मांगाचा हरी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 September, 2018 - 08:32

( या लिखाणाचा उद्देश एक निखळ, निरागस , भावविश्वाचे व्यक्तिचित्रण करणे हाच आहे . लेखक कुठल्याही भेदाभेद अथवा अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही . )

मांगाचा हरी

माझे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण माझ्या जन्मगावा व्यतिरीक्त दुसऱ्या गावात झाले आणि आठवी साठी माझ्या मूळगावापासून ७-८ किलोमीटरवर असलेल्या गावात रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत प्रवेश घेतला . प्रवेश घेण्या आधीच त्या शाळेतला शिपाई हरी माझ्या गावचाच असल्याने परिचित होता . कोठल्याही वयात एखाद्या पूर्ण अनोळखी ठिकाणी ओळखीचे कोणी असेल तर मनाचे अवघडलेपण कमी होते . मलाही नवख्या ठिकाणी रुळायला हरीची मदत झाली .

आमच्या गावात सगळे त्याला त्याच्या जातीवाचक नावने मांगाचा हरी म्हणून संबोधत .

या शाळेच्या नवख्या ठिकाणी हा पुराणपुरुष हरी माझं सारथ्य करत होता . मी प्रवेश घ्यायला शाळेच्या एक खोलीच्या मुख्याद्यापक कम टिचर्स कम ऑफिसच्या रूम मध्ये शाळा सुरू व्ह्यायला साधारण एक दीड तास उरला असता बसलो होतो . हरीची वर्ग खोल्यांची साफसफाई झाली . तो आता कावडीने पिण्यासाठी पाणी आणून रांजण भरत होता .
साधारण पाच सव्वा पाच फूट उंच सूडसूडीत देह, वय १६ वर्ष , खोबरेल तेल चोपून बसवलेले काळे कुरळे केस , तरतरीत नाक , वर्ण काळसर. अंगात नीळ दिलेला फूल बाह्यांचा सफेद सदरा . त्या बाह्या थोड्या जास्त लांब असल्याने मनगटावरच्या गुंडीच्या आधी छान झोळ सुटलेला . शर्टाला छातीवर उजवीकडे आणि डावीकडे असे दोन खिसे . त्या खिशांना वरतून लिफाफ्या सारखे त्रिकोणी फ्लॅप . या फ्लॅपला मधल्या टोकावर एक गुंडी लावलेली. एका खिशात स्वत: बनवलेली छोटी डायरी . दुसऱ्या खिशाच्या फ्लॅपला वर एक छिद्र आणि त्यातून बाहेर टेहळणी करणारे शाईचे पेन . त्या खिशावर पेनातून बाहेर आलेल्या शाईचे डाग हरी शिक्षित असल्याचे दर्शवित होते . सफेद नीळ दिलेला घेरदार लेंगा . तो पायात अडकू नये व चिखलाने खराब होवू नये म्हणून हरी सायकल चालवताना वापरायच्या क्लिप लावायचा पाणी आणताना . त्याक्लिप मुळे हल्ली नाच करताना मुले एक विशिष्ट लेंगा घालतात गुडघ्यावर घोळ असलेला आणि पोटऱ्यात घट्ट असलेला तसा दिसायचा . अशा प्रकारचे लेंगे पूर्वी आम्ही गावच्या तमाशात राजा , प्रधान मंडळीने घातलेले पाहिलेत .

