मांगाचा हरी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 September, 2018 - 08:32

( या लिखाणाचा उद्देश एक निखळ, निरागस , भावविश्वाचे व्यक्तिचित्रण करणे हाच आहे . लेखक कुठल्याही भेदाभेद अथवा अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही . )

मांगाचा हरी

माझे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण माझ्या जन्मगावा व्यतिरीक्त दुसऱ्या गावात झाले आणि आठवी साठी माझ्या मूळगावापासून ७-८ किलोमीटरवर असलेल्या गावात रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत प्रवेश घेतला . प्रवेश घेण्या आधीच त्या शाळेतला शिपाई हरी माझ्या गावचाच असल्याने परिचित होता . कोठल्याही वयात एखाद्या पूर्ण अनोळखी ठिकाणी ओळखीचे कोणी असेल तर मनाचे अवघडलेपण कमी होते . मलाही नवख्या ठिकाणी रुळायला हरीची मदत झाली .

आमच्या गावात सगळे त्याला त्याच्या जातीवाचक नावने मांगाचा हरी म्हणून संबोधत .

या शाळेच्या नवख्या ठिकाणी हा पुराणपुरुष हरी माझं सारथ्य करत होता . मी प्रवेश घ्यायला शाळेच्या एक खोलीच्या मुख्याद्यापक कम टिचर्स कम ऑफिसच्या रूम मध्ये शाळा सुरू व्ह्यायला साधारण एक दीड तास उरला असता बसलो होतो . हरीची वर्ग खोल्यांची साफसफाई झाली . तो आता कावडीने पिण्यासाठी पाणी आणून रांजण भरत होता .
साधारण पाच सव्वा पाच फूट उंच सूडसूडीत देह, वय १६ वर्ष , खोबरेल तेल चोपून बसवलेले काळे कुरळे केस , तरतरीत नाक , वर्ण काळसर. अंगात नीळ दिलेला फूल बाह्यांचा सफेद सदरा . त्या बाह्या थोड्या जास्त लांब असल्याने मनगटावरच्या गुंडीच्या आधी छान झोळ सुटलेला . शर्टाला छातीवर उजवीकडे आणि डावीकडे असे दोन खिसे . त्या खिशांना वरतून लिफाफ्या सारखे त्रिकोणी फ्लॅप . या फ्लॅपला मधल्या टोकावर एक गुंडी लावलेली. एका खिशात स्वत: बनवलेली छोटी डायरी . दुसऱ्या खिशाच्या फ्लॅपला वर एक छिद्र आणि त्यातून बाहेर टेहळणी करणारे शाईचे पेन . त्या खिशावर पेनातून बाहेर आलेल्या शाईचे डाग हरी शिक्षित असल्याचे दर्शवित होते . सफेद नीळ दिलेला घेरदार लेंगा . तो पायात अडकू नये व चिखलाने खराब होवू नये म्हणून हरी सायकल चालवताना वापरायच्या क्लिप लावायचा पाणी आणताना . त्याक्लिप मुळे हल्ली नाच करताना मुले एक विशिष्ट लेंगा घालतात गुडघ्यावर घोळ असलेला आणि पोटऱ्यात घट्ट असलेला तसा दिसायचा . अशा प्रकारचे लेंगे पूर्वी आम्ही गावच्या तमाशात राजा , प्रधान मंडळीने घातलेले पाहिलेत .

