पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १४. गुमनाम (१९६५)

Submitted by स्वप्ना_राज on 4 September, 2018 - 07:51

बरीच वर्षं झाली ह्या गोष्टीला. अ‍ॅगथा ख्रिस्ती ह्या माझ्या लाडक्या लेखिकेची लायब्ररीत असतील नसतील तेव्हढी सगळी पुस्तकं वाचायचा सपाटा मी लावला होता. एके दिवशी तिचं 'And Then There Were None’ हातात आलं. प्लॉट वाचताक्षणी वाटून गेलं 'अरेच्चा, आपला गुमनाम ह्याच्यावर बेतलाय की काय'. पुस्तक वाचायला लागल्यावर चित्रपट बराच loosely based आहे ह्याची जाणीव झाली. पण तरी गुमनाम आणि 'And Then There Were None’ हे असोसिएशन आजतागायत माझ्यासाठी कायम आहे. Happy काय म्हणताय? काय आहे 'गुमनाम'ची कथा? चला तर मग.....पाहू यात.

आपला पहिला थांबा आहे हॉटेल मेट्रोपोल. चित्रपट सुरु होतो तेव्हा एक व्यक्ती ह्या हॉटेलच्या बाहेर पडताना दिसते. एका बाल्कनीत उभा असलेला एक माणूस इशारा करतो आणि रस्त्यावर असलेली एक गाडी अचानक सुरु होऊन भरधाव वेगाने येते ती त्या व्यक्तीला उडवूनच जाते. आसपासचे लोक गोळा होतात तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून ती व्यक्ती, म्हणजेच सेठ सोहनलाल, मरण पावल्याचं आपल्याला कळतं. बाल्कनीत उभा असलेला तो माणूस खोलीत येऊन एकामागून एक चार फोन करतो - पहिला फोन एका डॉक्टरला डेथ सर्टिफिकेट बनवायला सांगण्यासाठी, दुसरा कोण्या बाईला वकिलाकडे मृत्यूपत्र पाठवण्यासाठी, तिसरा त्या वकिलाला ते मृत्यूपत्र बदलण्यासाठी आणि चौथा आशा ह्या सोहनलालच्या पुतणीला तिच्या काकाच्या अपघाती मृत्यूची बातमी द्यायला. चौथा फोन अजून चालूच असतो तेव्हढ्यात त्या खोलीत अचानक एक व्यक्ती येते आणि त्या माणसाला गोळी घालून निघून जाते. आशा 'हॅलो, हॅलो' ओरडत राहते आणि चित्रपटाची टायटल्स सुरु होतात.

टायटल्स संपतात तेव्हा आपल्याला दिसतो तो प्रिन्सेस क्लब. आज ह्या क्लबची सिल्व्हर ज्युबिली असते. त्या निमित्ताने आधी नाचगाण्याचा कार्यक्रम होतो आणि मग ज्या लोकांनी लकी तिकिटं जिंकलेली असतात त्यांची नावं घोषित केली जातात. ह्या सगळ्यांना एका चार्टर्ड फ्लाईटने २ आठवड्यांसाठी परदेशात सहलीवर नेलं जाणार असतं. हे भाग्यवंत असतात - बॅरिस्टर राकेश, किशन, मिस किटी केली, डॉक्टर आचार्य, मधुसूदन शर्मा, सेठ धरमदास आणि मिस आशा (सेठ सोहनलालची पुतणी). फ्लाईट टेक-ऑफ करतं तेव्हा त्यांच्यासोबत केबिनमध्ये हवाई कर्मचारी आनंदसुध्दा असतो. पण अचानक इंजिनमध्ये काही खराबी झाल्यामुळे विमानाला एका निर्जन बेटावर इमर्जन्सी लॅन्डीन्ग करावं लागतं. वैमानिक सांगतात की सगळं ठीक व्हायला किमान दोन तास लागतील तेव्हा हवं तर तुम्ही पाय मोकळे करून या. आनंदसकट सर्वजण बाहेर पडतात. पण थोड्याच वेळात विमानाच्या टेक-ऑफचा आवाज आल्याने सगळे धावत जातात तेव्हा त्यांचं सामान बाहेर काढून टाकून विमान निघून जाताना दिसतं. ते सातही जण आनंदकडे संशयाने पाहतात पण तो ह्या सगळ्याशी आपला काही संबंध नसल्याचं निक्षून सांगतो.

रात्र होऊ लागते. आनंद "आजूबाजूला कुठे निवाराही नाही आणि मनुष्यप्राण्याची काही खूण नाही" असं सांगत येतो तेव्हा आशा भडकते. "आता मीच जाऊन बघते" म्हणून तावातावाने आपलं सामान घेऊन ती तिथून निघते. किटी आनंदला "तिला थांबव" म्हणून सांगते पण तो निवांत असतो. "काही पावलं जाईल आणि घाबरून परत येईल" हे त्याचं उत्तर. खरंच आशा काही पावलं चालून जाते आणि अचानक कोण्या स्त्रीच्या हसण्याचा आवाज येतो. रात्रीच्या नीरव शांततेत, विशेषत: 'वस्तीचं कुठलंही चिन्ह ह्या बेटावर नाही' असं आनंदने ठामपणे सांगितलेलं असताना तो अशरिरी आवाज ऐकून सगळे तर चरकतातच पण आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आणि इथेच सुरु होतं चित्रपटाचं टायटल सॉंग - गुमनाम है कोई, बदनाम है कोई. किसको खबर कौन है वो, अंजान है कोई. आवाजाचा मागोवा घेत सगळेजण एका हवेलीजवळ येऊन पोचतात. दरवाजा आपोआप उघडतो. ते आत जातात आणि दरवाजा बंद करतानाची बॅरिस्टर राकेशची नजर आपल्या काळजाचं पाणी पाणी करून जाते.

ही मंडळी आत जातात न जातात तोच आशाचं लक्ष खोलीत असलेल्या लांबलचक टेबलावर सफेद चादरीत गुंडाळून ठेवलेल्या शरीराकडे जातं. ती किंचाळते. हळूहळू ते शरीर आडव्याचं उभं होतं. जागच्या जागी थिजून सगळे पाहत राहतात. पण जेव्हा चादर दूर होते तेव्हा आत एक जिवंत माणूस आहे हे पाहिल्यावर त्यांच्या जीवात जीव येतो. तो असतो तिथला स्वयंपाकी. तो जेव्हा सगळ्यांना सांगतो की मी एक आठवड्यापासून तुमची वाट पाहतोय तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटतं. राकेश त्याला विचारतोही की तू आम्हाला ओळखतोस का? तेव्हा तो सगळ्यांची नावं अचूक सांगतो. इतकंच काय पण त्यांची नावं लिहिलेलं एक पत्रही त्यांना दाखवतो. त्यात फक्त एक नाव नसतं - आनंदचं. आनंदभोवतीचं गूढ अधिक गहिरं होतं.

ह्या हवेलीत सेठ धरमदासला एक डायरी सापडते. रात्रीचं जेवण झाल्यावर आनंद सर्वांना त्यातला मजकूर वाचून दाखवतो. त्यात असं लिहिलेलं असतं की तिथे हजर असलेले सगळेजण गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्ह्याबद्दल त्यांना मृत्यूची शिक्षा फर्मावण्यात आलेली आहे. सुटकेचा कुठलाच मार्ग नाही. हा धक्का बसतो न बसतो तोच पुन्हा ते गूढ गाणं ऐकू येऊ लागतं. हवालदिल झालेले प्रवासी त्या स्वयंपाक्याला बोलावून "इथे आणखी कोणी राहतंय का" असं खडसावून विचारतात. पण तो साफ कानांवर हात घेतो. त्यानेही ते गाणं ऐकलेलं असतं आणि 'एखादा अतृप्त आत्मा ह्या बेटावर भटकतोय' अशी भीती तो बोलून दाखवतो तेव्हा ते आणखी अस्वस्थ होतात.

