मी त्या बाबांच्या मठात पोहोचलो. आणि दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. आता माझी पाळी आली. मी बाबांसमोर माझी जन्मपत्रिका ठेवली आणि भविष्य बघतील म्हणून हात पुढे केला. बाबाजींनी माझ्या हातावर एक रुपया ठेवला आणि एखाद्या कागदाच्या कपट्याप्रमाणे जन्मपत्रिका फाडून फेकून दिली.
'बोल बाळा, तुझी काय समस्या आहे'.
मला फार आनंद झाला कारण माझे घरचे आणि नातेवाईकांशिवाय अजून कुणीतरी मला 'बाळा' म्हणून हाक मारली होती.
'बाबा, माझं लग्न जमत नाही'.
'माझ्याकडे सर्व गोष्टींवरचा तोडगा आहे. तुझ्याही समसयेचा तोडगा आहे. पण, तुला मी सांगेन तसं वागावं लागेल. बोल तयार आहेस का?'
'हो बाबा, मी तयार आहे' मी हात जोडत म्हटलं.
ठीक आहे. पण माझी समस्या सोडवण्याची स्टाईल वेगळी आहे. म्हणून माझे भक्त त्यांना जे पाहिजे असेल त्या रुपात येतात. जसा तू नवरी बनून आला आहेस. बरोबर ना?'
मी होकारार्थी मान हलवली.
'जर तुला तुझ्या लग्नाची समस्या सोडवायची असेल तर तुझं लग्न करावं लागेल'.
'पण माझं लग्नच तर होत नाहीये'. मी त्यांना मध्येच थांबवत म्हणालो.
'गप्प बस! जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा कुणीच मध्ये बोलत नाही. जा! मी नाही करत तुझ्या समस्येचा उपाय!' बाबा रौद्र रूप धारण करत म्हणाले.
'नको नको बाबा. मी मूर्खच होतो जो मध्ये बोललो. तुम्ही म्हणाल तसंच होईल' मी बाबांचे पाय पकडले.
'आत्ता कसा आलास लाईनवर! पाय सोड. बर, कुठे होतो आपण?'
'तुम्ही माझं लग्न करण्याबाबत बोलत होतात'.
'तर, तुझं लग्न करावं लागेल. अरे, कोण आहे रे तिकडे? मंगळसूत्र आणि कुंकु घेऊन या'. बाबांनी त्यांच्या चेल्याला आदेश दिला.
मला काही न समजल्याने मी बाबांना विचारलं, 'बाबा'!
'आता काय?' बाबांनी त्रासिक स्वरात विचारलं.
'माफ करा बाबा! पण मला काहीच समजत नाहीये हे कुंकू आणि मंगळसूत्र कशासाठी आहे? ' मी म्हणालो.
'अरे यात काय समजवायच? तुझं लग्न करायचं आहे मग लग्नाचे विधी करण्यासाठी तुला कुंकू आणि मंगळसूत्र नको का?' बाबा म्हणाले.
'ए दिनू नवऱ्याला घेऊन ये रे. त्याला सांभाळून आण. त्याला अजिबात धक्का देऊ नको. नाहीतर तो सगळा मठ डोक्यावर घेईल' बाबांनी पुन्हा त्याच्या चेल्याला आदेश दिला.
'नवरा? नवरा तर मीच आहे ना?' मी दचकून म्हणालो.
'हाताची घडी तोंडावर बोट! तू प्रश्न भरपूर विचारतोस. फक्त तू एवढंच लक्षात ठेव कि तूला जर खऱ्या आयुष्यात लग्न करायचं असेल तर तुला आमच्या नवऱ्याशी लग्न करावं लागेल. तेव्हाच तुझ्या डोक्यावरचं अविवाहितपणाचं लेबल पुसलं जाईल आणि तुला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळेल, समजलं?' इति बाबा.
'पण बाबा, माझा नवरा कोण आहे?' मी गोंधळून विचारलं.
'शेरुबरोबर! तुझं लग्न आपण शेरुबरोबर करणार आहोत'.
'शेरु? हा शेरू कोण आहे?'
'थोडं थांब. सगळं समजेल काही वेळात. शेरुबरोबर लग्न केल्यावर तुझ्या नशीबतला अविवाहितपणाचा योग्य संपून शेरूच्या नशिबात येईल. त्यानंतर तुझं काही दिवसातच लग्न ठरेल. आता तू विचार करत असशील, हा काय विचित्र उपाय आहे'.
