चुटपुट लावून गेलेली आठवण..(पु. ल. देशपांडे)

Submitted by हरिहर. on 11 September, 2018 - 08:46

(व्यक्तिचित्रण स्पर्धेचा मजकुर वाचून हे लिहावे वाटले.)
पुलं.jpg

तसं माझं लग्न दहावीला असतानाच ठरलं होतं म्हटलं तर वावगं होणार नाही. ठरलं होतं म्हणजे आमचं दोघांचंच ठरलं होतं. पुढे कॉलेजला असताना घरच्यांना थोडी कुणकून लागली होती पण त्यांची एकूणच प्रतिक्रिया पहाता त्यांचा फारसा विरोध नसावा हेही स्पष्ट झालं होतं. फक्त दोघांच्याही घरुन ‘अगोदर शिक्षण पुर्ण करा मग पाहू’ अशी अट घातली गेली होती. अर्थात त्यांनी नसतेही सांगीतले तरी आम्हादोघांचे ‘अगोदर पदवी’ मग लग्न हे ठरलंच होतं. दोघांनीही डिप्लोमा पदरात पाडून घेतला पण डिग्रीची ओढ दोघांनाही गप्प बसू देत नव्हती. पण आता परिस्थिती उलट झाली होती. घरचे लग्नासाठी मागे लागले होते. तिच्या घरचे तर जरा जास्तच. कारण आम्हा दोघांच्याही वयात फार तर दोन-तिन महिन्यांचेच अंतर होते. त्या काळाप्रमाणे तिच्या वडिलांना थांबणे अयोग्य वाटत होते. त्यामुळे दोन्ही घरुन “लग्नाचं पहा अगोदर. शिक्षण काय, आयुष्यभर सुरुच असते.” अशा सुचना सुरु झाल्या होत्या. त्यावेळी होस्टेलचं फारसं प्रस्थ नव्हते. अगदीच नाईलाज असेल तर होस्टेलचा विचार केला जाई. ॲडमिशन घ्यायच्या वेळी नातेवाईक ज्या शहरात असतील त्या शहराला प्राधान्य दिले जाई. (काका, मामा, मावशी आनंदाने शिक्षणासाठी मुलं ठेऊन घेत त्या काळी.) त्यामुळे तिने मुंबईला आणि मी पुण्याला ॲडमिशन घेतले. पुण्यात लहानपणापासूनच येणेजाणे असल्याने मला घरीच आल्यासारखे वाटले.

मी पुण्यात चांगलाच रमलो होतो. ते वयच वेडेपणा करायचं, झपाटून जायचं असल्याने आठवडाभर सपाटून अभ्यास आणि शनिवार रविवार दोघांनी सिंहगड, पुरंदर अशी पुण्याजवळची ठिकाणे पालथी घालायला सुरवात केली. लग्नानंतर कळालं की पाऊस रिपरीप पडतो. पण त्यावेळेस तो रिमझीम पडायचा. थंडीही कडाक्याची न पडता गुलाबी पडायची. एकूनच दिवस मखमली होते. एकमेकांच्या आवडीनिवडी पुरवण्यात कोण आनंद वाटायचा. मखमली दिवस फुलपाखरासारखे उडाले. दोघांनीही उत्तम मार्कांनी डिग्री मिळवली. पण मी स्कल्पचरला ॲडमीशन घेतले. म्हटलं निदान वर्षभर करु. मग आहेच जॉब किंवा व्यवसाय. लग्न वर्षभर लांबल्याने तिनेही मुंबईतच जॉब पाहीला आणि मीही मातीत रमून गेलो.