अश्या अवस्थेतही तिथे त्या सगळ्यांचं एक रुटीन बनून जातं. एके दिवशी किशनला तिथून जात असलेली एक बोट दिसते पण खूप प्रयत्न करूनही त्यांना ती बेटाकडे वळवून घेण्यात अपयश येतं. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे असतात - फक्त किशन सोडून. बाकी कोणाला त्याची फारशी फिकीर नसते पण आनंद आणि आशा मात्र त्याला शोधत एका जुन्या दफनभूमीमध्ये पोचतात. तिथे त्यांना ऐकायला येतो पुन्हा तोच हसण्याचा आवाज. तेच गाण्याचे सूर. आणि सापडतो किशनचा मृतदेह. जवळ खुन्याने एक चिठ्ठी ठेवलेली असते त्यात लिहिलेलं असतं की किशनचा सोहनलालला मारण्यात हात होता. आनंदला तिथे आणखी एक गोष्ट सापडते - सिगारचा एक तुकडा. प्रवाश्यांपैकी सेठ धरमदास आणि मधुसूदन शर्मा तशी सिगार ओढत असतात. त्यात धरमदास त्या रात्री जेवायला उशिरा आलेला असतो आणि किशनचा खून ज्या खंजिराने झालेला असतो तो त्याचा असतो हे आनंदने पाहिलेलं असतं. त्यामुळे खुनाचा संशय धरमदासवर जातो. तो जीव तोडून सांगत राहतो की मी मासेमारी करायला गेलो होतो पण कोणीही त्याचं काहीही ऐकून घेत नाही. त्याला आपलं निरपराधीत्त्व सिद्ध करायला एक दिवसाची मुदत दिली जाते. आणि दुसर्या दिवशी त्याचं प्रेत सापडतं. त्याचा खून गळा आवळून झालेला असतो.

एव्हाना खूनी आपल्यातलाच कोणीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. जो तो एकमेकावर संशय घेऊ लागतो. संशयाची सुई स्वयंपाक्याकडेही वळते. आणि तरीही खुनाचं सत्र काही थांबत नाही. मधुसूदन शर्मा, डॉक्टर आचार्य, किटी सगळे एकामागोमाग मरतात. शेवटी राहतात फक्त तिघे - आनंद, राकेश आणि आशा. कोण करत असतं हे सगळे खून? का? चिठ्ठीत आणि डायरीत लिहिल्याप्रमाणे ह्या सगळ्याचा सोहनलालच्या खुनाशी काही संबंध असतो का? का कारण काही वेगळंच असतं? त्या गूढ गाण्यामागे काय रहस्य दडलेलं असतं? आता ही सगळी प्रश्नावली सोडवायला चित्रपट बघायला पाहिजे, नाही का? फिकर नॉट. चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी (किंवा वीकडेला रात्री जागूनसुध्दा!) डाउनलोड करून अवश्य पाहा. "पुढचा लेख वाचू नका" हे ओघाने आलंच. Happy

पण अजून तुम्ही लेख वाचताय म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहिला असणार. चित्रपटाबद्दल पुढे लिहिण्याआधी विकिपीडियावर वाचलेली एक इंटरेस्टिंग गोष्ट - ह्यातलं 'जान पहचान हो' हे गाणं 2001 च्या ‘Ghost World’ ह्या चित्रपटाच्या opening credits मध्ये आणि २०११ च्या Heineken च्या 'The Date' नावाच्या जाहिरातीत वापरलं होतं म्हणे. Happy