हरी खांद्यावर कावडीची काठी घ्यायचा . त्या काठीला दोन्ही टोकावर दोन दोन घुंगरू बांधलेले. आणि दोन्ही टोकाला हातभर लांब दोन लोखंडी आकडे . त्या आकड्यात दोन बाजूला दोन पत्र्याचे डबे पाण्याने भरून अडकवून हरी वाकून काठी मधोमध उचलायचा . एका संथ लयीत हरी अनवाणी पळायचा . तसे करताना काठी देखील एका लयीत डबे खालीवर करत लवत हलायची . टोकाची घुंगरं देखील खुळ्ळम, खुळ्ळम आवाज करायची . या सांगितीक लकबीमुळे हरीच्या तोंडावर ओझे उचल्याचे भाव कधीच नसायचे . अनवाणी पायांना खडे बोचायचे नाहीत . डब्यातून हेंडकाळलेले पाणी फुफाट्यावर नागमोडी नक्षी काढायचे .
शाळेच्या वर्गाच्या फक्त चार खोल्या . हेड सर ९ वाजता शाळेत आले . माझ्या प्रवेशाची प्रक्रिया लौकरच पार पडली . हरी मला वर्गात सोडून गेला . साधारण ९.३० वाजता सर्व मुले प्रार्थनेसाठी समोरच्या मैदानात गोळा झाली . प्रत्येक वर्गाची एक रांग झाली . प्रत्येक वर्गात २०-२५ मुले . माझी नजर सहज ९ वी च्या रांगेवर गेली . हरी दिसला . हरी आता वेगळाच दिसला . खिशावर शाळेचा कापडी बिल्ला असलेला सफेद अर्ध्या बाह्यांचा शर्ट खाक्या हाफ पॅंटीत इन केलेला हरी प्रथम मला ओळखू आला नाही . मला वाटले हरी तर शिपाई तो कसा असेल इथे .

नंतर मला समजले हरी शाळेत कामही करायचा आणि शिकायचा सुध्दा . हरी आणि मी एकाच शाळेत शिकत होतो दोन वर्ष . कर्मवीरांच्या शाळेतला हरी हा देखील एक कर्मवीरच होता . गरीबीमुळे हरी शिपाई कम विद्यार्थी झाला होता .

रोज सकाळी शाळेची झाडलोट , पाणी भरणे , ऑफिसची साफसफाई या कामासाठी लवकर येणे शक्य व्हावे यासाठी त्याने गावातच एक खोली घेतली होती अत्यल्प भाड्याने . भिंती पोतेऱ्याने सारवलेल्या आणि भूई शेणाणे . त्या खोलीत दोन जोड कपडे . दोन गोधड्या . एक पितळी ताटली , दोन वाट्या , एक तांब्या , एक तवा , दोन अल्युमिनियमची पातेली . एक पिठाचा डबा . आणि मडक्यात राख घालून ठेवलेले , मूग , हरबरे वगैरे . चुलीशेजारी एक पिठाचा डबा . असा हरीचा संसार .

हरी स्वत:चे जेवण स्वत: बनवी . भाजी बऱ्याचदा बेसन किंवा कांदवणी . तो कांदवणी छान बनवायचा . बारिक चिरलेल्या कांदा लाल होइपर्यंत तेलात भाजायचा , थोडे वाटलेले कारळे , तिखट , मीठ घातले की हरीचे झणझणीत कांदवणी तयार . वाटणाची भाजी असेल तर पाट्यावर वाटण वाटायचा . कधी भाजी नसेल तर दोन मिरच्या आणि मीठ पाट्यावर वाटायचा, भाजी तयार . ज्वारीच्या छोट्या छोट्या टम्म फुगलेल्य दामट्या पण छान करायचा.

खूप पाऊस असला की मी हरीकडे राहयचो . घरचे सांगायचे ओढ्याला पूर असेल तर येउ नकोस . मग हरीचे लोखंडी तव्यात बनवलेले कांदवणी आणि भाकरी जिभल्या चाटत खायचो .

वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर सुध्दा मी हरी सोबत राहयचो अभ्यास व्हावा म्हणून . अशा वेळी उन्हाळ्यामुळे रात्रीसाठी ठेवलेली भाजी भाकरी विटून जायची . हरी मग माझ्यासाठी देखील भाकरी कालवण करायचा . मी यथेच्छ खायचो पण घरी सांगायचो नाही .

