एका रात्री सुंदर मुलीला दिलेली लिफ्ट

Submitted by किरणुद्दीन on 9 September, 2018 - 12:12

कॉलेजच्या दिवसातला अनुभव आहे. जरासा विचित्रच !

अ‍ॅन्युअल डे ची तयारी चालू होती. आम्ही गाणी बसवत होतो. लेक्चर्स बंक करायचे नाहीत म्हणून मग कॉलेज सुटल्यावर प्रॅक्टीस करायची होती. संध्याकाळी सहाला आम्ही जमायचो. मग ऑडिटोरियमची चावी आणेपर्यंत अर्धा तास जायचा. इन्स्ट्रुमेण्ट्स लावणे वगैरेंमधे अजून अर्धा तास. सात वाजता मग सिरीयसली सगळे प्रॅक्टीस सुरू करायचे. माझ्या डोळ्यासमोर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमातला राजेंद्रकुमार गाणे म्हणताना यायचा. त्याच्या आवाजावर मुग्ध होऊन कॉलेजची स्वप्नसुंदरी त्याच्या गळ्यात पडायची.. किंवा मै पल दो पल का शायर हूं म्हणणा-या अमिताभच्या प्रेमात निळ्या डोळ्यांची राखी पडायची असे चित्र असे.

पण तब्येत खूप बारीक. वजन ४८ किलो. त्यामुळे मुली "चांगला मित्र " म्हणून माझ्याकडे बघत. याची चांगली जाणीव असली तरीही गाण्यावर खूप मेहनत घेऊन गाण्यात आर्त वगैरे भाव आणण्याचा मी प्रयत्न करायचो. पण त्या गाण्याच्या कौतुकात ती बात नसायची जशी शक्ती वगैरेंना दाद मिळायची. पोरी लगेच "हाय हाय" "मै मर जावां" अशा चित्कारायच्या , ते ऐकून काळजाचा ठोका चुकत असे !

नऊ वाजता पोरींच्या पोटात कावळे ओरडायला लागले की ब्रेक होई. पोरं स्वखर्चाने त्यांना पुणे स्टेशनपर्यंत नेऊन खाऊ घालत. यात पाऊण तास मोडायचा. सुरूवातीला मी पण गेलेलो. पण मी अदृश्य असल्याप्रमाणे सर्वांचा व्यवहार पाहून मग मी कॅफे डिलाईट मधे जाऊन झटकन कटलेट खाऊन पुन्हा यायचो. मी एकटाच असायचो.

कुणी नाही हे पाहून मी अवघड गाण्यांचा सराव सुरू केला. आशा वेडी असते. अचानक "लागा चुनरी मे दाग" गाऊन धक्का द्यायचा असा बेत होता. एक दिवस असाच डोळे मिटून गाणे म्हणत असताना टाळ्या वाजल्या. बघतोय तर समोर प्रेक्षागृहात एक मुलगी गाणे ऐकत होती. मी निरखून पाहीले. स्वप्नसुंदरी हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकी सुंदर. मनात म्हटलं बरं झालं कुणी पटली नाही. उसके घर मे देर है अंधेर नही है..

मग ती रोजच यायला लागली. एक बरं झालं. तिच्या वेळेला ही सगळी गँग स्टेशन किंवा कँपात भटकायला गेलेली असायची. अलिकडे त्यांना वेळही लागत होता. त्यामुळे रात्री बारा, एक , दोन वाजत. प्यून चावी मागायला आला की मगच प्रॅक्टीस बंद व्हायची. एक महीन्यात तिच्याशी चांगलीच गट्टी जमली होती.

एकदा धाडस करून तिला नाव आणि क्लास कुठला ते विचारलं. तर ती फक्त हसली. अलिकडे मी कॉलेज सुटल्यावर जीव खाऊन सायकल मारत घरी जायचो आणि सहा वाजेपर्यंत वडलांची जुनी लांबरेटा स्कूटर घेऊन यायचो. तिला मागे बसवायचं असं मनाने घेतले होते.

अरे ये क्या मेरी रोमँटीक कहानी यहा पर शुरू हो गई ?

