“पर्थी”ची वाट! भाग ४ – मुंडारिंग विअर

Submitted by kulu on 23 September, 2018 - 04:50

भाग १ https://www.maayboli.com/node/67051
भाग २ मुरो कट्टा https://www.maayboli.com/node/67131
भाग ३ – क्विनाना, लेक क्लिफ्टन, वार्नब्रो https://www.maayboli.com/node/67226

तर एके दिवशी कोर्नाक्का म्हणाली कुलदीप आल्यापासून आपण लांब लांब कुठे कुठे जातोय पण इथली आसपासची ठिकाणं काहीच बघितली नाहीत! तिच्या बोलण्यात तथ्य आहे हे सुरुवातीला आम्हाल पटलं नाही पण नंतर कोर्नि ने डोळे जरासे उगीच मोठे केल्यासारखे केले आणि मग आपण राहतो तो आजुबाजुचा परिसर अधी बघित्लाच पाहिजे हे आम्हाला अचानक लक्ष्यात आले. मग गुगलाण्णा ला पाचारण करण्यात आले आणि बघण्यासारखं काय काय आहे यावर एक चर्चासत्र झाले. बघण्यासारखे भरपूरच होते पण माझं आणि पाण्याचं काय कनेक्शन आहे माहित नाही, पण मुंडारिंग विअर या धरणावर जायचे ठरले, अगदी अर्ध्या तासावारच होते.

बमव वळणावळणाच्या रस्त्यावरून दुडक्या चालीने धाऊ लागली. अतिशय सुंदर परिसर आहे हा सगळाच! कालामुन्डा म्हणजे पर्थ च बेव्हर्ली हिल्स आहे खरं तर. डार्लिंग स्कॅर्प्स च्या छायेत वसलेलं. आपल्याला सह्याद्री जसा पाठीराखा आहे तसंच पर्थला डार्लिंग पर्वतरांगांनी आपल्या कवेत घेतलं आहे. शेवटच्या आईस एज मध्ये समुद्राच्या वाढलेल्या पातळीने या पर्वतरांगांची झीज केली आणि आणि पर्थ साठी एकदम अनुकूल असा सपाट पायथा या पर्वातांच्या पायथ्याशी तयार झाला. अर्थात पर्वत म्हणण्याएवढ्या काही या रांगा मोठ्या नाहीत पण सह्याद्री सारखाच काळा फत्तर मात्र ल्याल्या आहेत. या डार्लिंग रेंजेस मधून ज्या नद्या येतात तेवढ्याच काय त्या नद्या आख्ख्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया मध्ये बाकी सगळच वाळवंट. पण या रेंजेस मात्र नेहमी हिरवी इरकली नेसून भरजरी दिसतात. अशाच रेंजेस मध्ये कालामुन्डा हे पण एकेक सबर्ब. कुबेरानेदेखिल हेवा करावा अश्या एकाहून एक देखण्या टुमदार बंगल्या सुबाभळीच्या आणि निलागिरीच्या बनात लपलेल्या असतात. प्रत्येक बंगल्याला स्वतःचा स्विमिंग पूल जो पूल कमी आणि तळ जास्त दिसतो, प्रत्येक घराचा ड्राईव्हवे सुद्धा जणू कोकणातल्या एखाद्या घाटावरच्या वाटेसारखा नखरेल आणि दोन्ही बाजूनी ट्री ग्रास ने माखलेला. त्यावर केशरी खापर्‍यांचा पदर घेतलेली एखादी बंगली हळूच निलगिरीच्या आडून हसते. कुठेतरी अंगावर येणाऱ्या कृत्रिम श्रीमंतीपेक्षा शालीन ऐश्वर्याची कळा जास्त आहे इथे.

नागरी वस्तीचा भाग संपून १० मिनिटात जंगल सुरु झाल. पर्थ ची हिरवाई ही खरंतर आपल्यासारखी हिरवीगार नसतेच, इकडे हिरवा आणि किरमिजी हातात हात घालून चालतात. अगदी पावसाळ्यानंतर सुद्धा लुसलुशीत हिरवा वगैरे नाहीच, त्यावेळी देखील दोन्ही रंगांच्या कोवळ्या छटा एकेमेकात बेमालूमपणे मिसळलेल्या असतात. रस्ता छोटासा दुपदरी, त्यावर झाडांनी कमान धरलेली आणि लहानग्यांच्या लपाछपीप्रमाणे सूर्याचे कवडसे मधूनच पानांतून झिरपून हळूच आम्हाला सोन्याची आंघोळ घालून जात होते. मधूनच एखादा गुलाबी काकाटूंचा थवा झाडाखाली गवतात कल्लोळ करत उतरायचा. कुठे पोहोचायची घाई नाही, पुढच्या क्षणाची पर्वा नाही आणि मागच्या क्षणाची खंत नाही, सगळा अलवार समा! वास्तवाला जादूमय करायची कमाल निसर्ग इतक्या ताकदीने करत होता कि हा प्रवास कधीच संपू नये अस झाल! बालकवी म्हणतात तसं
वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे!
अशा स्वप्नवत वाटणाऱ्या प्रवासातून बाहेर आलो तेव्हा मुंडारिंग विअर ला पोहोचलो होतो. मुंडारिंग विअर म्हणजे पर्थ च राधानगरी! फरक एवढाच कि राधानगरीच पाणी कोल्हापूरला मिळतं पण मुंडारिंग विअर चा एक ठीप्पूस पर्थ ला मिळत नाही तर ते पाणी सगळं जात इथून पाच-साडेपाचशे किलोमीटर वर असलेल्या काल्गुरली या गावी!
१.
DSC_0329.JPG