हरी खांद्यावर कावडीची काठी घ्यायचा . त्या काठीला दोन्ही टोकावर दोन दोन घुंगरू बांधलेले. आणि दोन्ही टोकाला हातभर लांब दोन लोखंडी आकडे . त्या आकड्यात दोन बाजूला दोन पत्र्याचे डबे पाण्याने भरून अडकवून हरी वाकून काठी मधोमध उचलायचा . एका संथ लयीत हरी अनवाणी पळायचा . तसे करताना काठी देखील एका लयीत डबे खालीवर करत लवत हलायची . टोकाची घुंगरं देखील खुळ्ळम, खुळ्ळम आवाज करायची . या सांगितीक लकबीमुळे हरीच्या तोंडावर ओझे उचल्याचे भाव कधीच नसायचे . अनवाणी पायांना खडे बोचायचे नाहीत . डब्यातून हेंडकाळलेले पाणी फुफाट्यावर नागमोडी नक्षी काढायचे .
शाळेच्या वर्गाच्या फक्त चार खोल्या . हेड सर ९ वाजता शाळेत आले . माझ्या प्रवेशाची प्रक्रिया लौकरच पार पडली . हरी मला वर्गात सोडून गेला . साधारण ९.३० वाजता सर्व मुले प्रार्थनेसाठी समोरच्या मैदानात गोळा झाली . प्रत्येक वर्गाची एक रांग झाली . प्रत्येक वर्गात २०-२५ मुले . माझी नजर सहज ९ वी च्या रांगेवर गेली . हरी दिसला . हरी आता वेगळाच दिसला . खिशावर शाळेचा कापडी बिल्ला असलेला सफेद अर्ध्या बाह्यांचा शर्ट खाक्या हाफ पॅंटीत इन केलेला हरी प्रथम मला ओळखू आला नाही . मला वाटले हरी तर शिपाई तो कसा असेल इथे .

नंतर मला समजले हरी शाळेत कामही करायचा आणि शिकायचा सुध्दा . हरी आणि मी एकाच शाळेत शिकत होतो दोन वर्ष . कर्मवीरांच्या शाळेतला हरी हा देखील एक कर्मवीरच होता . गरीबीमुळे हरी शिपाई कम विद्यार्थी झाला होता .

रोज सकाळी शाळेची झाडलोट , पाणी भरणे , ऑफिसची साफसफाई या कामासाठी लवकर येणे शक्य व्हावे यासाठी त्याने गावातच एक खोली घेतली होती अत्यल्प भाड्याने . भिंती पोतेऱ्याने सारवलेल्या आणि भूई शेणाणे . त्या खोलीत दोन जोड कपडे . दोन गोधड्या . एक पितळी ताटली , दोन वाट्या , एक तांब्या , एक तवा , दोन अल्युमिनियमची पातेली . एक पिठाचा डबा . आणि मडक्यात राख घालून ठेवलेले , मूग , हरबरे वगैरे . चुलीशेजारी एक पिठाचा डबा . असा हरीचा संसार .

हरी स्वत:चे जेवण स्वत: बनवी . भाजी बऱ्याचदा बेसन किंवा कांदवणी . तो कांदवणी छान बनवायचा . बारिक चिरलेल्या कांदा लाल होइपर्यंत तेलात भाजायचा , थोडे वाटलेले कारळे , तिखट , मीठ घातले की हरीचे झणझणीत कांदवणी तयार . वाटणाची भाजी असेल तर पाट्यावर वाटण वाटायचा . कधी भाजी नसेल तर दोन मिरच्या आणि मीठ पाट्यावर वाटायचा, भाजी तयार . ज्वारीच्या छोट्या छोट्या टम्म फुगलेल्य दामट्या पण छान करायचा.

खूप पाऊस असला की मी हरीकडे राहयचो . घरचे सांगायचे ओढ्याला पूर असेल तर येउ नकोस . मग हरीचे लोखंडी तव्यात बनवलेले कांदवणी आणि भाकरी जिभल्या चाटत खायचो .

वार्षिक परीक्षा जवळ आल्यावर सुध्दा मी हरी सोबत राहयचो अभ्यास व्हावा म्हणून . अशा वेळी उन्हाळ्यामुळे रात्रीसाठी ठेवलेली भाजी भाकरी विटून जायची . हरी मग माझ्यासाठी देखील भाकरी कालवण करायचा . मी यथेच्छ खायचो पण घरी सांगायचो नाही .