पावसाळा नुकताच सरला होता. निसर्ग खुलला होता. या शनिवार-रविवारी कोकणात उतरायचा प्लॅन होता. ती शनिवारी सिंहगडने पुण्यात पोहचली. पण तिला काही कामासाठी गावी जायचे असल्याने कोकण बारगळले. हातात फक्त शनिवारच असल्याने मग पानशेतला गेलो. चारपर्यंत भटकून, धाब्यावर जेवन उरकून पुण्यात पोहचलो. तिची तुळशीबागेतली किरकोळ खरेदी उरुकन तिला एसटी स्टॅंडवर सोडायला गेलो. बसला अजुन अर्धातास वेळ होता. त्यामुळे तेथेच गप्पा मारत बसलो.
बोलता बोलता तिने मधेच विचारलं “तुझी आणि पुलंची ओळख आहे ना रे?”
“हो, कागं?”
“माझं छोटसं काम करशील?”
“हो, सांग की.” मी तोंडभरुन होकार दिला तरी टेन्शन आलंच. पोरींचा काही भरवसा नाही, कधी काय मागतील सांगता येत नाही.
तिने पर्समधून पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ बाहेर काढले आणि म्हणाली “प्लिज, यावर पुलंची सही घेशील. मी मैत्रीणीला प्रॉमीस केलय तसं.”
माझा जीव भांड्यात पडला. “ह्या! एवढच ना. दे पुस्तक. पुढच्या शनिवारी येशील तेंव्हा सही झालेली असेल.”
तिने डोळे मोठे करत इतक्या कौतुकाने आणि अभिमानाने माझ्याकडे पाहीले की काय सांगू? तिच्या अश्या एका कटाक्षासाठी मी पुस्तकावरच काय पुस्तकाच्या प्रत्येक पानावर भाईंची सही घ्यायला तयार झालो असतो.(लग्नाअगोदरचा बावळटपणा हो, दुसरं काय?)

मी तिला गाडीत बसऊन दिले आणि रुमवर आलो. सवयीप्रमाणे सही घ्यायचे विसरुन गेलो. त्यादिवशी गावावरुन मित्र यायचा होता मला भेटायला. त्यामुळे त्याला आणायला कॉलेजवरुन सरळ एसटी स्टॅंडवर गेलो. पाच दहा मिनिटात गाडी आली. मित्र नेहमीप्रमाणे दोन्ही हातात भरपुर पिशव्या घेवून गाडीतुन उतरला. हा खुप जिवलग मित्र माझा. शाळेचे अन् याचे पटले नाही की गुरुजींशी ते त्यालाच माहित पण सातवीतून याने शाळेशी, सगळ्या गुरुजनांशी फारकत घेतली आणि वडीलांबरोबर शेतात नांगर धरला. आताही त्याच्या हातात असंच गावाकडून आणलेली भाजी भाकरी, इतर खाऊ, खरवस, लाडू, मध असं काही बाही असलेल्या पिशव्या होत्या. मला पाहूनच त्याला इतका आनंद झाला की भर स्टॅंडवरच त्याने भरतमिठी मारली. मलाही आनंद झाला होता. पण त्याने मिठी मारताच मला ‘भावी पत्नीने सोपवलेले’ काम आठवले. कंबख्तको भी किस वक्त खूदा याद आया.
“च्यायला, मेलो आता.” म्हणत मी मित्राला पिशव्या उचलायला घाई केली.
मित्र गोंधळून म्हणाला “कायरं, पुन्यात मिठ्या मारत नाय का कुनी दोस्ताला?”
“तू बस रे गाडीवर पटकन. रुमवर गेल्यावर सांगतो सगळं.” म्हणत मी बाईक एसटी स्टॅंडबाहेर काढली.

रुमवर पोहचलो. पुस्तक सॅकमध्ये टाकले. मित्राने आणलेला चिवडा थोडा थोडा खाल्ला आणि पटकन निघालो. खरं तर मध्ये थांबून भाईंना फोन करायला हवा होता ‘येतोय’ म्हणून पण टाळले. कॉलेजच्या आणि इतर बिनकामांच्या उद्योगांमुळे मी मालती-माधवला जवळ जवळ चार पाच महिने चक्कर मारली नव्हती. मध्ये ताईंनी निरोप पाठवला होता “भाईची तब्बेत बरी नाहीए” म्हणून पण त्यावेळीही काही तरी कामाच्या नादात राहूनच गेले होते. तसे दोन तिन वेळा फोन केला होता पण प्रत्येक वेळी भाई कसल्या ना कसल्या कामात असल्याने ताईच फोनवर आल्या होत्या त्यामुळे भाईंशी बोलणे झालेच नव्हते. मग आता कोणत्या तोंडाने फोन करणार होतो की ‘येतोय’ म्हणून. उशीर झाला होता. अभिनव चौकातून फुलांचा बुके घेतला, काही फळे घेतली आणि मग कुठेही न थांबता सरळ भांडारकर रोड गाठला. मित्राचे सारखे चालले होते “अरं पन चाल्लोत कुठं ते तं सांग.” पण त्याला काय सांगणार. गुरुजींनी ‘नको वैताग’ म्हणत याला वरच्या वर्गात चढवत चढवत सातवीपर्यंत आणला होता. नंतर यानेच ‘गुरुजींना दिला तेवढा त्रास खुप झाला आता हायस्कूलमधे सरांना वैताग नको’ म्हणत शाळाच सोडली होती. दोनशे पानांच्या पुस्तकाला तो ग्रंथ म्हणायचा. एव्हढं वाचून काय मिळतं तुमाला? असं विचारायचा. त्याला पुलंविषयी सांगून कुठं हसं करुन घ्यायचे, म्हणून त्याला “तू गप बस रे, अर्धा तासाचे काम आहे फक्त” म्हणत त्याला चुप करत होतो.