तर आता आधी चित्रपटाच्या पात्रयोजनेबद्दल. आनंदची भूमिका केली आहे मनोजकुमारने आणि तो पूर्ण चित्रपटभर भारी Handsome दिसलाय असं ह्या बसंतीचं आणि तिच्या मौसीचं मत आहे. Happy अभिनयाचं म्हणाल तर आशाशी रोमान्स करणे, सर्वांकडे संशयाने पहाणे आणि फावला वेळ मिळालाच तर खुन्याचा माफक शोध घेणे ह्या पलीकडे त्याला फारसं अभिनयकौशल्य वापरावं लागलेलं नाही. पण त्याच्यासमोर नंदाला हिरॉईन (आशा) म्हणून पाहताना मात्र डोळे दुखतात. तिला ज्या कोणी श्वास घ्यायलाही त्रास होईल असले तंग कपडे दिलेत त्या व्यक्तीला माझा शि.सा.न. चित्रपटाच्या शेवटी तरुण बोसला तिला उचलताना पाहून त्याच्या पाठीच्या कण्याची अत्यंत कीव आली. तिलाही मृतदेह पाहून किंचाळणे, आनंदशी लाडिक लाडिक बोलणे आणि चित्रपटाच्या शेवटी हवेलीभर धावणे ह्यापलीकडे फारसं काम नाही. त्यापेक्षा बॅरीस्टर राकेश झालेल्या प्राणचा अभिनय रसरशीत वाटला. चित्रपटभर त्या इवल्याश्या बाटलीतून दारू प्यायची, सहप्रवाशांकडे भेदक नजरेने रोखून पहायची आणि मोक्याच्या वेळेस सूचक वाक्यं टाकायची त्याची लकब अफलातून आहे. त्या निर्जन बेटावर कापरं भरवणारं ते गाणं ऐकू येत असताना त्याच्या नजरेतली उद्दाम बेफिकिरी आवर्जून पाहण्यासारखी. हैदराबादी लहेज्यात बोलणाऱ्या स्वयंपाक्याच्या भूमिकेत महमूद मजा आणतो. बाकी कलाकारांत मनमोहन (किशन), धुमाळ (सेठ धरमदास), मदन पुरी (डॉक्टर आचार्य), हेलन (किटी केली) आणि तरुण बोस (मधुसूदन शर्मा) आहेत.

भारतीय सिनेरसिकांच्या अत्यन्त जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चित्रपटातली गाणी. ‘गुमनाम' च्या गाण्यांना संगीत दिलंय शंकर-जयकिशन ह्यांनी. पार्श्वगायकांत मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर अशी दिग्गज मंडळी असल्याने बहुतेक सर्व गाणी श्रवणीय आहेत. टायटल सॉंग 'गुमनाम है कोई' चा उल्लेख विशेष करून करावा लागेल. कारण त्याचे शब्द आणि चित्रीकरण दोन्ही अप्रतिम जमून आलंय. एका ओसाड बेटावर अचानक सोडून देण्यात आलेले प्रवासी आपलं सामानसुमान सांभाळत कोण्या अज्ञात गूढ आवाजाचा शोध घेत फिरत आहेत. त्यांच्या चेहेर्यावर भीती, काळजी, बेफिकिरी असे सगळे भाव स्पष्ट वाचता येतात. गाण्याचे शब्द हे रहस्य अधिक गहिरं करतात. उदा. 'चैन यहांपर महेंगा है और मौत यहांपर सस्ती है', 'किसको समझे हम अपना, कलका नाम है एक सपना, आज अगर तुम जिंदा हो तो कलके लिये माला जपना' आणि माझी अतिशय आवडती ओळ 'आये सदा विरानोसे जो पैदा हुआ वो फानी है'. फानी म्हणजे नश्वर हा अर्थ मला मायबोलीवरच कळला होता. 'जान पहचान हो' आणि 'इस दुनियामे जीना हो तो सुन लो मेरी बात' आपल्याला बसल्या जागी ठेका धरायला लावतात. ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' हे महमूद आणि हेलनवर चित्रित झालेलं Dream Sequence वालं गाणंही धमाल आहे. त्या मानाने आशा भोसले आणि उषा मंगेशकर ह्यांनी गायलेलं 'पीके हम तुम जो' आणि मनोजकुमार-नंदा ह्यांच्यावर चित्रित झालेलं 'एक लडकी है जिसने जीना मुश्कील कर दिया' ही दोन्ही गाणी निदान मला तरी फारशी आवडली नाहीत. 'जान-ए-चमन शोला बदन' हे सुरेख रोमॅन्टिक गाणं शारदाच्या किनर्या आवाजाने पूर्ण खराब केलंय. Sad विकिपीडियानुसार ह्या चित्रपटाच्या आल्बममध्ये अजून एक गाणं होतं - आयेगा कौन यहा - जे चित्रपटात वापरलं गेलेलं नाही. पण ते शारदाच्या आवाजात असल्याने न ऐकून फारसं काही बिघडलं असेल असं मला वाटत नाही.

राजा नवाथेंनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट कुठेही रेंगाळत नसला तरी आजच्या काळात पाहताना त्यात काही कच्चे दुवे नक्कीच जाणवतात. उदा. आशा सोडून बाकी ६ जण एकमेकांना थोडेफार ओळखत असतात. किमानपक्षी एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग असतो मग जेव्हा लकी ड्रॉमध्ये त्यांची नावं येतात तेव्हा त्यातल्या एकालाही ह्यात काही काळंबेरं असल्याचा संशय कसा येत नाही? हवेलीत आल्यावरही आनंद ते पत्र वाचून दाखवेपर्यंत ते निवांत दिसतात. आधी गाणं सुरु असताना त्यांच्या चेहेर्यांवर असलेल्या अस्वस्थतेचा मागमूसही नसतो. ते का? जेव्हा एकेका प्रवाश्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले जात नाहीत का? केले असतील तर मधुसूदन शर्मा त्यातून कसा सुटतो? इन्स्पेक्टर आनंद (हे हिरो लोक चित्रपटाच्या शेवटी इन्स्पेक्टर किंवा सीआयडी कसे निघतात हेही एक चिरंतन अनाकलनीय गूढ आहे) त्या फ्लाईटवर कशासाठी आलेला असतो? डॉक्टर आचार्य Poison असं जन्मांधाला दिसेल एव्हढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेली बाटली आणि सेठ धरमदास खंजीर घेऊन परदेशी प्रवासाला का निघालेले असतात? तेव्हा सर्व परदेशांत भारतीयांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय होती का? पूर्णपणे कफल्लक असलेला मदनलाल चार्टर्ड फ्लाईट आणि एकाकी बेटावरची हवेली (तीही स्वयंपाकी आणि शिध्यासकट!) वगैरे गोष्टी कश्या जमवून आणतो? आणि शेवटी अगदी मोक्याच्या क्षणी पोलिस बेटावर कसे येतात? हे सगळे प्रश्न अखेरीस अनुत्तरित राहतात. ते गूढ गाणं पूर्ण बेटावर फिरणाऱ्या प्रवाश्यांना सगळीकडे कसं ऐकू येतं हेही एक गूढच. Happy

पण जर मेंदू थोडावेळ बाजूला ठेवता येत असेल (आणि भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकांना तो सराव आहेच!) तर मात्र हिंदी चित्रपटसृष्टीच्या गोल्डन एरात जे काही मोजके रहस्यप्रधान चित्रपट निघाले त्यातला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून एकदा तरी गुमनाम बघायलाच हवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा आली....

मी हा चित्रपट गणेशोत्सवात रस्त्यावर पाहिलेला, त्यामुळे सुरवात चुकलेली. अशीच कब?क्यू?कहा? ची सुरवात मी चुकवलेली आहे.

किटी केली हे तेव्हाचे फेमस अमेरिकन नाव होते, जे हेलनला दिलेय. नंदापेक्षा हेलन जास्त क्युट दिसते. तिला गाणी पण एखाद दोन जास्त असावीत. Happy तिचा शेवट भयाण केलाय.

आणि नंदाने केलीय ग acting. Happy शेवटी घरात एकटीच राहते व तिच्या मागावर खुनी येतो तेव्हाचा घाबरल्याचा अभिनय बघून मीच घाबरले होते.

सिनेमा बराय पण मनोजकुमारची लिपस्टिक असह्य होते Proud
खूप लहानपणी एकदा बघितला होता, काही गोष्ट वगैरे लक्षात नव्हतं. पण परत मोठेपणी पहायला बसल्यावर ज्या क्षणी खुनी पडद्यावर आला त्याक्षणी लगेच आठवलं का आणि कसे खून होतात ते Uhoh

या पेक्षा वह कौन थी चं रहस्य जास्त बरं आहे...