पण मी बोर्डिंग मध्ये राहात असताना घरी उघड उघड सांगितले की आम्ही पाच सहा मुलं कधी कधी गावावरून आणलेल्या भाकऱ्या , चपात्या , भाजी एका ताटात खातो . हरी मांग असल्याचे आमच्या घराला एवढे वावडे नव्हते पण लोक काय म्हणतील हा यक्ष प्रश्न असायचा . तसे हरीचे आणि आमच्या घराचे बरेच जुने सबंध होते .

त्याचे असे झाले माझ्या आईच्या काकांचे अपत्य बरेच वर्ष जगत नव्हते . म्हणून चूलत आजीने मरीआईला नवस बोलला
" त्यांचे मुल जगू दे मुलाला मांगणीच्या वट्यात घालील "
झाले नवस खरा ठरला एक मुलगा जन्मला . तो जगावा म्हणून त्याचे नाव जगू ठेवले आणि त्याला हरीच्या काकूच्या ओटीत घातले . पुढे जगूचे आईबाप आजारपणात दगावले . त्यांची बऱ्यापैकी शेती मागे उरलेली तीला वारस हवा म्हणून वडील सहा महिण्यात जगूला परत आमच्या घरी घेऊन आले . तो पर्यंत हरीच्या कुटुंबियांना जगूचा चांगला लळा लागला होता पण पंचानी समजावल्यावर ते तयार झाले . तेव्हापासून हरीच्या घरचे आणि आमचे ऋणानुबंध . पुढे जगू आमच्या घरी वाढला आणि वारसाने मिळालेली शेती कसू लागला .
हरी हरहुन्नरी होता . याच्या घरी नेहमी सायकल रीपेरिंगची अवजारं असायची . तो सायकल दुरुस्ती, पंकचर काढण्याची कामे फावल्या वेळात करायचा .

हरी शनिवार , रविवारी गावात राहायचा त्याच्या भावा सोबत . सुट्टी असली की हरी कुठल्यातरी डोहाच्या आसपास घायपात कापत असलेला दिसायचा कंबरभर पाण्यात . अंगावर फक्त हाफ चड्डी असायची . घायपात कापताना काटे खरचटायचे . हरीचा उघडाबंब देह रक्ताळला तरी हूं की चूं करीत नसे . घायपात कापून तो ते पाण्यावर पसरून कुजत ठेवायचा. कुजलेल्या घायपाताचा उग्र दर्प असह्य व्हायचा . काही दिवस झाले की ते कुजलेले घायपात हरी आणि त्याचा भाऊ खडकावर ठेवून बडवायचे . त्यासाठी डोहाच्या काठावर पाण्यातच एक छोटा दगड ठेवायचे एखाद्या थोड्या उंच खडका जवळ . त्या छोट्या दगडावर बसकन मांडायचे . एक हातात मोगरी घेउन सडके घायपात खडकावर बडवायचे . घायपाताचे धागे सुटे होण्यासाठी मधूनच थोडे पाणी टाकायचे . खूप वेळाने मूठभर जाड सफेद सुटे ओले धागे मिळायचे . ते ओढ्यातच तापलेल्या दगडावर सुकवायचे . मग त्यापासून दोरखंड वळायला घ्यायचे . या कच्च्या लहान धाग्यापासून ते एक लांब धागा बनवायचे पीळ घालून . एक एक पीळ दिलेला धागा किमान करंगळी एवढा जाड असायचा .