गाडी कशीबशी रस्त्यावरच लावली आणि मित्रासोबत मालती-माधवमध्ये घुसलो. पहिल्याच मजल्यावर भाईंचा फ्लॅट होता. मित्राला तोंड बंद ठेवायची सुचना देऊन मी बेल वाजवली. बेल वाजणार आहे हे अगोदरच माहीत असावे इतक्या पटकन काम करणाऱ्या बाईनी दार ऊघडले. तिच्या चेहऱ्यावर “आता कोण आलं?” असे भाव पाहून लगेच लक्षात आलं अगोदर कुणीतरी येऊन गेलं असणार. मी आत येऊन सोफ्यावर बसलो. मित्र आरामात सोफ्यावर टेकला. “कोणे गं?” म्हणत ताई बाहेर आल्या.
त्यांनी मला पाहील्यावर “आज वेळ मिळाला का तुला, की रस्ता चुकलास बाबा?” म्हणत पाणी आणायला सांगीतले. मी कसंनुसं हसलो.
माझं अवघडलेपण पाहून ताईच हसुन म्हणाल्या “अरे, होणारी बायको आणनार होतास ना दाखवायला? की केलं परस्पर लग्न?”
“नाही अजुन. असं कसं लग्न करेन तुम्हाला न सांगता?” मी जरा लाजतच म्हणालो.
“मग काही काम काढलय का?”
“नाही हो ताई. काम कसलं. आज सकाळपासुन भाईंकाकांना भेटावं वाटत होतं म्हणून आलो, इतकच.”
“बस थोडा वेळ. भाई बातम्या पहातायेत. येतील बाहेर इतक्यात.” म्हणत ताई उठून आत गेल्या. बुके आणि फळांची करंडी सोफ्यावरच राहीली. मला आश्चर्य वाटलं. मी जेंव्हा जेंव्हा मालती माधवला आलो होतो तेंव्हा तेंव्हा ताईंशी चार शब्द बोलून सरळ भाईंच्या खोलीत जायचो. बरेचदा ते हॉलमध्येच बसलेले असायचे. पण आज भाई हॉलमध्येही नव्हते आणि ताईंनी मला आत जावू न देता “बस थोडा वेळ” म्हणत बाहेरच थांबवलं होतं. मित्राची चुळबूळ सुरुच होती. आता मलाही अस्वस्थ झाल्यासारखं झालं. पाच दहा मिनिटेही मला तासाभरासारखी वाटली. इतक्यात ताई भाईंची व्हिल चेअर ढकलत बाहेर आल्या. हसल्या. मग त्यांनीच भाईंच्या तब्बेतीची माहीती सांगीतली. भाईंच्या फक्त डोळ्यात हालचाल दिसत होती. बाकी शरीराची फारशी हालचाल होत नव्हती. बोलणंही बंद होतं. मी नकळत उभा राहीलो. आवाक होऊन भाईंकडे पहात राहीलो. रस्त्यावरुन चालताना कल्पना नसताना पायाखाली खड्डा आल्यावर सगळ्या शरीराला जसा झटका बसतो तसा झटका मला बसला होता. मी गुडघ्यावर बसुन व्हिलचेअरच्या दांडीवर हात ठेवत विचारलं “कसे आहात