साठ-सत्तरच्या दशकात (किंवा कदाचित त्याच्या आधीही असेल. ५० च्या दशकातले चित्रपट पाहायची माझी मानसिक तयारी अजून तरी झालेली नाही) बर्याच हिंदी चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांना परदेशदर्शन घडवलं. मग तो अॅन इव्हिनिंग इन पॅरिस असो, नाईट इन लंडन असो, द ग्रेट गॅम्बलर (कैरो, लिस्बन, व्हेनिस, रोम) असो की हरे रामा हरे कृष्णा (नेपाळ) असो. अर्थात हेही केवळ हिरो-हिरॉईनला गात बागडायला रमणीय बॅकड्रॉप हवा म्हणून नव्हे तर कथानक परदेशात घडतं म्हणून. ह्याच पठडीतला एक रोमँटिक सिनेमा म्हणजे '६६ साली आलेला लव्ह इन टोकियो. जॉय मुकर्जीच्या 'Love In’ ह्या trilogy अंतर्गत आलेला हा दुसरा चित्रपट अशी माहिती विकिवर मिळते. ह्या मालिकेतला पहिला 'लव्ह इन सिमला' (१९६०) आणि तिसरा 'लव्ह इन बॉम्बे' (१९७४). पैकी 'लव्ह इन सिमला' मध्ये त्याच्यासोबत साधना होती तर 'लव्ह इन बॉम्बे' मध्ये वहिदा.

तर आधी चित्रपटाची बोटभर कथा. अशोकचं लग्न सरितासोबत ठरलेलं असतं. पण त्याला ती फारशी पसंत नसते. त्यात सरिताच्या १७ व्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचे वडिल 'आता लग्न करून टाकू' असा धोशा लावतात तेव्हा तर अशोकला आपल्या मित्राची, महेशची, मदत घेऊन चक्क पार्टीतून धूम ठोकावी लागते. घरी त्याच्या करारी, शिस्तप्रिय, बाणेदार वगैरे (थोडक्यात, नवऱ्याच्या मागे पोरांना वाढवणाऱ्या बायका जश्या असण्याची पध्दत हिंदी सिनेमात आहे तश्या असलेल्या) आईजवळ, म्हणजे गायत्रीदेवींजवळ, त्यांचे वकिल एक चिठ्ठी घेऊन येतात. गायत्रीदेवींचा मोठा मुलगा काही वर्षांपासून जपानमध्ये स्थायिक झालेला असतो. त्याने आईच्या इच्छेविरुध्द एका जपानी पोरीशी लग्न केल्यामुळे गायत्रीदेवींने त्याच्याशी सर्व संबंध तोडलेले असतात. त्याचा मृत्यू झाल्याचं कळूनही त्यांच्या निर्णयात काही बदल झालेला नसतो. वकिलांनी आणलेली चिठ्ठी त्यांच्या जपानी सुनेने मरण्यापूर्वी लिहिलेली असते (भारतीय सून काय लिहील एव्हढं आतडं पिळवटून टाकणारी ती चिठ्ठी कोणी जपानी लिहील असं मला तरी वाटत नाही. पण ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला की हे असं होतं असावं) . आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला अनाथालयात जावं लागू नये म्हणून नातू म्हणून नव्हे तर निदान एका निराधार महिलेचा मुलगा म्हणून तरी त्याला सांभाळा अशी विनंती तिने केलेली असते. वंशाच्या दिव्याबद्दल ऐकताच गायत्रीदेवी (अर्थातच!) हळव्या होतात. आणि नातवाला आणायला अशोकने त्वरित जपानला जावं असं फर्मान काढतात. सरिता लगेच त्याच्याबरोबर जायचा मनोदय व्यक्त करते. पण अशोक भारतीय संस्कृती, बायकांचं अदबशीर वागणं वगैरेवर एक छोटेखानी भाषण देऊन तिचा बेत हाणून पाडतो. आणि एकटाच जपानला जातो.