बऱ्याचदा मी वडिलां बरोबर मांगवाड्यात दोऱ्या आणायला जायचो तेव्हा हरी आणि हरीचा भाऊ दोरखंड वळताना दिसायचे . त्यासाठी ते एखादी लांबलचक अडथळाहीन जागा शोधायचे . पीळ घातलेले तीन - चार लांब धागे एका टोकाला भिरभिऱ्याला जोडलेले असायचे तर दुसरे गाठ मारलेले टोक हरीच्या भावाच्या हातात असायचे . तो त्या गाठीच्या पुढे एक लाकडी तुकडा अडकावयाचा आणि हरी भिरभिरे फिरवायचा. जस जसा पीळ बसायचा, लाकडाच्या तुकड्यामागे दोरखंडाचा गोफ विणला जायचा .
हरीकडून आम्ही गोफण बनवून घ्यायचो ज्वारी , बाजरीच्या राखणीसाठी . बैल हाकारण्याचा आसूड देखील त्याला बनवता यायचा . दिवाळीला हरी आम्हाला लक्ष्मी पूजनासाठी नवी केरसुणी द्यायचा . केरसुणीच्या बदल्यात त्याला फराळाचे जिन्नस दिले जायचे .

सगळ्या गावाला दोरखंड पुरवायचं हरीच कुटुंब आणि त्या मोबदल्यात घरटी ज्वारी, बाजरीच्या दहाएक पेंढ्या कधी शेतातली भाजी मिळायची . या पिळदार दोरीने हरीने सारा गाव बांधून ठेवला होता मांगवाड्याच्या उंबऱ्याला .
गावात कोणाच्या घरी लग्न निघालं की लग्नघरची मंडळी गावातल्या सगळ्या देवळात पूजाअर्चा करायला जात . दंडवट घालत . हरी किंवा हरीचा भाऊ डफ वाजवत या मंडळींचे देव दर्शन घडवायचे .

हरीच्या घरी अजून एक उद्योग चालत असे . तो म्हणजे गुऱ्हाळ लागले की हरी आणि हरीचा भाऊ जाळव्याचे काम करायचे . म्हणजे उसाचा रस आटवायच्या कढईला जाळ घालण्याचे . त्यासाठी उसाच्या चरकातून बाहेर निघालेल्या चोयट्या बाजूच्या शेतात वाळवायच्या व त्या नंतर चुलांगणात जाळायच्या . हे करताना हरी पुन्हा अर्ध्या चड्डीत दिसायचा . वर्ण काळसर त्यात केसात , अंगावर चुलांगणातली रुपेरी राख आणि चोयट्यांचे बारीक कण . चुलांगणासमोर असल्याने भर थंडीतही घामाच्या धारा वाहयच्या . हरीचं हे रूप रात्री चुलांगणाच्या दारातून बाहेर आलेल्या लाल उजेडात चमकायचं पण नकळत मनात विचित्र विषण्णता पेरायचं .
तेव्हा मी तांब्यात लिंबू पिळून उसाचा चरकातून बाहेर आलेला ताजा फेसाळता रस अगदी ढेकर येइपर्यंत प्यायचो आणि वाटायचे खरच आपण किती भाग्यवान आहोत .

गुऱ्हाळात जी मळी निघायची ती हरीचा भाऊ कावडीने घरी आणायचा. घरी अंगणात एक छोटं चुलांगण खणायचा त्यावर एक छोटी कढई ठेवली जायची . त्यात मळी आटवली जायची आणि इतरांच्या टाकावू मळीचा गूळ हरीच्या घरी चहात पडायचा .

कधी सुट्टीला हरी घरी यायचा तेव्हा माझी सायकल खराब असली की हरीच्या घरी सकाळी जायचो . तो सायकवर घेउन जायचा मला शाळेत . तेव्हा सकाळी देखील त्याचा भाऊ मळी आटवताना दिसायचा . मळी शुध्द होण्यासाठी भेंडीच्या झाडाचा वापर करायचा .

चैत्रात गावोगावी यात्रा भरायच्या . देवाची पालखी निघायची . कुस्त्यांचे फड भरायचे . शाळेला सुट्टी असायची . कुस्त्यांच्या फडात हरीची हलगी कडकडायची . देवाचा छबिना गावभर फिरायचा तेव्हा देखील हलगी वाजवायचा हरी .
मी फक्त ९ वी पर्यंत हरीच्या शाळेत होतो . पुढे बोर्डिंग असलेल्या शाळेत प्रवेश घेतला जाण्या येण्याचा त्रास होतो म्हणून . तेव्हा हरी दहावीत होता . त्यानंतर मला समजलं हरी पाणीपुरवठा खात्यात काम करतो कुठल्यातरी धरणावर शिपाई म्हणून .

