मा. ल. क. - १०

Submitted by हरिहर. on 29 August, 2018 - 11:13

नजर पोहचेल तिथपर्यंत वाळवंटच दिसे. सोनेरी वाळूंच्या लहान लहान टेकड्या खुप सुरेख दिसत. दिवसा अंग जाळणारे लख्ख उन असे तर रात्री शरीर गोठवणारा गारठा असे. मात्र हे सुंदर दिसणारे विस्तीर्ण आणि लहरी वाळवंट वाट चुकलेल्यांचे हमखास जीव घ्यायचे. रस्ते तसेही नसतच वाळवंटात. जे असत ते रात्रीतुन बदलून जात. रस्तेच काय पण वाळूच्या वादळाने टेकड्याही आपल्या जागा बदलत असत. आकाशवाचन करणारा, ताऱ्यांची आणि वाळवंटातील सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती असलेलाच माणूस हे रण पार करु शके. एकदा का दिशा हरवली की मग प्रवास करणाऱ्याला ती परत सापडने अवघड असे. अर्थात सावल्यांचा जाणकार मात्र क्षणात दिशा सांगू शके. पिण्याचे पाणीही फार जपुन वापरावे लागे. जवळ असलेल्या पाण्याच्या साठ्याचे नियोजन चुकले तर तहान तुमचा जीव घेणार हे नक्की. पण अफाट पसरलेल्या रखरखाटातही निसर्गाने आपली कमाल दाखवली होतीच. उंच असलेल्या चार पाच वाळूच्या टेकड्यांच्या बेचक्यात बराच मोठा पट्टा अगदी हिरवागार होता. वाळवंटी खुरटी झुडपे आणि खुप सारी खजुरांची झाडे. प्रत्येक झाड खजुरांच्या गुच्छांनी लगडलेले.

काटेरी झुडपे जरी आपोआप आली असली तरी खजुरांनी लगडलेली झाडे मात्र लावलेली होती. त्यांची निगा राखली जायची. या खजुरांच्या आणि झुडपांच्या आधारावर तेथे तिन-साडेतिनशे उंबरा असलेला गाव वसला होता. गावातली विशिष्ट पध्दतीने बांधलेली फिकट खाकी घरे त्या हिरवाईत उठून दिसत. पण त्यातही गावाचा कारभार चालवणाऱ्या सरपंचाचे घर अगदीच उठुन दिसे. गावाचा मुख्य व्यवसाय खजुरांचा. वाहतुकीचे साधन म्हणजे उंट. उंटांचा उपयोग दुध आणि कातडे यासाठी देखील होई. खजुर हाताशी आले की उंटांचा एक काफीला निघे. काही दिवसांचा प्रवास करुन शहरात खजुराची विक्री करुन, जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करत असे. पुन्हा काही दिवसांचा खडतर प्रवास करुन काफीला गावात येत असे. मरुस्थलच ते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तशी वाणवाच होती. गावात फक्त दोन विहीरी होत्या. एक सरपंचाच्या घराच्या आवाराच्या आत होती तर दुसरी गावाच्या मध्यभागी. विहिरी खोल होत्या पण जपुन पाणी वापरले तर वर्षभर पाण्याचा पुरवठा आरामात होत असे. अर्थात सरपंचाच्या विहिरीचे पाणी वापरण्याची गावाला परवानगी नव्हती. पण त्याने फारसा फरक पडत नसे कारण गावातली विहिर सगळ्यांची तहान भागन्याईतके पाणी देई. सरपंच मात्र आपल्याच सुरेख बांधून काढलेल्या विहिरीचे पाणी प्यायचा.

