाशात रंगांची उधळण होते म्हणजे नेमकं काय होतं? ऋतू बदलायची चाहूल कशी लागते? अश्या अनेक गोष्टी. आता तर जन्माची मोट शहराशी बांधलेय. गाव नेहमी स्वप्नातच राहिला. पण त्या संध्याकाळी मी तो संधिप्रकाश डोळे भरून पाहिला. बिछान्याला पाठ टेकवली की झोपेच्या अधीन व्हायच्या आधी हे असले क्षण न बोलावता डोळ्यांआड हजर होतात. फक्त जेव्हा ते पहिल्यांदा मिळतात तेव्हा त्यांची बेगमी करून ठेवायची असते.

कारण पदोपदी धडपडायला, ठेचकाळायला, चाचपडायला लावणाऱ्या जगण्याच्या रामरगाड्यात ते फार कमी वेळा मिळतात.
----

माझं त्याच्याकडे लक्ष जायचं काहीच कारण नव्हतं. सिद्धिविनायक मंदिरावरून रोज जायचं म्हणजे अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं - लोकांना इन्स्टंट पुण्यसंचय करता यावा म्हणून रस्त्यालगत बांधलेल्या गाईच्या शेणाचा वास, नर्दुल्ला टँक मैदानात मेट्रोचं काम सुरु होताच तिथनं गाशा गुंडाळलेल्या आणि सुरज बरजात्याला झीट आणेल एव्हढ्या मोठ्या संयुक्त कुटुंबाचा (ह्यात दर काही महिन्यांनी नवा मेंबर दिसतोच!) फुटपाथच्या दोन्ही बाजूंना पसरलेला संसार, सॅन्डवीच-'मेंदु'वडे-डोसा-इडली विकणाऱ्या स्टॉलवाल्यासमोरची बकाबका खाणारी फुटपाथभर सांडलेली गर्दी, ‘बोला हरिविठ्ठल पांडुरंग बोला' सारखा ‘बोला घरगुती नाश्ता बोला' चा पुकारा, आपण मंदिरात जातोय की नाही ह्याची तमा न बाळगता ‘इथे चप्पल काढून ठेवा' म्हणत पावलोपावली रस्ता अडवणारे दुकानदार, रहदारीचा अर्धा रस्ता व्यापून बांधलेल्या भिंतीलगतच्या दशांगुळे जागेतल्या वाटेवरची बाहेरगावाहून दर्शनाला आलेल्या लोकांची मुंग्यांसारखी रांग आणि ह्या सगळ्यांना पुरून उरलेली भिकार्‍यांची गर्दी. त्यातच तो कुठेतरी उभा असणार.

पण माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. देवळावरून पुढे गेलं की शेअर टॅक्सींची जी जागा आहे तिथे इमानेइतबारे गाडी उभी करणाऱ्या काही मूठभर टॅक्सीवाल्यांपैकी एकाच्या टॅक्सीत शिरायला ती मुलगी येत होती तेव्हा नेमका विरुद्ध दिशेने हा भिकारी येत होता. अस्ताव्यस्त वाढलेले केस. अस्ताव्यस्त वाढलेली दाढी. अंगावर मळकट शर्ट. मध्यमवयीन. तिला बघून चटकन बाजूला होत त्याने वाट करून दिली. ती आत शिरल्यावरच तो आपल्या वाटेने गेला. ‘समझदार है बंदा. सयाने लोगोंसेभी ज्यादा समझदार' हे टॅक्सीवाल्याचं प्रशस्तिपत्रक त्याच्या गावीही नव्हतं. मग तिथनं जाताना जवळपास रोजच हा 'समझदार बंदा' मला दिसायचा. कधीकधी तो समोर दिसला नाही तर मी चालताचालता का होईना आसपास नजर टाकायची.

