Sty २ - भूर्जपत्र

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:50

'तो धावतोय... जिवाच्या आकांताने... का धावतोय, कधीपासून धावतोय हे त्यालाही माहित नाही; आणि ते जाणून घ्यायची ही योग्य वेळ नाही, हे त्याच्या अंतर्मनाने जाणलंय. जणू त्याने एक क्षण जरी वाया घालवला, तर ती कुठलातरी अनामिक गोष्ट त्याचं अस्तित्व संपवून टाकेल, ही भीती त्याच्या मेंदूत घर करून बसली आहे... ह्रदयाच्या ठोक्यांवर आता त्याचा स्वतःचा काबू नाहीय... मेंदूवरही जणू त्या अनामिकाचाच पगडा आहे. काळोख्या, अंगावर जणू चाल करणाऱ्या अंधःकारमय वातावरणात एक अनोळखी, गूढ नकारात्मक ताण स्पष्टपणे जाणवतोय! धावताना अगदी एकाच क्षणाला त्याला वाटतं, या जिवघेण्या भितीने क्षणाक्षणाला ह्रदय बंद पडण्यापेक्षा या अनामिकाच्या हातून मेलेलं काय वाईट! अन् त्याच क्षणी एक भेसूर, क्रूर, दुर्गंधाने भरलेली, चवताळलेली, जणू अनेक काळ्या अंधुक शक्ती गराडा घालून आहेत असं वाटावं, अशाप्रकारे स्वतःभोवती काळी वलयं लपेटलेली अमानवी आकृती त्याच्या अगदी समोर येते, अचानक! जणू ती मानवी चक्षूंना अदृश्य अशा मितीतून दृश्य मितीत अचानक अवतरली आहे! ती आकृती याच्याकडे क्रूर, विक्षिप्त, अघोरी नजरेने रोखून पाहते, अन् ते भयानक डोळे पाहून याला धडकी भरते, जणू तो आपल्या मृत्यूलाच समोर पाहत आहे! याला दरदरून घाम फुटतो, हातपाय थरथरु लागतात, ह्रदयाचे उसळून बाहेरच येईल की काय, असं धडधडत असतं, जिवाच्या आकांताने ओरडावंसं वाटतं त्याला, पण तोंडातून भीतीने एक शब्दही फुटत नाही, अन् तेवढ्यात... '

अगदी दचकून जागा झाला अजित. आपण बेडवर झोपलेलो आहोत, हे पाहून हायसं वाटलं त्याला. घसा कोरडा पडला होता. बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या जगमधून घटाघटा चार घोट पाणी पिऊन बरं वाटलं त्याला. श्वास अजूनही फुललेला होता. आता पाहिलं, अनुभवलं, ते एक भयावह स्वप्न होतं, यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्या स्वप्नातलं वातावरण, मनावरला भीतीचा पगडा अजूनही तसाच होता मनःपटलावर. आपल्याला साराच तपशील कसा आठवतोय, याचं त्याला राहून राहून याचंच आश्चर्य वाटत होतं. इथे आल्यापासून बरेचदा त्याला अशी स्वप्नं पडायची. काही वेळ असाच गेला, नि शेवटी तो उठला. आज त्याला जरा लांबच्या वस्तीत जायचं होतं.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अजित जगातल्या गूढ अनाकलनीय गोष्टीत रस असणारा व त्याचा पाठपुरावा करणारा एक विज्ञानवादी संशोधक होता. एका पुरातत्त्व संशोधन करणार्‍या खाजगी संस्थेत तो काम करायचा. नऊ वर्षांपूर्वी त्याने या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला, तो अगदी योग्य ठरला होता. इतक्या वर्षांच्या अनुभवाने माहिती, ज्ञान मिळत गेलं, आणि या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असल्याचं समाधानही. भारताच्या कानाकोपऱ्यात भटकून अनेक गूढ जमाती, समाज, प्रथा, पद्धती, भाषा, लिपी, आध्यात्मिक मान्यता त्याला माहीत झाल्या होत्या. वर त्याने आपल्या क्षेत्राशी निगडीत अनेक ग्रंथांचा, हस्तलिखितांचा सखोल अभ्यासही केला होता. संस्थेत त्याने आपल्या कामात झोकून देण्याच्या स्वभावामुळे छाप पाडली होती. मात्र अशातच, यावर्षी त्याचं एकाएकी नोकरीला राजीनामा देणं कोणालाही पटलं नव्हतं. पण यामागे अजितचं एक कारण होतं. गेल्यावर्षी एका शोधमोहिमेत अजितच्या हाती एक हस्तलिखित आलं होतं. हस्तलिखित साधारण १९७०च्या सालातलं असावं. लेखकाने आपली कोणतीच माहिती त्यात लिहिलेली आढळली नव्हती. त्या हस्तलिखितामध्ये लेखकाने भारतभ्रमणाच्या वेळी अनुभवलेले अनेक गूढ प्रसंग लिहिले होते. अगदी शेवटच्या प्रसंगाने मात्र त्याचं लक्ष वेधून घेतलं.