उंटाचा काफीला नुकताच गावात आला होता. घराघरात वाणसामानाची सध्या तरी कमी नव्हती त्यामुळे प्रत्येकजन आनंदात होता. दिवस उगवत होता, मावळत होता. उंट काटेरी झुडपांवर चरत होते. इकडे तिकडे फिरत होते. अशातच एका घरातून खुप मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. येतच राहीला. मग मागोमाग रडण्याचाही आवाज आला. गावकरी धावले. काय झाले ते कुणालाच समजेना. त्या घरातली स्री तोंडावर पदर ओढून म्हणाली “सकाळपासून हे असंच चालले आहे. कधी हसतात तर कधी रडतात. काहीही बडबड करतात. वेड लागल्यासारखे वागतात.” गावकरी विचारात पडले. पण त्यांच्या हातात काहीच नव्हते. वैद्याकडे तरी कुठे नेणार? मधे दोन तिन दिवस गेले आणि तसाच प्रकार दुसऱ्या घरात घडला. यावेळी तर त्या घरातील पती आणि पत्नीही वेड्यासारखे करु लागले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. आणखी दोन दिवस गेले. पुन्हा तसाच प्रकार घडला. यावेळी तर त्या घरातले सगळेच वेडे झाले. आता मात्र गावकरी काळजीत पडले. हा कोणत्या देवतेचा कोप आहे की कुणी जादूटोणा केलाय हे काही त्यांना समजेना. दुसऱ्या दिवशी गावात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या प्रकारावर साधक बाधक चर्चाही सुरु झाली. प्रत्येकाने वेगवेगळी अनुमाने बांधली. अडाखे लावले. पण या गुढ प्रकाराची उकल काही होईना. तेवढ्यात गावातील एका वृध्दाने जरा अंदाज घेतला आणि सांगितले
“बहुतेक गावातील विहिरीचे पाणी दुषीत झाले असावे. हे दुषीत पाणी पिण्याने असा आजार होण्याची शक्तता आहे.”
पण आता यावर उपाय काय? पाण्याशिवाय तर एक दिवसही रहाता येत नाही. शेवटी सगळे गावकरी मिळून सरपंचाच्या वाड्याकडे वळाले. सकाळी सकाळी सर्व गावकऱ्यांना वाड्याच्या दारात पाहुन सरपंच बाहेर आला. गावकऱ्यांनी सरपंचाला पाहुन एकच गोंधळ केला. शेवटी त्या म्हाताऱ्याने सर्वांना शांत करत सरपंचाला गावाची अडचण सांगीतली. गावातल्या विहिरीचे पाणी दुषीत झाल्यामुळे वाड्यातली विहिर गावकऱ्यांसाठी उघडण्याची विनंती केली. सरपंचाने सर्व ऐकून घेतले. पण त्याला काही हे पटले नाही. काहीही झाले तरी तो सरपंच होता. सामान्य गावकऱ्यांनी त्याच्या खास विहिरवर पाणी भरणे त्याला कमीपणाचे वाटले. सरपंचाने अत्यंत उर्मट आवाजात गावकऱ्यांना नकार दिला.
“तुम्ही तुमची अडचण कशीही सोडवा, मी काही माझ्या विहिरीचे पाणी तुम्हाला देणार नाही.” असं म्हणत सरपंचाने वाड्याचे दार लावले. त्या दिवशी सारा गाव तहानलेलाच झोपी गेला. पण दुसऱ्या दिवशी परत बैठक भरली. विचारांचा काथ्याकुट झाला. शेवटी गावातल्या वृध्दांनी मिळून एक निर्णय घेतला. तहानेने व्याकूळ होऊन मरण्यापेक्षा सगळ्यांनी आहे तेच दुषीत पाणी पिऊन ‘वेडे’ होऊनका होईना पण जीव वाचवावा. अनेकांनी याला विरोध केला. काही तयार झाले. पण शेवटी तहानेने सगळ्यांनाच विहिरीच्या काठावर आणुन ठेवले. “काय व्हायचे ते होऊद्या” म्हणत गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवसापासून दुषित विहिरीचे पाणी प्यायला सुरवात केली. हे ऐकून सरपंच गर्वाने हसला. पहिल्याच आठवड्यात गावातली बरीच मानसे वेडी झाली. महिनाभरात निम्मा गाव वेडा झाला. सरपंच वाड्यात बसुन हे सर्व हसत हसत पहात होता. एक दिवस असा आला की ते पाणी पिऊन गावातला शेवटचा शहाणा मानूसही वेडा झाला. शेवटी जगण्याच्या इच्छेने साऱ्या गावाला वेडे केले.

बरेच दिवस झाले गावात चक्कर मारली नाही म्हणून सरपंच सगळा जामानिमा करुन मोठ्या तोऱ्यात गावात फिरायला म्हणून वाड्याबाहेर पडला. गावात काही अंतर चालून जाताच त्याला मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला. सरपंचाने थबकून पाहिले. सगळे गावकरी त्याच्याभोवती गोळा झाले होते आणि त्याच्याकडे बोट दाखवून मोठ्याने हसत म्हणत होते “अरे हा पहा कोण वेडा आला आहे आपल्या गावात!”

मार्मिक लघु कथा
(कथासुत्र: अज्ञात, शब्दांकन: माझे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेखन. अंतर्मुख करणारी कथा.यावरून मॉब सायकॉलॉजी किंवा मेजॉरिटीज लॉ आठवलं. याचा कथेशी संबंध नाही पण संबंध जोडायची खोड आडवी येते.

मस्त लिहिलंय. Happy

ती एक जन्मांधळ्यांच्या गावात एक डोळस माणूस येतो ती कथा आठवली. सगळे मिळून ठरवतात की त्याचं रंगां/दृष्यांबद्दलचं जे वेड्यासारखं बोलणं आहे ते त्याच्या चेहर्‍यावरील दोन 'गाठीं'मुळे आहे, आणि त्या 'गाठी' काढून टाकून ते त्याला 'बरं'ही करतात.

ह्म्म... माझ्या मते हि गूढकथा आहे. प्रत्यक्षात सरपंचाच्याच विहिरीचं पाणी दूषित आहे/होतं; त्याचा परीणाम होउन तो भ्रमिष्ट होतो आणि त्याला संपुर्ण गांव वेडं दि/भासायला लागतं... Proud

आवडली.

> Sarpancha cha vadh kela pahije hota gavkaryanni > हो मूळ कथेचा शेवट बहुतेक तसाच आहे.