भाईकाका?” खरं तर अत्यंत निरर्थक प्रश्न. पण मी मलाच अजुन सावरू शकलो नव्हतो. भाईंचं असं काही रुप कधी काळी पहावे लागेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझा प्रश्न त्यांच्या कानावर पडला होता की नाही माहीत नाही. बहुतेक त्यांना काहीतरी बोलायचं असावं पण त्यांच्या डोळ्यांची फक्त केविलवाणी हालचाल झाली. आम्हा मित्रांना त्यांची ‘बटाट्याची चाळ’ अक्षरशः मुखोद्गत होती. अगदी संगीतकासकट. चाळीची व्हिडीओ कॅसेट आम्ही अगदी उगळली होती पाहून पाहून. भाईंची असंख्य रुपे डोळ्यापुढे येऊन गेली. ज्यांच्या घरी शब्द पाणी भरायचे त्यांच्या तोंडून एक शब्द ऐकायला जीव व्याकूळ झाला. ज्या जिभेवर सरस्वती ‘माहेरवाशीन पोरी’सारखी अवखळपणे खेळायची ती जीभ आता हलायलाही तयार नव्हती.
माझी अवघडलेली स्थिती सुनिताताईंच्या लक्षात आली. त्यांनी वेगळा विषय काढत विचारलं. काय आणलय रे? मी “काही नाही” म्हणत पुस्तक लपवलं. पण ते त्यांच्या लक्षात आलं. “सही हवीय की काय तुला? तू कधी पासून सह्या गोळा करायला लागला?” असं म्हणत त्यांनी पुस्तक मागीतलं. मी दिलं.
म्हणाल्या “मी पहाते, जमली तर करतील संध्याकाळी. नाहीच केली तर माझी चालेल ना?”
मी कसाबसा हसलो. मी अजून सगळ्यातून बाहेरच आलो नव्हतो. माझे डोळे सारखे भरुन येत होते. ताईंपुढे रडायचीही सोय नव्हती. मी बाहीने डोळे पुसत सोफ्यावर बसलो होतो. मित्र गोंधळला होता. काय चाललय हे त्याला काहीच समजत नव्हते. ताई काहीतरी ‘सरबत घेणार का?’ असं विचारीत होत्या. त्यांचा आवाज मला अगदी दुरुन यावा तसा ऐकायला आला. मी काय करतोय हे मलाच समजायच्या अगोदर मी ऊठलो आणि पंढरपुरच्या पांडूरंगाचे धरावेत तसे भाईंचे पाय धरले. दंडवत घातला आणि झपाट्याने चप्पल घालून बाहेर पडलो. खाली रस्त्यावर मित्राची वाट पहात थांबलो. तितक्यात तोही आला.
त्याने विचारलं “कोणी बाबा आहेत का रे हे? त्याच्या या प्रश्नावर मी एकतर खुप हसलो असतो नाहीतर रागावलो तरी असतो. पण मी त्याला म्हणालो “हो फार मोठे सत्पुरुष आहेत”
तो म्हणाला “चला, बरं झालं. तुझं पाहून मिही पाया पडलो ते”