माझ्या बाबांनी हा मुव्ही मुंबई ला येऊन पाहिलेला. तेव्हा ते गावी राहत आणि गावी परत आले तेव्हा रात्री च्या अंधारात त्यांना घरी जायला भीती वाटत होती सामसूम रस्त्यावरून Lol

छान लिहिलंय, तरी पूर्ण वाचलं नाही. कारण हा चित्रपट बघितला नाहीय. आधी बघतो मग पूर्ण वाचेन.
त्या किटी केली नावावरून और मान लो जो कहे कीटी केली हे गाणं या चित्रपटात आहे हे कळलं.

लगेच बघून टाकला इथलं वाचून.
हिंदी पिक्चर च्या मानाने चांगला आहे.
पण मूळ कादंबरी मधलं ओरिजिनल रहस्य जास्त सॉलिड आहे
लोकसत्ता मध्ये येणारं पाषाण बेट हे मराठीकरण आठवलं.ते मस्त बनलं होतं.

स्वप्ना नेहमीप्रमाणेच किती सुंदर लिहिलेस परिक्षण. Happy लगेच बघावासा वाटतोय सिनेमा, पण हापिसात आहे मी आता Sad
घरी जाताना पाहिन.

स्वप्ना नेहमीप्रमाणेच किती सुंदर लिहिलेस परिक्षण. Happy लगेच बघावासा वाटतोय सिनेमा, पण हापिसात आहे मी आता Sad
घरी जाताना पाहिन.+१११११११११११
घरी गेल्यावर पाहीन Happy

मी लहानपणी बघितलेला तुमचा लेख वाचुन आज पुन्हा बघितला.... गुमनाम शोधत असताना रा. ख. चा बावर्ची चिञपट सापडला.... घरी जातानां प्रवासात बघणार..

छान लेख स्वप्ना.
मी पण लहानपणी बघितलेला.. तेव्हा घाबरले होते बघतांना. आता परत बघेन.

प्रतिसाद दिल्याबद्दल (आणि वाचून आवर्जून चित्रपट पाहिल्याबद्दलसुध्दा!) सर्वांचे मनापासून आभार Happy

साधना, हेलन खरंच क्यूट दिसते. नंदाचा शेवटचा अभिनय थोडा बेगडी वाटला मला Happy वरदा, मनोजकुमारची लिपस्टिक Happy तेव्हाच्या काळात बर्‍याच हिरोंना पाहिली आहे. त्यामुळे फार खटकली नाही. मला 'वो कौन थी' पेक्षा 'मेरा साया' तला ट्विस्ट बरा वाटला होता. अर्थात तशी दोन्हीत सेमच आयडिया आहे म्हणा. फक्त स्टोरी वेगळं वळण घेते एव्हढंच. मात्र 'वो कौन थी' मधला तो बंगला, ते स्मशानाचं दार, चालू-बंद होणारे वायपर्स जाम टरकावतात.

मानव, इंग्रजी चित्रपटाच्या मानाने तुलना केलीत तर सो सो च वाटेल. मूळ कादंबरीतला प्लॉट जास्त चांगला आणि लॉजिकल होता.

अवांतर:
१९४४ सालचा एक चित्रपट आहे. रतन.
झोहराबाई अंबालेवाली या चित्रपटातील गाण्यांतून प्रसिद्ध झाल्या ( रुमझुम बरसे बादरवा, अखियां मिला के), पण गाणी सोडा.
चित्रपट तो काळ लक्षात घेता अप्रतीम आहे असे माझे वैयक्तीक मत. तुम्ही बघितला असेल / नसेल, नसल्यास बघा आणि त्याला पण या लेखमालेत आणा.

https://youtu.be/E_NpAV-ko_4

मकु असल्यामुळे पाहिलाच नाहीये आणि पुढेही पाहण्याचे धाडस करेन असे वाटत नाही. पण परीक्षण आवडले.