'अंदमानच्या एका जमातीत मी आलो आहे. अत्यंत गूढ,रहस्यमय जमाती. छोट्या अंदमानच्या वायव्य भागात वसलेली. जवळपास ९०-१०० लोकांनी बनलेली. हे लोक पोशाख म्हणून मोठमोठ्या रहिवासी पक्ष्यांचे अखंड पंख जोडून अंगाभोवती गुंडाळतात. अंगाला कुठल्यातरी गुहेत मिळणारी विशिष्ट रंगाची माती प्राण्यांच्या रक्तात कालवून लावतात.आहार प्रामुख्याने मांसाहार. उंची साधारण सहा फूट, मात्र सारेच कंबरेतून पुढे वाकलेले, राकट काळपट त्वचा. मात्र अत्यंत चपळ. कान, नाक या इंद्रियांच्या क्षमता सामान्य माणसापेक्षा कैक पटींनी वाढलेल्या. डोळे अत्यंत भेदक, गूढ आणि रागीट. हे लोक नरमांसभक्षणही करत असावेत. मी आतापर्यंत दूरुनच निरीक्षण करत आहे. काही अनाकलनीय गोष्टी घडताना दिसल्या. ही लोकं ग्रहण, अमावास्या, पौर्णिमा अशावेळी वस्तीत कुठेही दिसत नाहीत. अचानक कुठेतरी गायब होतात, नि अचानक प्रकट होतात. वस्तीत एक विचित्र पोशाखातली, वृद्ध व गूढ व्यक्ती. चेहर्‍यावर खुनशी, क्रूर भाव पसरलेली. तो बहुधा धर्म उपदेशक असावा. काल रात्री त्याला जंगलातून परत येताना पाहिलं, हातात काहीतरी गूढ चमत्कारिक वस्तू घेऊन. माझी उत्सुकता अत्यंत ताणली गेली, मी लपून त्याच्या खोपटापाशी आलो नि झरोक्यातून आत पाहू लागलो. जे काही घडताना दिसत होतं ते अत्यंत स्तिमित करणारं होतं. तो अधिक भयानक दिसत होता. त्याच्यापुढे एक भुर्जपत्र होतं, त्यावर काहीतरी लिहिलेलं असावं. त्याबाजूला एक गूढ वस्तू, आजुबाजूला जांभळट निळा प्रकाश फेकणारी. कधी चौकोनी, कधी पट्कोनी, तर कधी गोल भासणारी. कधी लाकडाची, तर कधी भक्कम धातूची वाटणारी. तो डाव्या हाताची तर्जनी त्या वस्तूवर ठेवून भुर्जपत्रावर लिहीलेलं अगम्य भाषेत उच्चारत होता. जसजसं तो वाचत जात होता, तसतशी ती वस्तू हळुहळू हवेत तरंगू लागली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भावही त्या प्रकाशात अधिकाधिक विकट भासत होते. एका क्षणी त्यानं वाचणं थांबवलं, नि बाजूला पडलेलं हत्यार घेऊन त्या वस्तूवर ठेवलेली डाव्या हाताची तर्जनी सपकन कापली.
अन् इतक्यात... '

यापुढचं एक पान गहाळ होतं. शेवटच्या पानावर ती लिहिणारी व्यक्ती शोध तसाच सोडून त्या ठिकाणाहून परत आली, असा उल्लेख होता. सोबत 'ती लोकं मला सोडणार नाहीत, माझा जरुर पिच्छा करतील', अशी संदर्भहीन वाक्यं होती. या वाक्यांचा अर्थ काय असावा, गहाळ पानात काय लिहीलं असावं, यापुढे काय झालं असावं, याबाबत अजितला कमालीची उत्सुकता होती. त्याला निदान त्या विस्मयजनक वस्तूचं, भुर्जपत्राचं रहस्य तरी सोडवायचंच होतं. त्याचा कुतूहलाचा पिच्छा पुरवण्याचा स्वभाव त्याला शांत बसू देत नव्हता. अखेर, काही दिवस यावर विचार करुन तो नोकरीचा राजीनामा देऊन अंदमानला निघाला. आपल्याला या मोहिमेत किती वेळ लागेल, हे काही त्याला ठाऊक नव्हतं. कित्येक आठवडे, महिनेही लागू शकणार होते. म्हणूनच त्याने राजीनामा दिला होता.