गावगाड्याचा कणाच होतं हरीचं कुटुंब . जेवणात जे मोठेपण मीठाच तेच शेतकऱ्यांना शेतकामासाठी दोरखंडाचं . दोरखंडाशिवाय शेती ही अशक्य कोटीतली गोष्ट .
हरीच्या घरी पोटाला पोठभर मिळविण्यासाठी कुठे वाटमारी नव्हती की लांडीलबाडी नव्हती . वेळेला मोलमजुरी करून संसार चालवत . कुठेही केलेल्या कष्टाच भांडवल नव्हतं . हातावरचं पोट , भेदाभेद हे सारं आड नाही आलं एक मराठी घरचं पोर सहा महिने सांभाळताना . त्या पोराचा हरीच्या काकूला लळा लागला होता . तिने त्याला अंगावरच दूध पाजलं होतं . खूप जड अंतकरणाने त्या माऊलीने जगूला माझ्या वडिलांचे हवाली केले होते . कधी , कुठे थोडासाही नाराजीचा सूर नसायचा हरीच्या घरी . सवर्णांच्या दिवाळीचे लक्षीपूजन हरीच्या केरसुणी साठी रुसायचे . शेतातल्या वा घरातल्या बहुतेक कामाला हरीच्या घामाची दोरी स्पर्शायची . सण , उत्सव हरीची हलगी कान देवून ऐकायचे .

घरात हरीच शिकत होता . परिस्थितीशी निढळ्या छातीने दोन हात करत अव्याहत हसतमुख असायचा हरी .

मी सेवानिवृत्त झाल्यावर हवापालटासाठी गावी गेलो होतो . मला गावात झालेला बदल जाणवला . आता शेतीचे गणित बदललेय . वरचेवर पडणाऱ्या दुष्काळामुळे पशुधन कमी झाले . मोट गेली , पाण्यासाठी पंप आले. पूर्वी मोटेला , बैलांना लागणारी दोरखंड कमी झाली . बरीच कामं भाड्याच्या ट्रॅक्टरने केली जाऊ लागली . सुतार , लोहार , मांग , चांभार , कुंभार हे गावगाड्याचे आधारस्तंभ गावात पोट भरेना म्हणून गाव सोडून गेले . नवीन पिढी शिकली, शहराकडं पळाली . लोक जमेल तसं काम चालवतात . एखादे काम गावात होत नसेल तर शेजारच्या गावात जातात . कुंभारवाडे , मांगवाडे ओस पडलेत . तिथेच राहिलं तर पोट भरण्याची शास्वती नाही. हरीला गावाने काय दिलं माहित नाही पण हरी आणि हरीचं कुटुंब अनंत कराने गावाला देत होतं . आता हरी देत असलेल्या सेवा पैसे मोजूनही वेळेला मिळतील याची खात्री नाही . त्या मिळाल्या तरी हरी सारखा माणुसकीचा ओलावा रहिला नाही .

वाढतं शहरीकरण गावं ओस पाडतेय . हरीच्या घराला सुध्दा एक मोठे कुलूप लटकलेय . गावासाठी हरीच्या गरजेचे दोर केव्हाच कापलेत काळाने . हरीची मुले सुध्दा शिकली, मोठी झाली . हरी आता त्यांच्या सोबतच शहरात असतो . हरी आता सेवानिवृत्त झालाय. त्याला निवृतीवेतन मिळते . मुले मिळवती झालेत . हरीला पूर्वी सारखे कष्ट सोसत नाहीत पण गावची आठवण अजून डोळ्यात पाणी आणते .

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे. आवडले.

लहानपणी गावाकडे घायपातापासून दोरखंड, कासरा वळताना पाहिले आहे. ती भिरभिरी बघून मलाही फिरवाविशी वाटायची.... फिरवताना गंमत वाटायची Happy

छान लिहिले आहे.