पण मी बोर्डिंग मध्ये राहात असताना घरी उघड उघड सांगितले की आम्ही पाच सहा मुलं कधी कधी गावावरून आणलेल्या भाकऱ्या , चपात्या , भाजी एका ताटात खातो . हरी मांग असल्याचे आमच्या घराला एवढे वावडे नव्हते पण लोक काय म्हणतील हा यक्ष प्रश्न असायचा . तसे हरीचे आणि आमच्या घराचे बरेच जुने सबंध होते .

त्याचे असे झाले माझ्या आईच्या काकांचे अपत्य बरेच वर्ष जगत नव्हते . म्हणून चूलत आजीने मरीआईला नवस बोलला
" त्यांचे मुल जगू दे मुलाला मांगणीच्या वट्यात घालील "
झाले नवस खरा ठरला एक मुलगा जन्मला . तो जगावा म्हणून त्याचे नाव जगू ठेवले आणि त्याला हरीच्या काकूच्या ओटीत घातले . पुढे जगूचे आईबाप आजारपणात दगावले . त्यांची बऱ्यापैकी शेती मागे उरलेली तीला वारस हवा म्हणून वडील सहा महिण्यात जगूला परत आमच्या घरी घेऊन आले . तो पर्यंत हरीच्या कुटुंबियांना जगूचा चांगला लळा लागला होता पण पंचानी समजावल्यावर ते तयार झाले . तेव्हापासून हरीच्या घरचे आणि आमचे ऋणानुबंध . पुढे जगू आमच्या घरी वाढला आणि वारसाने मिळालेली शेती कसू लागला .
हरी हरहुन्नरी होता . याच्या घरी नेहमी सायकल रीपेरिंगची अवजारं असायची . तो सायकल दुरुस्ती, पंकचर काढण्याची कामे फावल्या वेळात करायचा .

हरी शनिवार , रविवारी गावात राहायचा त्याच्या भावा सोबत . सुट्टी असली की हरी कुठल्यातरी डोहाच्या आसपास घायपात कापत असलेला दिसायचा कंबरभर पाण्यात . अंगावर फक्त हाफ चड्डी असायची . घायपात कापताना काटे खरचटायचे . हरीचा उघडाबंब देह रक्ताळला तरी हूं की चूं करीत नसे . घायपात कापून तो ते पाण्यावर पसरून कुजत ठेवायचा. कुजलेल्या घायपाताचा उग्र दर्प असह्य व्हायचा . काही दिवस झाले की ते कुजलेले घायपात हरी आणि त्याचा भाऊ खडकावर ठेवून बडवायचे . त्यासाठी डोहाच्या काठावर पाण्यातच एक छोटा दगड ठेवायचे एखाद्या थोड्या उंच खडका जवळ . त्या छोट्या दगडावर बसकन मांडायचे . एक हातात मोगरी घेउन सडके घायपात खडकावर बडवायचे . घायपाताचे धागे सुटे होण्यासाठी मधूनच थोडे पाणी टाकायचे . खूप वेळाने मूठभर जाड सफेद सुटे ओले धागे मिळायचे . ते ओढ्यातच तापलेल्या दगडावर सुकवायचे . मग त्यापासून दोरखंड वळायला घ्यायचे . या कच्च्या लहान धाग्यापासून ते एक लांब धागा बनवायचे पीळ घालून . एक एक पीळ दिलेला धागा किमान करंगळी एवढा जाड असायचा .