आणि असंच एक दिवस तो लंगडताना दिसला. पायाला फडकं गुंडाळलेलं होतं. काही लागलं होतं का कुत्रा चावला होता काय माहित. नाही म्हटलं तरी मला थोडी चुटपूट लागली. काय करावं? त्याला डॉक्टरकडे वगैरे घेऊन जायचा उत्साह म्हणा, इच्छाशक्ती म्हणा, नव्हती. २-३ दिवस त्याला पाहत होते. मग 'मुल्लाकी दौड मस्जिद तक' ह्या न्यायाने नेटवर सर्च केला कारण अस्मादिक 'शिवाजीमहाराज जन्माला यावेत पण ते दुसर्‍याच्या घरी' ह्या संप्रदायातले ना. फारसं काही हाती लागलं नाही. TISS तर्फे अश्या लोकांना मदत करायचा काही प्रोजेक्ट आहे एव्हढं कळलं. त्यांना मेल टाकली. उत्तराची अपेक्षा नव्हती. तरी ते यावं असं फार वाटत होतं. नाही आलं. पण ती मेल टाकल्याच्या दुसर्‍याच दिवशी तो भिकारी दिसला नाही. मग कितीतरी दिवस दिसला नाही. त्याला काही रोग झाला असावा म्हणून लोकांनी हाकलून लावलं असेल का? का कोणी दवाखान्यात दाखल केलं असेल? कळायला काही मार्ग नव्हता. काही दिवसांनंतर मीही त्याला विसरून गेले.

मग अचानक एक दिवस तो पुन्हा दिसला. मी लगेच त्याच्या पायाकडे पाहिलं. फडकं गायब. जखम वगैरे काही नाही. ठीकठाक होता. खूप बरं वाटलं. तसं वाटणं माणुसकीला धरूनच होतं म्हणा. पण आपण माणूस असल्याचा आनंद वगैरे नाही झाला मला. का माहित आहे?

कारण तो जेव्हा अचानक गायब झाला होता तेव्हा मला प्रचंड हायसं वाटलं होतं. आपल्या डोळ्यांदेखत एक माणूस त्रासात आहे आणि आपण त्याला मदत करायला काहीही करत नाही आहोत ही टोचणी त्याच्यासोबतच गायब झाली होती ना. हे कुठे माणुसकीला धरून होतं?

माझा असा टीचभर बुटका अर्धामुर्धा माणूस ह्याआधीही बऱ्याचदा झालाय. पण आता तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहणार आहे ही बोचरी जाणीव नवी आहे. आणि ती खूप त्रास देते. कधीकधी.
-----

ह्याआधीच्या पन्न्यांंत माझ्या सरांचा उल्लेख झालाय. माझ्या शाळकरी दिवसांत मी जो क्लास लावला होता तिथे ते गणित शिकवायचे. आता आम्ही Whatsapp वरून संपर्कात असतो. दोन वर्षांपूर्वी एकदा गणपतीच्या दिवसांत भेटलो होतो. तसे ते माझ्या घराच्या जवळच राहतात - चालत जायला जेमतेम अर्धा तास लागेल. पण माणसं जितक्या कमी अंतरावर राहतात तेव्हढी त्यांना जाऊन भेटण्यात जास्त चालढकल होते. तेच माझं झालंय सध्या. असो.

Whatsapp वरून संपर्क म्हणजे एकमेकांना आलेले informative मेसेजेस फॉरवर्ड करणं, त्यावर चर्चा असं चालतं. कधीकधी देशात काय चाललंय ह्यावर सरांची एखादी टिप्पणी असते. त्यावर ह्या विषयातल्या माझ्या त्रोटक ज्ञानाला झेपेल असं माझं उत्तर असतं. आम्ही वादही घालतो एकमेकांशी. म्हणजे मी वाद घालते. त्यांचा सूर शांत असतो. अनेक वर्षापूर्वी वर्गात असायचा तसा. काही महिन्यांपूर्वी अश्याच एका तेव्हाच्या (आपल्या देशात डेंग्यू, मलेरिया ह्यासारख्या ह्या साथीही येतात महिन्याच्या महिन्याला!) ज्वलंत विषयावर त्यांचे काही फॉरवर्डेड मेसेजेस आले. काही मी पाठवले. थोडीफार चर्चा झाली. अहो आश्चर्यम! कधी नव्हे ते एकमतही झालं. विषय कोणता ते इथे सांगत नाही. उगाच रणकंदन नको.

