चक्र

Submitted by शिवोऽहम् on 10 October, 2018 - 15:08

शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
कुर‌त‌ड‌तो अंत‌री विचार‌

रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस तगमग नूतन
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?

शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?

पण..

क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री

आणि अनाहत शंखामधला
नाद सनातन दक्षिणवर्ती
गुरुत्व की भ्रूमध्यामधले
प्रकाशते जे तिमिरावर्ती..

भिडेन मग मी त्या न्यूनाला
व्यापुन टाकिन त्या शून्याला
शून्य नव्हे, ते नित्य निरंजन
पूर्ण चक्र मम जीवन-चिंतन

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults