एका लग्नाआधीची गोष्ट

Submitted by सूनटून्या on 6 September, 2018 - 03:38

खूप वर्ष रॉक क्लाईम्बिंग केल्यानंतरही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच लोक, बहुतांश मित्रच तुम्हाला ओळखत असतात. रॉक क्लाईम्बिंग तुमच्या जिवनाशी किती एकरूप झालंय याची त्यांनाच जास्त जाण असते.

तुमची चाळीशी खुणावत असते, आणि तुम्हाला अचानक उमजते कि ''हे देवा सह्याद्री, चोवीस तासात काही तासांची रात्रसुद्धा असते''.
आणि आता स्वप्न पाहायची वेळ राहिलेली नाही तर थेट कृती करण्याची वेळ आली आहे.

दोनाचे चार, सहा, आठ हात करण्यासाठी आसुसलेली तुमची आई एका विवाह मंडळात नाव नोंदवते.
'अनेक सुंदर चेहरे प्रत्यक्षात एकत्र पाहून गोंधळून जा' सारख्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी तुम्हाला निमंत्रण येते. आईच्या आग्रहाखातर तुम्हीहि या कार्यक्रमाला आईला सोबत न घेता उपस्थित राहता.

उपस्थित सुंदर-सुंदर चेहरे पाहून तुम्ही खरेच गोंधळून जाता. क्षणात त्यातल्या सर्वात सुंदर मुलीबरोबर तुम्ही संसारही रंगवलेला असतो. अशा या गोंधळलेल्या अवस्थेत आयोजक, ओळख देण्यासाठी तुम्हाला व्यासपीठावर बोलावतात. तुम्ही स्व-स्तुती सुरु करता. लोकांच्या तोंडावरची माशीसुद्धा हललेली नाही हे बघून तुम्ही एक रॉक क्लाईम्बर आहात याची तुम्हाला आठवण होते. त्याबद्दल भरभरून बोलूनही कोणी तोंड उघडून जांभई देण्याचेही प्रयास करीत नाही. या अशा बोरिंग ओळखपरेड नंतर अचानक तुम्ही सांगता,

"मी दारू पितो आणि भावी पत्नीने यात काडी केलेली मला बिलकुल चालणार नाही". क्षणात काही चेहऱ्यांवर हास्याची लकेर फुटलेली असते. तुम्ही किती धीट आहात, असं काही चेहरे सुचवत असतात, बहुतांश मुलेच ..... आणि अनुभवी आयोजक...... "चू.... तुझा पत्ता कट".

अशा वागणुकीमुळे तुमचे स्त्रोत आटलेले असतात. वाट पाहूनही तुमच्या विवाहप्रस्तावाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. ‘आपला हात जगन्नाथ’ अवस्थेतून तुमची वाटचाल ओशो अवस्थेकडे झुकण्यास सुरुवात झालेली असते. अशावेळेस त्याच विवाह मंडळातून काही प्रस्ताव आलेले पाहून तुम्ही चक्रावून जाता. खरंतर हे प्रस्तावपाठवू लोक तुमची धिटाई पाहण्यासाठी त्यावेळेस तिथे उपस्थित नसतात म्हणून फसतात.

या प्रस्तावपाठवू मुलींपैकी एका मुलीला भेटण्यासाठी तुम्ही दादरच्या मामा काणे हॉटेलात जाता.

'मुलगी, छे...हि तर बाई'. लगेच तुम्हाला समोरचीच्या चेहऱ्यातही तुम्ही पण चाळीशीकडे झुकलेले पुरुष असल्याचे करुण भाव दाटून आलेले दिसतात.

त्या बाईसोबत तिची लग्न झालेली मोठी बहीण आणि कमी ऐकू येणारे वडील आलेले असतात. कमी ऐकू येणाऱ्या तिच्या वडिलांना तुमची ख्याती, संपूर्ण हॉटेलला ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्या आवाजात सांगता. हॉटेलातले काही चेहरे तुमच्याकडे फिरतात. न जाणो त्यापैकी एखादा चेहरा, तुमची ख्याती ऐकून आपला प्रस्ताव पुढेही करेल या विचाराने तुम्हालाही बरे वाटते.

दरम्यान तिच्या लग्न झालेल्या मोठ्या बहिणीचा चेहरा आणि मादक शरीर तुम्हाला सारख-सारख तिच्याकडे बघण्यास भाग पाडत असते.
तुम्ही मनात म्हणता, "बाई तू घटस्फोट घे, आता लग्न करतो तुझ्याशी".

अशा मुलाखतींना सरावलेल्या मुलीने आणि तिच्या सोबत्यांनी, तुमचे मन आणि डोळे वाचलेले असतात. तुम्हाला राम राम करून पळून जातात.

दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी दादर पूर्वेला जाता. पहिल्या बाई-अनुभवामुळे तुम्ही हिरमुसलेले असता. म्हणून मुलाखतीसाठी तुम्ही स्वतःला सजविण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही. हातात येईल ती ढुंगणावरून घसरणारी जिन्स आणि सप्तरंगीत टी-शर्ट घालून मुलाखतीला जाता.