महेशचं शीला नामक मुलीवर प्रेम असतं पण तिचे वडिल ह्या लग्नाच्या विरोधात असल्याने तिला भारतातून थेट जपानमध्ये घेऊन जातात. विमानात अशोकची गाठ ह्या दोघांशी पडते तेव्हा शीलाचे वडिल 'टोकियोत काही मदत लागली तर मला कळव' असं म्हणतात ( ते Amway वाले नसतात बरं का!)
सर्व भारतीय आईबापांना आपल्या मर्जीने मुलाचं-मुलीचं लग्न लावून द्यायची सवय असते (जी आजतागायत कायम आहे!) त्यानुसार आशाचे काका तिचं लग्न प्राणशी लावून देणार असतात. ह्याला आशाच्या स्वर्गवासी पिताश्रींची संमती असते. आणि हे लग्न झाल्यावरच त्यांचा वकिल आशाच्या वडिलांनी मरायच्या आधी तिच्यासाठी ठेवलेलं एक पत्र तिला देणार असतो. (तेव्हाच्या काळात कुटुंबाचे वकिल आणि लग्नाचे मुहूर्त काढून देणारे गुरुजी हे गरज पडायच्या आधीच हाताशी असायचे!). अर्थात काका आणि प्राण दोघांचा आशाच्या गडगंज संपत्तीवर डोळा असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. पण आशाला प्राण अजिबात पसंत नसतो. त्यामुळे ती साखरपुड्याच्या दिवशीच टोकियोतल्या आपल्या घरातून पळून जाते. तिला शोधायला काका ५००० डॉलर्सचं इनाम जाहीर करतात (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!).
दरम्यान अशोक टोकियोला पोचून आपल्या पुतण्याला, चिकूला, भेटतो खरा पण चिकू त्याच्याबरोबर भारतात यायला साफ नकार देतो. आशाच्या काकांनी तिला शोधून आणणाऱ्यांना इनाम जाहीर केल्याची बातमी तो टीव्हीवर पाहतो आणि घरातून पळून जातो. अर्थात कोणीतरी म्हटल्याप्रमाणे It’s a small world. पुन्हा निदान तेव्हाच्या काळात तरी जपानमध्ये फार गर्दी दिसत नव्हती (इथे आमच्या रानडे रोडला तेव्हाही कोणी गणपतीच्या किंवा दसरा-दिवाळीच्या दिवसांत हरवला तर एकदम ख्रिसमसलाच सापडत असेल ह्याची मला खात्री आहे!). तेव्हा चिकू नेमका आशाला जाऊन धडकतो. मग आशाला शोधायला निघालेला प्राण आणि चिकूला शोधायला निघालेला अशोक ह्या दोघांना गुंगारा देत देत आशा आणि चिकू टी-हाउस, शीलाच्या बापाचं दुकान असा त्रिखंडात संचार करत, वेषांतर करत पळत राहतात. पण शेवटी प्राणच्या हातावर तुरी देऊन अशोक, आशा आणि चिकू ह्या तीन ओंडक्यांची सागरात भेट होते. आशाने कोणी ओळखू नये म्हणून सरदारजीचा वेश धारण केलेला असतो. आणि अशोक पुरता माठ असल्याने 'ही बाई आहे' हे काही त्याच्या ध्यानात येत नाही. ह्या सगळ्या पळापळीत चिकूने हात फ्रॅक्चर करून घेतलेला असतो. त्याला सरदारजीचा उर्फ आशाचा लळा असल्याने अशोक तिलाही चिकूला सांभाळायला टोकियोतल्या आपल्या भावाच्या घरी घेऊन येतो. अर्थात त्यांचं भारतात येणं लांबणीवर पडतं. दरम्यान शीलाच्या जाण्याने अस्वस्थ झालेला महेश 'अशोकची टोकियोमध्ये एका जपानी मुलीसोबत जवळीक वाढलेय' अशी लोणकढी गायत्रीदेवींना मारून आपली जपानला जायची सोय करून घेतो. मग अशोक-महेश भेट, आशा बाई आहे हे अशोकला कळणं, दोघांचं एकमेकावर प्रेम बसणं, प्राणने आशाला किडनॅप करणं, शीला-महेशने तिला सोडवणं वगैरे गोष्टी यथासांग पार पडतात.