ह्या मुंडारिंग विअर ज्याच्यामुळे अस्तित्वात आला त्या इंजिनिअर ची कथा फार हृद्य आहे. Charles Yelverton O'Connor हा आयरिश शेतकऱ्याचा मुलगा. न्यूझीलंड मध्ये बरेच वर्षे रेल्वे इंजिनीअर च काम केल्यावर १८९१ मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया मध्ये इंजिनीअर इन चीफ म्हणून रुजू झाला. त्यानंतर फक्त नऊ वर्षे तो या पदावर होता आणि त्या कालावधीत आज पर्थ ज्यामुळे भरभराटीला अशा तीन गोष्टींची उभारणी त्याने केली एक म्हणजे Fremantle च बंदर, दुसर म्हणजे TransWA रेल्वे लाईन आणि मुंडारिंग विअर. पर्थ च्या वाळवंटी भागात काल्गुरली आणि कुलगार्डी येथे मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सापडले होते पण तिथ खाण-कामगारांची वस्ती बसवता येत नव्हती कारण पाण्याची दुर्लभता! त्यावेळी जॉह्न फोरेस्ट या अधिकाऱ्याने गोल्ड्फिल्ड्स वॉटर सप्प्लाय स्कीम ची पायाभरणी केली. या कामावर रुजू झाला तो C Y Connor सारखा कर्तबगार इंजिनीअर. दररोज २३००० किलो लिटर्स एवढं पाणी इथून त्या दोन गावी न्यायची ही योजना त्याकाळी भलतीच महत्वाकांक्षी होती. डार्लिंग रेंज मधल्या हेलेना या छोट्याशा नदीवर धरण बांधून तिच्या जलाशायातल पाणी वळवण्यात आलं. त्यावेळी या सगळ्याच प्रोजेक्टवर टीकेची झोड उठली, कॉनर च्या कार्यक्षमतेवर गंभीर आरोप करण्यात आले, त्यावेळच्या न्यूजपेपर्स नी एक भ्रष्ट अधिकारी असं म्हणून कॉनर वर ताशेरे ओढले, अनेक खटले चालवण्यात आले. या सगळ्यात कॉनर एखाद्या कर्मवीरासारख आपलं काम सचोटीने करत राहिला. कुठल्याच खटल्यात तथ्य नसल्याने सगळेच खटले रद्दबातल करण्यात आले पण कॉनर वर या सगळ्याचा परिणाम झाला. पुढे २४ जानेवारी (कॉनर च्या वाढदिवसानंतर बरोबर १३ दिवसांनी) १९०३ ला जेव्हा काल्गुरली ला पाणी आलं तेव्हा ते बघायला कॉनर मात्र तिथ नव्हता कारण प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या १० महिने आधी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तथ्यहीन पत्रकारितेने एका सच्च्या इंजिनीअर चा जीव घेतला! आज या जलाशयाला C Y Connor जलाशय अस नाव आहे! पुढे मी जेव्हा काल्गुरली ला गेलो तेव्हा आवर्जून जिथे हि पाइप्लाइन जाते ते ठिकाण बघितलं.

निळंशार पाणी आणि स्वतःवर खुश होऊन स्वतःलाच पाण्यात बघणारे हे खुळे ढग!
२.
DSC_0946.JPG
३.
DSC_0941.JPG
४.
DSC_1002.JPG

त्या सर्वाहून खुळा मी! (फोटो क्रेडिट - अ‍ॅबि द ग्रेट)
५.
rsz_1img_1596.jpg

धरणाच्या आसपास जंगलात फिरायला बऱ्याच वाटा आहेत. आम्ही निवांत इकडे तिकडे भटकत होतो, हलकेच वारा वाहत होता. शिवाय ठिकाण उंचावर असल्यामुळे उन्हाला दाहकता नव्हती. कांगारू इकडून तिकडे उड्या मारत मजेत फिरत होते. उन्हे उतरू पर्यंत आम्ही तिथेच बसून होतो, त्या दिवसातच एक जादू होती, कशामुळे काय माहित!

Group content visibility: 
Use group defaults

हा लेख फारच छोटा झालाय.
ते मुंडा वाचून तिकडे पंजाबी लोक जास्त राहतात असं वाटलं.