एक दिवस हिय्या करून तिला विचारलं... भूक लागली का ?
तिने फक्त माझ्याकडे पाहीलं. बहुतेक होकार असावा. मी म्हणालो "डिलाईट मधे जाऊयात का ?"
तिने नजरेनेच होकार दिला..
डिलाईट तर पायी चार पावलांवर. मग स्कूटर आणण्याचा काय फायदा ?
मी म्हणालो... " अरे पण आज डिलाईट बंद आहे ना ?"
तिने माझ्याकडे पाहीलं.
मी म्हणालो "आशिर्वाद मधे जाऊयात का , अलंकारच्या शेजारी ? स्कूटरवर जाऊयात"
तिने खूप छान मान डोलावली.
मी एक करोडची लॉटरी लागल्यासारखा खूष झालेलो.

स्कूटर काढली. ती एका किकमधे चालू झाली नाही. ब-याच किका मारताना बॅक किक येऊन घोट्यावर आदळली.
पार मेंदूपर्यंत झिणझिण्या गेल्या.
पण हिच्यासमोर शूर बनणे गरजेचे होते. शरीर आतून आक्रंदत असताना मी वरून चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न केला.

गाडी एकदाची चालू झाली. आम्ही आशिर्वाद मधे (आताचे अक्षय) पोहोचलो.
नंबर आल्यावर ऑर्डर देण्यासाठी काय घेणार विचारले..
ती काहीच बोलली नाही. मी जवळपास सर्व मेन्युकार्ड वाचले. पण ती मानेने नकारार्थी खूण करायची.
मग मलाही काही खाणे प्रशस्त वाटेना. खरं म्हणजे भूक केव्हांच पळून गेली होती.

शेवटी कोल्ड्रींक्सला ती तयार झाली !
दोन मिराण्डा आले. तिच्या समोर हॉटेलमधे बसून मिराण्डा पिताना मला अक्षरशः दुनिया मेरी मुट्ठीमे असं वाटू लागलेलं होतं.
आता जाताना हिला विचारूनच टाकावं की जरा थांबावं असा विचार चाललेला होता.
आम्ही बाहेर आलो. गाडी सुरू झाली. ती मागे बसली. पोरगी मागे बसल्यावर काय भारी वाटतं त्याचा अनुभव घेत होतो.
एखाद्या पिक्चरचा हिरो असल्यासारखं वाटत होतं. (लो बजेट मराठी सिनेमाचा समजून चालवून घ्या ).
मी चटपटीत, विनोदी काही तरी बोलत होतो. तिच्या हसण्याचा आवाज वीणेच्या तारा झंकारल्यासारखा येत होता.
अंगावर रोमांच उठत होते. मी कुठल्या तरी दुनियेत वावरत होतो. माझा मी राहिलोच नव्हतो.

स्कूटर रेल्वे ब्रीजच्या वर आली. मी बोलत राहिलो.
खूप वेळ गेला होता.

मागून ती काहीच बोलेना. मी मागे पाहीलं. काहीच जाणवेना. स्कूटर थांबवली.
मागे पाहीलं...

मागची सीट रिकामी होती. पूर्ण रिकामी.
आणि त्या सुनसान रस्त्यावर माझ्याशिवाय कुणीही नव्हतं... !

चालत्या गाडीवरून उतरून गेली तरी दिसली असती अशा उंचावर मी उभा होतो.
मला काहीच सुचेना.

घड्याळात पाहीलं रात्रीचे बारा वाजले होते.

मन काही तरी गडबड असल्याचा इशारा देत होतं . हळू हळू या दृश्याचा अर्थ ध्यानात येऊ लागला.
कुठूनतरी डोक्याला चालना मिळाली आणि गाडीला किक मारून मी ऑडीटोरीयम गाठले.
प्यून होता फक्त. पोरं गेली होती.

माझा अवतार पाहून त्याने काय झालं विचारलं..
मी सगळा किस्सा सांगितला.
त्यावर त्याने सांगितलं. त्या पुलावर अपघातात एक मुलगी मेलेली आहे.
रात्री लिफ्ट मागते आणि त्या पुलावर आलं की गायब होते .
त्यालाही अनुभव आलेला होता हा...