> हे गणेशोत्सवाच्या स्पर्धेत यायला हवे होते. > +१

> त्यानंतर मला समजलं हरी पाणीपुरवठा खात्यात काम करतो कुठल्यातरी धरणावर शिपाई म्हणून. > आता परवाच त्या मांग-बळी वगैरे पोस्ट वाचल्याने भ्या वाटलं Sad

गावाकडे सुविधा आल्या , सुबत्ता आली हे चांगलेच झाले ... तिकडचे समाजजीवनही बदलून गेले !
माणसांतली दरी , आर्थिक प्रगतीमुळे कमी झाली !!!
सुबत्ता आली की एकमेकांवरचे अवलंबणे संपते.. दु:ख - दारिद्र्य सरते .....
पण जीवनात एक प्रकारचा कोरडेपणा येतो ! त्याला इलाज नाही !

एक नंबर.
निव्वळ व्यक्तिचित्रण नाही हे. अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. गावगाडा, जात उतरंड हे अस्सल चित्रण केले आहे. निवेदनातील प्रांजळपणा भावला.

सुंदर! हरी आणि त्याची व्यक्तिरेखा दोन्ही आवडलं. म्हातारपणी तरी हरीचे कष्ट संपले म्हणून छान वाटतंय.

> त्याचे असे झाले माझ्या आईच्या काकांचे अपत्य बरेच वर्ष जगत नव्हते . म्हणून चूलत आजीने मरीआईला नवस बोलला
" त्यांचे मुल जगू दे मुलाला मांगणीच्या वट्यात घालील "
झाले नवस खरा ठरला एक मुलगा जन्मला . तो जगावा म्हणून त्याचे नाव जगू ठेवले आणि त्याला हरीच्या काकूच्या ओटीत घातले . पुढे जगूचे आईबाप आजारपणात दगावले . त्यांची बऱ्यापैकी शेती मागे उरलेली तीला वारस हवा म्हणून वडील सहा महिण्यात जगूला परत आमच्या घरी घेऊन आले . तो पर्यंत हरीच्या कुटुंबियांना जगूचा चांगला लळा लागला होता पण पंचानी समजावल्यावर ते तयार झाले . तेव्हापासून हरीच्या घरचे आणि आमचे ऋणानुबंध . पुढे जगू आमच्या घरी वाढला आणि वारसाने मिळालेली शेती कसू लागला .

हातावरचं पोट , भेदाभेद हे सारं आड नाही आलं एक मराठी घरचं पोर सहा महिने सांभाळताना . त्या पोराचा हरीच्या काकूला लळा लागला होता . तिने त्याला अंगावरच दूध पाजलं होतं . खूप जड अंतकरणाने त्या माऊलीने जगूला माझ्या वडिलांचे हवाली केले होते . >

• हे खरे आहे का?
• मरीआई म्हणजे कोणाची/कशाची देवी आहे?
• कोणत्याही जातीचे लोक तिला नवस बोलू शकतात का?
• सवर्णमधली कोणकोणती जात मरीआईला पूजतात किंवा नवस बोलतात?
• मुल सांभाळायला द्यायला मांगणीलाच का निवडली?
• ते असेच फुकट सांभाळतात का मुलाला? राशोमनसारखं माझी आधीच पाच मुलं आहेत
त्यात अजून एकाची भर पडली तर फार फरक पडणार नाही....
• असा कोणी सवर्णाचा मुलगा/गी पूर्ण आयुष्यभर मांगवड्यात वाढलेला तुम्हाला माहित आहे का?
• त्याला गावातले इतर सवर्ण कसे वागवतात?

आवर्जून प्रतिसाद देणाऱ्या सर्व जाणकार मायबोलीकरांचे खूप आभार .
लिखाण वेळेत न झाल्याने स्पर्धेसाठी देता आले नाही .

