पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १८. बिन बादल बरसात (१९६३)

Submitted by स्वप्ना_राज on 7 October, 2018 - 01:21

index.jpg

विश्वजितची नायक म्हणून भूमिका असलेल्या 'बीस साल बाद' आणि 'ये रात फिर ना आयेगी' ह्या चित्रपटांबद्दल मी ह्या मालिकेत आधी लिहिलं आहे. त्याचीच भूमिका असलेला ‘कोहरा' मी पूर्वी पाहिला असला तरी त्यावर अजून लिहिलेलं नाही. ‘ये रात फिर ना आयेगी' वरच्या लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत मायबोलीकर चीकू ह्यांनी विश्वजित नायक असलेला आणि पुनर्जन्माची पार्श्वभूमी असलेला 'बिन बादल बरसात' हाही चित्रपट पाहा असं सुचवलं. टीव्ही गाईड पाहत असताना त्या चित्रपटाचं नाव लिस्टिंगमध्ये दिसलं. आणि काल संध्याकाळी अस्मादिक हा चित्रपट बघायला आसनस्थ झाले. तर कथा येणेप्रमाणे.

नीलमघाटचा जमिनदार प्रभात हा ह्या चित्रपटाचा नायक. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याचा मित्र सुंदर त्याला सांगतो की त्याच्या, म्हणजे सुंदरच्या, वडिलांनी प्रभातच्या लग्नाची बोलणी डॉक्टर गुप्तांशी चालवली आहेत. डॉक्टर गुप्तांची मुलगी मुंबईत शिकत असते. प्रभातला ही बातमी सांगून सुंदर निघून जातो. प्रभात बाहेर जायला निघतो तेव्हा एक मुलगी ओरडून मदत मागत असल्याचं त्याला दिसतं. तो तिच्याकडे पोचतो तेव्हा एका उतारावरून घसरून पडून तिची मैत्रिण सावित्री बेशुद्ध पडल्याचं ती त्याला सांगते. तसंच आपले वडिल ह्या शहरात डॉक्टर असल्याचंही सांगते. प्रभात सावित्रीला आपल्या घरी घेऊन येतो आणि डॉक्टर गुप्तांना फोन लावतो. ते येतात तेव्हा ती मदत मागणारी मुलगी ही त्यांची मुलगी संध्या असल्याचं कळतं. बेशुद्ध सावित्रीला संध्याच्या घरी हलवणं धोक्याचं असल्याने त्या रात्री तिच्यासोबत संध्या आणि डॉक्टर गुप्तासुध्दा प्रभातच्या घरी रहायचं ठरवतात. तेव्हढ्यात डॉक्टरांना पोलीस स्टेशनमधून बोलावणं आल्यामुळे ते निघून जातात. रात्री जेवताना संध्याशी बोलत असताना तिचं शिक्षण पूर्ण झाल्याने ती आता मुंबईला परत जाणार नाही हे प्रभातला कळतं. त्याचं तिच्यावर प्रेम बसलेलं असतं. आणि तिचं त्याच्यावर.

यथावकाश प्रभात तिला आपल्या घराण्याचे दागिने - जे घरच्या सुनांना द्यायचे असतात – दाखवतो आणि लग्नाची मागणी घालतो. संध्याला त्या दागिन्यांच्या पेटीत एक चिठ्ठी सापडते. ती प्रभातला त्याच्या वडिलांनी लिहिलेली असते. प्रभातने लग्न करायचं ठरवलं असेल तर त्याने ती वाचायची असते. प्रभात संध्याला ती चिठ्ठी वाचून दाखव म्हणून सांगतो. त्यात त्याच्या वडिलांनी प्रभातला 'तू लग्न करू नकोस' असा सल्ला दिलेला असतो. कारण त्यांच्या घराण्याला एका बंजारा टोळीच्या सरदाराने दिलेला शाप असतो ज्यामुळे नववधूचा लग्नानंतर एक वर्षाच्या आत मृत्यू होत असतो. प्रभातला हे वाचून धक्का बसतो. तो कपाट उघडून आतून एक फोटो काढतो. अनेक वर्षांपासून कपाटात असलेला १८९५ सालचा एका तरुण बंजारा स्त्रीचा तो फोटो कोणाचा असतो हे गूढ त्याला अनेक वर्षापासून उकलत नसतं. त्याचा ह्या शापाशी काहीतरी संबंध असावा अशी खात्री पटून तो ती बंजारा टोळी हुडकायच्या मागे लागतो.

