अजून बाकी आहे..

Submitted by अँड. हरिदास on 1 October, 2018 - 11:14

प्रिय मायबोलीकरांना सप्रेम नमस्कार,

मनाची 'व्यथा' मांडताना मोठा संभ्रम होतोय.. कारण आज पहिल्यांदाच 'कथा' लिहिण्याचा प्रयत्न केलाय.. तसं पाहता कथा,कादंबरी, कविता हा काही माझा प्रांत नाही. एखाद्या विशेष घटनेवर विश्लेषणात्मक लेख लिहिण्याचा आजवरचा अनुभव. पण, सध्या वृत्तपत्रीय क्षेत्रात दिवाळी अंक संपादनाचे काम सुरू असल्याने एका मित्राने दिवाळी अंकासाठी कथा लिहिण्याचा आग्रह केला. “बघूया, जमते का?” म्हणून मीही एक छोटासा प्रयत्न केला आहे.. पण, तो कितपत जमलाय हे समजायला काही मार्ग नाही.. जे मांडता आलं ते आपल्यासमोर ठेवलं आहे.. त्याला अजून शीर्षक देखील देता आलेलं नाही.. सुजान मायबोलीकरांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात, ही अपेक्षा. किंबहुना, असा प्रयत्न करावा की नाही, हे सुचवावे. ही नम्र विनंती.

धन्यवाद..!

भाग 1

"किसकी जिंदगी मे मजबुरी होती है, तो किसी कि जिंदगीही मजबुरी बन जाती है.." 
हे कुठं तरी ऐकलेलं वाक्य आज अजय च्या डोक्यात सारखं फिरत होत..रस्त्यावरून चालत असताना आजवरच्या कटू घटनांचा आलेख खालपासून वरपर्यंत डोळ्यासमोर तरळत होता. चुकलेले निर्णय, स्वकीयांनीच केलेले विश्वासघात अन नियतीने मांडलेला खेळ आठवून त्याचे मन अजूनच खट्टू झाले. हे जग आपल्यासारख्यांसाठी नाही. कि, आपणच या जगात जगण्याच्या लायकीचे नाही. या विचारद्वंदात डोके गरगरू लागले आणि आता काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा, असं ठरवून अजय रस्त्यावर असलेल्या एका पुलावर जाऊन बसला. खरंतर, आता काय करायचे? याचा निर्णय त्याने कधीच घेऊन टाकला होता. दररोजचा मनस्ताप आणि उद्विग्न होऊन जगण्यापेक्षा या जीवनाचा अंत करावा..म्हणजे सुटका!  पण, यावर अजयचा निर्धार पक्का होत नव्हता. आपण हजार चुकलो असेल, पण कुणाचेच वाईट केले नाही, कुणाचाही विश्वासघात केला नाही. सत्याच्या मार्गावर चाललो नसेल पण असत्याचा मार्गही स्वीकारला नाही.त्यामुळे, एक संधी मिळेल, संशयाचे ढग दूर होतील. आणि आपण पुन्हा एक नवी उभारी घेऊ, अशी आशा त्याला नेहमी वाटायची. 'नशीब पालटणार' असल्याचा संकेत त्याच्या मनाने त्याला अनेकदा दिला होता. दुसरीकडे त्याचा स्वभाव त्याला हा निर्णय घेण्यापासून रोखत होता. परिस्थितीसमोर झुकायचे नाही तर लढायचे, सगळ्यांचे हिशोब चुकते करायची उर्मी त्याला अधूनमधून मिळायची. बायको-पोरांचा मोह ही निर्णयाचे निर्धारात रूपांतर करण्यासाठीचा मोठा अडसर होता. त्यामुळे निर्णय झाला असला तरी त्याच्या मनातील विचारसंघर्ष त्या निर्णयाला कृतीत उतरविण्याची हिम्मत देत नव्हता. गेल्या अनेक दिवसापासून अजयच्या मनात असल्या विचारांचे युद्ध सुरु असे. मनातील या खेळामुळे आपल्याला एकदा मानसिक आजार झाल्याची शंकाही त्याला एकदोनदा येऊन गेली. पण त्याने ती मनातून झटकून टाकली. मुळात, तसला काही प्रकार नव्हताही. सकारात्मक आणि संवेदनशील असणाऱ्या एका माणसाला जीवनातील कटू प्रसंगांनी निराशेच्या गर्तेत ओढले होते. स्वार्थी मित्र, निष्ठुर साथीदाराच्या घात-आघातांनी त्याच्या हळव्या स्वभावाला गंभीर इजा पोहचवली होती. त्यामुळे, त्याचा मनात विचारांची ही वावटळ नेहमी उठायची. एरवी वावटळ उठायची आणि काही वेळाने ती शांतही व्हायची. पण, आज वावटळीचे वादळ झाले होते. कुठलातरी ठोस निर्णय घेल्याशिवाय विचारांचं वादळ शमणार नव्हतं. म्हणूनच, काय करायचे ? हे ठरविण्यासाठी अजय एकांतात आला होता...

माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा माणसासाठी अनपेक्षित असतो. कधी कधी वाटतं की आपलं नशीब जोरावर आहे, कारण सगळं कसं मनासारखं घडत असतं. पण चालता-चालता असं एक वळण येते की सगळेच मार्ग तिथे संपतात...
अजय पाटील , तिशीतील उच्चशिक्षित युवक. ठरवलं असतं तर एक सर्वसामान्य सुखी जीवन त्याला मिळू शकलं असतं. मात्र, सुरवातीपासून त्याच्या महत्वाकांक्षा मोठया होत्या. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची इच्छा होती. अर्थात, यबाबद्दल त्याने कुणाजवळ कधी मन मोकळे केले नाही. मात्र त्याचे प्रयत्न सुरू असायचे. त्यात त्याला काहीवेळा यशही मिळले. पण, आज एका वळणावर येवून त्याचं आयुष्य थांबल्यासारखं झालं होतं..
(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users