मी होकारार्थी मान हलवली.
'तर याच उत्तर आहे… हा माझा उपाय आहे. ऑल राईट्स रिझर्वड बाय- सेटलमेंट बाबा'.
तू काही काळजी करू नकोस. मी अशा अनेक समस्या सोडवल्या आहेत. आजपर्यंत कोणाचीच तक्रार अली नाही. या लग्नानंतर तुझी सगळी कमनशिबी शेरुमध्ये ट्रान्सफर होईल आणि तुझे लग्न धुमधडाक्यात होईल' बाबांनी सविस्तर समजावले.
'शेरू हे तर एका पुरुषाचं नाव वाटतं. पुरुषासोबत लग्न?
मी बाबांना म्हणालो, 'नको बाबा मला इथून जाऊ द्या. पुरुषासोबत लग्न करण्यापेक्षा मी अविवाहित राहीन. हा कसला उपाय आहे? आजपर्यंत कोणाचातरी बळी देऊन समस्या सोडवल्याचं ऐकलं आहे. पण इथे तर तुम्ही माझाच बळी देत आहात! मला नाही करायचं कोणत्या पुरुषासोबत लग्न. चला! निघतो! राम राम!'
'अपमान! घोर अपमान! माझ्याकडे आलेल्या सर्व भक्तांनी मी सांगेन तसं केलं आहे. तूच आहेस ज्याने माझा असा अपमान केला आहे. काळू, बाळू, विनू, दिनू सगळे इकडे या' बाबांनी डोळे मोठे करून बोलावले.
'काय झालं बाबा?' काळू म्हणाला.
'या माणसाने (माझ्याकडे इशारा करून) माझा अपमान केला आहे. म्हणतोय, मी शेरुशी लग्न करणार नाही. - बाबा
'काय बाबाजी तुमचा अपमान केला! तुम्ही म्हणत असाल तर याला पिंपळाच्या झाडावर उलटा लटकवतो आणि खालून मिरचीची धुरी देतो' विनू म्हणाला.
'आधी नको. जर तो लग्नाला तयार झाला नाही तर हाही प्रोग्रॅम करू. याच्यावर लक्ष ठेवा, कारण हा लग्न चालू असताना पळून जाऊ शकतो'. - बाबा.
बाबाजींच्या चेल्यांनी मला असं घेरलं जसं लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलमध्ये रन न होऊ देण्यासाठी बॅट्समनला घेरतात.
'अरे, हि काय हुकूमशाही लागून गेली काय? जर तुम्ही मला जबरदस्तीनं इथे थांबवून ठेवलात तर मी पोलिसात जाईन. समजलं!' मी ऊसनं अवसान आणत बोललो.
'तुझ्याकडे पुरावा काय आहे?' इति बाबा.
याचा विचार केल्यावर माझं उरलंसुरल अवसानदेखील गळून पडल.
'बाबा मला सोडा हो. इथे तर मी माझा मित्र रामुच्या सांगण्यावरून आलो होतो. पहिली त्या रामुची खबर घेतली पाहिजे. मला सोडा बाबा! हवं तर हे माझे सगळे पैसे घ्या.
मी माझ्या पाकिटातले सगळे पैसे समोर ठेवले. माझ्या खिशातले, पायातल्या मोज्यांमधले सगळे पैसे दिले.
'बाबा हे सगळे पैसे घ्या पण मला जाऊ द्या' मी रडवेला होऊन म्हणालो.
'पाकीटाच्या चोरकप्प्यातला माल कधी रिकामा करणार?' बाबा पाकिटाकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाला.
'बाबा, हे पैसे मला घरी जाण्यासाठी लागतील'. इति मी.
'घरी तर सगळ्यांना जायचंय. तू घराची माया सोड आणि सर्व पैसे मला दे. नाहीतर तुला झाडावर लटकावे लागेल'.
झाडावर लटकवणार हे ऐकताच मी तेही पैसे बाबांना दिले.
'बाबा, सगळे पैसे तर घेतलेत. आता तरी जाऊ द्या'.
'नाही! तू माझ्या मठातून रिकाम्या हाती जाऊ शकत नाहीस. माझ्याकडे आलेला कोणीही रिकाम्या हाती जात नाही'- बाबा।
'मी तर रिकामाच झालोय. प्लीझ मला जाऊ द्या'. - मी
'अरे यार! बोलण्यात वेळ घालवू नको. मला अजून बऱ्याच जणांची समस्या सोडवायची आहे' - बाबा.