दादरला तिची वाट पाहताना शेवटच्या क्षणी तुम्हाला रस्त्याच्या कोपऱ्यात फुलवाला दिसतो. त्याच्याकडे उरलेल्या फुलांच्या बुकेशिवाय काहीही नसते. तुम्ही विचार करता, आपल्यासारखच कोणीतरी उरलेलं फुल असेल, खपून जाईल हा दोन फुलांचा बुके.

तुमचा फोन वाजतो आणि तुमचे हृदय धडधडायला लागते. "मी हॉटेलच्या दारात उभी आहे", असं ती सांगते. तुम्ही वळून पाहता तर समोर एक सुंदर आणि मादकता ठसठसून भरलेली अप्सरा पाहून तुमचे डोळे आणि तोंड सताड उघडे पडते. लगेच तुम्हाला जाणवते कि तुम्ही किती मोठी चूक केली आहे. तिचे लक्ष तुम्ही आणलेल्या उरलेल्या फुलांच्या बुकेकडे जाते, तुम्ही उगीच लपविण्याचा प्रयत्न करता.

हॉटेलात बसण्याआधी बुके देऊन संवाद सुरु करता. मध्येच गाडी तुमच्या आवडत्या विषयाशी येऊन थांबते..... रॉक क्लाईम्बिंग..... तुम्ही जे सुसाट सुटता त्याला तोड नाही. खूप कुतूहलाने ऐकतेय असा चेहरा करून, मध्येच कसनुसं हसून, मान हलवून प्रतिसाद येत असतो. तुमचं झाल्यावर ती विचारते, "रॉक क्लाईम्बिंग म्हणजे काय"?

तुमचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तुम्ही मान भरभर वळवून हॉटेलातल्या भिंती, झुंबर, स्टाफ, फरसबंदी, चमचे, ताट-वाट्या आणि तोंडावर कोणीतरी लघुशंका करून गेल्यासारखा चेहरा बनवून बसलेला हॉटेल मालक, यांच्याकडे पाहत बसता.

आणि समोरील मादक सौंदर्य या विचारात असते कि....... “चू.....साला....मी इथे बेड-चढाईसाठी पार्टनर शोधायला आलेय आणि हा टेंटमध्ये हनिमून करायचं प्लान करतोय”. हा प्रस्तावही बारगळतो.

दरम्यान तुमचे नातेवाईकही धावपळ करीत असतात. तुमच्या काकीच्या, काकीच्या मुलीच्या मुलीचा प्रस्ताव आलेला असतो. यावेळेस मुलीच्या घरीच कार्यक्रम असतो. तुम्ही नातेवाईकांना सोबत घेऊन आलेला असता. कांदेपोहे आणि चहा घेऊन मुलगी बाहेर येते. गॅस होतो म्हणून तुम्ही कांदेपोहे नको म्हणता. मग कौन बनेगा करोडपती सुरु होते. तुम्हाला जाणवते कि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुलीची आई आणि भाऊ देतायत.

तुम्हाला शंका येते. 'मुलीला बोलता येते ना? असं तुम्ही विचारता. तुमचे नातेवाईक मारक्या म्हशीसारखे तुमच्याकडे पाहतात. तुम्ही त्यांच्या कानात सांगता कि हे स्थळ मला पसंत नाही. पण तुमचे नातेवाईक तुम्हाला 'आपला हात जगन्नाथ' अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी आसुसलेले असतात. ते आपला घोडा पुढे रेटतात. "आमचा बाळ्या ना फार गुणी आहे".

तुम्ही दक्ष होता आणि आपला हुकूमाचा पत्ता बाहेर काढता. रॉक क्लाईम्बिंगवर तुमचं किती प्रेम आहे आणि तो किती खतरनाक खेळ आहे हेही सांगता. आता तिचा भाऊ उत्सुकतेने आणि आदराने तुमच्याकडे पाहत असतो. तुम्हीही एक प्रेक्षक/श्रोता लाभल्याचा आनंद लपवू शकत नाही. तुम्ही तुमचे रॉक क्लाईम्बिंगचे काही खतरनाक फोटो त्याला दाखवता. त्याच्या चेहऱ्यावर "होणारे भावोजी किती भारी" असे भाव दाटून आलेले असतात. आणि तुम्ही......ओ त्तेरी, ये तो उलटा हो गया.

मग तुम्ही तुमचं मुख्य अस्त्र बाहेर काढता आणि सांगता "मी दारू पितो आणि भावी पत्नीने यात काडी केलेली मला बिलकुल चालणार नाही". क्षणात घरामध्ये स्मशान शांतता पसरते. तुम्ही वळून तुमच्या नातेवाईंकाकडे पाहता. ते केंव्हाच अदृश्य झालेले असतात.