गम छोडके मनाओ रंगरेली प्रचंड आवडते - खराब मुडवरचा रामबाण उपाय आहे.

मकू Lol

मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा खूपच घाबरवणारा वाटला होता. पण गोष्टीमधे अनेक त्रुटी आहेत. नंदा आणि मनोजकुमार ह्यापेक्षा अन्य लोक , हेलन, मदन पुरी, प्राण, मेहमूद, मनमोहन, धुमाळ जास्त आवडले.

मेहमूदची वेडसर बहिण ते गूढ शीर्षकवाले गाणे म्हणत असते तर ही गोष्ट मेहमूद सांगत का नाही? भटकती आत्मा वगैरे का सांगतो?
हेलनचे बीचवरचे किटी केलीचे गाणे मस्त आहे.

नंदाचे अती तंग कपडे पाहूनच मला गुदमरल्यासारखे होत होते!

डॉक्टर आचार्य Poison असं जन्मांधाला दिसेल एव्हढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेली बाटली आणि सेठ धरमदास खंजीर घेऊन परदेशी प्रवासाला का निघालेले असतात?
>>> चेक इन केले असेल हो ☺️
तेव्हा सर्व परदेशांत भारतीयांना व्हिसा-ऑन-अरायव्हलची सोय होती का?
>>> बऱ्याच देशात अजूनही व्हिसा ऑन अरीवल आहे,बऱ्याच देशात तर भारतीय व्हिसा शिवाय जाऊ शकतात. खूप लोकांना हे माहीत नाहीय.

मेहमूदची वेडसर बहिण ते गूढ शीर्षकवाले गाणे म्हणत असते तर ही गोष्ट मेहमूद सांगत का नाही? >>>
याचा खुलासा आहे चित्रपटात. मेहमूदला एकट्यालाच यायला बजावलेलं असतं, तो तिला लपवून आणतो / ठेवतो.

'जान-ए-चमन शोला बदन' हे सुरेख रोमॅन्टिक गाणं शारदाच्या किनर्या आवाजाने पूर्ण खराब केलंय
>>> खून झालाय आणि हे रोमान्स काय करतायत☺️ काहीही डायरेक्षण.

म्हणून तर रोमान्स करतात. हेलनच्या तोंडी असेच काहीसे संवाद आहेत ..खुनासाठी आपला नंबर कधी येणार याची वाट पाहत बसण्यापेक्षा मजेत वेळ घालवूया.

स्ट्रेस किंवा दुःखी घटनांचा रोमान्स कमी होण्याशी संबंध नाही ☺️☺️
रोमान्स हा उत्तम स्ट्रेस बस्टर असतो असे म्हणतात.

प्लिज पर्सनल चॅलेंज वर येऊ नका. ☺️☺️
भीती, दुःख,ग्रिफ हेही एका हद्दीनंतर मन बधिर होऊन मागे अंतर्मनात जाते.
महायुद्ध, नाझी इरा मधले संदर्भ तपासून पहा.

चॅलेंज वगैरे नाही हो, कल्पना करून बघा की .... अशा अर्थाने घ्या.

भीती, दुःख,ग्रिफ हेही एका हद्दीनंतर मन बधिर होऊन मागे अंतर्मनात जाते.
महायुद्ध, नाझी इरा मधले संदर्भ तपासून पहा.
>>
बरोबर आहे, पण त्यासाठी वेळ लागतो.

हो.वेळ लागतो हे खरे.
एकंदर हिंदी पिक्चर म्हटल्यावर लॉजिक लॅप्स आलाच ☺️☺️
प्राण,मनोज कुमार सोडून तिसरा एक हँडसम गृहस्थ असतो तो अजित का?
पहिले गाणे आणि त्यातला परदेशी डान्स पाहून करमणूक झाली.नायिका मुंग्याच्या वारुळात गेली होती आणि सारखी पाय झटकत मुंग्या घालवतेय असे वाटते ☺️☺️☺️

Pages