त्याला अंदमानच्या आदिवासी जमातींमध्ये जावं लागणार होतं. ही विशिष्ट जमात शोधून काढावी लागणार होती. बरीच माहितीही मिळवावी लागणार होती. तो अंदमानला पोहोचला. रोज छोटा अंदमान परिसर पालथा घालायचा. कधीकधी दुर्गम भागात खूप आत जावं लागल्याने तिकडेच तंबू उभारुन रहायचा. जंगलात त्याला अनेक जमाती भेटल्या. काही भाषा त्याच्या परिचयाच्या होत्या, तर काही जमातीच हिंदी, तमिळ सदृश भाषा वापरत होत्या. या जमातीतल्या लोकांनाही या अगम्य जमातीबद्दल विचारुन झालं, पण काहीच माहिती हाती आली नाही. जंगलात राहणाऱ्यांनाही या जमातीबद्दल कसं माहीत नाही, याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. कधीकधी त्याला जाणवायचं, की ही लोकं या विषयावर बोलणं टाळत आहेत, मुद्दामहून. मात्र अनेक वस्त्यांमधली म्हातारी, वयस्कर माणसं जोरजोरात नकारार्थी हात, मान हलवून याला ह्या फंदात न पडण्याबद्दल सांगत. हातानेच त्याला परत जाण्याचा इशारा करत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दाटलेली असे. पण अजितला आता मागे हटायचंच नव्हतं.

आज तो असाच या जमातीच्या शोधात अतिदुर्गम भागात आला. त्याला कळलंच नाही, की तो एवढ्या दुर्गम भागात आलाय. झाडी दाट होती. विचित्र हिंस्त्र प्राण्यांचे आवाज येत होते. अन् हा जणू गुंगीत, धुंदीत चालत होता. त्याचं भान हरपलं होतं. त्या परिसरात नक्की काहीतरी अगम्य होतं, खेचणारं, भान हरपायला लावणारं! इतक्यात त्याच्या कानाजवळून काहीतरी दगडासारखं वेगात गेलं, नि तो भानावर आला. दचकून त्याने आजुबाजूला पाहिलं, नि तेव्हाच त्याला आपण नकळत या अतिदुर्गम भागात आलो असल्याची जाणीव झाली. का कोण जाणे, पण त्याला आज फार भीती वाटली. एक गोठवणारी, शिरशिरी आणणारी थंड लहर अंगभर धावत होती. सकाळच्या स्वप्नामुळे आपण उगाच भितोय, अशी त्याने स्वतःला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण हा परिसर जणू भारलेला होता, तणावपूर्ण होता, स्तब्ध, निश्चल होता. ना वारा वाहत होता, ना कुठे हालचाल दिसत होती. ऐकू येत होते ते हिंस्त्र, अगम्य आवाज. नाही म्हणायला तो चपापलाच.

त्याला वाटलं, आपण इथून परत फिरावं, तो चारीकडे भिरभिरत्या नजरेने पाहू लागला, पण आपण कुठल्या रस्त्याने आलो, हे काही त्याला आठवतच नव्हतं. हिंस्त्र आवाजांनी मेंदू बधीर झाला होता. राहून राहून त्याला इतर वस्त्यांमधील वयस्करांचं त्याला यासाठी अडवणं, आणि त्यांच्या चेहर्‍यावर दाटलेली भीती आठवत होती. ही जमात नक्कीच फार क्रूर व भयावह असली पाहिजे. या विचारात असतानाच अचानक त्याला कुठल्याशा अगम्य आदिवासी वाद्याचा आवाज येऊ लागला. सोबत लयीत आरोळी ठोकण्याचा मोठा आवाज. अजित पुरता घाबरला, त्याने आसपास पाहिलं, जवळ असलेल्या एका झाडाच्या मागे बसून राहिला. भीतीने त्याची गाळण उडाली होती. काही क्षण स्तब्ध गेले, अन् तेवढ्यात....

नियमावली:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
४) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भन्नाट !
लेखनशैली ओळखीची वाटतेय.. Proud
कथा पुर्ण करण्यात यावी. Happy