चला संकटांनाच चारू खडे

Submitted by स्वच्छंदी महेश on 11 September, 2018 - 03:28

फुटो ऊर अथवा तुटो आतडे
चला संकटांनाच चारू खडे

जरी मोडला जिंदगीचा कणा
उभारू नव्याने मनाची शिडे

पुरेसा भरु जोम धमन्यांत अन्
उभे ठाकुया मग नशीबापुढे

स्विकारून कोलंबसाचा वसा
दिमाखात देऊ जगाला धडे

उभे गाव हरले तरी आजही
लढा देत आहे जुने झोपडे

असा घाव देऊ पहाडास की
चितारून जावे नभाला तडे

खरी वाट शोधू चला यार हो
तिमीराकडोनी प्रकाशाकडे

- स्वच्छंदी/महेश मोरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults