स्वप्नपूर्ती (भाग २)

Submitted by निन्या सावंत on 30 August, 2018 - 03:46

सकाळी साधारण 4 च्या दरम्यान कसल्याशा गोंधळामुळे जाग आली, टेंट मधून बाहेर आलो तर पाहिलं एका ग्रुप चा धांगडधिंगा सुरू होता, पुन्हा झोपायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. शेवटी पुन्हा शेकोटीजवळ ऊब घेत बसलो. सकाळी 5 पर्यंत सगळे उठले कारण आम्हाला सूर्योदय बघायला जायचे होते ते म्हणजे सह्याद्रीतल्या सर्वात उंच शिखरांपैकी एक असणाऱ्या तारामती शिखरावर.
तोंडावर पाणी मारून 5:30 च्या दरम्यान आम्ही कोकणकड्यावरून तारामतीला जाणाऱ्या वाटेला लागलो. १५-२० मिनिटांच्या चालीनंतर वाट चढणीला लागली. आत्ता सुद्धा काळोख असल्यामुळे वाट कळत नव्हती पण त्या पायवाटेच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी होती आणि गार वारा सोबतीला होताच. साधारण अर्ध्या-पाऊण तासानंतर आम्ही एका लोखंडी शिडीजवळ पोहोचलो. शिडी ची अवस्था म्हणायला चांगली होती पण काळजी घेणं आवश्यक होतं. एक पाऊल जपून टाकत आम्ही ती शिडी पार केली आणि त्यानंतर आणखी 15-20 मिनिटांतच आम्ही तारामती शिखरावर दाखल झालो. पश्चिमेकडे चंद्र आपलं अस्तित्व दाखवून देत होता तर पूर्वेकडून सूर्यदेव सुद्धा आपला पवित्रा घेण्याच्या तयारीत होते त्यामुळे निळ्या आकाशात सोनेरी रंग आपले स्थान निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. रंगांची ही जुगलबंदी बघायला मजा येत आकाशात निळ्या आणि सोनेरी रंगांची उधळण होत असतानाच, पूर्वेकडून तो महाकाय गोळा हळूहळू वर सरकू लागला आणि आम्ही सगळेच त्या दृष्याकडे भारावल्या सारखे बघत राहिलो. असं किती वेळ बघत राहिलो माहिती नाही पण रंगांची ती मुक्त उधळण पाहण्यात वेगळीच मजा येत होती. थोड्या वेळाने भानावर आलो. तारामती वरून कालाडगड, अजोबागड अगदी स्पष्ट दिसत होते तर लांबवर कळसुबाई डोकं वर काढून अमच्यांकडे बघत होती. थोडं फोटो सेशन करून मग आम्ही पुन्हा तारामती शिखर उतरायला सुरुवात केली. त्या लोखंडी शिड्या उतरताना एक वेगळंच दडपण मनावर येत होतं, थोडा जरी पाय घसरला तरी किमान हात पाय तरी तुटतील एवढी उंची होतीच. त्यामुळे थोडी जास्त खबरदारी घेत त्या शिड्या उतरलो आणि त्यानंतरची ती गर्द झाडाची वाट उतरत आम्ही पुन्हा सपाटीवर चालायला सुरवात केली. आमच्या पैकी काहीजण इथून मग आपली "महत्वाची" कामं उरकायला गेले बाकीची मंडळी सुद्धा इकडे तिकडे विखुरली होती. मी आणि आरती आम्ही दोघे एकत्र होतो, मग थोडा timepass करत इकडे तिकडे उड्या मारत तर कधी तिथे असणाऱ्या छोट्या छोट्या डबक्यांवर मस्ती करत निवांत आम्ही भास्कर दादाच्या खोपटावर गेलो. काही "महत्वाची" कामं उरकून पोहे आणि चहा पोटात ढकलून आम्ही थेट कोकणकड्याकडे धावलो.
कोकणकडा :- निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणा हवं तर, अर्ध्या किलोमीटर परीघ असलेला आणि वाटीच्या आकाराचा कडा. आज पर्यंत ऐकलं होतं, वाचलं होतं आज याची देही याची डोळा त्याचा रांगडेपणा अनुभवत होतो. सरळ उभं राहून खाली वाकून पाहणं जवळजवळ अशक्यच, त्यामुळे झोपून त्याच्या उंचीचा नजारा डोळ्यात भरून घेत होतो. आम्ही वर आलो ती वाट समोर दिसत होती, खाली बेलपाडा गाव, पलीकडे नाणेघाट आणि नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरवगड साद घालत होते. एव्हाना सकाळचे 10 वाजले होते आणि आम्हाला केदारेश्वर च्या शिवलिंगाला भेट देऊन दुपारच्या जेवणाला खिरेश्वर ला उतरायचं होतं. कोकणकडा आहेच असा की त्याच्या भेटीला गेलेल्या माणसाला तिथून लवकर निघण्याची इच्छा होत नाही, माझं ही तसंच काहीतरी झालं होतं पण एखाद्या जागेवर यायची जशी वेळ असते तसंच त्या जागेवरून निघायची पण वेळ येतेच.
