वाटणी - एक लघुकथा

Submitted by अनिंद्य on 29 August, 2018 - 07:48

त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते.

- 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला.

मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले.

पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता. त्याच्यापेक्षा पहिला माणूस अगदीच कमकुवत होता, पेटीला नुसता हात लावून तो मागेमागे चालत होता - स्वतःचा हक्क कायम ठेवत.

दोघे सुरक्षित स्थानी पोचले. पेटी खाली ठेवून दमलेल्याने विचारले - आता बोल, मला ह्यातील किती माल देणार?

- पाव भाग तुझा, रुपयात चार आणे.

- खूप कमी होतात.

- कमी नाही, उलट खूप जास्त देतोय. पेटीवर आधी मीच हात टाकला होता ना?

- ते ठीक आहे, पण हे धूड इथवर उचलून कोणी आणले?

- ठीक आहे. दोघांत अर्धे-अर्धे वाटून घेऊ. बोल, मंजूर?

- मंजूर. उघड पेटी.

पेटी उघडली. त्यातून हाती तलवार घेतलेला एक माणूस बाहेर पडला. तलवारीनी सपासप वार करत त्याने दोन वाटेकऱ्यांची चार तुकड्यात वाटणी केली !

(सआदत हसन मंटो ह्यांच्या 'तक़सीम' ह्या मूळ उर्दू कथेवर आधारित.)

* * *

ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :-

तक़सीम ही कथा प्रसिद्ध झाली १९४८ साली. पण तेंव्हा मंटोंना 'साहित्यकार' मानायला कोणी तयार नव्हते. अनेक लोकांना तर मंटोंना वेड लागलंय असा संशय होता. पुढे वीसेक वर्षानंतर त्यांच्या साहित्याला लोकप्रियता मिळाली. मला स्वतःला मंटोंच्या कथा म्हणजे सत्य, रूपक, शब्दकळा आणि स्थलकालनिरपेक्ष साहित्यमूल्य ह्या सर्वच कसोट्यांवर उजव्या वाटतात.

भाषान्तरातले न्यून ते माझे समजावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. रेख्तावर मंटोच्या सगळ्या कथा आहेत. मी इतक्यातच मंटो चित्रपट पाहिला आणि कथा शोधल्या. "टिटवाल का कुत्ता" पण अनुवाद करा की. आय होप की कुठला कॉपीराईट वगैरे इशु नसावा.

मंटोविषयी थोडी माहिती
लोकसत्ताच्या ब्लॉगवर पण मिळेल.

@ सामो
@ देवकी

आभार.

@ असुफ ,
मी भाषान्तर केलेली आणखी एक मंटो कथा :- https://www.maayboli.com/node/67120

@ वेका,
'सगळ्या' कथा नाहीत तिथे, पण ज्या आहेत त्या छान आहेत.

Pages