मग सर म्हणाले ह्या विषयावर त्यांच्याकडे अजून काही मेसेजेस आहेत पण ते मेसेजेस ते मला पाठवू शकत नाहीत कारण त्यात काही वाईट शब्द आहेत. त्यांचा हा मेसेज वाचून आधी मला हसायलाच आलं. सर अजून मला १४-१५ वर्षांचीच समजताहेत का काय? 'अहो सर, मी Adult होऊनही खूप वर्षं झाली आता' मी एक स्मायली टाकून म्हटलं. उत्तरादाखल स्मायली आला आणि सरांचं उत्तर 'माहित आहे ग मला. पण गुरू-शिष्यांत कसा संवाद असावा त्यालाही काही मर्यादा आहेत. हे असे शब्द त्यात येता कामा नयेत. ह्याला वाचिक तप म्हण हवं तर'.

वाचिक तप? हा असा काही प्रकार असतो ह्याचा मला पत्ताच नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर नाक्यानाक्यावर उभ्या असलेल्या घोळक्यांत लाडाने एकदुसर्‍याला मा****, भें**, आई*** असल्या शिव्या सहज घालणारे आणि काहीही वाटून न घेता त्या ऐकून घेणारे अनेक जण आले. मी कितीतरी वेळा त्यांच्याकडे नाराजीने पाहिलं आहे. पण ते त्यांच्या गावीही नसतं. आपण काही बोलायला गेलो तर 'ओ बाई, तुमच्या आई-बहिणीला शिवी दिलीय का?' असंही विचारायला हे लोक कमी करणार नाहीत ह्याची खात्री आहे मला. आणि ह्या असल्या जगात माझे सर वाचिक तपाविषयी बोलताहेत? हायला!

ह्या 'हायला' भोवती जीभ अडखळली. Shit, F***, चायला हे शब्द लहानपणी नव्हते आपल्या तोंडी. पण आता किती सहजपणे येऊन बसलेत हेही जाणवलं. ही सवय घालवायला अक्षरश: भगिरथ प्रयत्न करावे लागणार आहेत. तेव्हढी चिकाटी आणि Will Power राहिली नसणार अशीही शंका आहे. But I am going to eat this elephant one bite at a time.

One...bite...at...a...time.
-----

'या ताई' तिने तोंडभरून स्वागत केलं.

गेल्या काही महिन्यांपासून रोज सकाळी ती भाजीवाली माझ्या रोजच्या यायच्या-जायच्या रस्त्यावर बसायला लागलेली होती. तिच्याकडची भाजी छान ताजी असते. एखादी भाजी फार नको असेल (माझ्या लेखी फरसबी, तोंडली, भेंडी, घेवडी, चवळी ह्या सगळ्या भाज्या ह्या सदरात मोडतात!) तर १० रुपयांचा वाटा पण देते. आणि बघावं तेव्हा हसतमुख. कधी कपाळावर आठ्या नाही बघितल्या मी तिच्या. पालघरवरून येते म्हणे. घरी परत गेल्यावर शेतावर काम करते असं तिनेच मला एकदा सांगितलं होतं. मनोमन मी तिला हात जोडले होते.

'बांबू नाही आणलेत?' मी कोवळ्या बांबूबद्दल विचारत होते. आम्ही त्याला कोंब म्हणतो. सारस्वतांत ह्याची भाजी आणि आमटी करतात. मला स्वत:ला दोन्ही अजिबात आवडत नाही. पण आईला आवडतात. १-२ वेळा ह्या भाजीवालीने आणूनही दिले होते. आईसाहेबांना अजून एकदा हवे होते. पावसाळा संपला की हे नाही मिळत.

'काल आणले होते ताई. तुम्ही नाही आलात. मग मी आणखी एक गिर्‍हाईक आलं होतं त्यांना देऊन टाकले' चुटपुटत्या आवाजात ती म्हणाली. माझा जळफळाट झाला. दानेदानेपे लिखा है खानेवालेका नाम.

'मला काय हो माहित तुम्ही बांबू आणणार म्हणून. काल मी एक काम होतं म्हणून दुसर्‍या रस्त्याने गेले' मी पडलेल्या आवाजात म्हटलं. मग मला एकदम आठवलं की एके दिवशी सकाळी हिला मोबाईलवर बोलताना पाहिलं होतं.

'तुमच्याकडे फोन आहे ना? मला नंबर द्या बघू तुमचा. तुम्हाला फोन करून विचारत जाईन.'