मनात नसताना नाईलाजाने तिथून निघावं लागलं, पाठपिशव्या खोचून कोकणकडा डोळ्यात भरून मंदिराकडे चालायला सुरुवात केली. 10 मिनिट सरळ चालून एक छोटासा चढ लागला आणि तिथून खाली मंदिराचं दर्शन झालं. 5 मिनिटात मंदिराजवळ आलो, दर्शन घेतलं आणि निघालो केदारेश्वराची गुहा बघायला.
कमरेपर्यंत असलेलं हाडं गोठवणारं थंड पाणी, तीन खांब पडलेले आणि एका खांबावर उभ्या त्या गुहेत मधोमध दिमाखात उभं असणारं शिवलिंग, जितकं पाण्याच्या खाली तितकंच पाण्याच्या वर. याच वर्णन करणं अक्षरशः अशक्य गोष्ट.
शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून आणि त्याच्या समोर नतमस्तक होऊन पाण्याच्या बाहेर आलो. थंड पाण्यात असताना थंडी जाणवत नव्हती पण बाहेर आलो आणि अक्षरशः कुडकुडायला लागलो. वस्त्रपरिवर्तन करून आलो आणि पाहिलं तर आमच्या ग्रुप चे बरेच जण पुढं निघून गेले होते. लगेचंच वाटेला लागलो. राजमार्गाने उतरायची खूप इच्छा होती पण उशीर खुपचं झाला होता आणि काल नळीच्या वाटेने चढताना काही लोकांना त्रास पण झाला होता त्यामुळे ग्रुप लीडर्सनी टोलर खिंडीतून उतरायचा निर्णय घेतला. टोलार खिंडीकडे जायला बराच वेळ लागतो कारण 7 टेकड्या चढउतार व्हाव्या लागतात असं ऐकलं होतं. पण त्या वाटेला सुद्धा फाटा देत आम्ही दुसऱ्या वाटेने साधारण तासाभरात टोलर खिंडीच्या टोकावर आलो. टोलार खिंडीची वाट अखंड कातळात आहे, उतरताना जपून पावलं टाकत खाली उतरत होतो. खिंडीच्या अगदी खाली थोड्या रेलिंग होत्या नाहीतर बाकी आधाराला कुठेच काही नाही. थोड्या वेळाने खिंड संपली आणि वाघ्रेश्वर शिल्प आहे तिथे येऊन पोहोचलो. खिंडीतून खाली आलो त्याच्या समोरची वाट कोठळे गावात उतरते. त्या जंक्शन वर लिंबू पाणी पिऊन बाकीच्यांची वाट राहिलो कारण पहिल्यांदाच आलेलो असल्याने पुढे जायची वाट माहिती नव्हती मग नसती रिस्क घेण्यापेक्षा त्याच वेळात एक झकास पावर नॅप घेतला.
साधारण अर्ध्या तासाच्या विश्रांती नंतर आम्ही खिरेश्वर कडे उत्तरायला सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या चालीनंतर खिरेश्वरला आलो आणि मारुती दादाच्या घरासमोर बॅग टेकवल्या. जेवण उरकलं आणि सहज म्हणून गडाकडे नजर टाकली, समोर दिसणारी टोलार खिंड, बालेकिल्ला, नेढं, त्या नेढ्यातून येणारी राजमार्गाचं वाट सगळं अप्रतिम दिसत होतं. काही तासापूर्वी आपण त्या बालेकिल्ल्याच्या खाली होतो यावर विश्वास बसत नव्हता.
जेवण उरकून 4 च्या दरम्यान खिरेश्वर चा निरोप घेतला. शरीर थकलं होत पण मनातून नळीची वाट, कोकणकडा, भास्कर दादा चं खोपटं, तारामती शिखर, सूर्योदय, कोकणकडा, केदारेश्वर गुहा, टोलार खिंड हे सगळं जायला तयार नव्हतं किंवा मला ते जाऊ द्यायचं नव्हतं. आज एक स्वप्न पूर्ण झालं होतं त्याचा आनंद होताच पण त्याही पेक्षा आनंद होता की आयुष्यात एका नव्या सह्यसख्या ची भर पडली होती जो कधीही तयार असणार होता माझं स्वागत करायला अगदी हसतमुखाने आणि अगदी निरपेक्षपणे!!!

Group content visibility: 
Use group defaults

सुंदरच!
पण फोटोंशिवाय मजा नाही !