आता एव्हढं सगळं चांगलं चाललंय म्हणजे माशीला सर्दी होणारच. म्हणजे माशी शिंकणारच हो. सरिताचे वडील गायत्रीदेवींचे कान भरून त्यांना आणि सरिताला घेऊन टोकियोत येतात. (तेव्हाच्या काळात मुंबईहून शिवनेरी किंवा नीता व्हॉल्वो पकडून पुण्याला जावं अश्या सहजतेने मंडळी घाऊक गर्दी करून भारतातून जपानला जाताना पाहून मला तर भरून आलं). आईसाहेब आशाला त्वरित नापसंत करतात. मग चित्रपटाचा शेवट जवळ आला नसतानाही हिंदी सिनेमातली सुप्रसिध्द मॅरेथॉन सुरु होते, त्या पळापळीत प्राण अशोकला गाडीने उडवतो आणि अशोकची दृष्टी जाते. तेव्हा आईसाहेबांना सरिता आणि आशा दोघीतल्या फरकाची जाणीव होते. यथावकाश अशोकला दृष्टी परत मिळते (टीव्ही चॅनेलवर चित्रपटाच्या प्रायोजकांनी त्यांच्या पाइल्सच्या औषधाची जाहिरात २०-२५ मिनिटं दाखवल्याने चित्रपट कापला. त्यामुळे हा चिमीत्कार कसा झाला हे माहित नाही!) . सरिता आणि तिचे वडिल दोघांना हाकलून लावण्यात येतं. गायत्रीदेवी नातवाला स्वीकारतात. अशोक आणि आशा शुभविवाह ठरतो. पण.......
पण, किंतु, परंतु......बंधू.....आणि भगिनींनो.....ह्या 'पण'च्या पुढे काय आहे हे कळण्यासाठी चित्रपट पहा असं म्हणायला माझी जीव धजावत नाही. कारण चित्रपटाची गाणी पाहून-ऐकून हा रोमँटिक चित्रपट आहे अशी समजूत होते खरी. पण प्रत्यक्षात तो रोमान्स तोंडी लावण्याइतकाही नाही. महेश-शीला-शीलाचे वडिल ह्यांचा आचरटपणा मात्र चित्रपट भरून वर दशांगुळे उरला आहे. फक्त तो सहन करायची तयारी असल्यासच चित्रपट पाहावा.
चित्रपटाच्या नायकाची भूमिका जॉय मुकर्जीने केली आहे म्हणजे तो अशोक. मला स्वत:ला जॉय मुकर्जी आवडतो. बंगाली नायकांच्या मानाने सणसणीत उंची, देहयष्टी आणि बर्यापैकी देखणा (आणि तरीही बायकी न दिसणारा!) चेहेरा हे तिन्ही त्याच्याकडे आहेत. रोमँटिक हिरो म्हणजे शेवटच्या काही रिळांत पोलिस यायच्या आधी व्हिलनला ३-४ चापट्या, थोडे बुक्के, काही गुद्दे मारणे, त्याचा गळा धरणे, थोडीफार लाथाळी करणे ह्यापलीकडे फायटिंग स्किल्स लागत नाहीत. बाकी राहिली गाणी अन हसणं-रागावणं-आश्चर्य-संभ्रम वगैरे प्रेमात पडलेली मंडळी करतात त्या लीला. त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' ह्या न्यायाने त्याने भूमिका बर्यापैकी वठवली आहे. आशाच्या भूमिकेत आशा पारेख आहे. तिचं थोडं लाडिक बोलणं (ह्या बाबतीत शर्मिला चार पावलं पुढे आहे म्हणा!) सोडलं तर तीही हिंदी नायकप्रधान (म्हणजे जवळपास सर्वच!) चित्रपटात नायिकेकडून असणाऱ्या ज्या काही अपेक्षा असतात त्या बर्यापैकी पूर्ण करते. फक्त गायत्रीदेवी उगाचच तिच्या कानाखाली जाळ काढतात तेव्हा ती मुळूमुळू रडते ते मात्र मला अजिबात आवडलं नाही. तिने ठणकावून सांगायला हवं होतं की "हे बघा आईसाहेब, माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे पण म्हणून मी वाटेल ते अजिबात सहन करणार नाही. तेव्हा परत हात उचलायचा नाही. काय समजलेत?”. असो. प्राणच्या भूमिकेत प्राण सिकंद नेहमीप्रमाणेच शोभला आहे. मदन पुरीने आशाच्या काकांची भूमिका केली आहे तर ललिता पवारने गायत्रीदेवी साकारल्या आहेत. महेश म्हणजे महमूद हे एव्हाना लक्षात आलं असेल. त्यामुळे शीलाची भूमिका शुभा खोटेने केली आहे हेही ओघाने आलंच.