जवळपास एक महिन्यानंतर सुंदर त्याला गावाजवळ एक बंजारा टोळी उतरली असल्याचं सांगतो. प्रभात एके रात्री तिथे चौकशी करायला जातो. तो तिथे गाडी थांबवतो तेव्हा त्याला एक तरुण बंजारा स्त्री धावत त्या वस्तीत शिरताना दिसते. वस्तीत शिरल्यावर प्रभातला कळतं की ती त्याच शाप देणाऱ्या सरदाराची टोळी असते फक्त तो शाप देणारा सरदार अनेक वर्षांपूर्वी मेलेला असतो. प्रभात तिथल्या लोकांना मला सध्याच्या सरदारांकडे घेऊन चला असं सांगतो. आत गेल्यावर तो सध्याचा सरदार हा नीलमघाटचा जमीनदार आहे हे ओळखतो आणि 'मी तुझी बऱ्याच वर्षांपासून वाट पाहत होतो' असंही सांगतो. प्रभात बुचकळ्यात पडतो पण सरदाराला ती चिठ्ठी वाचून दाखवून 'मला मदत कर' असं विनवतो. तो सरदार त्याला निक्षून सांगतो की तू संध्याशी लग्न केलंस तर मीच काय पण जगातली कुठलीही शक्ती तिला वाचवू शकणार नाही. प्रभातच्या एका पूर्वजाने सुमारे ७० वर्षांपूर्वी तेव्हाच्या बंजारा सरदाराच्या मुलीला लग्नाचं वचन देऊन दुसर्याच मुलीशी लग्न केलेलं असतं. त्या सरदाराची मुलगी बहुतेक आत्महत्या करते आणि म्हणून संतापून त्याने जमीनदाराच्या घराण्याला शाप दिलेला असतो.

प्रभात घरी येऊन हे सगळं जेव्हा संध्याला सांगतो तेव्हा ती त्याचं बोलणं हसण्यावारी नेते. तिच्या वडिलांनी तिला सांगितलेलं असतं की प्रभातच्या आईचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला होता, कुठल्याही शापामुळे नाही. तिचा एकंदरीत ह्या शाप प्रकरणावर अजिबात विश्वास नसतो. दोघांचा साखरपुडा ठरतो. साखरपुड्याच्या पार्टीत बंजारा सरदार सोहळ्यात सामील व्हायची परवानगी मागतो. संध्याचे वडिल ती देतात. बंजारा टोळीचे लोक नाचगाण्याचा कार्यक्रम करतात त्यात प्रभात-संध्याला ती फोटोतली तरुणी दिसते. ७० वर्षांपूर्वीची तरुणी अजून जिवंत कशी ह्याचं त्यांना आश्चर्य वाटतं. गाणं संपतं आणि अचानक दिवे जातात. दिवे पुन्हा येतात तेव्हा सगळी बंजारा टोळी हवेत विरून जावी तशी गायब झालेली असते. जमलेल्या लोकांच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. ह्या कोड्याचा उलगडा करायला प्रभात पुन्हा बंजार्यांच्या वस्तीवर जायचं ठरवतो. ह्यावेळी संध्याही त्याच्यासोबत जाते. तिला गाडीत बसवून ठेवून प्रभात वस्तीत शिरतो तेव्हा सरदाराच्या समोर जळत असलेली धुनी अचानक विझते. तो प्रभातला सांगतो की ती आग नसून त्याच्या घराण्याला शाप देणाऱ्या सरदाराचा आत्मा आहे जो ७० वर्ष झाली तरी अजून सूडाग्नीने धगधगतो आहे. प्रभातला दिसलेली तरुणी रेश्मा हा त्या सरदाराच्या मुलीचा दुसरा जन्म असतो. आणि तिला आधीच्या जन्मात धोका देणारा जमीनदार दुसरातिसरा कोणी नसून खुद्द प्रभात असतो. अर्थात तो त्याचा आधीचा जन्म असतो म्हणा. प्रभातचा ह्यावर विश्वास बसत नाही तेव्हा तो सरदार पेटीतून एक फोटो काढतो ज्यात ती तरुणी आणि एक हुबेहूब प्रभातसारखा दिसणारा माणूस असतो. तो सरदार प्रभातला हेही सांगतो की त्याला आधीच्या जन्मातल्या चुकीचं प्रायाश्चित्त घ्यायचं असेल तर त्याने संध्याचा विचार सोडून देऊन रेश्माशी लग्न करायला हवं. मगच त्यांच्या घराण्याला असलेला शाप संपेल. प्रभात असं काही करायला साफ नकार देतो.