दोन दिवसांनी ताईंचा निरोप आला. पुस्तक घेऊन जा म्हणून. सकाळी लवकर गेलो. दारातूनच पुस्तक घेतलं. येईन परत म्हणत मागे फिरलो. रुमवर येऊन पाहीलं तर पहिल्याच पानावर लाल स्केचपेनमधे भाईंची वेडीवाकडी सही होती आणि त्या खाली सुनिताताईंची निळ्या पेनमधे. अशा अवस्थेतही भाईंनी मला नाराज केलं नव्हतं.

दोन दिवसांनी मी एका वर्कशॉपच्या निमित्ताने पुणे सोडलं. आता महिनाभर तरी पुणे दिसणार नव्हतं. दहा बारा दिवस झाले असतील. सोमवार होता. रविवारचा कंटाळा अजुन गेला नव्हता. मित्राचा फोन आला “भाई गेले”
मला पुण्याला लगेच निघनं शक्य नव्हतं. एकच विचार मनात आला “भाई तुमचं ते हसरं, मिश्कील, रुपडं मनात ठसलं होतं तेच बरं होतं. का अशा अवस्थेत भेटलात?”

(फोटो आंतरजालावरून.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवण क्लेशकारक आहेच पण पुलं आणि सुनिताबाईंचे मोठेपणच त्यातून अधोरेखीत होते. दुर्धर आजाराला तोंड देतानाही आपल्यावर प्रेम करणार्‍या मंडळींशी त्यांचे हे वागणे आपल्याला बरेच काही शिकवून जाते. शाली, तुम्ही फार भाग्यवान आहात! तुम्हाला देवमाणसांचा स्नेह लाभला.

शाली... एकदा भेटा तुम्ही, पांडुरंगाचे पाय धरावेत तसे तुमचे धरतो... !! भाईंना प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न होतं ते आता कायमस्वरुपी स्वप्न च राहणार आहे. Sad आता फक्त भांडारकर रोड वरुन जाताना म न पा ने लावलेल्या त्या ब्ल्यु शिल्ड ला न चुकता नमस्कार करतो.

ओह Sad

मला पुलंच्या बालपणाविषयी, शाळा कॉलेजच्या दिवसांबद्दल आणि एकंदर जडघडणीविषयी जाणून घेण्याची नेहमी ऊत्सुकता वाटते. पण अर्थात ते त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळायला हवे होते. दुसर्‍यांनी लिहिलेले वाचण्यात तेवढी ऊत्सुकता वाटेल का माहित नाही.

हा पुलंचा कुठल्या सालचा फोटो आहे हा शाली?

हायझेनबर्ग, लेखासोबत फोटो हवा म्हणून जालावरून घेतला आहे. उल्लेख करायला विसरलो. (करतो लगेच.)
त्यांच्या बालपणीच्या नाही पण ईतर बऱ्याच आठवणी मला त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यात. वसंत शिंदेंकडून ‘तुका म्हणे आता’ या नाटकाच्या आठवणी खुपदा ऐकल्यात.

त्यांच्या बालपणीच्या नाही पण ईतर बऱ्याच आठवणी मला त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्यात. वसंत शिंदेंकडून ‘तुका म्हणे आता’ या नाटकाच्या आठवणी खुपदा ऐकल्यात. >> हेवा वाटला तुमचा.

ईथे आहेत त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी त्यांच्याच शब्दात पण त्या आठवणी माहिती देण्याकडे झुकलेल्या आहेत,
https://www.youtube.com/watch?v=GCaZNkJGPAY

उल्लेख करायला विसरलो. (करतो लगेच.) >> धन्यवाद. मी तुमच्या सालो-मालोच्या लेखाची लिंक देणारच होतो Wink

शाली, खरंच भाग्यवान आहात हो.
परचुरे प्रकाशनाचे ' जीवन त्यांना कळले हो' हे, भाऊ मराठे आणि अप्पा परचुरे यांनी संकलित केलेलं पुस्तक चांगलं आहे. पुलंविषयी विविध व्यक्तींचे लेख आहेत. बरेचसे पूर्वप्रकाशित आहेत.
त्यात श्रीराम पुजारी, वसंतराव देशपांडे, ग प्र प्रधान, वसंत सबनीस, राम गबाले अशांचे जे लेख आहेत, ( जे त्यांना पहिल्यापासून ओळखत होते , म्हणजे पुलं लेखक नव्हते तेव्हापासून) त्या लेखांमधून पुलंची खट्याळ, तरीही अभ्यासू अशी बाजू समोर येते.
रेडिओवर प्रोड्यूसर म्हणून पुलं कसे उत्कृष्ट काम करायचे, कार्यक्रम चांगलाच झाला पाहिजे यासाठी कसे झटायचे यावरही एक लेख आहे.
पुलंबरोबर नाटकात काम केलेले कलाकार ( भक्ती बर्वे-इनामदार, करुणा देव, विजया मेहता इ.) यांचेही लेख सुंदर आहेत.
पुलंच्या नावावर अनेक विनोद खपवले जातात. पण या पुस्तकात काही 'ओरिजनल पुलं' विनोदही वाचायला मिळतात.

मला पुलंच्या शेवटच्या काळात किंवा ते गेल्यावर आलेली ' उरलंसुरलं' टाईप पुस्तकं फारशी रुचली नाहीत. त्यामुळे हेही पुस्तक साशंक मनानेच घेतलं. पण खरंच खूप बरं झालं घेतलं ते. पुलंच्या अनेक पैलूंचं दर्शन झालं. जयवंत दळवींसारखा, स्वतः सिद्धहस्त आणि लोकप्रिय असलेला लेखक पुलंविषयी किती निर्मळ प्रेमाने आणि अतीव आदराने लिहितो ते वाचायला मिळालं. तसं ' पुलं एक साठवण' चं त्यांचं प्रास्ताविकही वाचलं होतं, पण ह्या पुस्तकातला लेख जास्त हृद्य आहे.