बऱ्याचदा मी वडिलां बरोबर मांगवाड्यात दोऱ्या आणायला जायचो तेव्हा हरी आणि हरीचा भाऊ दोरखंड वळताना दिसायचे . त्यासाठी ते एखादी लांबलचक अडथळाहीन जागा शोधायचे . पीळ घातलेले तीन - चार लांब धागे एका टोकाला भिरभिऱ्याला जोडलेले असायचे तर दुसरे गाठ मारलेले टोक हरीच्या भावाच्या हातात असायचे . तो त्या गाठीच्या पुढे एक लाकडी तुकडा अडकावयाचा आणि हरी भिरभिरे फिरवायचा. जस जसा पीळ बसायचा, लाकडाच्या तुकड्यामागे दोरखंडाचा गोफ विणला जायचा .
हरीकडून आम्ही गोफण बनवून घ्यायचो ज्वारी , बाजरीच्या राखणीसाठी . बैल हाकारण्याचा आसूड देखील त्याला बनवता यायचा . दिवाळीला हरी आम्हाला लक्ष्मी पूजनासाठी नवी केरसुणी द्यायचा . केरसुणीच्या बदल्यात त्याला फराळाचे जिन्नस दिले जायचे .

सगळ्या गावाला दोरखंड पुरवायचं हरीच कुटुंब आणि त्या मोबदल्यात घरटी ज्वारी, बाजरीच्या दहाएक पेंढ्या कधी शेतातली भाजी मिळायची . या पिळदार दोरीने हरीने सारा गाव बांधून ठेवला होता मांगवाड्याच्या उंबऱ्याला .
गावात कोणाच्या घरी लग्न निघालं की लग्नघरची मंडळी गावातल्या सगळ्या देवळात पूजाअर्चा करायला जात . दंडवट घालत . हरी किंवा हरीचा भाऊ डफ वाजवत या मंडळींचे देव दर्शन घडवायचे .

हरीच्या घरी अजून एक उद्योग चालत असे . तो म्हणजे गुऱ्हाळ लागले की हरी आणि हरीचा भाऊ जाळव्याचे काम करायचे . म्हणजे उसाचा रस आटवायच्या कढईला जाळ घालण्याचे . त्यासाठी उसाच्या चरकातून बाहेर निघालेल्या चोयट्या बाजूच्या शेतात वाळवायच्या व त्या नंतर चुलांगणात जाळायच्या . हे करताना हरी पुन्हा अर्ध्या चड्डीत दिसायचा . वर्ण काळसर त्यात केसात , अंगावर चुलांगणातली रुपेरी राख आणि चोयट्यांचे बारीक कण . चुलांगणासमोर असल्याने भर थंडीतही घामाच्या धारा वाहयच्या . हरीचं हे रूप रात्री चुलांगणाच्या दारातून बाहेर आलेल्या लाल उजेडात चमकायचं पण नकळत मनात विचित्र विषण्णता पेरायचं .
तेव्हा मी तांब्यात लिंबू पिळून उसाचा चरकातून बाहेर आलेला ताजा फेसाळता रस अगदी ढेकर येइपर्यंत प्यायचो आणि वाटायचे खरच आपण किती भाग्यवान आहोत .

गुऱ्हाळात जी मळी निघायची ती हरीचा भाऊ कावडीने घरी आणायचा. घरी अंगणात एक छोटं चुलांगण खणायचा त्यावर एक छोटी कढई ठेवली जायची . त्यात मळी आटवली जायची आणि इतरांच्या टाकावू मळीचा गूळ हरीच्या घरी चहात पडायचा .

कधी सुट्टीला हरी घरी यायचा तेव्हा माझी सायकल खराब असली की हरीच्या घरी सकाळी जायचो . तो सायकवर घेउन जायचा मला शाळेत . तेव्हा सकाळी देखील त्याचा भाऊ मळी आटवताना दिसायचा . मळी शुध्द होण्यासाठी भेंडीच्या झाडाचा वापर करायचा .

चैत्रात गावोगावी यात्रा भरायच्या . देवाची पालखी निघायची . कुस्त्यांचे फड भरायचे . शाळेला सुट्टी असायची . कुस्त्यांच्या फडात हरीची हलगी कडकडायची . देवाचा छबिना गावभर फिरायचा तेव्हा देखील हलगी वाजवायचा हरी .
मी फक्त ९ वी पर्यंत हरीच्या शाळेत होतो . पुढे बोर्डिंग असलेल्या शाळेत प्रवेश घेतला जाण्या येण्याचा त्रास होतो म्हणून . तेव्हा हरी दहावीत होता . त्यानंतर मला समजलं हरी पाणीपुरवठा खात्यात काम करतो कुठल्यातरी धरणावर शिपाई म्हणून .