संध्या-प्रभातच्या लग्नाचा मुहूर्त दसर्याचा ठरतो. एके रात्री अचानक रेश्मा प्रभातच्या घरी येते आणि 'तू तुझ्या स्वत:च्या मर्जीने माझ्याशी लग्न करशील' असं त्याला सुनावते. सरदार प्रभातला हिप्नोटाईझ करतो. त्या प्रभावाखाली आलेला प्रभात अमावास्येच्या रात्री गाडी चालवून बंजारा वस्तीत जातो. तिथे सरदार त्याचं लग्न रेशमाशी लावून देण्याच्या बेतात असतो एव्हढ्यात संध्या तिथे तिच्या वडिलांसोबत येते आणि प्रभातला घेऊन जाते. तिला प्रभातच्या नोकराने प्रभात अचानक गाडी घेऊन कुठेतरी निघून गेल्याचं सांगितलेलं असतं.

संध्याचे वडील कोतवालांकडे बंजार्याना गावातून हुसकावून लावायची विनंती करतात पण प्रभात स्वत: गाडी चालवून त्यांच्या वस्तीत गेला असल्याने ते आपण काहीही कारवाई करू शकण्यास असमर्थ असल्याचं सांगतात. यथावकाश प्रभात आणि संध्याचं लग्न होतं. पण त्या रात्रीच छतावरचं काचेचं मोठं झुंबर अचानक खाली येतं. ह्या अपघातातून संध्या सहीसलामत वाचते खरी पण तरी ही घटना तिला हादरवून टाकते. शापापासून मुक्तता मिळवायला आपण दोघे एक वर्ष ब्रह्मचारी राहू असं प्रभात तिला सुचवतो. दरम्यान जवळच्या गावात भरलेली एक जत्रा पाहायला ते दोघे गाडीने जात असताना गाडी बंद पडते. इंजिन गरम झालेलं असतं म्हणून प्रभात पाणी आणायला जातो तर संध्या आत बसलेली असतानाच गाडी अचानक चालू होते, तिने प्रयत्न करूनही ब्रेक लागत नाही आणि कड्याच्या पार टोकाला जाऊन गाडी थांबते.

असं करत करत ११ महिने २९ दिवस निघून जातात. पुन्हा दसऱ्याचा दिवस येतो. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संध्याचे वडिल दोघांना रात्री जेवायला बोलावतात. वाटेत एका सुनसान जागी गाडी बंद पडते, ती पुन्हा चालू होण्याची चिन्हं दिसत नाहीत आणि त्यात पाऊस पडायला लागतो. दोघं एका पडक्या निर्जन घराचा आसरा घेतात. आता रात्र तिथेच काढावी लागणार असते. संध्याला तहान लागते म्हणून ती पाणी पिते पण शापाच्या प्रभावाने तिला नशा चढते. ती फारच लाडात येते आणि दोघांनी घेतलेली ब्रह्मचर्याची शपथ मोडते का काय अशी स्थिती निर्माण होते.

काय होतं पुढे? प्रभातच्या घराण्याला असलेला शाप संध्यालाही भोवतो? का तो शाप संपून दोघांचं मिलन होतं? रेशमाचं काय होतं? ह्या प्रश्नाची उत्तरं माहित नाहीत असा हिंदी चित्रपटाचा प्रेक्षक मिळणं मुश्कील. पण तरी बर्यापैकी बांधून ठेवणारं वेगवान कथानक, त्याचं चांगलं सादरीकरण आणि सुश्राव्य गाणी ह्या भांडवलावर हा चित्रपट चांगलाच प्रेक्षणीय ठरतो असं एक आम प्रेक्षक म्हणून मज पामराचं मत.

लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रभातची भूमिका विश्वजीतने अदा केलेली आहे. जमीनदार/श्रीमंत/ठाकूर ही व्यक्तिरेखा त्याने ह्याआधीही बीस साल बाद (१९६२) मध्ये रंगवली होतीच. त्याचीच आवृत्ती १.१ (२.० नव्हे!) ह्या चित्रपटात आहे. कोहरा (१९६४), ये रात फिर ना आयेगी (१९६६) ह्या पुढल्या आवृत्त्या. त्यामुळे अधिक काही न लिहिलेलं बरं. आशा पारेख संध्या झालेय. तिचं थोडं लाडिक बोलणं सोडलं तर तिने प्रभातवर मनापासून प्रेम करणारी, त्याच्या घराण्याला असलेल्या शापाबद्दल कळूनही त्यावर विश्वास न ठेवणारी, १-२ अनुभवानंतर थोडी हादरलेली आणि तरीही आपल्या प्रेमावर अढळ निष्ठा असलेली संध्या चांगली रंगवली आहे. फक्त शापाच्या प्रभावाने पाणी पिऊन दोघांना नशा चढते तेव्हाचा त्यांचा अभिनय 'महाविनोदी' ह्या सदरात मोडणारा आहे. Proud तेव्हाच्या अनेक चित्रपटांत ओढूनताणून आणलेला विनोद का असायचा हे मला आजतागायत न सुटलेलं कोडं आहे. ह्या चित्रपटात विनोद करण्याची जबाबदारी अर्थात सुंदर म्हणजे महमूदवर आहे. फार पाचकळपणा न करता त्याने ती पार पाडली आहे हे प्रेक्षकांचं सुदैव. त्याच्या प्रेयसीच्या, चंपाच्या, भूमिकेत चक्क पद्मा चव्हाण आहे. बाकी भूमिका अश्या कलाकारांनी वठवल्या आहेत जे अनेक चित्रपटातून दिसतात पण ज्यांची नावं जाणून घ्यायची आपण प्रेक्षक कधीच तसदी घेत नाही. Sad

जब जाग उठे अरमान, जिंदगी कितनी खूबसुरत है, खुशीभी मिली हमको, एक बार जरा फिर कह दो आणि दिलमे तेरी याद सनम लबपे तेरा नाम ही गाणी सुरेख आहेत. पैकी 'खुशीभी मिली हमको' आणि 'दिलमे तेरी याद सनम लबपे तेरा नाम' आधी कधी ऐकली नव्हती. चित्रपटाच्या शीर्षकाचं कोडं टायटल सॉंगच्या शब्दांत उलगडतं. आणि 'एक बार जरा फिर कह दो' मधलं 'ओ जाने जा' हे हेमंतकुमारच्या आवाजातले हलकेच म्हटलेले शब्द मर्मबंधातली ठेव बनून जातात Happy

चित्रपटातल्या कच्च्या दुव्यांच्या बाबतीत बोलायचं तर संध्याचे चित्रपटाच्या सुरुवातीला प्रभातला भेटल्यानंतरचे हावभाव 'ही मुलगी लफंगी आहे आणि डॉक्टरांची मुलगी असल्याचं नाटक करून चोरी करायला त्याच्या घरात घुसलेय' अशी शंका उत्पन्न करतात. प्रभातला आपलं तिच्याशी लग्न ठरतंय हे माहित असतं तरी तिला पाहून त्याची काही खास प्रतिक्रिया होताना दाखवलेली नाहीये. प्रभातचे वडिल मुलगा वयात आल्यावर त्याला ती चिठ्ठी मिळेल अशी व्यवस्था का करत नाहीत? त्याने लग्न करायचं ठरवल्यावर त्याला शापाबद्दल सांगणं थोडं दुष्टपणाचं वाटतं नाही? तसंही त्याला 'लग्न करू नको' असं सांगणं म्हणजे आपण भरपेट जेवून दुसर्याला निर्जळी उपवास करायला सांगण्यासारखंच आहे की. Wink १८९५ साली भारतात फोटो काढायची सोय होती? जरी असली तरी त्या बंजारा मुलीचा आणि आपला फोटो काढून घेऊन कुठला जमिनदार स्वतःच्या हाताने आपल्या पायांवर धोंडा पाडून घेईल? दुसरीशीच लग्न केल्यावर आधीच्या प्रेमपात्राचा फोटो कशाला आपल्या घरात ठेवेल? आपल्या वस्तीत बसल्या बसल्या सरदार प्रभातला रिमोटली कसा काय हिप्नोटाईझ करतो? रेश्मा प्रभातच्या घरात अगदी बेडरूमपर्यंत कशी येते? चित्रपटाच्या शेवटी प्रभात आणि संध्या त्या झोपडीत आहेत हे रेश्माला अंतर्ज्ञानाने कळतं का? वारंवार गाडी बंद पडत असताना प्रभात ती एकदा मेकॅनिकला दाखवून का आणत नाही? Happy गाडी आपोआप चालू होते तेव्हा प्रभात गाडीबाहेर असतो मग संध्या बाहेर उडी मारायच्या ऐवजी त्याच्या नावाने बेंबीच्या देठापासून का बोंबलत असते? तो काय सुपरमॅनसारखा उडून येणार असतो का तिला वाचवायला? Uhoh एक वर्ष ब्रह्मचारी राहण्यामागे काय लॉजिक असतं हे तर माझ्या आकलनशक्तीपलिकडलं आहे. त्यात एकदा प्रभात देवापुढे जाऊन 'मला माझ्या व्रताचं पालन करायची शक्ती दे' असं म्हणतो. आता ह्यात देव काय करणार? तो म्हणणार मी तुला थोडंच सांगितलं होतं ह्या भानगडीत पडायला. Proud कैच्या कै.