'काळू, बाळू तुम्ही वरमाला आणि शेरुला घेऊन या आणि विनू, दिनू तुम्ही याला पकडून ठेवा. शेरुला नीट घेऊन या. चुकूनही त्याला धक्का लावू नका. नाहीतर तो सगळा मठ डोक्यावर घेईल' - बाबा.
त्या दोघानी सिहांचा कळप जसा एखाद्या कमजोर हरिणावर झडप घालतो तशी माझ्यावर झडप घातली. मला पकडलं आणि माझे हात-पाय बांधले.
मी मनात विचार करू लागलो,'शेरू हा एक पुरुष आहे आणि बाबा माझं लग्न एका पुरुषाशी लावून देत आहेत'. पण मी परत चुकीचा ठरलो. बाबा माझं लग्न एका पुरुषाशी नाही तर कुत्र्याशी लावून देणार होते. शेरू हा काही गल्लीतला सामान्य कुत्रा नव्हता. तो तर खूप लांब आणि ताकदवान अल्सेशियन जातीचा कुत्रा होता. शेरुला येताना पाहून माझी पायाखालची जमीनच सरकली. शेरू आणि हार इतक्या पटकन आले की, असं वाटलं हे माझ्यासाठीच तयार होऊन बसले होते.
'काळू, बाळू तुम्ही याला (माझ्याकडे पाहून) पकडा आणि दिनू, विनू तुम्ही शेरूच्या पायात वरमाला अडकवून याला घाला' बाबांनी आदेश दिला.
'नका, नका! असे करू नका!' मी कळवळून म्हटलं. पण दिनू, विनू इतके शक्तिशाली होते की मला हलण्याचीसुद्धा संधी दिली नाही.
शेवटी शेरू नावाच्या कुत्र्याने मला वरमाला घातली. तिथे असलेल्या सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या. शेरू जीभ बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागला. असं वाटत होतं की हे त्याचं रोजचं काम आहे.
'आता नवर्याने नवरीच्या कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्यावर हे लग्न सम्पन्न होईल' - बाबा.
'अरे देवा! गल्लीतल्या कुत्र्याला बघून रस्ता बदलणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला कुत्र्याबरोबर लग्न करावं लागतंय. हा कुत्रा माझ्या कपाळावर कुंकू लावणार? बापरे! नंतर हा मंगळसूत्रही घालणार, नंतर काय सांगावं हि लोक माझा आणि त्या कुत्र्याचा हणीमुनही करून देतील. नाही! हे असं मी होऊ देणार नाही! अजिबात नाही! मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण हे दोघे पैलवान मला हलूही देत नव्हते.
'बाबा, माफ करा. पण अजून नवरीची वरमाला घालणं बाकी आहे' काळू म्हणाला.
'स्मार्ट फोन… नाही नाही स्मार्ट बॉय! बर झालं आठवण केलीस. नवरीचे (माझे) फक्त हात सोडा. पण नीट लक्ष ठेवा हा सुटण्यासाठी माशासारखा तडफडत आहे' - बाबा.
मला हात सोडल्यावर असं वाटलं की श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तीला ऑक्सिजन दिला आहे. पण माझे पाय अजूनही बांधले होते. मला समजलं की देवाने मला हि शेवटची संधी दिली आहे. ही संधी जर हातातून गेली तर हे लोक माझं कुत्र्याबरोबर लग्नही लावून देतील आणि हणीमुनही करतील! माझ्या हातात त्यांनी वरमाला दिली आणि शेरूला माझ्या समोर आणलं गेलं. बाबांनी आधीच सांगितलं होतं की शेरूला धक्का दिलेला आवडत नाही. मी शेरूच्या जवळ गेलो आणि हार घालण्याऐवजी शेरूला जोराचा धक्का दिला. शेरू थोडा दूर जाऊन पडला. शेरू उभा राहिला आणि माझ्याकडे बघून भुंकू लागला. 'शेरुला धक्का कशाला दिलासा? बापरे! आता काय करायचं₹' दिनू म्हणाला.