पुन्हा केंव्हातरी एका स्व-स्थापित, स्व-निर्मित करियर केलेल्या मुलीकडून प्रस्ताव येतो. मुलाखतीदरम्यान नेहमीप्रमाणे तुम्ही रॉक क्लाईम्बिंगचा विषय काढता. तुमचे पाणी घालून वाढवून सांगितलेले किस्से ऐकून ती तुम्हाला विचारते, "तुझं स्वतःच घर आहे का"?

एका क्षणात तुमचा 'हिरोशिमा झालेला असतो आणि तुम्ही पूर्ण उद्धवस्त.

तुम्ही सांगता, "नाही, लग्नानंतर दोघ मिळून घेऊ".

ती म्हणते, 'म्हणजे तुला घर आणि ‘चढाईसाठी बेड’, मिच घेऊन देऊ का!

आणि अशा तऱ्हेने प्रस्तावावर प्रस्ताव येताच राहतात आणि मुलाखतीही चालू राहतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी रॉक क्लायबिंग म्हणजे काय?
स्टाईल चा एक किस्सा माहिती आहे,
असाच एक 35शी क्रॉस केलेला कम्पनी सेक्रेटरी मुलगा , मुली शोधत होता,
चहा पोहे झाल्यावर बोलताना मुलीने त्याला विचारले " तुझा
टाइपिंगचा स्पीड काय" तो टोटल नॉन प्लस, CS मुलाला ती सेक्रेटरी समजली होती.

@ सिम्बा: हे बरेच कं सेक्रेटरी मुलांच्या बाबतीत झाले आहे. आताशा होत नसावे अवेअरनेसमुळे. "सेक्रेटरी तर मुली असतात ना" हा प्रश्न मी सुद्धा एका मुलीच्या बहिणीकडून ऐकला आहे.

Biggrin

सिम्बा,
यावरुन सत्यघटना आठवली ती सांगतो. यात अजिबात अतिशयोक्ती नाही.
आमचा सीए चा 'निकाल' लागला होता. सालाबाद प्रमाणे गँग मधले आम्ही बरेचसे जण गचकलो होतो. एकमेकांचं सांत्वन आणि थोडा विरंगुळा म्हणून संभाजी पार्क मधे गेलो. निकालावर राग काढत प्रत्येकी किमान २-२ भेळी हादडल्या. मग बागेत निरुद्देश हिंडायला लागलो. इतक्यात आमच्यातल्या एकाचा मित्र त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर दिसला. नको त्या वेळी नको ते लोक भेटतात, असा त्याचा चेहरा होता, तर शाळेतला ढ गोळा, पोरगी फिरवतोय असा आमच्या मित्राचा चेहरा ! काहीतरी बोलायचं म्हणून दोघे सुरु झाले.
मध्येच त्याने ह्याला विचारलं
तो: "काय करतोस सध्या ?"
हा: सीए करतोय !
तो: बीए नंतर का ??? Uhoh
..... त्या क्षणी आमच्या साठी तो सगळ्यात मोठा स्ट्रेस बस्टर होता ! Happy

कहर आहे !

म्हणजे अगदी स्वतःच वीरू आणि स्वतःच जय असा प्रकार आहे.

मुंबईकर मुलगा जर जाॅबसाठी पुणे, हैद्राबाद, बंगलोर वगैरे ठिकाणी असेल तर?
गरीब बिच्चारा! मुंबईत जाॅब नाही रे. नक्कीच काही खास क्वालिफिकेशन (आणि पगार) नसणार असे लुक्स देतात.

☺️☺️
मला अजून सीए आणि सीएस च्या वर्क प्रोफाइल मधला फरक नीट कळत नाही.दोघं पैश्यात खेळतात आणि मार्च महिन्यात प्रचंड बिझी असतात इतकं माहीत आहे.

@mi_anu, सी एस लोक मार्चमध्ये बिझी नसतात. ते मोस्टली जुलै ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये बिझी असतात जेंव्हा ए जी एम आणि रिलेटेड कामे असतात. सी एस हा रेग्युलेटरी कम्पलायन्स बघतो, लीगल रिलेटेड कामे बघतो, त्याचा फायनान्सशी तेवढा संबंध नाही. थोडक्यात तो शेअरहोल्डर आणि मॅनेजमेंट आणि रेग्युलेटर आणि मॅनेजमेंट मधला दुआ आहे.

ओके, म्हणजे सी एस हा कॉर्पोरेट लॉयर सारखा का? (अत्यंत मूर्ख प्रश्न असेल तर सोडून द्या)

@mi_anu, बरोबर. कॉर्पोरेट लॉयर.. कं कायदा, फेमा , सेबी , कॉन्ट्रॅक्ट कायदा ई. चा समावेश होतो. लॉची पदवी असेल तर एच आर पॉलिसिज आणि लेबर विषयक तसेच रिअल ईस्टेट विषयक कामे पण करता येतात. सध्या बरेच सी एस आय पी आर ची कामे पण करतात.