एकादशी दुप्पट खाशी - राजगिरा बटाटा पुरी - आशिका

Submitted by आशिका on 22 September, 2018 - 07:40

आज या पा. कॄ. स्पर्धेच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन येतेय एक फास्टसाठीचा चाट आयटम' राजगिरा बटाटा पुरी.
ही आहे आपल्या नेहमीच्या शेव बटाटा पुरीची 'उपवासी' बहीण. पण थोडी हटवादी, त्रास देणारी. असं का म्हणता? अहो, कसं आहे ना? आता जेव्हा घरी फर्माईश होते की "आई, आज माझे मित्र येणार आहेत, शेव बटाटा पुरी कर" तेव्हा आई काय करते बरं? सरळ आपल्या जवळच्या सुपरमार्केटचा नंबर फिरवायचा, पुर्‍यांचं पाकीट, बारीक शेव, कधीतरी तर रेडीमेड चटण्या अशी सारी ऑर्डर देऊन हे सारं आलं की फक्त टेबलवर मांडायचं, कांदा , टोमॅटो, कोथिंबीर चिरायची . आईचं काम झालं. पण या बाईसाहेब उपवासी ना? मग यातील प्रत्येक घटक पदार्थ फास्ट फुडच्या चाळणीतून तावून सुलाखून बाहेर आलेला हवा. संयोजकांनी दिलेल्या यादीतीलच घटक हवा. आता आली का पंचाईत मारावी का या चाटवर काट?

नाही,काट मारायला नको. या सर्व अडथळ्यांना पार करत ही पा. कॄ. पेश करतेय. यासाठी लागणार्‍या पुर्‍यासुद्धा आपलाला बनवायच्या आहेत फास्टफुड स्पेशल, त्यामुळे अधिक बडबड न करता आता साहित्य सांगते. आणि हो एक स्पॉयलर्स अ‍ॅलर्ट म्हणजे विषयाचं नावच आहे 'एकादशी दुप्पट खाशी' त्यामुळे कॅलरीजसारख्या गोष्टी विचारात घेतल्या नाहीयेत. वाटल्यास आज संध्याकाळी हे खाऊन झाल्यावर उद्या संपूर्ण दिवस विषय क्रमांक १ मधील फक्त पौष्टीक सलाड खा.

आता साहित्य पाहू-

१. पुरीसाठी-राजगिरा पीठ - १ वाटी (या प्रमाणाने १५-१६ पुर्‍या बनतात).
जीरे- २ चहाचे चमचे
साजूक तूप - तळण्यासाठी ४-५ मोठे चमचे
मीठ - चिमुटभर
पाणी- अर्धा वाटी

इतर साहित्य

बटाटे- ३ मध्यम आकाराचे, उकडून सोललेले, बारीक फोडी करुन
शेंगदाणे - भाजून कुट केलेले - ३ ते ४ मोठे चमचे
काकडी - १ लहान साले काढून, बारीक तुकडे करुन
डाळिंबाचे दाणे - १५-२०

२.चटणीसाठी साहित्य

अ. खजूर चटणी - खजूर -१० ते १२
पाणी - अर्धा वाटी

ब. हिरवी चटणी - हिरव्या मिरच्या - ४-५
जीरे - १ चहाचा चमचा
शेंगदाणे - १०-१२ दाणे
कोथिंबीर-४-५ काड्या
मीठ – चवीनुसार
पाणी - वाटण्यापुरते
एका वाडग्यात खजूर घेऊन ते पाण्यात भिजत घातले. 3 बटाटे उकडून घेतले. थंड झाल्यावर साले काढून फोडी करुन ठेवल्या. काकडी सोलुन, बारीक फोडी करुन ठेवल्या. डळिंब सोलून दाणे वाटीत ठेवले.