गावगाड्याचा कणाच होतं हरीचं कुटुंब . जेवणात जे मोठेपण मीठाच तेच शेतकऱ्यांना शेतकामासाठी दोरखंडाचं . दोरखंडाशिवाय शेती ही अशक्य कोटीतली गोष्ट .
हरीच्या घरी पोटाला पोठभर मिळविण्यासाठी कुठे वाटमारी नव्हती की लांडीलबाडी नव्हती . वेळेला मोलमजुरी करून संसार चालवत . कुठेही केलेल्या कष्टाच भांडवल नव्हतं . हातावरचं पोट , भेदाभेद हे सारं आड नाही आलं एक मराठी घरचं पोर सहा महिने सांभाळताना . त्या पोराचा हरीच्या काकूला लळा लागला होता . तिने त्याला अंगावरच दूध पाजलं होतं . खूप जड अंतकरणाने त्या माऊलीने जगूला माझ्या वडिलांचे हवाली केले होते . कधी , कुठे थोडासाही नाराजीचा सूर नसायचा हरीच्या घरी . सवर्णांच्या दिवाळीचे लक्षीपूजन हरीच्या केरसुणी साठी रुसायचे . शेतातल्या वा घरातल्या बहुतेक कामाला हरीच्या घामाची दोरी स्पर्शायची . सण , उत्सव हरीची हलगी कान देवून ऐकायचे .

घरात हरीच शिकत होता . परिस्थितीशी निढळ्या छातीने दोन हात करत अव्याहत हसतमुख असायचा हरी .

मी सेवानिवृत्त झाल्यावर हवापालटासाठी गावी गेलो होतो . मला गावात झालेला बदल जाणवला . आता शेतीचे गणित बदललेय . वरचेवर पडणाऱ्या दुष्काळामुळे पशुधन कमी झाले . मोट गेली , पाण्यासाठी पंप आले. पूर्वी मोटेला , बैलांना लागणारी दोरखंड कमी झाली . बरीच कामं भाड्याच्या ट्रॅक्टरने केली जाऊ लागली . सुतार , लोहार , मांग , चांभार , कुंभार हे गावगाड्याचे आधारस्तंभ गावात पोट भरेना म्हणून गाव सोडून गेले . नवीन पिढी शिकली, शहराकडं पळाली . लोक जमेल तसं काम चालवतात . एखादे काम गावात होत नसेल तर शेजारच्या गावात जातात . कुंभारवाडे , मांगवाडे ओस पडलेत . तिथेच राहिलं तर पोट भरण्याची शास्वती नाही. हरीला गावाने काय दिलं माहित नाही पण हरी आणि हरीचं कुटुंब अनंत कराने गावाला देत होतं . आता हरी देत असलेल्या सेवा पैसे मोजूनही वेळेला मिळतील याची खात्री नाही . त्या मिळाल्या तरी हरी सारखा माणुसकीचा ओलावा रहिला नाही .

वाढतं शहरीकरण गावं ओस पाडतेय . हरीच्या घराला सुध्दा एक मोठे कुलूप लटकलेय . गावासाठी हरीच्या गरजेचे दोर केव्हाच कापलेत काळाने . हरीची मुले सुध्दा शिकली, मोठी झाली . हरी आता त्यांच्या सोबतच शहरात असतो . हरी आता सेवानिवृत्त झालाय. त्याला निवृतीवेतन मिळते . मुले मिळवती झालेत . हरीला पूर्वी सारखे कष्ट सोसत नाहीत पण गावची आठवण अजून डोळ्यात पाणी आणते .