पण हिंदी चित्रपटात फार लॉजिक शोधायचं नसतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की. मेंदूला दोन-अडीच तासांचा टाईमआऊट देऊन एन्जॉय करण्यासारखा हा चित्रपट नक्कीच आहे. मोबाईलसारखा मेंदूसुध्दा कधीकधी बाजूला काढून चार्जिंगला लावावा लागतो. त्यालाही आराम आणि आपल्यालाही. आणि आपल्याला असं करता येतं ही देवाजीची मोठी कृपा आहे, नाही का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, तू धडाकाच लावलास ग पिक्चर बघायचा.

मी हे नाव इथेच ऐकले पहिल्यांदा. चित्रपट पाहिलेला नाही. एक बार जरा... गाणे रेडिओवर ऐकलंय तेवढंच…

आता पहावा असे वाटतेय, तू मस्त लिहिलंस, शेवट काय असेल याची उत्सुकता वाटतेय. नेहमीसारखे इस्टेटीचे प्रकरण नसावे ही प्रभुचरणी प्रार्थना.

शेवट लिही ना. हे सगळं वाचून पुढे काय ही उत्सुकता निर्माण होते. आणि ती शमवण्यासाठी हा चित्रपट (हा काय कोणताच) इतक्यात बघता येईल असं वाटत नाहीये. सो जेव्हा स्टोरी अशी अर्धवट सोडतेस तेव्हा (हवं तर स्पॉयलर अलर्ट देऊन) उरलेली कथा कमेंट्स मध्ये लिहीत जा ना प्लीज.

हा सिनेमा पाहिलेला आठवतो आहे. शेवटी विश्वजीत आणि आशा पारेख हिरो-हिरॉईन असल्याने त्यांना काधी धाड भरत नाही आणि शाप संपतो हे होणारच. यात रेश्माची भूमिका निशीने केली आहे. ही निशी म्हणजे 'जानी दुश्मन' नामक दोन अती अचाट सिनेमे काढणार्‍या राजकुमार कोहलीची बायको आणि दुसर्‍या सिनेमातल्या त्या नागोबा अरमान कोहलीची आई!

बाय द वे, रणबीर कपूरच्या सिनेमात जे 'कतेया करु तेरी' हे गाणे आहे ते मूळ गाणे 'पिंड दी कुडी' या पंजाबी सिनेमात या निशीवर चित्रीत करण्यात आले आहे. या मूळ गाण्याची गायिका होती शमशाद बेगम.
https://www.youtube.com/watch?v=6t_YGFdoRdk

या चित्रपटाचं नाव, गाणी काहीच माहित/ऐकलं नव्हतं.
छान लिहिलं आहे.