मला दरदरून घाम फुटत होता. काही सुचेनासे झाले होते. कॉलेजमधला अंधार खाऊ कि गिळू म्हणून अंगावर येऊ पाहत होता. स्कूटर स्टँडच्या इथे झाडी होती. ती भीती दाखवत होती. कसाबसा स्कूटर चालू करण्यात यशस्वी झालो. गेटच्या बाहेर येईपर्यंत जिवात जीव नव्हता. डावीकडे लागूनच तो पूल होता. तिकडे न पाहता गाडी डिलाईट चौकातून बंडगार्डन कडे घेतली. मुळा मुठेचा पूल ओलांडून आता नगर रस्त्याला लागलो. येरवड्यात जाग होती. ती मागे पडली तेव्हां उजव्या हाताचे स्मशान खुणावू लागले. जुन्या स्मशानात एक चिता जळत होती. सतत मागे कुणीतरी बसलेय असा भास होत होता. थंडीतही अंग घामाने ओलेचिंब झाले होते.

खांद्यावर नाजूक हात पडल्याचा भास झाला. एक लहर अंगातून दौडत गेली. पण नाही, कुणी नव्हते मागे. नगर रस्ता अजूनही या वेळी सुनसान असतो. रस्त्यावरचे दिवेही गेलेले. दोन्ही बाजूला दाट झाडी. ...!

हा प्रवास युगानुयुगे चालू आहे असे वाटत राहीले. कसा बसा कल्याणीनगरच्या जुन्या रस्त्याला लागलो. नगरवालाच्या शाळेजवळ पण अशाच काही वदंता होत्या. मन अगदी दगड करून पुढे जात राहिलो. घरी कसा पोहोचलो हे मला आजही सांगता येत नाही. मात्र मी पोहोचलो हे खरेच.
त्यानंतर कित्येक वर्षे रात्री उशिरा कधीच त्या पुलावरून जायचे धाडस केले नाही.

वरील घटनेनंतर मुलींचा विचार मी सोडून दिला हे सांगायला हवे का ? सांगून आलेल्या पहिल्या स्थळाला होकार दिला आणि मुकाट्याने लग्नं करून प्रेममहाल बांधण्याची स्वप्ने गाडून टाकली. बायको हीच प्रेयसी, बायको हीच मैत्रीण हे ब्रीदवाक्य ठेवले. तिने ठेवले तसे रहावे, दिले ते खावे अशा बाण्याने संसार केला. त्याचा प्रसाद म्हणून मग वजन वाढू लागले. माझे मलाच अप्रूप वाटू लागले. ते वाढते वजन काही वर्षातच मग इतके वाढले की लग्नातला सूटही येईना... आता वजन कमी करण्याची निकड भासू लागली.

खूप वर्षांनी कॉलेजचा ग्रुप भेटला. जुन्या विद्यार्थ्यांचे संमेलन होते. आम्ही कुणी एकमेकांना ओळखू येत नव्हतो.
त्यावरून हा हा ही ही झाले. मग मला भेटलेल्या त्या मुलीचा विषय निघाला. का कोण जाणे सगळे हसताहेत असा भास झाला. एक अंगाने थोडीशी सुटलेली आता कन्यका म्हणता येणार नाही अशी माजी मुलगी.... आत्ताची बाई समोरून गेली. माझ्याकडे पाहून हसत गेली. हिला कुठे तरी पाहीलेय ...

सारखं वाटत होतं. जरी अंगाने धष्टपुष्ट होती तरी चेहरा कमालीचा सुंदर होता. कभी गजब ढाया होगा.
खूप ताण दिल्यावर आठवलं...

अरे ही तर तीच... पुलावरची मुलगी !
बाप रे !
कधी काळी जिच्यावर लाईन मारत होतो ती किर्ती दिसली. तिला सावध करायला म्हणून मी ही बातमी सांगितली.
तिने माझ्याकडे बावळटाकडे पहावं तसं पाहीलं.
म्हणाली "ही माझी धाकटी बहीण आहे प्रीती "

प्रॅक्टीस चालू असताना उशीर व्हायचा म्हणून तिची बहीण घरून यायची. दोघी जवळच क्वीन्सगार्डनला रहायच्या. बहीणी असल्याने एकाच घरात राहत होत्या हे ओघाने आलंच. पण हे मला कुठे माहीत होतं. चला म्हणजे ते भूत नव्हतं तर..