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

ललीत म्हणून आवडले. लेखकाचा प्रांजळपणादेखिल भावला.
पण गावगाड्यासंदर्भातले माझे मतः ही अतिशय म्हणजे अतिशयच क्रूर, शोषणमूलक, अन्याय्य व्यवस्था होती. या व्यवस्थेतील तळागाळातील लोकांची केवळ कष्टावर मोनॉपली होती. त्यांच्या हक्काची, सवर्णांबरोबरच्या मानवीय समानतेची जाणीव दलितांनादेखिल नव्हती सवर्णांना तर सोदूनच द्या. किंबहुना, ती होऊ नये याचा प्रयत्न सातत्याने होत असे. हरीला इतके कष्ट भोगावे लागत, त्याचा योग्य मोबदला त्याला मिळतदेखिल नसे उलट वेळोवेळी समाजातल्या उच्च मानल्या गेलेल्या वर्गाकडून होणारी मानखंडनेत दुर्दैवाने त्यालाही काही फार वावगे वाटू नये अशी व्य्वस्था रूजवली गेली होती. भटके-विमुक्त, ओबीसींचे शोषण निराळ्या प्रकारचे, फार डॉक्युमेंट न झालेले पण जुन्या माणसांना विचारले की त्यातली दाहकता फार बोचते. त्रिंबक आत्रे यांचे १९१६ साली प्रकाशीत झालेले 'गावगाडा' हे पुस्तक वाचले तर ही व्यवस्था ग्रामिण महाराष्ट्राच्या मातीमातीत किती ऑरगॅनिकली भिनली होती याचे चित्रण आढळेल. माझ्या मते, हा गावगाडा नाहिसा होत चाललाय ही सेलिब्रेट करण्याची गोष्टंय. आंबेडकर आणि त्यांचे सहकारी किती हजार पावसाळे घट्ट टिकलेल्या कभिन्न खडकांशी टकरा देत झुंजले हे नतमस्तक व्हायला लावणारं.

@ पुंबा खूप धन्यवाद दिलखुलास प्रतिसादाबद्दल . तुमच्या मताशी सहमत आहे . कालच तुम्ही सुचवलेले पुस्तक मिळाले . वाचन चालू आहे .पण आता परस्थिती बदलतेय तरी काही मंडळी आपण किती पुरोगामी हे दाखवण्यासाठी उठसुठ सवर्ण लोकांना शिव्या घालतात ते खटकते . कुठलीही शोषित समाज व्यवस्था घातकच असते आणि तिचा ऱ्हास ठरलेला असतो .

फारच सुंदर लिखाण. हे गणेशोत्सवाच्या स्पर्धेत यायला हवे होते. पुन्हापुन्हा वाचावे असे.

ओह.

भास्कराचार्य, शाली ,वावे, सस्मित खूप धन्यवाद
स्पर्धेसाठी व्यक्तिचित्रण देऊ शकलो नाही उशीर झाल्याने.

फारच सुंदर लिखाण. हे गणेशोत्सवाच्या स्पर्धेत यायला हवे होते. पुन्हापुन्हा वाचावे असे. >>> पूर्ण सहमत!

खूप छान लिहीले आहे. १६ वर्षांचा मुलगा शाळेत शिपाई वाचल्यावर आधी खूप वाईट वाटले, पण नंतर तो तेथेच शिकतो हे वाचून जरा बरे वाटले.

डब्यातून हेंडकाळलेले पाणी फुफाट्यावर नागमोडी नक्षी काढायचे . >>>
त्यात मळी आटवली जायची आणि इतरांच्या टाकावू मळीचा गूळ हरीच्या घरी चहात पडायचा . >>>
कर्मवीरांच्या शाळेतला हरी हा देखील एक कर्मवीरच होता >>>

ही यासारखी वाक्ये व एकूणच शैली खूप सुरेख आहे. अजून लिहा. आवडेल वाचायला.

फारएन्ड , अंजू , mr. Pandit, राजसी, रश्मी, maitryee ,mi_anu खूप आभार प्रोत्साहनात्मक प्रतिसादासाठी .

Pages