RIP ‘फ्रेंड’!

Submitted by झुलेलाल on 5 October, 2018 - 10:34

परिस्थितीचे चटके माणसाला शहाणं करतात की नाही, माहीत नाही. पण जनावरं मात्र या अनुभवांतून खूप काही शिकतात. परिस्थितीशी जुळवून घेतात आणि त्यावर मातही करून स्वत:चे जगणे सोपे करून घेतात.
गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एका दिवशी हा नवखा देखणा, बोलक्या डोळ्यांचा कुत्रा अचानक कुठून तरी आमच्या गल्लीत आला. चुकून आला, की घरात नकोसा झाला म्हणून कुणी आणून सोडला, माहीत नाही.
काही लोक हौस म्हणून कुत्रे पाळतात, मग कालांतराने त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी जाणवू लागल्या की त्यांना बेवारस स्थितीत लांब कुठेतरी सोडून देतात. घराच्या सावलीची सवय झालेली ही कुत्री रस्त्यावर आली की बावरतात. कावरीबावरी होतात. काही काळाकरिता त्यांचा माणसावरचा विश्वासही बहुधा उडून जातो, आणि ती माणसाला जवळही येऊ देत नाहीत. एकीकडे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचे भय आणि दुसरीकडे, माणसांचं दुरावलेलं प्रेम या कोंडीत ही कुत्री अधिकच केविलवाणी होतात...
... गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा आमच्या गल्लीत आला तेव्हा काहीसा असाच, केविलवाणा, कावराबावरा होता. फूटपाथवर अंग चोरून बसायचा. प्रत्येक माणसाकडे अविश्वासाच्या नजरेनं बघत स्वत:ला माणसापासून लांब ठेवण्यासाठी धडपडायचा...
पण तो आमच्या गल्लीत आला हे त्याचे नशीब. त्याआधी कुणीतरी आमच्याच गल्लीत आणून सोडलेल्या एका कनवाळू कुत्र्याला इथे नवे पालक मिळाले होते, तर कुठून तरी जबर मार खाऊन पळून आलेल्या कुत्रीला माझ्या मुलीने मालाडच्या अहिंसाच्या केंद्रात दाखल केले. लागोपाठ आलेल्या या तिसऱ्या पाहुण्याने गल्लीतच फूटपाथवर तळ ठोकला, पण माणसांपासून मात्र फटकून वागू लागला.
... हीच परिस्थिती त्याला शहाणपण शिकवून गेली. भूक आणि भय यांपासून संरक्षणासाठी माणसाच्या सोबतीने रहावेच लागेल हे त्याला कळले, आणि एका सकाळी आमच्या स्नोईला घेऊन मी उतरलो असता लांबूनच आम्हाला पाहून त्याने शेपूट हलविले...
त्याच्या नजरेतील अविश्वासही संपला होता!
त्या दिवशी मी त्याला आपुलकीने थोपटले, आणि आमच्या स्नोईचा तो दोस्त झाला.
मग आम्ही त्याला नाव दिले... ‘फ्रेंड!’
हा फ्रेंड खूपच मायाळू होता. ज्या घरातून तो आला तिथेही त्याने माणसांवर निरपेक्ष प्रेम केले असणार हे त्याच्या समजुतदार वागण्यातून कळून येऊ लागले. पुढे तो गल्लीतल्या अनेकांच्या ओळखीचा झाला. बाजूच्याच शाॅपिगमधील दुकानदारांशीही त्याची मैत्री झाली. एटीएमच्या सिक्युरिटीवाल्यांचा तर तो सच्चा साथीदारच झाला.
... आणि आमच्या स्नोई, शेरूसारख्या अनेकांचा ‘फ्रेंड’!
गेल्या वर्षभरात त्याने खूप लळा लावला. स्नोईच्या जेवणासोबत त्याचंही जेवण बाजूला काढलं जाऊ लागलं. एटीएमच्या वाॅचमनच्या टिफीनमधे दोन चपात्या त्याच्याचसाठी जादा येऊ लागल्या, आणि सकाळी वाॅकला जाताना सोबत रस्तोरस्तीच्या कुत्र्यांकरिता चिकन विकत घेऊन वाटत जाणाऱ्या एका श्वानप्रेमीला तर या फ्रेंडने प्रेमाने पुरते जिंकले!
गेले वर्षभर गल्लीतल्या लोकांनीही त्याला माया दिली. जवळपास प्रत्येकाशी त्याची ओळखही झाली होती. नेहमी आसपास दिसणारी माणसं दिसली, की शेपूट हलकेसे हलवून तो ती ओळख दाखवायचा...