धन्यवाद वावे!
खरी आणि खेदाची गोष्ट ही आहे की वयाची कमी जाण आणि भाईंचं पंधरा मिनिटाच्या अंतरावर सहज उपलब्ध असणं यामुळे काही गोष्टींची जाणीव कधी झालीच नाही. बऱ्याच गोष्टी करायच्या, घ्यायच्या राहील्या. एखादं हस्तलिखित, पेन, किंवा फोटो असं काहीच करावं वाटलं नाही. कारण तेवढी औपचारीकताच नव्हती. सह्या तर त्यावेळीही घेत नव्हतो, आजही घेत नाही कुणाच्या. काही काम निघाले किंवा अगदी फक्त आठवण आली म्हणून सुध्दा भेटून यायचो. आता मात्र 'असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर' वगैरे विचार येतात. वसंत शिंदे तर अगदी जीवलग मित्र होते. पण त्यांच्याही काही आठवणी वस्तूरुपात ठेवावे असं वाटलं नाही. सरपोतदारांचे चिंच गुळ घातलेले जेवण जेवून कंटाळले की माझ्या घरी येऊन आईच्या हातची हुलग्याची (कुळीथ) शेंगोळी खायचे. चंद्रकांत मांढरे (सुर्यकांत-चंद्रकांत या पैकी एक) खुप सुंदर चित्रे काढीत. दिव्याची काजळी वापरुन. त्यांनी अण्णांचे आणि त्यांच्या आईचे पोर्ट्रेट काढले होते. मी सहज म्हणालो "अण्णा मला द्या हे तुमचे पोर्ट्रेट" तर अण्णांनी ते पॅक करुन दिले. गप्पांच्या नादात ते त्यांच्याच बंगल्यावर विसरुन आलो. त्यांनी किती वेळा सांगीतले घेऊन जायला पण राहूनच गेले. फक्त कंटाळ्यामुळे. आज हे आठवलं की स्वतःला भाग्यवान न समजता दुर्दैवी आणि मुर्ख समजतो. भाईंच्या फारश्या आठवणी जरी त्यांच्याकडून ऐकल्या नाहीत तरी वसंत शिंदे यांच्या खुप आठवणी ऐकल्या आहेत ज्या जगापुढे कधी आल्या नाहीत. भालबांच्या (पेंढारकर) नाटकात त्यांनी प्रथम काम केले ते गणपतीचे. त्या गणपतीच्या मुखवट्यात लाल मुंग्या होत्या. मुखवटा चढवून स्टेजवर गेल्यावर त्यांना हे कळाले पण काय करणार? विंगेतून बाहेर पडले तोवर तोंड अगदी सुजले होते. यासारख्या असंख्य आठवणी आम्ही खो खो हसत ऐकल्या आहेत. असो. 'आज जी जाण आहे ती त्यावेळेस असती तर...' असं खुप वेळा वाटतं पण काय करणार. आता फक्त आठवणी.

वेदनादायी आठवण शाली ..अन इतक्या उत्तुंग अशा ज्यांना शालेय वयात देव मानले त्या पुलंच्या तुम्ही इतक्या जवळुन संपर्कात होतात ' मान गये'. तुम्ही पण आज पासुन मोठे झालात आमच्या साठी.

द स्मिता,
तुम्ही पण आज पासुन मोठे झालात आमच्या साठी.>> काहीही काय! थोडा वेळ राजवाड्यावर चुकून बसलेला कावळा आहे मी एवढंच.

खरं तर त्यांना पुलं याचं नावाने संबोधतात किंवा मलाव्य. पण तुम्ही म्हणतां तसा बदल करतो आहे.
खुप धन्यवाद टीना.

डोळ्यातन पाणी काढलंत राव ..... पहिल्या पानावर लेख पहात होते पण शिर्षक पाहून वाचावेसे वाटत नव्हते.पुलं घातलंत ते बरं केलं ........... एका उत्कृष्ट लेखाला मुकले असते.