तिने पर्स उघडून आतून ट्रेनचा पास काढला. त्यासोबत एक कार्ड होतं. त्याच्या मागच्या भागावर तिचा नंबर लिहिला होता. मी तो मोबाईल मध्ये टिपून घेतला आणि ते कार्ड तिला परत केलं.

'बघा उद्या बांबू मिळाले तर. मी फोन करते सकाळी.'
'चालेल ताई. कविताताई नाव लिहा'
'काय?'
'फोनमध्ये माझं नाव कविताताई लिहा'
'ओह, हा, लिहिते'. मी काहीसं ओशाळून म्हटलं.

तिथून पुढे गेल्यावर मी फोनचं अ‍ॅड्रेस बुक उघडलं. त्यात 'भाजीवाली' असं टाईपलं होतं ते डिलीट करून तिथे 'कविताताई' हे नाव टाकलं.

शेक्सपियरचं चुकलंच बघा. नावात बरंच काही आहे.
-----

'घे' माझी मैत्रीण डबा पुढे करत म्हणाली.
'काय आहे?'
'एग भुर्जी'
'अगं पण.....आज मंगळवार आहे' मी नकळत बोलून गेले.
'मंगळवार? पण आता तुझा देवावर विश्वास नाही ना?' तिने आश्चर्याने विचारलं.
'हो ग.....पण......' मी पुढे बोलूच नाही शकले.

खरं आहे की आता माझा देवावर विश्वास नाही. कारणं बरीचशी खाजगी. काही सार्वजनिक. किंबहुना खाजगी कारणांनंतर अचानक दिसू लागलेली सार्वजनिक कारणं. त्याचा उहापोह करायचं हे स्थळ नव्हे, हा काळ नव्हे आणि ही वेळ नव्हे. उहापोह तरी कशाला करायचा म्हणा. मीही आधी 'देव आहे रे' कंपूत होतेच की. आता 'देव नाही रे' कंपूत आहे. एव्हढंच. भूतांवर विश्वास असणारे आणि नसणारे कसे हिरीरीने एकमेकांशी भांडतात पण स्वत:चा मुद्दा काही दुसर्‍याला पटवून देऊ शकत नाहीत तसंच हेही. तस्मात ज्याचा विश्वास आहे त्याला ठेवू द्यावा. ज्याचा नाही त्याचा नसू द्यावा.

पण मी खरंच ' देव आहे रे' कंपूत पूर्णपणे होते का कधी? 'अमुक एक पाहिजे म्हणून तमुक एक देईन' असे नवस केले खरे. 'तमुक एक' द्यायची वेळच कधी आली नाही कारण 'अमुक एक' मिळालंच नाही कधी. ते जाऊ द्या. पण असे नवस करूनही 'काही मिळावं म्हणून देवाला काही द्यावं का लागतं' हे कधी कळलं नाही. आपण मनापासून अथक प्रयत्न केले की तो देणारच हा विश्वास का नाही वाटला कधी? अमुक एक गणपती नवसाला पावणारा असतो. पण गणपती ह्या देवाचं तो केवळ एक रूप असतो मग त्याची बाकीची रूपं नवसाला पावत नाहीत? का? हेही कधी कळलं नाही. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीला सिद्धीविनायकाच्या बाहेरच का उभं रहायचं? का गाभार्‍यातल्या पुजाऱ्याचा 'पुढे चला' चा ओरडा ऐकून घ्यायचा? घरच्या देव्हार्‍यातल्या गणपतीला नमस्कार केलेला नाही का चालणार? तुम्ही म्हणाल हे सगळं धर्माचं बाजारीकरण झालंय. मान्य आहे. पण मग देव का नाही थांबवत हे? का नाही त्याच्या भक्तांना सद्बुध्दी देत? ५ महिन्यांच्या निष्पाप बाळाला घेऊन जाणार्‍या देवाला मरायची वाट पाहणारे लोक का नाही दिसत? हे पूर्वजन्मीचं देणं असेल तर ही देणी देव त्याच जन्मात का नाही फेडून घेत? दोन भावंडांचं भांडण १०-१५ मिनिटांत मिटलं नाही तर आई मध्ये पडते. मग इथे शतकानुशतकं लोक न बघितलेल्या देवावरून भांडताहेत, खून पाडताहेत तर का नाही तो देव समोर येऊन त्यांना सांगत की बाबांनो भांडू नका रे, मी एकच आहे? देवाचं नाव घेऊन हा भवसागर वगैरे तरून जायचाय तर देवाने त्यात आपल्याला आधी लोटलंच का? बसलो असतो ना निवांत सगळे देव देव करत. हे प्रश्न देवळाबाहेरून जाताना नमस्कार करतानाही पडायचे. थोडक्यात काय तर तेव्हाही मी पूर्णपणे आस्तिक नव्हतेच. आणि आता पूर्णपणे नास्तिकही होऊ शकत नाहिये.