शेरु आता शेर बनला होता. त्याने रागाने माझ्या अंगावर उडी मारली. मी स्वतःला वाचवण्यासाठी खाली वाकलो. शेरुने सरळ माझ्या मागे उभ्या असलेल्या विनू वर झडप घातली. मी माझी सगळी ताकद एकवटून स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करू लागलो. शेवटी मी स्वतःला सोडवून घेतलं. माझ्या पाठीमागे शिकारी कुत्रा सोडल्यासारखा मी धावत होतो. मी ना डावीकडे बघितलं ना उजवीकडे! जोपर्यंत बाहेर पडायचं दार दिसत नाही तोपर्यंत सरळ वाट मिळेल तस धावत राहिलो. एकदाचं दार दिसलं. मी तिथे थोडावेळ श्वास घेण्यासाठी थांबलो. मी मागे वळून पाहिलं. बाबांचा निष्ठावान कुत्रा शेरु बाबांचा मठ उद्ध्वस्त करत होता. काळू, बाळू, दिनू आणि मिनूची शेरुला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावून धावून बिकट अवस्था झाली होती. शेरु नावाच्या वादळापासून बाबतरी कुठे वाचले होते. शेरूने बाबांचा लांब पांढरा कुडता फाटलेल्या कुडत्यामध्ये बदलला होता. शेरुने 'सेटलमेंट बाबा'चीच 'सेटलमेंट' केली होती.
शेरु बाबांचे साम्राज्य उध्वस्त करून स्वतःच बाबा असल्याप्रमाणे बाबाच्या हॉटसीटवर बसला होता. झालेला प्रकार आठवून हसत-हसत मी तिथून बाहेर पडलो.
मी माझे नवरीच्या कपडे बदलून पुन्हा माणसात आलो. मी परत राघुवाडीला जाण्यासाठी पायी निघालो. तेवढ्यात मागून कुणीतरी मला हाक मारली,
'ओ मिस्टर!'
कुणी हाक मारली आहे हे बघण्यासाठी मी मागे वळून पाहिलं. तर तिथं एक मुलगी नवऱ्याचा वेष करून अली होती. तिची पण बहुतेक लग्नाचीच समस्या असावी. मी तिच्याकडे एक क्षण बघतच राहिलो, कारण ती दिसायला खूप सुंदर होती.
तिने मला परत हाक मारली, 'ओ मिस्टर!'
मी ताळ्यावर आलो.
'अहो, मी तुम्हाला केव्हापासून हाक मारतेय!' - ती.
'माफ करा! माझं लक्ष नव्हतं'. - मी.
'ठीक आहे'. - ती.
'आपलं काय काम होत माझ्याकडे' - मी
'तुम्ही काय मस्त धडा शिकवलाय त्या भोंदू बाबाला!' - ती.
'धन्यवाद! तुमचही लग्न जमत नाही का?' - मी
'हो. मला मंगळ आहे त्यामुळे मी इथे माझ्या आई-बाबांबरोबर आले आहे. माझा खरतर अशा भोंदू बाबांवर विश्वास नाही. पण माझ्या आई-बाबांच्या इच्छेसाठी मी इथे आले' - ती.
'तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?' नकळतपणे माझ्या तोंडातून हे शब्द निघाले.
तिने माझ्या डोळ्यात पहिल. थोडीशी हसली. आणि लाजेने मान खाली घातली. मी काय समजायचं ते समजलो. हा बाबांचा चमत्कार असेल किंवा नसेलही. पण मला माझी नवरी मिळाली हे मात्र नक्की!
ज्याचा शेवट गॉड! ते सगळंच गॉड!
(हि कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथेचा अंधश्रद्धा समर्थनाचा काहीही हेतू नाही).
मस्त! धमाल लिहिलत पु ले शु
मस्त! धमाल लिहिलत
पु ले शु
छान जमलीये.
सॉलिड जमलीय की
सॉलिड जमलीय की

अजून येवूद्या कथा
पुलेशु
मस्त
छान, पुलेशु
छान, पुलेशु
छान लिहीलत
छान लिहीलत
काही वाक्ये रिपीट झालीत . ती सुधारा
छान कथा
छान कथा
भारी
छान कथा.
छान कथा.
छान जमलीये असे लिहित रहा.
छान जमलीये
असे लिहित रहा.
भारीये !
भारीये !
मस्तच येवू देत अजून नवीन
मस्तच
येवू देत अजून नवीन कथा
भारीच. फुल धुमाकुळ. शेवट
भारीच. फुल धुमाकुळ. शेवट मस्तच.
☺️
☺️
काहीही कथा आहे ☺️☺️☺️वाचून
काहीही कथा आहे ☺️☺️☺️वाचून मजा आली.
मस्त
मस्त
जमली जमली... छान केला शेवट.
जमली जमली... छान केला शेवट. लिहीत रहा.
(No subject)