बाकी भूमिकांत धुमाळ (शीलाचे वडील), मुराद (गायत्रीदेवींचे वकिल), मोहन चोटी (शीलाच्या वडिलांचा सहाय्यक), असित सेन (शीलाचं लग्न तिच्या वडिलांनी ह्याच्याशी ठरवलेलं असतं) आणि तरुण बोस (अशोकचे डोळे जातात तेव्हा त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर) ही मंडळी दिसतात.
चित्रपट गाण्यांच्या बाबतीत मात्र अजिबात निराश करत नाही. हसरत जयपुरीचे शब्द, शंकर-जयकिशनचं संगीत आणि लता मंगेशकर-मोहम्मद रफी-मन्नाडे ह्यांचे आवाज. सायोनारा, ओ मेरे हे शाहे-खुबा, ले गयी दिल गुडीया जापानकी, आ जा रे आ जरा, कोई मतवाला आया मेरे द्वारे आणि मुझे तुम मिल गये हमदम (पाइल्सवाल्यांनी हे गाणंही कापायला लावलं. त्याबद्दल त्यांना आधी रौरव आणि मग कुंभीपाक!) पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच.
टीचभर कथेचा दोन-अडीच तासांचा चित्रपट करताना त्याचं जे होतं तेच ह्या चित्रपटाचं झालं आहे. विनोदाच्या नावाखाली आचरटपणा, थिल्लरपणा आणि पाचकळपणा ह्यांचा अतिरेक झाला असल्याचं आधी म्हटलंच आहे. गेईश्याच्या नाचाच्या वेळी महमूदने जे काही हावभाव केलेत ते जपानी संस्कृतीची टर उडवणारे, अनादर करणारे वाटतात. अशोकचे डोळे जातात तेव्हा गायत्रीदेवी आणि आशा 'माझे डोळे घ्या' चा जो काही धोशा लावतात तो पाहून हसावं का रडावं तेच कळत नाही. त्यात तो डॉक्टर भारतीय असतो म्हणून हा वेडेपणा खपवून घेतो. एखादा जपानी असता तर त्याने 'एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू काढून ह्या दोघींच्या डोक्यात त्याचा अर्धा-अर्धा भाग बसवावा काय' असा विचार केला असता. :रागः आणि हो, मिशन इम्पॉसिबल मध्ये मास्क वापरण्याआधी ह्या लोकांनी त्याचा शोध लावला होता.
आहात कुठे?
थोडक्यात काय तर हा चित्रपट तेव्हा जपानमध्ये दाखवला असता तर '६६ मध्ये ते नक्की आपल्यावर चाल करून आले असते.
ता.क. चित्रपटात आशा पारेखने तिचा पोनीटेल बांधायला वापरलेल्या क्लिपवरून तश्या हेअरक्लिप्सना पुढे 'लव्ह इन टोकियो' असं म्हणायला लागले हे विकीवरून कळलं.
mi_anu, पिक्चरचं नाव
mi_anu, पिक्चरचं नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद! लगेच माझ्या लिस्टमध्ये अॅड केला.
कविता, बी.एस. धन्यवाद! हे लेख वाचून तुम्ही सगळे ह्यातले काही जुने चित्रपट पहाताय हे वाचून खूप मस्त वाटतंय.