ते मुंडा वाचून तिकडे पंजाबी लोक जास्त राहतात असं वाटलं.>>>> Lol हो, लेख छोटा वाटला खरा, पण फोटोंनी कसर भरुन काढली

.पुढे २४ जानेवारी (कॉनर च्या वाढदिवसानंतर बरोबर १३ दिवसांनी) १९०३ ला जेव्हा काल्गुरली ला पाणी आलं तेव्हा ते बघायला कॉनर मात्र तिथ नव्हता कारण प्रोजेक्ट पूर्ण व्हायच्या १० महिने आधी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तथ्यहीन पत्रकारितेने एका सच्च्या इंजिनीअर चा जीव घेतला! >>>>>>> Sad आपल्या देशातल्या मुर्खांसारखे काही तिथे पण आहेत हे बघुन खेद वाटला.

वा नवीन भाग आला असं म्हणे म्हणे तो संपला पण ... Happy

>>बमव वळणावळणाच्या रस्त्यावरून दुडक्या चालीने धाऊ लागली. अतिशय सुंदर परिसर आहे हा सगळाच! कालामुन्डा म्हणजे पर्थ च बेव्हर्ली हिल्स आहे खरं तर. डार्लिंग स्कॅर्प्स च्या छायेत वसलेलं. आपल्याला सह्याद्री जसा पाठीराखा आहे तसंच पर्थला डार्लिंग पर्वतरांगांनी आपल्या कवेत घेतलं आहे. शेवटच्या आईस एज मध्ये समुद्राच्या वाढलेल्या पातळीने या पर्वतरांगांची झीज केली आणि आणि पर्थ साठी एकदम अनुकूल असा सपाट पायथा या पर्वातांच्या पायथ्याशी तयार झाला. अर्थात पर्वत म्हणण्याएवढ्या काही या रांगा मोठ्या नाहीत पण सह्याद्री सारखाच काळा फत्तर मात्र ल्याल्या आहेत. या डार्लिंग रेंजेस मधून ज्या नद्या येतात तेवढ्याच काय त्या नद्या आख्ख्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया मध्ये बाकी सगळच वाळवंट. पण या रेंजेस मात्र नेहमी हिरवी इरकली नेसून भरजरी दिसतात. अशाच रेंजेस मध्ये कालामुन्डा हे पण एकेक सबर्ब. कुबेरानेदेखिल हेवा करावा अश्या एकाहून एक देखण्या टुमदार बंगल्या सुबाभळीच्या आणि निलागिरीच्या बनात लपलेल्या असतात. प्रत्येक बंगल्याला स्वतःचा स्विमिंग पूल जो पूल कमी आणि तळ जास्त दिसतो, प्रत्येक घराचा ड्राईव्हवे सुद्धा जणू कोकणातल्या एखाद्या घाटावरच्या वाटेसारखा नखरेल आणि दोन्ही बाजूनी ट्री ग्रास ने माखलेला. त्यावर केशरी खापर्‍यांचा पदर घेतलेली एखादी बंगली हळूच निलगिरीच्या आडून हसते. कुठेतरी अंगावर येणाऱ्या कृत्रिम श्रीमंतीपेक्षा शालीन ऐश्वर्याची कळा जास्त आहे इथे. >> सुंदर चित्रदर्शी वर्णन..पण फोटो सुद्धा हवाच होता ईथे..

>>आणि लहानग्यांच्या लपाछपीप्रमाणे सूर्याचे कवडसे मधूनच पानांतून झिरपून हळूच आम्हाला सोन्याची आंघोळ घालून जात होते >> कित्ती मस्त शब्द आहे हा सोन्याची अंघोळ...मागे एकदा मारुती चितमपल्लींच्या पुस्तकात असाच एक मस्त शब्द होता हळदुली उन्हे..त्याची आठवण झाली मला एकदम...

फोटो जरा सढळ हस्ते टाका की कोल्हापुरकर...:-)

बाकी नेहेमीप्रमाणेच मस्त लेख...

सर्वांचे प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार! Happy

वा नवीन भाग आला असं म्हणे म्हणे तो संपला पण ...>>>> लेख छोटा झालाय खरंय पण त्या दिवशी फक्त एवढंच केलं, लेख वाढवायला म्हणुन दुसर्‍या दिवसाचं लिहिलं असतं तर मग खुपच मोठा झाला असता लेख!

पुढचे भाग कुठेयत हो मोरे?
आज वाचून काढले बघ सगळे भाग एक सलग ! नेहमीप्रमाणेच खुमासदार वर्णन, जाशील तिकडे कोल्हापूरच्या खाणाखुणांचा शोध, मनभावन फोटोज वगैरे. खूप दिवसांनी बरं वाटलं.
आता मार्कोच्या त्या टुमदार बंगलीचे, स्विमिंग पुलाचे, तुझ्या युनिव्हर्सिटी कँपसचे, लॅबचे, टुणटुणत इकडे तिकडे फिरणा-या कांगारूंचेही फोटोज येऊ देत पुढच्या भागांमधे. लिहितोयस ना पुढे? इथवर येऊन गाडी थांबलेली दिसतेय, पुन्हा गेअर टाका पावनं.