> प्रभातचे वडिल मुलगा वयात आल्यावर त्याला ती चिठ्ठी मिळेल अशी व्यवस्था का करत नाहीत? त्याने लग्न करायचं ठरवल्यावर त्याला शापाबद्दल सांगणं थोडं दुष्टपणाचं वाटतं नाही? > वयात आल्यानंतर लग्न करेलच असे काही नाही. जर लग्न करणारच नसेल तर कशाला उगाच शापाबद्दल सांगायचं? असा विचार केला असेल.

> तसंही त्याला 'लग्न करू नको' असं सांगणं म्हणजे आपण भरपेट जेवून दुसर्याला निर्जळी उपवास करायला सांगण्यासारखंच आहे की. Wink > नाह्. भरपेट जेवण कुठे? त्यांची बायकोपण एका वर्षात पोराला जन्माला घालून मरून गेली की!

छान लिहिलंय.
स्पॉयलर अलर्ट देउन शेवट पण लिहि. म्हणजे शापाचं काय? खरंच शाप असतो की कुणाची चाल वैगेरे असते? रेश्माचं काय होतं? वैगेरे वैगेरे Happy

त्या एवढं लिहितात, तर वाचकांपैकी कुणीतरी चित्रपट पाहून शेवट लिहावा.

रिव्हर्स स्वीप, हे कोहली प्रकरण माहित नव्हतं. धन्यवाद!

अ‍ॅमी, अजिबात लग्न नाही त्यापेक्षा एक वर्षाचं लग्न म्हणजे भरपेट जेवणच की. आता प्रभात जमिनदार असल्याने बाहेरचं जेवायची सोय करू शकला असता हा भाग अलाहिदा.

/****** स्पॉयलर अलर्ट सुरुवात ******/
/****** स्पॉयलर अलर्ट सुरुवात ******/
/****** स्पॉयलर अलर्ट सुरुवात ******/

संध्या आणि प्रभात झोपडीत लाडात आलेले असतात. तर तिकडे सध्याच्या सरदाराला कसं कोण जाणे कळतं की ओरिजिनल शाप देणार्या सरदाराने संध्याला माफ केलंय. का ते तो सरदारच जाणे. सध्याचा सरदार तसं रेश्माला सांगतो. पण तिला पटत नाही. ती मी स्वतः संध्याला मारणार म्हणून निघते. सरदार तिला अडवायला जातो तर ती त्याचाही खून करते. मग ती थेट त्या झोपडीत येते. तिची आणि संध्याची झटापट चालू असते तेव्हा झोपडीत एक साप शिरतो. तो दोघींच्या पायाजवळ बसून कोणाला चावायचं ह्यावर गहन विचार करतो आणि शेवटी रेश्माला चावतो. मग रेश्माला पश्चात्ताप होऊन ती मरते. एव्हाना सुंदर संध्याचे वडिल आणि कोतवाल (हे सुंदरचे वडिल असतात) दोघांना घेऊन झोपडीत येतो. शेवटी संध्या आणि प्रभात फुलांनी सजवलेल्या बेडवर बसलेले पाहून पुढचा अंदाज आल्याने मी चॅनेल बदललं. Proud

/****** स्पॉयलर अलर्ट शेवट ******/
/****** स्पॉयलर अलर्ट शेवट ******/
/****** स्पॉयलर अलर्ट शेवट ******/

अरे वा! छान वाटलं या चित्रपटाचं परीक्षण इथे बघून! मस्त लिहिलं आहे. तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया वाचून हा चित्रपट बघितल्याबद्द्ल धन्यवाद!

विश्वजित या रहस्यमय, black & white चित्रपटांतूनच जास्त आवडतो. नंतरच्या रंगीत, केवळ romantic चित्रपटांतून तो वात आणतो. तो 'इश्क पर जोर नही' या एकाच चित्रपटात आवडला होता. त्यात तो, साधना आणि धर्मेंद्र होते. सचिनदेव बर्मनदांचं सुमधूर संगीत आणि विश्वजितची थोडी ग्रे छटा असलेली व्यक्तिरेखा हीच चित्रपटाची जमेची बाब. साधना आणि धर्मेंद्र एरवी खूप आवडतात पण या चित्रपटात दोघेही सहन होत नाहीत. चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे लगेच विस्मरणातही गेला. धर्मेंद्र आणि विश्वजितबरोबर साधनाने काम केलेला हा एकमेव चित्रपट. तसंच साधनाचा हा एकमेव चित्रपट ज्याला बर्मनदांचं संगीत होतं.