त्यामुळे गोची एव्हढीच झालेय की आता देवळासमोरून जाताना हातही जोडले जात नाहीत. आणि मंगळवारी एग भुर्जीही खाता येत नाही.
-----

पूर्वी खूप गोष्टी मुठीत सामावून घ्यायची धडपड असायची. उत्साह असायचा. आता बहुतेक वेळा मुठीत जे काही आहे निदान ते तरी निसटून जाऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालते. पण सूर तक्रारीचा किंवा निराशावादी नाही. 'आहे हे असं आहे' हे एकदा आपल्याशीच मान्य केलं की मग ते - अगदी कणभर का होईना पण - अधिक चांगलं कसं करता येईल हा विचार, अधेमध्ये का होईना, पण करता येतो ही काळ्या ढगाची सोनेरी किनार आहे. अन ती हलकीशी किनार आहे म्हणूनच ह्या जगण्याला 'आयुष्य' म्हणायला जीभ अजून तरी रेटतेय.

फक्त एका शायराने म्हटलंय तसं एकच मागणं आहे.

इतनी बदसलूकी ना कर ऐ जिंदगी
हम कौनसे यहा बार बार आनेवाले है
--

वि. सू. १. लेखातले दोन्ही शेर फॉरवर्डॅड आहेत.
वि. सू. २. ह्या लेखातलं काही नाही पटलं तर सोडून द्या. कृपया वाद घालू नका ही दोन्ही हात जोडून कळकळीची विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा असा टीचभर बुटका अर्धामुर्धा माणूस ह्याआधीही बऱ्याचदा झालाय. पण आता तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहणार आहे ही बोचरी जाणीव नवी आहे. आणि ती खूप त्रास देते. कधीकधी. >>>>>> अगदी खरयं

खुप खुप छान लिहिता तुम्ही. खुप आवडलं लेखन !

वाह अप्रतिम.!!
गुरू शिष्य नात....
माझे विद्यार्थी मला नावाने हाक मारतात. मीच सवय लागली. कधितरी सर हाक मारल्यावर मी म्हणतो मी काय तुझी बहिण नाही. फ्रेंच मध्ये sœur म्हणजे sister.
मग ह्या वेगळ्या मास्तराबरोबर ती खुलतात, मोकळेपणाने बोलू लागतात. गातो, विनोद करतो त्यांच्यातील एक वाह्यात मुल होतो.
आता कोणाला दुजाभाव वाटेल पण मुलांना शिव्या शिकवल्या तरी मुलींना सांगत नाही.
काही वेळा चाभरटपणा करत अमुकतमुक म्हणजे काsssय? अस विचारतात
मग मी म्हणतो डीक्शनरी घ्या. शोधा! माझी हद्द इथपर्यंतच.
एखादा म्हणतो "You remind me of Ishan Sir from Taare Jamin Par"
आणि माझ्या डोळ्यासमोरच दृष्य हिंदकळू लागतं

कुठे मिळाला गं हा आरसा? जो आपल्याच आत दडून बसलेले इतके लख्ख दाखवतो ?

बेल्जीअम आरसे खूप उत्तम प्रतीचे असतात / असायचे म्हणे. पण असा स्वप्नीअम आरसा परत मिळाला तर माझ्याकरता घेऊन ठेव.

वाचिक तप, कायिक तप, मानसिक तप यावरुन आ. विनोबांच्या "विचार पोथी" तील एक वाक्य इथे द्यावेसे वाटले.
"तप आणि ताप ह्यातील विभाजक रेखा ओळखणे जरुर आहे." Happy

Pages