मस्तच चालली आहे मालिका
मस्तच चालली आहे मालिका
लिखते रहो
no matter ललित कि चित्रपट
स्वप्ना, लेख चित्रपट विभागात
स्वप्ना, लेख चित्रपट विभागात लिहून जर पब्लिक केले तर सर्वांना दिसतात - तेव्हा त्यांची व्हिजिबिलिटी कमी होणार नाही.
पण चित्रपटविषयक लेख चित्रपट विभागातच लिहावेत या मताची मीही आहे - त्या मुद्द्यावर हाबला अनुमोदन.
चित्रपटचिषयक लेख चित्रपट
चित्रपटचिषयक लेख चित्रपट विभागातच लिहावेत +१.
थरार चित्रपटांचा विषय निघालाय - अमिताभचे बेनाम आणि मजबूर. दोन्ही अनेक वेळा पाहिलेत.
हा ब अनुमोदन. मला ही सर्व
हा ब अनुमोदन. मला ही सर्व सीरीज सखाराम गटणे कसे पुस्तक परीक्षन लिहीतात तशी वाटते. थोडी कथा. पात्र परिचय. पिक्चर बोअर नट
नटी ओके संगीत बद्दल चार शब्द. एक्सेल शीट रिव्ह्यू. पण लव्ह इन् टो किओ फॉर उदाहरण अप्रतिम संगीत. सर्व अल्ब म उत्तम आहे. व एक एक गाणे पारखून घ्यावे असे आहे. कोई मतवाला आया मेरे द्वारे ह्या उत्तम लता सोलो बद्दल काही नाही. ओ मेरे शाहे खुबा, मुझे तुम मिल गये सनम ऑसम गाणी व सायोनारा आणि इतर दोन गाणी लव्हली टाइप आहेत. पिक्चर आला त्या काळात बहु सं ख्य जनता परदेशी जाउ शकत नव्हती. टीव्ही तर नव्हतेच घरो घरी. त्यामुळे नवलाई होती. मला तर इठलाति बलखाती हे पण जपानीच शब्द वाटा यचे. एका छोट्या बाळाला मांडीवर बसवून सायो नाआ सायोनारा च्या ठेक्यावर टाळ्या पिटलेल्या आहेत. दिग्दर्शकाच्या जागा, त्या काळातले कल्चर ह्या बद्दल काही टिप्प णी, किस्से काहीच नाही. कथा सांगणे हा रिव्यू होत नाही. तो चीकू, तो प्राण त्या हवेली / कोठी व मजेने पिताजी मै सहेलि यो के साथ कल कश्मिर जा रही हू. अशी म्हणणारी नायिका हे फार अप्रु प होते. बस चे तिकीट चे पण बजेट असे खूप लोकांचे.
आशा पारेखच्या मेजॉरिटी कारकिर्दीत जेन्युइन डीप क्रायसिस असे कोनत्या चित्रपटात पक्षी त्याम्च्या कथेत ,आलेत तिच्या? लाडी क लाडु बाई, चांगले नाच संगीत व जोडीला कथा. थोडा विनोद. पण असे सिनेमे पण पब्लिकची गरज असते.
थोडी अजून मेहनत घेतली. तर सीरीज अजून चांगली होईल. व मायबोली विशेष मालिका संग्रह आहे त्यात घालता येइल. सिलेक्षन पण
थोडे रिसर्च करून करता येइल.
चित्रपटचिषयक लेख चित्रपट
चित्रपटचिषयक लेख चित्रपट विभागातच लिहावेत +१.
दिग्दर्शकाच्या जागा, त्या
दिग्दर्शकाच्या जागा, त्या काळातले कल्चर ह्या बद्दल काही टिप्प णी, किस्से काहीच नाही.... कथा सांगणे हा रिव्यू होत नाही. >>>
>>>>
माझ्या मते रुढार्थाने हे परीक्षण नाहीये. जुने सिनेमे ज्यांनी बघितले नाहीत त्यांना ( विशेषतः नवीन जनरेशनला) त्याची ओळख, ती स्वतः या जनरेशनचची प्रतिनिधी असल्याने त्या नजरेने बघतांना काय वाटलं ते तिने लिहिले आहे. म्हणूनच तिला ललित मध्ये लिहावसं वाटलं असेल.
Pages