पण मग ते गायब होणं ?
मग माझी खिचाई करत करत सगळा एपिसोड कळाला. हे सगळं ठरवून प्लान करून झालेलं होतं. मला ती आवडत होती हे सगळ्यांनाच ठाऊक झालं होतं. मी केव्हां तिला विचारतोय याचीच सगळे वाट बघत होते. स्क्रीप्ट आधीच ठरलेली होती. अलंकारवरून आगरकर कॉलनीतून रेसीडेन्सी क्लबकडे वळताना गाडी अगदी स्लो झाली तेव्हांच ती शिताफीने उतरली होती. मागून येणा-या आमच्या गँगसोबत ती केव्हांच घरी पण पसार झाली होती. मी तसाच एकटाच गप्पा मारत पुलावर पोहोचलो होतो. आणि पुढचा प्रसंग घडला.

प्यूनला एक क्वार्टर देऊन ठेवलेली होती. सगळं कसं व्यवस्थित सेटींग होतं. आता सगळंच रहस्य उघड झालं होतं.
मी खजील झालो हे सांगायला हवं का ?
पण नंतर सगळं उलगडल्यावर हुश्श होऊन एकेकाला मारायला सुरूवात केली आणि हास्यकल्लोळ उडाला.

पण ...

या पण बद्दल नंतर पुन्हा केव्हां तरी.

[समाप्त]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

YOU,

are

NOT

THE ब्रह्मे.

Didn't read the thread, just replying to lift in title.

मजेशीर आहे.
सर्व एरिया कॉलेज चा असल्याने एकदम रिलेट पण झाले.
बाय द वे रेसिडन्सी कडे जाणार्‍या पुलाबद्दल अश्या गोष्टी खरोखर आहेत.

छान मजा आली ही कथा वाचून...खरोखर असे घडले का तुमच्याबाबतीत..?

जर खरोखर घडले असेल तर लगेच काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींनी का नाही सांगितले?

महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य (मुक्तपीठ)
Submitted by अनिरुध्द.. on 10 September, 2018 - 12:23

हा लेख ब्लॉगच्या माध्यमातून जतन करून ठेवल्याबद्दल धन्यवाद! मी या सगळ्या विनोदी मुक्तापीठाच्या लिंक्स सेव्ह करून ठेवल्या होत्या, पण सकाळने आपली वेबसाईट अपडेट केल्यापासून एकही लिंक उघडत नाही.

करमणूक मांजराची (प्राची सप्तर्षी) हा विनोदी लेख आहे का संग्रहात???

Kusumita, योगी 009, mi anu
मनःपूर्वक आभार आपले.
मुक्तपीठ बद्दल चर्चा इतरत्र केली तर नाही चालणार का? प्लीज.

छान किस्सा..मजा आली +१११
मित्रांनी केलेली मस्करी असेल असे पहिल्यापसून वाटत होते वाचताना...
कारण असे हे प्रकार अनुभवाच्या पोतडीत आहेत Proud

ही प्रतिक्रिया फारच वाचनीय आहे -

On 24/01/2013 09:19 PM Sachin said:
ब्रह्मे साहेब, आपने खाया नही, पिया नही, ग्लास भी नही फोडा, उपर से टेबल भी साफ किया, बर्तन भी धोया, कचरा भी उठाया, वाश बेसिन भी साफ किया फिर भी ४००० का बिल भरा..वाह तुम्हारा दिल है कि दिल्ली दरवाजा...

अजिंक्यराव पाटील आणि मनिम्याऊ आपले मनःपूर्वक आभार

बिपीनचंद्र - तुम्हाला मेसेज करतोय. कृपया पहावा ही विनंती.

योगी ९००
आपण जेव्हां एखाद्या कथेच्या स्वरूपात लिहीतो, तेव्हां थोडी लिबर्टी घेतच असतो. हा किस्सा काल्पनिक की वास्तव याचा खुलासा यासाठीच केला नव्हता. प्रथमपुरूषी निवेदन असेल ते सारेच अनुभव नसतात. अनेकदा त्या काल्पनिक कथा असतात.

समजा ही वास्तविक कथा आहे आणि प्रथमपुरूषी निवेदन लेखकाच्या बाबतीतच आहे असे गृहीत धरले तरी कदाचित त्याला कुणकुण लागली असेल, कदाचित त्याने विश्वास ठेवला नसेल, असेल. पण नंतर पुन्हा गॅदरींगच्या वेळी हा विषय निघणे भाग आहे. यातले काय ठेवावे काय नाही याचा निर्णय तो घेऊ शकेल....