महिनाभरापूर्वी अचानक त्याची तब्येत पार बिघडली. त्याच्या नजरेतलं बोलकेपण विझून गेलं. कमालीच्या अशक्तपणामुळे त्याची हालचालही थंडावली. लोकांनी आणून दिलेलं खाणं मलूलपणे हुंगून तो मान फिरवू लागला, आणि अनेकजणांना त्याची काळजी वाटू लागली. माझ्या मुलींनी त्याला डाॅ. पेठेंकडे नेलं. सलाईन, इंजेक्शन्स सुरू झाली. ठरलेल्या वेळी औषधंही सुरू झाली.सगळ्या टेस्टस करून घेतल्या, आणि हळुहळू तो सावरू लागला. त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी माझ्या मुलींनी- विदिशा आणि सलोनीने- केलेल्या प्रयत्नांची कृतज्ञता तो व्यक्त करायचा. त्या दिसल्या कीत्याच्या अशक्त पायांनी धडपडून उठत तो जवळ यायचा...
तेव्हा त्याच्या नजरेतले भाव वाचता यायचे!
तो बरा होत होता, आणि त्याच्यावर माया करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा आनंद वाटत होता.
गेल्या आठवड्यात मात्र, तो दिसलाच नाही. बाजूच्याच काॅंप्लेक्समधे आत कुठेतरी असेल असे सगळ्यांनाच वाटत होते.
... आणि एका संध्याकाळी एका कोपऱ्यात त्याचा निश्चल देह आढळला.
कितीतरी माणसांवर माया उधळणारा आमच्या फ्रेंडने जगाचा निरोप घेतला!..
आज तिथून येजा करताना आमचा स्नोईही थोडासा थबकतो. त्याला शोधतो...
कुठूनतरी येऊन तो प्रेमानं जवळ थांबेल, शेपटी हलवत पायाशी झुकेल असं उगीचच वाटू लागतं.
काही महिन्यांपूर्वी एक पिल्लू चुकून गल्लीत आलं, आणि फ्रेंडने त्यालाही माया दिली. फ्रेंडसोबत ते वाढू लागलं!
... आता ते कुठेतरी कोपऱ्यात शून्यपणे बसलेले दिसते.
फ्रेंडसोबतच्या आठवणीत गुरफटल्यासारखे... एकटेच!

friend_1.jpg

Group content visibility: 
Use group defaults

काही काळाकरिता त्यांचा माणसावरचा विश्वासही बहुधा उडून जातो, आणि ती माणसाला जवळही येऊ देत नाहीत.>>> ओह!

आमच्या गावातील कॉलनीतही सगळ्यांचा आवडता एक कुत्रा होता, वाघ्या. तो गेल्यावर सगळे हळहळले होते.

आमच्या काकांनीही एक कुत्रा पाळला होता. पण काका वारल्यावर काही दिवसात तो ही वारला. खुप वाईट वाटलेल त्यावेळी. ज्यावेळी काकांचे प्रेत आणले. त्यावेळी सतत रडत होता आणि त्यांच्या प्रेताजवळ जायचा प्रयत्न करत होता. पण आमचे दुर्दैव एका उकिरड्याजवळ तो मरुन पडला. आणि नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी उचलुन नेले.

लेख वाचुन वाईट वाटलं. तुम्हाला नेमकं काय वाटत असेल ते रिलेट नाही करु शकत पण तरीही तुम्हा सगळ्यांना खुप सारे हग्स!
तुमच्या मुलींनी त्याला हवी तेवढी माया दिली त्यामुळे किमान तो एक गिल्ट नसेल मनात!

आवांतर - शीर्षक वाचून प्रचंड धास्तावले, फ्रेण्ड्स म्हणलं की मला टिव्ही सिरिअलच आठवते आणि त्यात मॅथ्यु पेरी आजारी असल्याच्या बातम्या ऐकतेय. म्हणतात ना मन चिंती ते Sad

आवांतर - शीर्षक वाचून प्रचंड धास्तावले, फ्रेण्ड्स म्हणलं की मला टिव्ही सिरिअलच आठवते आणि त्यात मॅथ्यु पेरी आजारी असल्याच्या बातम्या ऐकतेय. म्हणतात ना मन चिंती ते Sad>> +१. त्यामुळे जरा टेन्शन मधेच धागा उघडला मी.. मॅथ्यु बद्दल माहित नव्हत.. देव करो तो लवकर ठिक होवो..

मला असे वाटते की भटक्या जनावरांचे निर्बिजीकरण करावे. त्यांना आसरा द्यावा व प्रजा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या वेदना ,अवहेलना आणि वाईट अवस्थेतील अंत बघून वाईट वाटते. We need a law for stray animals

आमच्या कॉलनीत पण एक देखणा कुत्रा होता. राजा म्हणायचो आम्ही त्याला!
मागचा एक पाय लंगडा होता. रोज नेमाने ७.१५ ला दारासमोर येवून उभा रहायचा. पोळी दिली की घेवून जायचा. कधी खात बसला नाही.
खूप प्रेमळ! लहान मुले जवळ जायची, थोपटायची पण त्याने कधी रागाने मान पण हलवली नाही.
नंतर गायब झाला, कुठे गेला कोण जाणे Sad

Oops Sad

या मुक्या प्राण्यांच्या कथा मनाला चटका लावून जातात. खास करून डॉगीच्या. मी शक्यतो अशा कथा वाचायचं टाळतो पण दुसरं मन वाचल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. RIP __/\__