डोळ्यातन पाणी काढलंत राव ..... पहिल्या पानावर लेख पहात होते पण शिर्षक पाहून वाचावेसे वाटत नव्हते.पुलं घातलंत ते बरं केलं ........... एका उत्कृष्ट लेखाला मुकले असते.>> +१.
नकोशी आठवण म्हटल्यावर कशाला वाचायची असा विचार सारखा मनात येत होता.

पण एक विचार मनात आलाच, तेव्हा तुम्ही पुलंना भेटायला गेला नसतात तर नंतर भेट झालीच नसती. मग आपण का गेलो नाही, अगदी सुनिताईंनी बोलावणं पाठवूनही गेलो नाही, शेवटची भेटही राहून गेली म्हणून जास्त वाईट वाटलं असतं ना. त्यापेक्षा अशा अवस्थेतही पुलं भेटले हे महत्त्वाचं वाटत मला तरी.

Niddhii +1
मलाही हा मुद्दा पटतोय. अगोदर नव्हता लक्षात आला.

शालीजी एक सुचवू? शिर्षक बदलू शकता का? -" अखेरची भेट चुटपुट लावून जाणारी (पु.लं) " असे काहीसे. माझा हा लहान तोंडी मोठा घास आहे पण कदाचित वाचकवर्ग वाढेल अन भावना ही पोहचतील.

बरेच जणांनी सुचवले म्हणून शिर्षकात बदल केला आहे. ज्यांनी पुलंना शेवटच्या दिवसात पाहीले असेल त्यांना मी असं शिर्षक का दिले होते ते चटकन समजले असते. खरं तर हा लेखच काढून टाकावा असं वाटत होतं पण ठेवला. माझे पुलंबरोबर काही फारसे सलगीचे संबंध नव्हते. त्यांच्या असंख्य भक्तांपैकी मीही एक होतो. अण्णांमुळे (वसंतराव शिंदे) ओळख जरा जास्त जवळून झाली इतकेच. नावाने ओळखण्याईतकी, केंव्हाही न सांगता त्यांच्या दारावरची बेल दाबण्याईतकी. पण तेही मी माझे मोठे भाग्य समजतो. तेही आता. त्यावेळी त्याचे फारसे काही वाटत नसे.

गम्मत अशी आहे की पुलंना अनेकदा भेटूनही त्यांच्या फारशा आठवणी नाहीत माझ्याकडे ज्यावर काही लिहिता येईल. आणि अण्णांच्या असंख्य आठवणी आहेत पण त्या येथे लिहिता येणार नाही. (सेन्सॉर) चित्रपटात अण्णा जेवढे मिश्कील होते त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रत्यक्षात होते. दादा कोंडकेंच्या अनेक चित्रपटातील कॅमेऱ्यामागचे विनोद, प्रसंग त्यांनी अगदी रंगवून रंगवून मला सांगितले आहेत.

कलानगरमधे गजानन सरपोतदार, वसंत शिंदे, दादा कोंडके यांचे शेजारी शेजारी बंगले होते. पलिकडील बाजूला आनंद यादव रहायचे. एकून कलानगरमधली माझी काही वर्षे फार आनंदात गेली.

तुमच्या सगळ्यांचे फार आभार. तुम्ही फार आपुलकीने माझी ही छोटीशी आठवण वाचलीत.

शाली, तुमच्या पोतडीतले किस्से ऐकायला आवडतील. ती जुनी माणसे नाहीत आता...पण मोठी होती खूप.
आम्ही बरेचदा ओळख नसतानाही पु लं. कडे त्यांच्या वाढदिवशी जायचो. शुभेच्छा द्यायचो. छान बोलायचे. छान आदरातिथ्य करायचे. आता असे सेलेब्रीटीज बघायला तरी मिळतील का?

@ शाली,

हृद्य आठवण !
हंसते-मुस्कुराते यकबयक संजीदा कर गये Sad

अहो शाली, काय लिहावे ? डोंगराएवढ्या माणसांच्या जवळ राहायचं भाग्य मिळालं तुम्हाला. तुम्ही त्यांचे पाय धरले हे फार छान केले. पु.लं सारख्या माणसांनी हे जगणे सुसह्य बनवले. तुमच्या रूपाने आमच्या सगळ्यांचे नमस्कार त्या महामानवाला पोचले.

Pages