@ ॲमी
त्यानंतर मला समजलं हरी पाणीपुरवठा खात्यात काम करतो कुठल्यातरी धरणावर शिपाई म्हणून. > आता परवाच त्या मांग-बळी वगैरे पोस्ट वाचल्याने भ्या वाटलं

१) मी कोठल्याही अंधश्रध्देचा पुरस्कर्ता नाही .
२) हे लिखाण एक साहित्यिक कलाकृती म्हणूनच घ्यावे .

मी लहानपणी एवढे ऐकले होते की एखादा पूल किंवा धरण बांधण्यात अडचणी आल्यास नरबळी देतात कोठल्याही जातीचा . माझा यावर तेव्हाही विश्वास नव्हता आणि आताही नाही .

@ ॲमी
त्याचे असे झाले माझ्या आईच्या काकांचे अपत्य बरेच वर्ष जगत नव्हते . म्हणून चूलत आजीने मरीआईला नवस बोलला
" त्यांचे मुल जगू दे मुलाला मांगणीच्या वट्यात घालील "
झाले नवस खरा ठरला एक मुलगा जन्मला . तो जगावा म्हणून त्याचे नाव जगू ठेवले आणि त्याला हरीच्या काकूच्या ओटीत घातले . पुढे जगूचे आईबाप आजारपणात दगावले . त्यांची बऱ्यापैकी शेती मागे उरलेली तीला वारस हवा म्हणून वडील सहा महिण्यात जगूला परत आमच्या घरी घेऊन आले . तो पर्यंत हरीच्या कुटुंबियांना जगूचा चांगला लळा लागला होता पण पंचानी समजावल्यावर ते तयार झाले . तेव्हापासून हरीच्या घरचे आणि आमचे ऋणानुबंध . पुढे जगू आमच्या घरी वाढला आणि वारसाने मिळालेली शेती कसू लागला .

हातावरचं पोट , भेदाभेद हे सारं आड नाही आलं एक मराठी घरचं पोर सहा महिने सांभाळताना . त्या पोराचा हरीच्या काकूला लळा लागला होता . तिने त्याला अंगावरच दूध पाजलं होतं . खूप जड अंतकरणाने त्या माऊलीने जगूला माझ्या वडिलांचे हवाली केले होते . >

• हे खरे आहे का?
• मरीआई म्हणजे कोणाची/कशाची देवी आहे?
• कोणत्याही जातीचे लोक तिला नवस बोलू शकतात का?
• सवर्णमधली कोणकोणती जात मरीआईला पूजतात किंवा नवस बोलतात?
• मुल सांभाळायला द्यायला मांगणीलाच का निवडली?
• ते असेच फुकट सांभाळतात का मुलाला? राशोमनसारखं माझी आधीच पाच मुलं आहेत
त्यात अजून एकाची भर पडली तर फार फरक पडणार नाही....
• असा कोणी सवर्णाचा मुलगा/गी पूर्ण आयुष्यभर मांगवड्यात वाढलेला तुम्हाला माहित आहे का?
• त्याला गावातले इतर सवर्ण कसे वागवतात?

१) हे व्यक्तिचित्रण खरे आहे आणि तेव्हाच्या चालीरिती देखील
२ ) कृपया पुढील लिंक पहा जी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी , डॉं ग . ह . खरे, रा . चिं . ढेरे आदी मान्यवरांच्या संशोधनावर आधारित आहे . शेवटी ग्रंथांची नावे आणि लेखक दिले आहेत . या लिंकचा दुसरा पॅरा पुढील प्रमाणे --
शक्तीची उपासना आदिम काळापासून जगभर सुरू आहे. तिचे स्वरूप वेगवेगळे असेल, तिची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती, सामथ्र्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय आहे. शक्तिपूजेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तिपूजा प्रकर्षांने दिसते. स्त्रीदेवतांची पूजासुद्धा मानववंशसातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामथ्र्यवृद्धी यांकरिता आवर्जून केली जायची.

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.loksa...