एक वाटी राजगिरा पीठ ताटात घेऊन त्यात चिमुटभर मीठ घातले, २ चहाचे चमचे जीरे, एक चमचा तूप घालून मग पाणी घालून पुरीच्या पिठाइतके घट्ट पीठ मळून घेतले.
ते बाजुला ठेवून मिक्सरच्या भांड्यात भिजलेला खजूर घातला, थोडे पाणी घालून फिरवले आणि गाळणीने गाळून घेतले. घट्ट अशी खजूर चटणी तयार झाली.
मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे, जीरे, मीठ आणि किंचित पाणी घालून बारीक वाटून घेतले. ही चटणीही घट्टच केली.
आता भिजवलेल्या पीठाचे सुपारीएव्हढे गोळे करुन त्याच्या पुर्‍या लाटल्या. या पुर्‍यांना काटा वापरुन (आपल्या बोलीभाषेत फोर्क) भोके पाडली. असे केल्यामुळे पुर्‍या फुगत नाहीत. (आपल्याला शेव पुरीची बहीण बनवायची आहे, पाणीपुरीची नव्हे त्यामुळे पुर्‍या फुगणे अपेक्षित नाही). कढईत चार पाच मोठे चमचे तूप घेतले. ते गरम झाल्यावर एकेक पुरी सोडून सगळ्या पुर्‍या तळून घेतल्या. पुर्‍या तळताना गॅस अगदी मंद ठेवला आणि झार्‍याने पुरीवर दाब देत तळल्या. त्यामुळे पुर्‍या चपट्या, खुसखुशीत झाल्या.
(स्पॉयलर अ‍ॅलर्ट नं २ - या पुर्‍या लगेच वापरायच्या नसल्यास त्या अपारदर्शक बरणीत भरुन ठेवणे. पारदर्शक बरणीत ठेवलेल्या या खुसखुशीत पुर्‍या आयत्या वेळी शिल्लक राहिलेल्या असतीलच असे नाही.)
SV1.jpg (84.24 KB)
sv2.jpg (97.71 KB)sv2.jpg

एका भांड्यात एक चमचा तूप घेऊन ते गरम झाल्यावर जीरे फोडणीला घातले. मिरचीचे तुकडे घातले त्यावर बटाट्याच्या फोडी घालून छान परतून घेतल्या. त्यावर ३-४ चमचे दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ घालून पुन्हा छान परतले व गॅस बंद केला.
आता मेन डीश बनवायची.

एका ताटलीत आधी पुर्‍या ठेवल्या. त्याव्र बटाट्याच्या फोडी घातल्या. वरुन खजूर चटणी, हिरवी चटणी घातली. शेवटी त्यावर
काकडी, डाळिंबाचे दाणे घालून डीश पेश केली.
SV3.jpg (98.97 KB)
SV4.jpg (98.83 KB)SV4.jpgSV5.jpg (96.73 KB)SV5.jpg

राजगिरा पीठाच्या पुर्‍या या एकदम खुसखुशीत होतात. त्यावर बटाट्याच्या साजूक तुपात परतलेल्या फोडी, खजूर चटणीमुळे किंचित गोड तर मध्येच मिरचीची तिखट चव, काकडी, डाळिंब यांची चव या सगळ्या चवी मिळून आल्यामुळे हा पदार्थ खरंच भन्नाट लागतो. एकदा करुन पहाल तर वारंवार उपवास कराल. घरी तर सर्वांना आवडलेच पण हे सारे घटक पदार्थ वेगवेग्ळ्या डब्यात भरुन ऑफिसात नेले. सर्वांना ही फास्ट फुडची डीश खूपच आवडली.
यावर बटाट्याचा उपवासाचा चिवडा, सळी चिवडा किंवा हल्दीराम ब्रँडचा फलाहारी चिवडा घातला तर आणखी खुमारी वाढेल मात्र स्पर्धेच्या नियमात बसत नसल्यामुळे मी हे काही वापरले नाही.

नक्की करुन पहा तुम्हालाही आवडेल ही राजगिरा बटाटा पुरी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आशिका माबो वरची ही तुझी रेसिपी वाचून मार्केट मध्ये उपासाची शेव बटाटा पुरी आली तर पेटंट चे म्हणून चांगले पैसे घे त्यांच्या कडून , ☺

उपासाची शेव बटाटा पुरी कल्पनाच भारी आहे.

पहिल्या क्रमांका बद्दल खूप खूप अभिनंदन !

Pages