बैलपोळा सण हा तसा माझ्या ओळखीचाच. पण सासरी आल्यावर त्या सणाच्या ओळखीसोबतच त्यांचे महत्वही पटले. नवीन लग्न झाले होते. पोळा सण असल्यामुळे सासुबाईनी गावी बोलावुन घेतले. पोळा सण तीन दिवस हा चालतो. या तीन दिवसात बैलाला काम कराव लागत नाही. पहिला दिवस असतो खांदमणीचा. यात पळसाची पानं व तुपानी बैलाची पाठ शेकली जाते. त्याची आंघोळ घालुन त्यांची पुजा होते. व छान पुरणपोळीचा नैवद्य दाखविला जातो. त्याच बरोबर गावातील आजुबाजुच्या घरातील बैल असतील तर त्यांच्या मालकांना व शेतावर काम करणाऱ्या गडी माणसांना तिन्ही दिवस जेवायला बोलवतात. त्यामुळे तिन्ही दिवस घरी दिवाळी सारखी धावपळ असते.
दुसरा दिवस असतो खास पोळ्याचा. बैलाला आंघोळ घालुन , सजवलं जातं., अंगावर झुल टाकतात, शिंगाना रंग लावला जातो. गळयात वेगवेगळया माळा, घटया घालतात . संध्याकाळी सजवलेला बैल पोळयात नेतात त्यापुर्वी त्याला ग्रामदेवतेच दर्शन करायला नेतात. जिथे पोळा भरतो तिथे गावातील सर्व बैल येतात. एक मोठे तोरण लावलेले असते त्या खाली सर्व बैल उभे राहतात. बैलाची पुजा झाल्यावर .झडती ( एक प्रकारचे गाणे ) म्हणतात
आभाळ गड गडे, शिंग फडफडे,
शिंगाला पडले नऊखडे,
नऊ खड्याच्या नऊ धारा,
बैल गेला पाऊन खडा ,
पाऊन खड्याची आणली माती,
ती दिली पार्वतीच्या हाती,
पार्वतीने घडवली,
माझ्या बैलाची शिंगशिगोटी,
एक नमन कवडा , बोला हरहर महादेव.
अश्या वेगवेगळया प्रकारच्या झडत्या लोक म्हणतात . यानंतर गावातील पाटील, पंच मंडळी मानाची जोडी निवडतात. आणि ज्याची जोडी निवडली गेली त्याच्या घरी सर्व गावातील मंडळी साठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो. घरी महिला मंडळी भावाच्या पाठीवर काकडी फोडतात. व त्यातील बिया अंगणात , घरात टाकतात. पोळयात गेलेल बैल घरोघरी जातात व पोळी मागतात. बैलाची पुजा करुन पुरणपोळीचा नैवद्य देतात व बैलाच्या मालकाला पैसे दिले जातात.
अश्या प्रकारे मोठ्याचा बैल पोळा साजरा होतो.
तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. हा दिवस लहानाचा असतो. ज्याप्रकारे मोठया बैलाचा पोळा भरतो त्याप्रमाणे लहान मुलंही आपले मातीचे , लाकडी बैल घेउुन येतात. गावी हा तान्हा पोळा आमच्या कडून आयोजीत व्हायचा सकाळ पासून लगबग सुरु असायची. घरची पुरुष मंडळी गावातील मुलाना हाताशी घेऊन तोरण बांधणे , पुजेची तयारी करणे सुरु असते. सर्व गावातील मुलं आपले मातीचे बैल घेऊन तोरणाखाली उभे असतात. सर्व बैलाची पुजा होते . मुलांना बिस्कीट पुडे व पैसे दिले जातात.येथेही मोठ्या बैल पोळ्या प्रमाणे एक मानाची जोडी काढली जाते. व मानाची जोडी असते त्याच्या घरी गावातील सर्वासाठी चहापाण्याचा कार्यक्रम असतो.
वरवर हा एक सण दिसत असला तरी तो गावाच्या एकोप्यासाठी एक महत्वाचा आधारस्तंभ ठरतो. कारण येथे कुठलाही जाती भेद न ठेवता . चहापाण्याचा कार्यक्रमानिमित्त सर्वजण एकमेंकाकडे जातात कुठलाही भेदाभेद न ठेवता. त्याच बरोबर सर्वाचे एकत्र येणे होते. वर्षभर आपल्याला मदत करणाऱ्या जीवाशिवाच्या बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण.पोळा सण अनुभवायचा असेल तर तो गावातच अनुभवावा.
कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा........पोळा सण
Submitted by sarika choudhari on 6 October, 2018 - 07:29
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त वर्णन आहे.बैलाची पाठ
मस्त वर्णन आहे.बैलाची पाठ शेकण्याचा मुद्दा सर्वात जास्त आवडला.
फोटो पण टाका ना.अजून शोभा येईल वर्णनाला.
छान वर्णन.
छान वर्णन.
गावी मोठ्या पोळ्याला जत्रा भरत असे, त्यात विविध आकर्षक खेळणी, खाऊ विकायला ठेवले असत.
तान्ह्या पोळ्याला आम्ही खेळण्यातले / मातीचे बैल घेऊन घरोघरी जात असू, खाऊ / पैसे मिळत असत. पाचव्या वर्गात गेल्यावर मात्र हे बंद असा प्रघात होता.
आमच्या गावी पण असते जत्रा
आमच्या गावी पण असते जत्रा पोळ्याची..
आम्ही लहानपणी जायचो बघायला. पण बैलांना आराम द्यायचा असतो म्हणायचे पण तिथे बैलांची शेपटी पिरगाळायचे लवकर पळावे म्हणुन कुणी पाण्याचे फुगे मारायचे.
दुसर्या दिवशी मारबत आणि बडगा काढतात सकाळी. तान्ह्या पोळ्याला खुप मज्जा यायची लाकडाचे बैल घेऊन जायचो चुरस असायची आमच्यात कुणाला जास्त बोजारा मिळतो याची.
(बोजारा = पोळ्याला मिळणारे पैसे / खाऊ)
माझ्या एका आज्जीच्या गावी मोठय़ा पोळ्याच्या दुसर्या दिवशी गोटमार होते. दोन गावांमध्ये दगडांचा मारा सुरू असतो नदीपात्रात लावलेला ध्वज तोडण्यासाठी. कित्येक वर्षांची परंपरा आहे तिथे. बरेच लोक येतात बघायला. Mp त आहे ते गाव पांढुर्णा नावाचे.
याबद्दल काहीच माहित नाही.
याबद्दल काहीच माहित नाही. फोटो हवे होते.