३ ) तिरुपतीला केसच का द्यायचे तसेच मांगीणच का ? मला उमगले ते असे . तुमच्या जवळच्या नातेवाईकात मुल देणे खूप सोपे पण बहिष्कृत समाजात देणे म्हणजे देवाच्या परीक्षेत खरे उतरणे समजले जात असावेत . मुळात पोटचा गोळा कुठली आई दुसऱ्याच्या हवाली करेल . पण जिथे तर्कसंगत बुध्दी थांबते तिथे असे अजूनही होते . यल्लमाला जोगतिणी/जोगते सोडले जातात . लालबागचा राजा आणि तुमच्या घरचा गणपती वेगळा नसतो मग तिथेच एवढी रांग कशी लागते .
४) मरीआई सर्व गावात पुजली जाते . तुम्ही पोतराज पाहिला असेल . मरीआई मुख्यता रोगराई पळवणारी म्हणून प्रसिध्द आहे . माझ्या लहानपणी पोतराज घरोघरी मरीआईचा देव्हारा घेऊन जायचा . घरोघरी बायका सुपात हळदीकुंकू आणि धान्य घ्यायच्या . एक हातात पाण्याचे भाडे . भांड्यातले पाणी देव्हाऱ्याच्या चार पायावर घातले जायचे . देवीला हळदीकुंकू वाहात . मग दर्शन घेत . हे नाही केले तर मरी कोपते असा समज होता . मरीआईचे देवूळ बहुतेक गावात आहे .
मराठी देवींची नावे या लिंक वर पहा
https://mr.m.wikipedia.org/wiki/मराठी_देव,_देवी_आणि_देवता

हिंदू लोक दर्ग्याला , बांद्र्याच्या मठमाउलीला नवस बोलतात . हे सारं ज्याच्या त्याच्या श्रध्देवर अवलंबून . काही लोक साईबाबाला हिंदू देवता मानत नाहीत तर सगळ्यात जास्त नवस मग जात कोठलीही असो तिथेच बोलले जातात .

या व्यक्तिचित्रातला जगू ( नाव बदललेय ) खरा आहे .
या बाबतीत हरीच्या घरचे हिशेबी नव्हते .
जगूला गावाने स्विकारले . त्याची दोन लग्न देखील झाली मूलगा होत नव्हता पहिल्या बायकोला म्हणून .

उत्तर दिल्याबद्दल आभार दत्तात्रय साळुंक _/\_

> मी लहानपणी एवढे ऐकले होते की एखादा पूल किंवा धरण बांधण्यात अडचणी आल्यास नरबळी देतात कोठल्याही जातीचा . माझा यावर तेव्हाही विश्वास नव्हता आणि आताही नाही . > ठीक. पण १९वे शतक आणि त्याआधी हे होत असेल असे मला वाटते. फक्त भारतात नाही तर जगभरात.

===
> तुमच्या जवळच्या नातेवाईकात मुल देणे खूप सोपे पण बहिष्कृत समाजात देणे म्हणजे देवाच्या परीक्षेत खरे उतरणे समजले जात असावेत . मुळात पोटचा गोळा कुठली आई दुसऱ्याच्या हवाली करेल . पण जिथे तर्कसंगत बुध्दी थांबते तिथे असे अजूनही होते . > हम्म. पटले.

> यल्लमाला जोगतिणी/जोगते सोडले जातात . > हेमात्र थांबायला हवे Sad
यल्लमा म्हणजेच मरीआई का? तुम्ही दिलेली लिंक अजून वाचली नाही. नंतर वाचेन.

हो पोतराज पाहिला आहे लहानपणी. भीती वाटायची त्याची.

> या बाबतीत हरीच्या घरचे हिशेबी नव्हते . > _/\_

> जगूला गावाने स्विकारले . त्याची दोन लग्न देखील झाली मूलगा होत नव्हता पहिल्या बायकोला म्हणून . > काय बोलणार!!

एनिवे. लिहित रहा.

Pages