सामाजिक उपक्रम २०१८ आढावा

Submitted by प्राची. on 6 September, 2018 - 03:49

आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ९ वे वर्ष. नेहमीप्रमाणे यावर्षीही आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोली आणि मिसळपाववर आवाहन व घोषणा केली. याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो.
ज्यांनी असा पसंतीक्रम कळवला नव्हता त्यांच्यासाठी संस्था निवडताना शक्यतो प्रत्येक संस्थेला समप्रमाणात देणगी मिळावी असा विचार केला गेला पण असं करतानाही आपण प्रत्येक संस्थेने नमुद केलेली यावर्षीची गरज शक्य तितकी पूर्ण होईल याकडेही शक्य तेव्हढं लक्ष दिलं आहे.
सांगावयास आनंद वाटतो की या वर्षीदेखील उपक्रमाची माहिती वाचून मायबोली आणि मिसळपावचे सभासद नसलेल्या, किंवा मायबोली आणि मिसळपाववर केवळ वाचनमात्र येणाऱ्या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला. नियमीतपणे उपक्रमाचा भाग होणारे आपले देणगीदार, नवीन देणगीदार, मायबोलीकरांचे मित्र, नातेवाईक अशा सगळ्यांच्या हातभारामुळे हा उपक्रम पुर्णत्वास जाऊ शकला.
देणगीदारांकडून त्या त्या संस्थेत देणगी जमा करण्याचं काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही देणगीदारांची देणगी प्रक्रिया अजून सुरु आहे.
आवाहनात लिहील्याप्रमाणे त्या देणगीचा विनियोग देखील काही संस्थांनी केला आहे. काही संस्थांमधे विनियोगाचे काम अजून चालू आहे. त्या सगळ्याची माहिती खाली देत आहोत. आपण यंदा एकूण रु. ४,६३,६०८/- (रुपये चार लाख त्रेसष्ठ हजार सहाशे आठ मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो

संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत :
1. शबरी सेवा समिती, ता. कर्जत: विहीर बांधणी प्रकल्प त्यांनी यंदा हाती घेतला होता. त्यांना मिळालेल्या रु. ८८,२०७/- (रुपये अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सात मात्र) या देणगीतून त्यांनी धडगाव, अक्कलकुवा, शिरपूर, आंबाईपाडा या सर्व ठिकाणी मिळून एकूण ४ विहीरी बांधल्या. या कामाचे फ़ोटो खाली प्रतिसादात देत आहोत. तसेच जूनमधे जव्हारमधील बेहडपाडा येथील जिल्हापरिषदेच्या शाळेतील ९ वी व १० वीच्या मुलांना पाठ्यपुस्तक संचाची निकड होती. मुले अत्यंत गरीब घरातील होती व किमान काही जणांमधे मिळून तरी पूर्ण संच त्यांना मिळावा असा एक संदेश “व्हॉट्स-ॲपवर” कुठूनतरी फ़िरत आला आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. संदेशामधे अपील करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्रमांक दिला होता तरीही तरी त्या माहितीची शहानिशा करण्याइतके मनुष्यबळ आपल्यापाशी नव्हते. शबरी समितीचे काम त्याभागातही चालते याची कल्पना असल्याने शबरी सेवा समितीच्या करंदिकर काकांना हे काम करण्याची विनंती करताच त्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन तसेच पडताळणी करुन योग्य माहिती मिळवून आपल्या कार्यकर्त्यांना कळवली. एव्हढेच नाही तर परिक्षा तोंडावर आल्यामुळे त्या मुलांची निकड ओळखून पुस्तक संच खरेदी करुन त्याचे शाळेत जाऊन वाटपही केले. आपल्याला त्या खरेदीची पावती व पुस्तक संच वाटप कार्यक्रमाचे फ़ोटोही पाठवले. आपल्या काही देणगीदारांनी हा खर्च आपणहून उचलायची तयारी दाखवून शबरी सेवा समितीला त्या खरेदी पावतीवर जितकी रक्कम होती तितकी रक्कम देणगी म्हणून दिली.

2. सहारा अनाथालय, गेवराई बीड: आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रु.७५,९००/- (रुपये पंच्याहत्तर हजार नऊशे मात्र) इतकी देणगी दिली गेली. या देणगीचा विनियोग अजून बाकी आहे. ते काम येत्या एक दोन महिन्यात पूर्ण होऊन त्याचे तपशील इथे त्याप्रमाणे दिले जातील

3. अमेय पालक संघटना, खोणी: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रू. ६३,५०१/- (रुपये त्रेसष्ठ हजार पाचशे एक मात्र) इतकी देणगी दिली गेली. खोणी येथील मतीमंद निवासाच्या दैनंदिन खर्चाकरिता या देणगीचा वापर केला आहे. त्याचे तपशील आणि पावतीचे फ़ोटो लवकरच प्रतिसादात देण्यात येतील.

4. हरीओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गिय सेवाभावी बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रु. ६६,०००/- (रुपये सहासष्ठ हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली.
संस्थेसाठी बोअर किंवा सोलरसाठी देणगीचा विनियोग करण्यात येईल. त्याचे तपशील आणि पावतीचे फ़ोटो लवकरच प्रतिसादात देण्यात येतील.

5. शिव ऋण प्रतिष्ठान, जुन्नर: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रू.७००००/ - (रुपये सत्तर हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली. शिवऋणसंस्था बेवारस मनोविकल रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांना आश्रय देणे, पुनर्वसन करणे यासाठी मदत करते. अशा लोकांसाठी बांधलेल्या खोलीची फरशी बसवणे व या लोकांसाठी वेगळी बाथरूम बांधणे या कामासाठी त्यांनी आपली देणगी रक्कम तसेच त्यांना इतर ठिकाणांहून आलेल्या देणगी रकमेचा वापर केला. श्रमदान हे मुख्यत्वे स्वयंसेवकांनी व आधार मिळालेल्या लोकांनीच केले.

6. प्रश्नचिन्ह: आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रू.७००००/- (रुपये सत्तर हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली. किराणा सामान खरेदी करण्यासाठी याचा विनियोग केला गेला.

7. सावली सेवा ट्रस्ट, पुणे : : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रु.३०,०००/-(रुपये तीस हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली. गणवेष खरेदीसाठी व शैक्षणीक फी साठी त्याचा वापर करण्यात आला.
सावली सेवा ट्रस्ट ही संस्था तशी आपल्या यादीत या वर्षी नव्हती. पण दरवर्षी आपल्या एक देणगीदार त्यांना गणवेशाकरीता व शैक्षणीक फी करीता देणगी देतात व इथल्या मागील काही वर्षांच्या आपल्या उपक्रमामधूनच सावली सेवा ट्रस्टशी त्या जोडल्या गेल्यामुळे तसे कार्यकर्त्यांना कळवतात. म्हणून त्याचाही उल्लेख इथे करावासा वाटला.
सर्व संस्थांनी देणगीदारांना पावत्या दिल्या आहेत्. ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे प्रकाशचित्रे, बांधकामाचे प्रकाशचित्र आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी वेगळा धागा काढून किंवा येथेच प्रतिसादामधे लवकरच प्रकाशीत केले जातील.
उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : सुनिधी(प्राजक्ती कुलकर्णी), अतर्ंगी (मनोज), महेंद्र ढवाण, निशदे (निखील देशपांडे),अरुंधती कुलकर्णी, प्राची. (प्राची वेलणकर), कविन (कविता नवरे)
या सर्व उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचेच खूप मोलाचे सहकार्य लाभले. मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली आणि मिसळपाव प्रशासनाने मिसळपावचे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले यासाठी त्यांचे विशेष आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी नेहमीच सकारात्मक उर्जा देणारा आणि प्रेरणादायी असते.
काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच ह्याची खात्री आहे.
सस्नेह,
सामाजिक उपक्रम २०१८ स्वयंसेवक टीम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची, मस्तं काम केलस हे.

फोटोच टाकण्यासाठी रुमाल टाकला होता आधी मी. पण तू ते सुद्धा काम पूर्ण केलं आहेस. Happy

बाकीही फोटो आणि खरेदीच्या पावत्या इथे काम पुर्ण होत जाईल तस अपडेट करत जाऊ

धन्यवाद मायबोलीकर्स. हे काम करताना टिमला नेहमीच एक वेगळा आनंद मिळतो. आणि तुम्हा सगळ्यांचा अ‍ॅक्टीव्ह सहभाग आमचा हुरूप वाढवतो.

हो ग कविन ...

हर्पेन , मानव धन्यवाद _/\_ Happy

photo 6.jpgphoto 5.jpgphoto 4.jpgphoto 3.jpgphoto2.jpg

प्रश्नचिन्ह: आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रू.७००००/- (रुपये सत्तर हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली. किराणा सामान खरेदी करण्यासाठी याचा विनियोग केला

शिव ऋण प्रतिष्ठान, जुन्नर: : आपल्या उपक्रमाद्वारे त्यांना एकूण रू.७००००/ - (रुपये सत्तर हजार मात्र) इतकी देणगी दिली गेली. शिवऋणसंस्था बेवारस मनोविकल रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांना आश्रय देणे, पुनर्वसन करणे यासाठी मदत करते. अशा लोकांसाठी बांधलेल्या खोलीची फरशी बसवणे व या लोकांसाठी वेगळी बाथरूम बांधणे या कामासाठी त्यांनी आपली देणगी रक्कम तसेच त्यांना इतर ठिकाणांहून आलेल्या देणगी रकमेचा वापर केला. श्रमदान हे मुख्यत्वे स्वयंसेवकांनी व आधार मिळालेल्या लोकांनीच केले. IMG-20180907-WA0024_0.jpgIMG-20180907-WA0025.jpgIMG-20180907-WA0027.jpgIMG-20180907-WA0030.jpgIMG-20180907-WA0031.jpgIMG-20180907-WA0032.jpgIMG-20180907-WA0033.jpg